Saturday, 15 October 2011

इ त स्त स्त:

रविवार दि. १६ ऑक्टोबर २०११ चे भाष्यकराचीची दुर्दशा
कराची हे पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर आहे. सुमारे दोन कोटी लोकसंख्येचे. फार थोड्या लोकांना माहीत असेल की, १९३५ पर्यंत सिंध प्रांत, त्यावेळच्या मुंबई इलाख्याचा भाग होता. नंतर तो वेगळा प्रांत बनला आणि १५ ऑगस्ट १९४७ पासून पाकिस्तानात समाविष्ट झाला. कराची, सिंध प्रांतात आहे; त्याची राजधानी आहे.
फाळणीच्या त्या दुर्दैवी कालखंडात, लक्षावधी हिंदूंना निर्वासित होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला. तसेच, पंजाबातील काही मुसलमानही पाकिस्तानात गेले. ते बहुतेक सिंधमध्ये आणि विशेषत: कराचीत स्थिरावले. त्यांना ‘मुहाजिर’ असे म्हणतात. ‘मुहाजिर’ म्हणजेही विस्थापितच. त्यांची तेथे मोठी संख्या आहे. त्यांचा एक वेगळा राजकीय पक्षही आहे. त्याचे नाव आहे ‘कौमी मुहाजिर मुव्हमेंट.’ हे पंजाबी निर्वासित तेथे पोचले, तेव्हा मूळचे सिंधी आणि हे मुहाजिर यांच्या संघर्ष झाले. अर्थात्, मुसलमानांमध्ये संघर्ष! म्हणजे रक्तरंजित संघर्ष हे ओघानेच आले. फाळणी होऊन आता ६४ वर्षे झालीत, पण या मुहाजिरांचे मुहाजिरपण काही संपले नाही. भारतात आलेले सिंधी व पंजाबी निर्वासित समग्र समाजजीवनात संपूर्णपणे मिळून मिसळून गेले, तसे मुस्लिम मुहाजिरांचे झाले नाही. इस्लामी मनोवृत्ती आणि हिंदू मनोवृत्ती यांच्यातील हा फरक आहे.
याच्याच जोडीला, अफगानिस्थानातील पठाण निर्वासितही कराचीत येऊन पोचले आहेत. त्यामुळे सिंधी विरुद्ध मुहाजिर याप्रमाणे, सिंधी विरुद्ध पठाण आणि मुहाजिर विरुद्ध पठाण असे संघर्ष सुरू झाले आहेत. कराचीत जवळपास रोजच दंगा होतो. २० जुलै २०११ च्या ‘नवा ए वक्त’ या दैनिकात एक अहवाल प्रकाशित झाला आहे. त्या लेखाच्या शीर्षकाचा अर्थ आहे ‘कराची जगातील सर्वात मोठे अनाथालय.’ त्याच दिवशीच्या ‘डॉन’ या इंग्रजी दैनिकातील बातमीचे शीर्षक होते ‘कराची पेटले आहे. २४ तासांत ३४ मेले.’ ‘डॉन’च्या वृत्तानुसार ‘जानेवारी ते ३१ जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत कराचीमध्ये ८०० लोकांना ठार करण्यात आले.’ १५ जुलैच्या ‘नवा ए वक्त’ दैनिकाच्या अंकात संपादकीय पृष्ठावर मोहम्मद अहमद तराजी या लेखकाचा लेख प्रकाशित झाला आहे. लेखाचा मथळा आहे ‘कफन की दुकानपर भीड.’
कराचीत रस्त्यावरून जात असताना, कुणाला कुठून येणार्‍या गोळीला बळी पडावे लागेल याचा नेम नसतो. तो एक नित्यनियम झाला आहे. पोलिसही, त्यांना वाटले, तर येतात, अन्यथा स्वस्थ बसतात. एखादा मजूर आपल्या वस्तीतून निघून कामावर जाईल, तर तो सुखरूप परत येईल याची शाश्‍वती नसते. ५ जुलै ते ८ जुलै या चार दिवसांत, कराचीत भाषिक दंगली उसळल्या. त्यात ८५ लोकांना प्राण गमवावे लागले. कुणी मारले, का मारले, याची साधी चौकशीही आता लोक करीनासे झाले. कराचीत मृत्यू हा आता बातमीचा विषयच उरला नाही. बाजार उघडे असतात, पण ग्राहकांचे स्वागत बंदुकीच्या गोळीने होणार नाही, याची खात्री नाही. गोळी कुठून आली, कोणी मारली, हे सारे अज्ञात असते. ‘जसारत’ हे ‘जमाते इस्लामी’ या कट्टरवादी संघटनेचे मुखपत्र आहे. त्याच्या संपादकीयाचे शीर्षक आहे ‘कराची : बारूद के ढेर पर.’ २३ जुलैच्या अंकात हे पत्र लिहिते, ‘‘राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून ओळखले जाणारे हे शहर दहशतीच्या पिंजर्‍यात अडकलेले आहे. अजून जुलै महिना समाप्त झाला नाही, तरी ३४० लोक ठार करण्यात आले.’’ ४ ऑगस्टच्या अंकात हेच पत्र लिहिते, ‘‘अजून ऑगस्टचा पहिला सप्ताह पूर्ण झाला नाही, पण ३८ प्रेते उचलली गेली. सरकार हताश आहे. सैन्य दुसरीकडे गुंतले आहे आणि कराचीतील आग सारखी जळत आहे.’’
(२१ ऑगस्ट २०११ च्या ‘पांचजन्य’ अंकातील श्री मुजफ्फर हुसैन यांच्या लेखाच्या आधारे)
*** *** ***


डोंबीवलीत नागालँड

डोंबीवली! कुठे आहे डोंबीवली? आपल्या महाराष्ट्रात कल्याणजवळ. बहुधा कल्याण-डोंबीवली मिळून एक महानगर बनत असावे. आणि नागालँड? भारताच्या पूर्वेच्या टोकाला. पण डोंबीवलीने नागालँडशी संबंध जोडले आहेत. तेथे नागालँडमधील विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह आहे. गेल्या १० वर्षांपासून ते चालू आहे. कोण चालवीत असतील हे वसतिगृह? अन् कुणावर विश्‍वास ठेवून नागालँडमधील पालक आपल्या मुलांना इतक्या दूरवर पाठवीत असतील? या प्रश्‍नांचे उत्तर एकच मिळेल ही संघाची स्वयंसेवक मंडळी असावी आणि ते अगदी खरे आहे.
या वर्षीच्या शालान्त परीक्षेत या वसतिगृहातील १७ मुले उत्तीर्ण झाली. त्या सर्वांचा सत्कार ऑगस्ट महिन्यात करण्यात आला. लोकप्रिय संगीतकार श्री सलिल कुळकर्णी यांच्या हस्ते हा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. सर्वाधिक गुण इनातो या विद्यार्थ्याने प्राप्त केले होते. त्याला ८५ टक्के गुण मिळाले होते. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त करताना तो म्हणाला, ‘‘वसतिगृह समितीचे सदस्य आणि अन्य नागरिक यांनी आमच्यावर खूप प्रेम केले. आमच्याकडून अभ्यास करून घेतला. म्हणूनच आम्ही दहावीपर्यंत मजल मारू शकलो. मी इथे आलो नसतो, तर माझं काय झालं असतं हे सांगता येत नाही. इथं आलो म्हणूनच माझी प्रगती होऊ शकली. आमच्याकडून नक्कीच काही चुका झाल्या असणार. त्याबद्दल मी क्षमा मागतो.’’
हे वसतिगृह ‘अभ्युदय प्रतिष्ठान’ ही संस्था चालविते. प्रतिष्ठानचे कार्यवाह उदय कुळकर्णी म्हणाले, ‘‘या मुलांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नव्हते. परंतु त्यांचे चेहरेच त्यांच्या भावना व्यक्त करीत होते. या मुलांशी परिचय झाला की त्यांच्यातील सुप्त गुणांची जाणीव आपल्याला होते. ही मुलं शिक्षण पूर्ण करून नागालँडला परत जातील. नागालँडमध्ये, आमचे जे कार्यकर्ते कार्यरत आहेत, त्यांना भेटण्यासाठी, इथून गेलेली मुलं एक-दोन दिवसांची पायपीट करून देखील भेटायला येत असतात. त्यावरून हे भावनिक नातं किती गहिरं आहे, याची कल्पना येते.’’

(ईशान्य वार्ता, ऑगस्ट २०११ च्या अंकातील माहितीच्या आधारे)
*** *** ***


डॉ. मोहम्मद हनीफ शास्त्री

होय! डॉ. मोहम्मद हनीफ हे ‘शास्त्री’ आहेत. संस्कृतचे विद्वान आहेत. संस्कृतचे ख्यातनाम अध्यापक आहेत. आपले उपराष्ट्रपती श्री हमीद अन्सारी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय सद्भावना’ पुरस्कार देऊन, या वर्षी ज्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांमध्ये डॉ. मोहम्मद हनीफ शास्त्री यांचाही समावेश होता. डॉ. शास्त्री यांनी भगवद्गीता व कुराण शरीफ यांचा तौलनिक अभ्यास केला आहे. हिंदू-मुसलमानांमधील समानता दाखविणार्‍या त्यांच्या लेखांमुळेच त्यांना हा सद्भावना पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे मत असे आहे की, जगातील सारे मुसलमान नमाज पढतात. पण नमाज कशी ‘कबूल’ होईल, याचे उत्तर गीतेत आहे. ‘रोजे’ का पाळायचे, याचेही उत्तर गीतेत आहे आणि नवल म्हणजे श्री इंद्रेशकुमार आपले प्रेरणास्रोत आहेत, असे ते म्हणाले. इंद्रेशकुमार म्हणजे रा. स्व. संघाचे प्रचारक आणि कार्यकारी मंडळाचे एक सदस्य.
डॉ. शास्त्री यांची माझी, बहुधा २००३ मध्ये, दिल्लीच्या तिहार तुरुंगातील एका कार्यक्रमात भेट झाली होती. दिल्लीला रामकृष्ण गोस्वामी नावाचे एक समाजसेवी गृहस्थ आहेत. त्यांनी ‘अपराधनिवारण-चरित्र निर्माण’ या नावाची एक संस्था काढली आहे. ही संस्था म्हणजे एकटे गोस्वामी तुरुंगातील कैद्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवीत असतात. त्यांच्या या शिक्षणाचे चांगले परिणाम बघून, अनेक सरकारी तुरुंगांकडून त्यांना आमंत्रित केले जाते. त्यांच्याबरोबर मी तिहार तुरुंगात दोनदा, अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात एकदा आणि अगदी अलीकडे काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गेलो होतो.
तर काय, तिहार तुरुंगातील एका कार्यक्रमात डॉ. शास्त्री यांची माझी भेट झाली. दोन-अडीच हजार कैद्यांसमोर गीतेच्या शिकवणुकीवर आमची भाषणे झालीत. तुरुंगाचे अधिकारीही उपस्थित होते. डॉ. शास्त्री यांनी सुरेख रीतीने गीतेचे महत्त्व विशद केले होते. गेल्या सप्टेंबर महिन्याच्या ‘हिमालय परिवार’ या नियतकालिकाच्या अंकात ‘सच्ची सांप्रदायिक भावना’ या मथळ्याखाली इमरान चौधरी यांचा एक छोटासा लेख प्रकाशित झाला आहे. खालील माहिती, त्या लेखाच्या आधाराने आहे.
इमरान चौधरी यांनी डॉ. मोहम्मद हनीफ शास्त्री यांची मुलाखत घेतलेली दिसते. त्या मुलाखतीत चौधरी यांनी डॉ. शास्त्री यांना सरळ संघाबद्दलच प्रश्‍न विचारले. त्यांना उत्तर देताना डॉ. शास्त्री म्हणाले, ‘‘संघ व मुसलमान यांच्यात गैरसमज आहेत. ते दूर केले जाऊ शकतात. या मुद्यांना राजकारणाशी मात्र जोडू नये. संघ एक राष्ट्रवादी संघटन आहे. मी एक मुसलमान आहे आणि माझा अनुभव मला सांगतो की, संघाची मंडळी वाईट नाहीत. व्यक्तींविषयी आम्ही दूर राहून वाट्टेल ते बोलतो आणि गैरसमज करून घेतो. परंतु जवळ गेल्यानंतरच कळून येते की ती व्यक्ती कशी आहे. न जाणताच कुणाही विषयी काही बोलणे हे अल्लाह व त्याचे रसूल यांना नाराज करण्यासारखे आहे.’’

*** *** ***


रेंगेपार (कोहळी) ची मातोश्री गौशाळा

रेंगेपार हे एक लहानसे खेडे आहे. लोकसंख्या पुरती दोन हजारही नाही. पण तेथे एक सुंदर गौशाळा आहे. बाह्यत: तेवढी सुंदर नाही. तिचे अंतरंग अति सुंदर आहे. प्रशंसनीय आहे, कौतुकास्पद आहे.
रेंगेपार, भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात आहे. लाखनीपासून सुमारे ८ कि. मी. अंतरावर. तालुक्यात ‘रेंगेपार’ नावाची आणखी काही खेडी आहेत. म्हणून याचे नाव रेंगेपार (कोहळी) असे सिद्ध झाले आहे. कारण, येथे कोहळी समाजाची बहुसंख्या आहे.
‘मातोश्री गौशाळा’ हे या गोशाळेचे नाव. कसायांच्या तावडीतून सोडवून आणलेल्या गाईच येथे आहेत. त्यांची संख्या ४०० आहे. बहुतेक गाई आणि बैलही अंत्यत कृश, जखमी आणि रोगपीडित आहेत. त्या सर्वांची देखभाल ही गौशाळा करते. आता एक मोठा हॉलही तयार झाला आहे.
ही गौशाळा, मुख्यत: यादवराव कापगते यांच्या परिश्रमाने उभी झाली आहे. यादवराव कॅन्सरचे रुग्ण होते. डॉक्टरांनी आशा सोडली होती. फार तर महिना-दीड महिना ते जीवित राहू शकतील, असे त्यांना सांगण्यात आले होते. २००१ ची ही घटना. अशा वेळी देवलापारच्या गोविज्ञान केंद्रातील मंडळी त्यांना भेटली. त्यांनी, त्यांना गोमूत्र चिकित्सा सांगितली. रोज सकाळ-संध्याकाळ, यादवराव, ताजे गोमूत्र गाळून पिऊ लागले आणि दहा महिन्यांच्या, या एक प्रकारच्या तपस्येनंतर, ते रोगमुक्त झाले. ६२ वर्षांचे यादवराव आता चांगले धडधाकट झाले आहेत. उंच, रुबाबदार अशी त्यांच्या शरीराची ठेवण आहे.
दिनांक १२ ऑक्टोबरला, आम्ही ती गौशाळा बघितली. आणखी एका व्यक्तीने आम्हाला चकित केले. आम्ही तेथे सकाळी १०.३० च्या सुमारास पोचलो, तेव्हा एका गाईला खाली पाडून व तिला दोघांनी आवरून ठेवले असताना, एक तिसरी व्यक्ती, त्या गाईची जखम धुताना व तिच्यावर औषधाचे लेपन करताना दिसली. आम्हाला वाटले की हे कुणी तरी पशुडॉक्टर असावेत. पण ते डॉक्टर नव्हते. व्यापारी आहेत आणि ते आपल्या नागपूरचे आहेत. लकडगंज भागाचे ते रहिवासी आहेत. त्यांनी पशुरोगचिकित्सेचे प्राथमिक ज्ञान घेतले आणि त्या ज्ञानाच्या आधारावर ते रुग्ण गाईंची सेवा करतात. यात तसे नवल वाटण्याचे कारण नाही. पण नवल हे आहे की, ते रोज सकाळी नागपूरवरून रेंगेपारला येतात. नागपूर-रेंगेपार अंतर किमान ९० कि. मी. रोज ९० कि. मी. यायचे आणि जायचे. आणि धनप्राप्ती शून्य. केवळ गोसेवा व तिच्यासाठी एवढा आटापिटा. खरेच ही एक तपस्याच आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे शंभुभाई पटेल. संस्थेच्या विश्‍वस्त मंडळात ते सहसचिव आहेत. पण सहसचिवाने एवढे कष्ट घ्यावेत? रोज १८० कि. मी.चा, स्वत:च्या वाहनाने प्रवास करावा? गोभक्तीचे हे आगळेवेगळे दर्शन येथे घडले. शंभुभाईंचा तेथील वासरांना असा काही लळा लागला आहे की विचारूच नका. त्यांनी आवाज देताच ५-६ वासरे त्यांच्या भोवती गोळा झाली. शंभुभाईंनी नागपूरवरून आणलेल्या ब्रेडचा एकेक तुकडा त्यांच्या तोंडात टाकला. ही त्यांची रोजचीच कृती असावी. वासरांना परिचित झालेली.
सेवानिवृत्त कृषी उपसंचालक श्री दादासाहेब राजहंस यांच्या मार्गदर्शनाने एक मोठी आमराईही या परिसरात विकसित झाली आहे. ४०० सुंदर आम्रवृक्ष तेथे दिमाखात उभे आहेत. सोबतीला बांबूंचे कुंज आहेत, सागवानही आहेत. आम्ही ती आमराई पाहून एकदम खुष झालो.
पण रेंगेपारचा चमत्कार येथेच थांबत नाही. येथे प्रत्येक घराला संडास आहे आणि नवल म्हणजे घरोघरी गोबरगॅस आहे. गौशाळा व आमराई बरोबरच फुलांचा बगीचा आहे, रोपवाटिका आहेत, जैविक खतांचा वापर आहे. एक सुंदर तलाव आहे आणि सहलीसाठी सर्वांना आमंत्रणही आहे. एक व्यक्ती मनात आणील तर काय परिवर्तन घडवून आणू शकते याचे प्रात्यक्षिक आम्ही रेंगेपारला बघितले. यादवराव म्हणतात, नाही तरी मी दहा वर्षांपूर्वीच मरण पावलो असतो. गोमातेने मला जीवदान दिले. हे माझे बोनस आयुष्य गाईंच्या सेवेला समर्पित आहे.

***  *** ***


बाल मुख्याध्यापक

पश्‍चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भापता उत्तरपारा हे एक गाव. त्या गावात गेल्या पाच वर्षांपासून एक शाळा चालत आहे. या शाळेचा, संचालक म्हणा मुख्याध्यापक म्हणा, एक १७ वर्षांचा तरुण आहे. हे त्याचे आजचे वय आहे. शाळा सुरू केली, तेव्हा तो केवळ १२ वर्षांचा आहे. त्याचे नाव आहे बाबर अली.
त्याच्या शाळेत ९७७ विद्यार्थी आहेत. २००५ साली, त्याचे वडील मोहम्मद नसीरुद्दीन यांनी त्याला ६०० रुपयांचे भांडवल दिले. मोहम्मद नसीरुद्दीन यांचा अन्नधान्य व खते यांचा छोटासा व्यापार आहे. त्यांनी दिलेल्या भांडवलावर बाबर अलीने शाळा सुरू केली. ‘आनंद शिक्षा निकेतन’ असे या शाळेचे नाव आहे. शाळेला ग्रामपंचायत, स्थानिक शासकीय अधिकारी, रामकृष्ण मिशनचे प्रमुख, जिल्हाधिकारी आणि कलकत्ता विकास प्राधिकारण यांच्याकडून मदत मिळत असते.
२०१० मध्ये बाबर अलीने १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याने आता पदवीपरीक्षेसाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. स्वयंसेवी वृत्तीने काम करणारे आणखी दहा शिक्षक त्याच्या मदतीला आहेत. त्याच्या शाळेत मुमताज बेगम नावाची विवाहित स्त्री, रोज पाच कि. मी. अंतर चालून शिकायला येते. ती ८ वीत आहे, तर तिची मुलगी पहिल्या इयत्तेत शिकत आहे.
बाबर अलीच्या या कर्तृत्वाची दखल बीबीसीनेही घेतली आहे. २००९ च्या ऑक्टोबरमध्ये दिलेल्या बातमीत बीबीसीने सांगितले की, हा जगातील सर्वात तरुण मुख्याध्यापक आहे. खाकी अर्धी चड्डी आणि टी-शर्ट हा या मुख्याध्यापकाचा वेष आहे.

(‘विकल्पवेध’च्या १ ते १५ सप्टेंबरच्या अंकावरून)
*** *** ***


आपली रेल्वे
आपली रेल्वे कुणाला माहीत नाही? तिच्यासंबंधी ही मनोरंजक माहिती-

१)  आपला संपूर्ण रेल्वेमार्ग ६३९४० कि. मी. लांबीचा आहे.
२) रोज १४२४४ आगगाड्या धावत असतात.
३) ७०९२ रेल्वे स्टेशने आहेत.
४) ‘गिनीज बुक ऑफ रेकॉडर्स’ या पुस्तकात, रेल्वे स्टेशन पुरवीत असलेल्या विविद सेवांकरिता, पुरानी दिल्ली स्टेशनचे नाव आहे.
५) इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याच्या कारकीर्दीत १६ एप्रिल १८५३ मध्ये मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे अशी पहिली रेलगाडी धावली.
६) जम्मू ते कन्याकुमारी सरळ जाणारी ‘हिमसागर एक्सप्रेस’ ही गाडी आहे. ती ३७५१ कि. मी.चे अंतर ६६ तासांमध्ये पूर्ण करते. ती १२ राज्यांमधून जाते आणि ती आपल्या देशातील सर्वाधिक अंतर धावणारी गाडी आहे.
७) संगणकावरून रेल्वे आरक्षण करण्याची सोय १९६६ पासून दिल्लीवरून प्रथम सुरू झाली.
८) खडकपूरचा रेल्वे फलाट सर्वात लांब फलाट आहे. तो २७३३ फूट लांब आहे.
९) शोण नदीवरील पूल सर्वात लांब आहे. त्याची लांबी १० हजार ४४ फूट आहे.
१०) कोकण रेल्वेच्या अंतर्गत बनलेल्या पुलाच्या एका खांबाची उंची कुतुबमिनारच्या उंचीपेक्षाही अधिक आहे.
११) ट्राम सेवा सर्वप्रथम मुबंई व चेन्नईत सुरू झाली. वर्ष होते १८७४.


-मा. गो. वैद्य

नागपूर
दि. १५-१०-२०११

No comments:

Post a Comment