Saturday, 19 January 2013

पाकिस्तानच्या टिकण्यात, त्याला टिकविण्यात काही अर्थ आहे काय?रविवारचे भाष्य दि. २०-०१-२०१३ करिता

जम्मू-काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर तैनात असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने नियंत्रणरेषा ओलांडून म्हणजे भारताच्या हद्दीत येऊन, दोन भारतीय सैनिकांना ठार केले आणि त्यापैकी एका सैनिकाचे डोकेही कापून नेले. या क्रौर्याने आपला सारा देश पेटून उठला. अनेक राजकीय पक्षांनी पाकिस्तानच्या कृत्याचा प्रखर निषेध करून पाकिस्तानशी जशास तसे वागून, त्याला धडा शिकविण्याची मागणी केली. पण भारत सरकार शांत राहिले. त्याने नियंत्रणरेषेवर दोन्ही बाजूंच्या सेनाधिकार्‍यांची शांतिबैठक (ध्वज बैठक) बोलाविण्याचा प्रस्ताव पुढे केला. पाकिस्तानकडून त्याला सुरवातीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. भारतात वातावरण इतके तापले की, हवाई दलाच्या प्रमुखाला, ‘आम्हाला अन्य पर्यायांचा विचार करावा लागेलअसे उद्गार काढावे लागले. स्थलसेनाध्यक्षांनाही असेच कठोर निर्धाराचे शब्द उच्चारावे लागले. अखेरीस उशिरा का होईना, ती क्रूर घटना घडल्यानंतर एक आठवड्याने, प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनाही म्हणावे लागले की, ‘‘या राक्षसी कृत्यानंतर, पाकिस्तानशी आमचे संबंध नेहमीसारखे राहणार नाहीत.’’ प्रधानमंत्री आपल्या वक्तव्यातून देशाच्या जनतेचीच भावना व्यक्त करीत होते.

क्षुब्धतेचा आविष्कार
८ जानेवारीला नियंत्रणरेषेवर ती निर्दयी कत्तल घडल्यानंतर सारा देश क्षुब्ध झाला. परिणामस्वरूप हॉकी खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना परत जावे लागले. महिलांचे जागतिक क्रिकेट सामने मुंबईला खेळले जावयाचे होते. मुंबईच्या क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले की, हे सामने मुंबईला होऊ शकणार नाहीत. ते सामने नंतर अहमदाबादला घेण्याचा विचार प्रकट झाला. तेथील क्रिकेट मंडळानेही तीच भूमिका घेतली. आता, तर ते सामने ओडिशात होणार आहेत, असे वृत्त आहे.

शौर्य आणि क्रौर्य
पण काही प्रसारमाध्यमांना, भारताचा हा त्वेष पसंत नाही. त्यांनी याला भडकाऊ देशभक्ती’ (Chauvinistic Jingoism) म्हणून त्याची हेटाळणी केली. या मंडळींना पाकिस्तानधार्जिणे म्हटले, तर ते त्यांना आवडायचे नाही. पण प्रश्‍न असा की, त्यांना पाकिस्तानधार्जिणे का म्हणू नये? पाकिस्तान सरकार व सेना म्हणते की, आम्ही डोके कापलेच नाही. त्याचा उलट आरोप असा आहे की, भारताच्या सैनिकांनीच नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. आपण क्षणभर हे मान्य करू की, भारतीय सैनिकांनी नियंत्रणरेषेचे उल्लंघन केले. म्हणून पाकी सैन्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व त्यांना ठार केले. पण ठार केलेल्या सैनिकाचे डोके का कापले? ते अगोदर कापून, नंतर त्याला ठार करण्यात आले, असे तर झाले नाही? आणि हे होणे अशक्य नाही. मुसलमानांच्या डोक्यावर कोणते भूत सवार असते हे कळत नाही, त्यांना क्रौर्य पसंत पडते. शौर्य आणि क्रौर्य यातला फरकच लक्षात येत नाही

क्रौर्याचे कारण?
आता सैन्याचे अधिकारी सांगत आहेत की, डोके कापून नेण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही दोनदा भारतीय सैनिकांच्या बाबतीत अशाच घृणास्पद घटना घडल्या होत्या. तथापि, आपणांस याचे आश्‍चर्य करण्याचे कारण नाही. कारगिल युद्धाच्या वेळी, भारतीय विमानदलातील एक विमानचालक चुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेला, तर त्याला पकडल्यानंतर त्याची हालहाल करून हत्या करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणत: १०-११ वर्षांपूर्वी बांगला देशाच्या सैनिकांच्या तावडीत काही भारतीय सैनिक सापडले होते. त्यांना केवळ ठार करण्यात आले नव्हते. त्यांची कातडीही सोलून काढलेली होती. महमद घोरीने पृथ्वीराज चव्हाणांचे डोळे फोडले व नंतर त्याला ठार केले. तसेच औरंगजेबाने संभाजी राजांचे डोळे फोडून व नंतर एकेका अवयवावर शस्त्राघात करून त्यांना ठार मारले होते. या रानटी मध्ययुगातील घटना आहेत, असे आपण मानतो. पण नाही, हा मध्ययुगातील रानटीपणाचा आविष्कार नाही. तो मुस्लिम समाजाच्या अंगभूत क्रौर्याचा आविष्कार असावा असे वाटते. म्हणून असे राक्षसी क्रौर्य २० व्या व २१ व्या शतकातही आपणांस पहावयास मिळते. ह्या घटना अपवादात्मकही नाहीत. काश्मीरच्या खोर्‍यातून काश्मिरी पंडितांना हाकलण्यासाठी हीच तर्‍हा खोर्‍यातील मुसलमानांनी अंमलात आणली होती. जिज्ञासूंनी दहशतीच्या छायेत’ (राजहंस प्रकाशन) हे पुस्तक वाचावे. हे पुस्तक तेज एन्. धर यांच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. मूळ पुस्तकाचे शीर्षक आहे- 'Under the shadow of militancy : the diary of an unknown Kashmiri'. ही ती अमानुष तर्‍हा आहे. माणसाला सरळ मारायचे नाही. त्याचे हालहाल करावयाचे. बघणार्‍यांच्या मनात दहशत निर्माण करावयाची आणि मग संपवायचे अशी ही रीत आहे. ही रीत इस्लामच्या शिकवणीतून आली म्हणावी की अरब टोळ्यांच्या चरित्राच्या अनुकरणातून आली असे समजावे, हा वादाचा मुद्दा आहे. पण मुसलमानांच्या शौर्याचा, क्रौर्य हा अविभाज्य घटक बनला आहे. १९७१ साली, आपल्या भारताच्याही ताब्यात पाकिस्तानचे, एकदोन नव्हे, तब्बल ९२ हजार सैनिक कैदी म्हणून होते. उडविले गेले काय एखाद्याचे तरी डोके? सिमला करारानंतर ते कैदी पाकिस्तानात परत पाठविण्यात आले. असा एक सैनिक परत पाठवणीचा कार्यक्रम वाघा सीमेवर मी बघितला आहे. सर्व जण हातात पवित्र कुराणाची प्रत घेऊन भारतीय सीमेतून, नो मॅन्स लॅण्डमध्ये व तेथून पाकिस्तानच्या सीमेत गेले. हे का घडले? आणि पाकिस्तान किंवा बांगला देश यांच्याकडून हे का घडू शकत नाही, या प्रश्‍नाचे उत्तर मुसलमानांनीच दिले पाहिजे.

द्वेषातून जन्म
आपल्या भारतातील फार मोठ्या संख्येतील जनतेला वाटते की, पाकिस्तानशी आपले संबंध सुरळीत असावेत. शांततेचे असावेत. परस्परात व्यापार चालावा, वाहतूक सुरू असावी. खेळ, नाटक, सिनेमा आदी क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य असावे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध सुधारतील. पण आपली ही अपेक्षा व्यर्थ आहे. आपण सर्वांनी, निदान जाणत्यांनी, प्रसारमाध्यमांनी आणि पाकिस्तानचा पुळका वाटणार्‍या सज्जनांनी, हे जाणून घ्यावे की हे शक्य नाही. कारण, पाकिस्तानच्या जनतेला भलेही शांततेचे जीवन हवे असो तेथील सैन्याला भारताशी सौहार्दपूर्ण संबंध नको आहेत. पाकिस्तानचा जन्मच मुळी भारताच्या खरे म्हणजे हिंदूंच्या द्वेषातून झाला आहे. अलीकडेच वकार अहमद या लेखकाचा द आयडिऑलॉजी ऑफ पाकिस्तान : अ थॉर्नी इश्युया शीर्षकाचा लेख माझ्या वाचनात आला. लेखक प्रश्‍न विचारतो की, पाकिस्तानचा सिद्धांत काय आहे? ‘इस्लामम्हणावा तर बांगलादेश पाकिस्तानातून का अलग झाला? १९४७ साली तर बांगला देश पाकिस्तानचाच भाग होता. तेथेही इस्लामला मानणारे मुसलमानच बहुसंख्य होते. असे असतानाही टिक्काखानच्या सैनिकांनी मुसलमान बंगाली स्त्रियांवर अत्याचार का केले? वकार अहमद प्रश्‍न उपस्थित करतात की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, हिंदुस्थानात लोकशाही व्यवस्थेत बहुसंख्य हिंदूंचे राज्य येणार आणि त्या राज्यात मुसलमानांची उन्नती व प्रगती होऊ शकणार नाही, म्हणून पाकिस्तानची मागणी करण्यात आली म्हणावे तर किती तरी मोठ्या संख्येतील मुसलमानांना भारतातच का राहू देण्यात आले? आपण एकत्र असतो तर आपली (मुसलमानांची) संख्या ४० टक्के राहिली असती. आणि आपले राजकीय हक्क प्राप्त करण्यासाठी आपणांस अधिक बळ प्राप्त झाले असते. मग फाळणीची मागणी का? वकार अहमद यांच्या प्रश्‍नाला खरे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे हिंदूंचा द्वेष.

राष्ट्रबांधणीचा आधार इस्लाम नाही
सर्वांनी समजून घ्यावे की, इस्लाम हा राष्ट्रबांधणीचा आधार होऊ शकत नाही. अन्यथा, अरेबिया, येमेन, सीरिया, इराक, इराण, अफगानिस्थान ही वेगळी राष्ट्रे बनलीच नसती आणि त्यांच्यात परस्पर संघर्षही झाले नसते. परंतु ते संघर्ष अजूनही चालू आहेत. राष्ट्र बनण्यासाठी लोकांचा एक समान इतिहास हवा असतो. समान परंपरा हवी असते. वर्तमानाचा संबंध भूतकाळाशी असावा लागतो. काही जीवनमूल्ये म्हणजेच वेगळी संस्कृती असावी लागते. या अटी जो समाज पूर्ण करतो, त्याचे राष्ट्र बनते. त्या समुदायाला त्या संस्कृतीच्या मूल्यांचे भान असावे लागते. असे पाकिस्तानजवळ काहीही नाही. १९४७ च्या अगोदरचा संपूर्ण पाकिस्तानचा वेगळा इतिहास नाही. महापुरुष नाहीत. समान सांस्कृतिक मूल्येही नाहीत. इस्लाममजहब हाच केवळ जोडणारा एकमात्र बंध होता. पण तो राष्ट्रभाव निर्माण करू शकत नाही हे वर सांगितलेच आहे. ते सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते, तर बांगला देश वेगळा झालाच नसता. उर्दूच्या आग्रहापायी पाकिस्तान तुटले म्हणावे, तर उर्दू काही त्यांची धर्मभाषा नाही. पवित्र कुराण उर्दूत लिहिलेले नाही. इराण किंवा इराकची भाषा किंवा जवळच्या अफगानिस्थानचीही भाषा उर्दू नाही. मग उर्दूचा अट्टहास का? माझ्या मते तो एक बहाणा होता. संपूर्ण पाकिस्तानच्या लोकसंख्येत पूर्व पाकिस्तानची म्हणजे आजच्या बांगला देशची लोकसंख्या अधिक होती. पाकिस्तानची सत्तासूत्रे बंगाली भाषी मुस्लिमांच्या हाती जाऊ नये, यासाठी सारा खटाटोप होता. त्यासाठी अवामी लीगला बहुमत मिळाले असतानाही, त्या पक्षाचे नेते मुजीबुर रहमान यांना प्रधानमंत्री बनू देण्यात आले नाही. त्यांना तुरुंगात डांबले गेले. पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे.

अशांत पाकिस्तान
मला येथे हे अधोरेखित करावयाचे आहे की, पाकिस्तान हे राष्ट्रच नाही. ते एक कृत्रिम राज्य आहे. अँग्लो-अमेरिकनांच्या जागतिक राजकारणाच्या सोयीसाठी त्याची निर्मिती झाली आहे आणि ती सोयच आजपर्यंत पाकिस्तानला टिकवून ठेवीत आली आहे. परंतु, आता जागतिक राजकारणात आमूलाग्र बदल झाला आहे. रशियाची भीती उरलेली नाही. शीतयुद्ध संपलेले आहे आणि इकडे पाकिस्तान मात्र अशांत आहे. अगदी अलीकडेच पाकिस्तानच्या बलुचीस्तान या प्रांतात, एका घटनेत, सुमारे शंभर शियापंथीय मुसलमानांची हत्या करण्यात आली. का? कारण एकच की ते मुस्लिम असले तरी अल्पसंख्यक शियापंथीय होते. बलुचीस्तान अशांत आहे. सिंधमध्ये स्वायत्ततेसाठी अनुकूल वारे पुन: वाहू लागले आहेत. १९४७ पर्यंत वायव्य सरहद्द प्रांतात कॉंग्रेस पक्षाचे सरकार होते. तेथील पुश्तुभाषी पठाणांना भारताशी संलग्नता हवी होती. आता परिस्थिती काय आहे, हे सांगता येणार नाही. पण या प्रांताच्या काही भागांत पाकिस्तान सरकारची हुकुमत चालत नाही, टोळीवाल्यांचा हुकूम चालतो, ही वस्तुस्थिती आहे.

हुकूमशाहीची आवड
पाकिस्तान हे एक फसलेले राज्य (Failed State) आहे. ते टिकणे शक्य नाही. तेथे सध्या गेल्या पाच वर्षांपासून लोकशाही व्यवस्था दिसत आहे. पण ती अमेरिकेच्या दडपणामुळे. इस्लामला लोकशाहीचे वावडे असावे असे वाटते. तुर्कस्थानसारखा एखादा अपवाद सोडला, तर बहुतेक सर्व मुस्लिम राष्ट्रांमध्ये अलीकडेपर्यंत हुकूमशाही राजवट होती. अमेरिकेच्या दडपणामुळे लोकशाहीचा देखावा तेवढा दिसत आहे. पण अमेरिकेने आपला हस्तक्षेप थांबविला तर सर्वत्र पुन: हुकूमशाहीची राजवट स्थापन होईल. बाकीच्या देशांचे सोडून द्या. जवळच्या अफगानिस्थान व पाकिस्तानचाच विचार करू या. एक वर्षानंतर अफगानिस्थानातून अमेरिका व त्याचबरोबर इतर नाटो राष्ट्रे आपली सैन्ये परत नेणार आहेत. त्यानंतर अफगानिस्थानात तालिबानची सत्ता पुन: येणार याविषयी शंका नको. पाकिस्तानात कधीच लोकशाही व्यवस्था स्थिरावली नाही. १९५८ साली अयूबखान हे लष्करशहा सत्ताधारी बनले. त्यांनी ११ वर्षे सत्ता राबविली. १९६९ मध्ये याह्याखान यांनी त्यांना हटवून आपली सत्ता स्थापन केली. याह्याखानही लष्करी अधिकारीच होते. नंतर याह्याखानांनी झुल्फिकारअली भुत्तो यांच्या स्वाधीन सत्ता केली. ते निवडणुकीतून सत्तेवर स्थिरावत नाही तोच झिया-उल-हक या सेनाधिकार्‍याने त्यांना पदच्युत करून व एका बनावट खटल्याचा आधार घेऊन त्यांना फासावर लटकविले. मग एका विमान अपघातात झिया-उल-हक यांचा मृत्यू झाला. पुन: थोडा काळ लोकशाहीव्यवस्था नांदली, तर सेनापती मुशर्रफ यांनी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांना बडतर्फ करून सत्ता आपल्या हाती घेतली. आता २०१३ त पाकिस्तानात निवडणूक होऊ घातली आहे. पण सध्याचे पाकिस्तानचे सरसेनापती कयानी यांना सत्तेची हाव सुटलेली आहे. त्यांनी जरदारींना पदच्युत करून सत्ता हस्तगत केल्याची बातमी कळावयाला फार काळ वाट पहावी लागेल असे वाटत नाही.

नवी रणनीती
हा सर्व तपशील देण्याचे कारण हे की, पाकिस्तान म्हणजे किंवा पाकिस्तानचे सरकार म्हणजे पाकिस्तानी जनता हे समजण्याचा भाबडेपणा आपण करू नये. पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानी सेना हे समीकरणच आपण ध्यानात घेतले पाहिजे; आणि त्या सेनेचा पराभव करूनच आपण पाकिस्तानी जनतेला सुखी करू शकतो. खेळ किंवा इतर मनोरंजक साधने यांच्याबाबतीतील परस्पर सद्भावावर पाकिस्तान सरकारची किंवा पाकिस्तानी सेनेची नीती अवलंबून रहावयाची नाही. तेव्हा आपणांस पाकिस्तान टिकविण्यात रस असण्याचे कारण नाही. पाकिस्तानचे विघटन हेच आपल्या दृष्टीने हितप्रद राहील. सुरवात पाकव्याप्त काश्मीरपासून करावयाला हरकत नसावी. महाराजा हरिसिंगांनी भारतात विलीन केलेले संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य हा भारताचा अविभाज्य घटक आहे, ही आपली अधिकृत भूमिका आहे. ती आपण राष्ट्र संघातही मांडली आहे. २२ फेब्रुवारी १९९४ ला आपल्या सार्वभौम संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने पारित केलेल्या ठरावातही त्या भूमिकेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. या जम्मू-काश्मीर राज्याचा काही भाग पाकिस्तानने आक्रमण करून, अवैध रीत्या आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. तो परत मिळविण्याचा आपल्याला अधिकार आहे. तशी संधी, कारगिल युद्धाच्या वेळी आपणांस प्राप्त झाली होती. आता पुन: १४ वर्षांनी, आपल्या सैनिकांच्या बर्बर कत्तलीनंतर आपणांस ती संधी प्राप्त झाली आहे. या पाकव्याप्त काश्मिरातील फार मोठ्या संख्येतील जनता पाकिस्तानचे जोखड झुगारून देण्याच्या मन:स्थितीत आहे. आपणांस त्याचा फायदा होऊ शकतो. त्यांना भारताकडून मदतीची अपेक्षा आहे.
बलुचीस्तान व सिंधही स्वतंत्र होण्यासाठी उत्सुक आहेत. आपली तेथल्या लोकांना मदत असली पाहिजे. भारतापासून पंजाब तोडण्यासाठी पाकिस्तान शिखिस्थानवाल्यांना मदत करू शकतो, तर आपण बलूच व सिंधी लोकांना का मदत करावयाची नाही? श्रीमती इंदिरा गांधींनी अवामी लीगला मदत केली नसती, तर बांगला देश निर्माण होऊ शकला असता काय? आपण इंदिराजींच्या नीतीचे अनुसरण केले पाहिजे. कशी आणि किती मदत करायची हे तपशिलाचे व रणनीतीचे विषय आहेत. फक्त एवढे लक्षात घेतले पाहिजे की, पाकिस्तानच्या टिकण्यात आणि त्याला टिकविण्यात आपल्याला आस्था असण्याचे कारण नाही. मग लघुदृष्टीचे सेक्युलॅरिस्ट आणि उथळ प्रवृत्तीची प्रसारमाध्यमे काहीही म्हणोत. याचा अर्थ पाकिस्तानच्या स्वातंत्र्योत्सुक प्रांतांना भारताशी राजकीय दृष्ट्या संलग्न करावे असा नाही. सांस्कृतिक दृष्ट्या ते जवळ आले पाहिजेत. म्हणजे त्यांना समावेशकतेच्या तत्त्वाचे (inclusiveness)चे महत्त्व कळेल. जैन, बौद्ध, शीख हे सारे आपापली धार्मिक वैशिष्ट्ये आणि पंथोपपंथांचे अस्तित्व सांभाळून एका विशाल संस्कृतीचे- तिला हिंदू संस्कृती म्हणायला हरकत नाही- भाग बनले आहेत. मुसलमानही तसे बनू शकतात, मग सुन्नी, शिया, कादियानी, सुफी सारे समन्वयाने राहू शकतील आणि मग भारतीय जनतेशी, या प्रांतातील जनतेचे खर्‍या अर्थाने स्नेहबंध निर्माण होऊ शकतील. आपल्याला असे स्नेहबंध हवे आहेत ना?

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. १८-०१-२०१३
babujivaidya@gmail.com

1 comment:

 1. आदरणीय
  वैद्य बाबा ....
  सादर प्रणाम ...
  भारतीय मिडिया त्यातल्या त्यात दृक्श्राव्य मिडिया खरोखर काही विशिष्ठ लोकांच्या हातचे बाहुले बनला आहे.
  पाकिस्थान आणि भारत संबंध यापुढे कदापिही सुधारने शक्य नाही .आपण सुचाविले त्या प्रमाणे खरेच पुन्हा आपण गमाविलेला प्रान्त ताब्यात घेण्याची वेळ येवून ठेपली आहे .
  ----------------
  लेख आवडला
  -----------------
  महेशचंद खत्री
  कळंबेश्वर
  मेहकर जिल्हा

  ReplyDelete