Saturday, 24 March 2012

संघाची व्याप्ती, शक्ती आणि रीती

रविवारचे भाष्य दि. २५-०३-२०१२ करिता

संघ. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ही एक, महाकवी कालिदासाचा शब्द वापरायचा झाला, तर अलोकसामान्य संस्था आहे. कारण, आज आपल्या देशात किंवा इतरत्रही ज्या अनेक संस्था कार्य करीत आहेत, त्यांच्या नमुन्यात संघ बसत नाही. काव्यालंकारांमध्ये ‘अनन्वय’ नावाचा एक अलंकार आहे. ज्याची तुलना फक्त त्याच्याशीच, इतर कुणाशीही होऊ शकत नाही, असे अनन्यत्व म्हणजेच अद्वितीयत्व सूचित करणारा तो अलंकार आहे. त्याचे रूढ उदाहरण आहे :-

गगनं गगनाकारं सागर: सागरोपम:|
रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव ॥


आकाश आकाशासारखेच आहे, समुद्र समुद्रासारखाच आहे, आणि रामरावण युद्धही रामरावणाच्या युद्धासारखेच आहे. संघही संघासारखाच आहे. अनन्य. अद्वितीय.

अनन्यत्व

संघ किती मोठा, किती व्यापक, हे सांगताना, कुणीही संघाच्या शाखा किती, त्या किती स्थानांवर भरतात हे सांगेल. हे योग्यच आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या अ. भा. प्रतिनिधी सभेत जे आकडे प्राप्त झाले, त्यावरून २७९९७ स्थानी, संघाच्या ४० हजार ८ शे ९१ शाखा लागतात. अर्थात् या नित्यनेमाने भरणार्‍या दैनिक शाखा आहेत. सप्ताहातून एकदा आणि महिन्यातून एकदा भरणार्‍या मिलनांची संख्या मिळविली तर आणखी १५ हजारांचा आकडा जोडावा लागेल. तात्पर्य असे की, ५५ हजार ८ शे ९१ स्थानी, नित्य संघाचे कार्यकर्ते एकत्र येत असतात. आहे काय, हिंदुस्थानात किंवा जगातही अशी एखादी संस्था की, जिचे सहा लाखांहून अधिक स्वयंसेवक दररोज ठराविक वेळी एकत्र येत असतात? माझ्या माहितीत नाही. कुणाला माहीत असेल, तर त्याने सांगावे; मला माझे अज्ञान दूर झाल्याचा आनंद होईल.

मौलिक संकल्पना

परंतु, या शाखा म्हणजे संघाची संपूर्ण व्याप्ती नव्हे. ही फक्त ‘पॉवर हाऊस’ म्हणजे ऊर्जा निर्मितीकेंद्रे आहेत. ऊर्जा वितरणासाठी ‘पॉवर हाऊस’ सक्षम, समर्थ आणि नित्य सिद्ध असलेच पाहिजे. तरच त्या ऊर्जेने आपल्या घरातील ट्यूब व अन्य दिवे चालतील, यंत्रे चालतील, मोठमोठ्या गिरण्या चालतील. म्हणून संघाच्या रचनेत ‘पॉवर हाऊस’सारख्या असणार्‍या शाखांचे फार महत्त्व आहे. त्यामुळेच त्यातील ऊर्जा घेऊन समाजजीवनाची अनेक क्षेत्रे आज प्रकाशित आहेत.
एक मूलभूत संकल्पना नित्य ध्यानात ठेवली पाहिजे. ती ही की, संघ संपूर्ण समाजाचे संघटन आहे.
It is an organization 'of' the entire society; it is not an organization 'in' the society.  ‘ऑफ्’ आणि ‘इन्’ यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. कोणताही समाज आणि विशेषत: प्रगत समाज कधीच एकसूरी नसतो. तो व्यामिश्र (complex) असतो. म्हणजे समाजजीवनाची किती तरी विविध क्षेत्रे असतात. राजकारण त्यातले एक. धर्म, शिक्षण, उद्योग, शेती, कारखाने असे किती तरी अन्य. एकेका क्षेत्राचेही अनेक पोटविभाग. शिक्षणक्षेत्र म्हटले की मग विद्यार्थी आले, शिक्षणसंस्था आल्या, शिक्षक आले, संचालक आले. उद्योग म्हटला की उद्योगपतींबरोबरच कामगार आले. संघाच्या पॉवर हाऊसमधून ऊर्जा घेऊन संघाच्या स्वयंसेवकांनी ही सारी क्षेत्रे आपापल्या शक्तीप्रमाणे प्रकाशित आणि प्रभावित केली आहेत. त्यांना कुणी आनुषंगिक संघटना म्हणतात, कुणी विविध गतिविधी समजतात. कुणी ‘संघ परिवार’ मानतात. शब्द कोणताही वापरा पण त्याच्या मूळ ऊर्जास्रोताचे भान ठेवणे गरजेचे आहे.

संघाची व्याप्ती

अ. भा. प्रतिनिधी सभेत, ज्यांनी आपले वृत्तनिवेदन केले, अशा संस्थांची संख्या ३५ होती. लोकांना फक्त भाजपा आणि विहिंपच दिसतात. जरा दृष्टी व्यापक केली, तर वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्र सेविका समिती, विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच हेही नजरेत येऊ शकतात. पण विश्‍व विभाग येईल? आणि राष्ट्रीय शीख संगत, किंवा सेवा भारती, विद्या भारती, सीमा जागरण, पूर्व सैनिक सेवा परिषद, इतिहास संकलन समिती, प्रज्ञा प्रवाह आणि ज्यांच्या नावाच्या शेवटी ‘भारती’ हा शब्द आहे त्या संस्कृत भारती, संस्कार भारती, सहकार भारती, आरोग्य भारती, लघुउद्योग भारती, क्रीडा भारती यांचे स्मरण होईल? यांचीच ओळख नसेल, तर अंधांना नेत्र पुरविणारी ‘सक्षम’, स्वदेशी विज्ञान, साहित्य परिषद, सामाजिक समरसता मंच, आणि एक विशेष नाव घ्यायचे झाले, तर ‘आयसीसीएस’ किती जणांना ज्ञात असतील?

आयसीसीएस्

काय आहे ही आयसीसीएस्? ती आहे International Centre for Cultural Studies. या संस्थेचे नुकतेच म्हणजे ४ ते ७ मार्च २०१२ ला हरिद्वारला संमेलन झाले. ज्यांनी ख्रिस्ती मताचा प्रसार होण्यापूर्वीच्या आपल्या संस्कृतीचे अद्यापिही जतन करून ठेवले आहे. अशा ५० संस्कृति-परंपरांचे ४०० प्रतिनिधी तेथे आले होते. त्यात न्यूझीलंडचे माओरी होते, अमेरिकेतील मायन आणि नॅव्जो होते. युरोपात ज्यांना ‘पेगन’ म्हणजे ‘खोट्या देवतांची पूजा करणारे’ म्हणून हिणविले जाते, ते होते. लिथुयानियातले रोमुवा, तसेच बालीमधले हिंदूही होते. २००२ मध्ये दिल्लीला मला या समूहातले एक लेखक फ्रेडरिक लॅमण्ड भेटले होते. त्यांनी मला स्वत:चे 'Religions without Beliefs' हे पुस्तकही भेट म्हणून दिले होते. ते युरोपातील ऑस्ट्रिया देशाचे रहिवासी होते. संघातर्फे या संस्कृति-परंपरांचे रक्षण व संवर्धन केले जात आहे. हिंदू संस्कृति- परंपरांशी आपले किती साम्य आहे, हे त्यांच्या ध्यानात आले आहे. हा एक प्रकारे संघाचा विश्‍वविक्रमच आहे.

संघाची रीत

अ. भा. वनवासी कल्याण आश्रमाचे नाव आता सर्वपरिचित आहे. वनांचलात, त्याच्यातर्फे चालविण्यात येणारी हजारो एकल विद्यालये आहेत. विहिंप, विद्यार्थी परिषद यांच्यातर्फेही एकल विद्यालये चालविली जात आहेत. पण त्यात सिंहाचा वाटा कल्याण आश्रमाचा आहे. वनवासी कल्याण आश्रमामुळे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतरणाच्या आक्रमक कारवायांना आवर बसला आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल, मेघालय, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम, मणिपूर या छोट्या छोट्या राज्यांमध्ये अनेक जनजाती (ट्राईब्स) आहेत. त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत, तर काही साम्येही आहेत. या साम्यांचा आधार घेऊन आपल्या परंपरा जपण्यासाठी त्यांनी आपली एक संस्थाही बनविली आहे. विक्रमसिंह जमातीया हे त्यांचे नेते आहेत. हे सारे वनवासी कल्याण आश्रमाच्या द्वारे संपन्न झाले आहे. १ डिसेंबर २०११ ला अरुणाचल प्रदेशातील, ब्रह्मपुत्राच्या काठावरील पासीघाट येथे ‘दोन्यीपोलो’ (म्हणजे चंद्र आणि सूर्य) एलाम केबांग (पारंपरिक धर्मसंस्कृति संगठन) या संस्थेचा रजत जयंती समारोह संपन्न झाला. कल्याण आश्रमाचे अध्यक्ष जगदेवराय उरॉंव आणि अरुणाचलचे मुख्य मंत्री नाबम तुकी तेथे उपस्थित होते. वनवासी कल्याण आश्रमाची अशी व्याप्ती आहे.
२७ डिसेंबर २०११ पासून तो १ जानेवारी २०१२ पर्यंत पुणे येथे ‘वनवासी क्रीडा महोत्सवाचे’ आयोजन कल्याण आश्रमाने केले होते. त्यात २०३८ खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यात ७२५ महिला क्रीडापटू होत्या. हे सर्व खेळाडू ३४ राज्यांमधून आले होते. कुणी विचारील की यात काय विशेष आहे? कुणीही क्रीडा स्पर्धा आयोजित करू शकतो. पण एक संघाचे खास वैशिष्ट्य तेथे प्रकट झाले. एक दिवस पुण्यातील १३०० कुटुंबांनी आपल्या घरून भोजन आणून या खेळाडूंना ते देऊन आत्मीय बंधुतेचा साक्षात्कार घडविला. कुटुंबातून केवळ महिलाच आल्या नव्हत्या. सारे कुटुंबच होते आणि एकेका कुटुंबाबरोबर छोट्या गटांमध्ये सर्व वनवासी खेळाडूंनी मातृभोजनाचा आनंद घेतला. हे संघाचे वैशिष्ट्य आहे. ही संघाची रीत आहे.

विश्‍व विभाग

वर विश्‍व विभागाचा उल्लेख केला आहे. ३२ देशांमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाच्या ५२८ शाखा आहेत. अमेरिकेत (युएसए) १४०, तर यू. के. (इंग्लंड) मध्ये ७० शाखा आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात या हिंदू स्वयंसेवक संघातर्फे अमेरिकेत ‘सूर्यनमस्कार यज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात १३१९१ स्पर्धकांनी भाग घेतला आणि त्यांनी दहा लाख ३८ हजार ८४२ सूर्यनमस्कार घातले. अमेरिकेतील एका राज्याचे गव्हर्नर, दोन कॉंग्रेसमन म्हणजे आपल्या भाषेत खासदार आणि वीस शहरांच्या महापौरांनी अधिकृत सूचना देऊन या यज्ञाला पुरस्कृत केले होते. संघाच्या नावात ‘राष्ट्रीय’ शब्द आहे, पण त्याचा विचार आणि संघटनचारित्र्य आंतरराष्ट्रीय झाले आहे.

सीमा जागरण

‘सीमा जागरण’ या नावाच्या संघटनेचाही वर उल्लेख केला आहे. आपल्या देशाच्या सीमा शत्रुराष्ट्रांकडून धोक्याच्या वर्तुळात आलेल्या आहेत. त्यांच्या रक्षणासाठी आपले सैनिक सिद्ध आहेत. पण जसे सैनिक तेथे आहेत, तसेच त्या सीमावर्ती प्रदेशात आपली जनताही आहे. सैनिकांशी स्नेहबंध आणि जनतेत धैर्यबंध ही महत्त्वाची कार्ये हा सीमा जागरण मंच करीत असतो. गेल्या वर्षी ५०० सीमाचौक्यांवर रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. त्यात १३ हजार जवानांना राख्या बांधण्यात आल्या. या स्नेहबंध कार्यक्रमात अडीच हजार पुरुष आणि १८०० महिलांचा सहभाग होता. सैन्यदलात भरती होण्यासाठी या मंचाद्वारे तरुणांना प्रेरित आणि काहीसे प्रशिक्षितही केले जाते. पंजाब, जम्मू-काश्मीर आणि राजस्थान सीमांवर दरवर्षी सैन्यभरती कोचिंग कॅम्प आयोजित केले जातात. लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि ती टिकून रहावी म्हणून ‘सीमासुरक्षा चेतना यात्रा’ही काढल्या जातात. गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या १५ ते २५ या तारखांच्या दरम्यान दोन यात्रा चालल्या. एक जम्मू-काश्मीरच्या पूंछ प्रदेशातून निघाली, तर दुसरी कच्छमधील नारायण सरोवरापासून. २५ नोव्हेंबरला राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील खाजूवाला येथे दोन्ही यात्रांचा संगम झाला. ३००० कि. मी. या यात्रा चालल्या. ६१ ‘सीमा सुरक्षा संमेलने’ झालीत. २००० गावांमध्ये सभा झाल्या. ३०० हून अधिक शाळांमध्ये प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांमध्ये सीमा सुरक्षेसंबंधी जागृती निर्माण करण्यात आली. आणि यापुढे आपल्या सीमा आकुंचित होऊ देणार नाही, असा संकल्प लोकांच्या मनात रुजविण्यात आला. सागरी सीमेवरही मंचाचे काम चालू असते. पश्‍चिम आणि पूर्व सागरतटाला लागून ६२ जिल्हे आहेत. त्यापैकी ४६ जिल्ह्यांमध्ये सीमा जागरणाचे कार्य सुरू आहे.

फक्त राष्ट्रासाठी

संघाच्या कार्यकर्त्यांनी, ‘पॉवर हाऊस’मधून ऊर्जा घेऊन समाजजीवनाची जी जी क्षेत्रे प्रकाशमान केलीत, त्या सर्वांचा समग्र परिचय करून द्यावयाचे ठरविले, तर एक मोठा ग्रंथच होईल. तसा ग्रंथ बनवायला हरकतही नसावी. पण संघप्रेरित कार्ये प्रचाराच्या भरवशावर चालत नाहीत. प्रसिद्धीची सोडा, जिवाचीही पर्वा न करता, हे कार्यकर्ते त्या त्या क्षेत्रात पाय रोवून उभे आहेत. कशासाठी? स्वत:साठी? मंत्रिपद मिळावे म्हणून? की वृत्तपत्रात नाव छापून यावे म्हणून? नाही. त्यांच्या ठिकाणी कोणतीही वैयक्तिक आकांक्षाच नाही. आपला देश, आपले राष्ट्र, आपला समाज- (आणि राष्ट्र म्हणजे समाजच असतो- (People are the Nation) मजबूत व्हावा, एकसंध बनावा, परस्परांशी सामंजस्याने व सहकार्याने वागणारा बनावा आणि अशा रीतीने आपल्या एकराष्ट्रीयत्वाचा ठसा सर्वांच्या अंतरंगावर बिंबावा यासाठी ही सारी धडपड आहे. या नि:स्वार्थ धडपडीला परमेश्‍वराचे अधिष्ठान आहे आणि आशीर्वादही आहेत. म्हणून सफलता हीच त्याची नियती आहे. ही सारी संघाची शक्ती आहे. संघद्वेष्टे कॉंग्रेसी नेते दिग्विजयसिंग जे म्हणतात की, संघावर बंदी घालणे शक्य नाही, ते कुठल्याही उद्देशाने म्हणोत, खरेच सांगत आहेत. संपूर्ण हिंदू समाजावर बंदी घालता येईल काय? नाही ना! मग संघावरही ती घालता यावयाची नाही.

अनुशासनाचे रहस्य

संघाची एक खास रीतही आहे. शिस्त त्याचे खास वैशिष्ट्य आहे. संघात शिस्त आहे हे सर्वज्ञात आहे. पण त्यासाठी दण्डात्मक तरतुदी (punitive sanctions) नाहीत. मी प्रवक्ता असताना एका विदेशी पत्रकाराने मला संघातील शिस्तीचे रहस्य काय असा प्रश्‍न विचारला होता. मी म्हणालो, आमच्या येथे शिस्तभंगाबद्दल शिक्षा करण्याची व्यवस्था नाही. हे कदाचित्, त्याचे कारण असू शकेल! त्या पत्रकाराला यातले किती समजले असेल, कोण जाणे! एक जुनी गोष्ट सांगतो. १९५२-५३ मधली. तेव्हा गोहत्या बंदीसाठी संघाने हस्ताक्षर संग्रह केला होता. त्या काळात अनेक गोभक्त तत्कालीन सरसंघचालक श्रीगुरुजींना भेटायला येत. एकदा लाला हरदेव सहाय यांच्याबरोबर एक साधू आले होते. ते गुरुजींना म्हणाले, ‘‘आपण असा एक आदेश काढा की, संघातील कुणीही स्वयंसेवक आपल्या घरी 'डालडा'चा वापर करणार नाही.’’ तेव्हा ‘डालडा’ नवा नवा होता. गुरुजी म्हणाले, ‘‘अशी आज्ञा काढण्याची संघाची पद्धती नाही.’’ त्या साधूला खूप आश्‍चर्य वाटले. तो म्हणाला, ‘‘हे आपण काय सांगता? मी जेथे जेथे जातो, तेथे तेथे मला हेच उत्तर मिळते की संघाची आज्ञा असेल, तर असे आम्ही करू.’’ त्यावर गुरुजी म्हणाले, ‘‘अशा आज्ञांसाठी आमच्याजवळ कोणती दण्डशक्ती (सँक्शन्स) आहेत? कुणी आज्ञेचे पालन केले नाही, तर आम्ही कोणता दंड देऊ शकतो?’’ साधू म्हणाले, ‘‘मग आपल्या संघात एवढी शिस्त कशी?’’ गुरुजी म्हणाले, ‘‘आम्ही रोज संघस्थानावर एकत्र येतो. आपल्या पद्धतीने कबड्डी वगैरे खेळतो. त्यातून अनुशासन निर्माण होते.’’ त्या साधूचे समाधान झालेले दिसले. मला याच्या जोडीला आणखी एक कारण जोडायचे आहे. ते म्हणजे संघातील श्रेष्ठ अधिकार्‍यांचा व्यवहार. एक सामान्य मुख्य शिक्षक ‘दक्ष’ म्हणतो आणि सरसंघचालकांपासून सारे ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी हातपाय जोडून ताठ उभे राहतात. ते सर्व शिबिरात सर्वांच्या बरोबर राहतात. सर्व जण जे भोजन घेतात, तेच तेही घेतात. सर्वांसारखाच गणवेष परिधान करतात. आचरणातील या सर्वसाधारणात्वाने एक वेगळे वातावरण निर्माण होते. ते समतेचे असते. त्यातून शिस्त निर्माण होते. स्वत:हून स्वीकारलेले ते अनुशासन असते. धाकाने ते निर्माण झालेले नसते. संघातील शिस्त पाहून अज्ञानी आणि/किंवा पूर्वग्रहदुष्ट लोकांना संघ फॅसिस्ट वाटतो. खरेच हा एक मोठा विनोदच आहे. हे अनुशासन स्वाभाविक बनल्यामुळे ती संघाची रीत बनली आहे. कार्यक्रम सुरू होणार म्हणजे वेळेवर सुरू होणार. अनेकांना उशिरा येण्यात प्रतिष्ठा वाटते. संघात वेगळेच वातावरण असते. एवढ्या मोठ्या संघटनेत शिस्तीचा भंग कधी झालाच नसेल काय? पण त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाल्याचे आपण कधी ऐकले आहे काय? नाही. कारण ही शिस्त स्वयंस्वीकृत आहे. ही संघाची रीत आहे.

सरकार्यवाहांची निवडणूक

दि. १७ ला सरकार्यवाहांच्या पदासाठी निवडणूक झाली. निवडणूक म्हटली की, इतरत्र, ताणतणाव, संभाव्य उमेदवारांची चर्चा, कोण मागे कोण पुढे- असे धमाल वातावरण असते. संघात असा काही प्रकार नसतो. आपला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला म्हणून श्री भय्याजी जोशी यांनी एक छोटेचे निवेदन केले. सहयोगाबद्दल सर्वांचे आभार मानले आणि ते व्यासपीठावरून खाली उतरले. नंतर पश्‍चिम क्षेत्राचे संघचालक, लातूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री अशोकराव कुकडे यांची निर्वाचन अधिकारी म्हणून घोषणा झाली. (तीन वर्षांपूर्वी मी निर्वाचन अधिकारी होतो.) त्यांनी संघाच्या घटनेतील तरतुदीचा उल्लेख करून सरकार्यवाहाच्या पदासाठी नावे सुचविण्यास सांगितले. दिल्लीचे डॉ. बजरंगलाल गुप्त यांनी श्री भय्याजी जोशींचे नाव सुचविले. केरळचे श्री मोहनन् आणि बंगालचे श्री रणेन्द्रनाथ बंदोपाध्याय यांनी त्याला अनुमोदन दिले. निर्वाचन अधिकार्‍यांनी, आणखी काही नावांची सूचना येईल म्हणून थोडी वाट बघितली. पण अन्य कुणाचेही नाव आले नाही. भय्याजी जोशी पुढील तीन वर्षांसाठी सरकार्यवाह म्हणून निर्वाचित झाल्याची घोषणा त्यांनी केली. भय्याजी परत मंचावर आले. सरसंघचालकांनी त्यांच्या गळ्यात हार घातला आणि कार्यक्रम संपन्न झाला.

अगतिकता? छे!

मग, माजी सरसंघचालक श्री सुदर्शनजी आपल्या जागेवरून उठून ध्वनिवर्धकासमोर आले आणि त्यांनी तृतीय सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांनी स्वत:संबंधी सांगितलेला एक किस्सा सांगितला. एक माणूस स्टेशन आले म्हणून उतरू लागला. पण तो डब्याकडे तोंड करून उतरत होता. फलाटावर खूप गर्दी होती आणि जो तो वर चढण्याच्या घाईत होता. लोकांना वाटले, उतरणारी व्यक्तीही चढणारीच आहे. म्हणून तो लवकर चढावा म्हणून ते त्याला आत ढकलीत गेले. अखेरीस गाडी सुटली. उतरणारा प्रवासी गाडीतच राहून प्रवास करू लागला. बाळासाहेब म्हणाले होते, ‘‘अशी माझी अवस्था आहे. जो तो मला आतच ढकलीत असतो आणि मला बाहेर पडताच येत नाही.’’ सुदर्शनजींच्या या किस्स्यावर सारे सभागृह हास्यात बुडाले. पण नंतर सहसरकार्यवाह श्री सुरेश सोनी यांनी आणखी कमाल केली. ते म्हणाले, ‘‘तो उतरणारा प्रवासी लठ्ठ असल्यामुळे, डब्याकडे तोंड करून उतरीत होता. म्हणून तो नाईलाजाने आत ढकलला गेला. भय्याजी जोशी लठ्ठ नाहीत. ते आम्हा सर्वांना सरकार्यवाह हवेत म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.’’ सभागृह पुन: हास्यकल्लोळात न्हाऊन निघाले.
अशी ही सहजस्वाभाविक वाटावी अशी एक संघजीवनातील महत्त्वाची घटना आहे. संघात असेच घडत असते. हा संघ कार्यकर्त्यांचा स्वभावच बनलेला आहे. ‘मैं नहीं तू ही’- हा त्याच्यापुढे आदर्श असतो; आणि त्या आदर्शाला साजेशी संघाची सरळ, सपाट पण स्नेहिल रीत आहे. ही रीत त्याची मोठी शक्ती आहे. संपूर्ण समाजाला प्रेमाने आपल्या मिठीत घेऊन जी त्याची व्याप्ती वाढली आहे, तीच त्याच्या शक्तीचे सुदृढ अधिष्ठान आहे. केवळ बुद्धिग्राह्य तत्त्वज्ञान नाही.

     -मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २४-०३-२०१२

1 comment:

 1. संघाच्या अशा या अनन्य साधारण व्याप्ति ला त्रिवार अभिवादन !
  ------------------------------------------
  महेशचंद खत्री .
  मेहकर जिल्हा .
  विदर्भ .

  ReplyDelete