Saturday 25 August 2012

इ त स्त त:




रविवारचे भाष्य दि. २६ ऑगस्ट २०१२ करिता


जिब्रानचा तो देश
खलिल जिब्रान हा लेबॅनॉन देशातला लेखक. इ. स. १८८३ मध्ये त्याचा जन्म झाला; आणि १९३१ मध्ये तो मरण पावला. ४८ वर्षांच्या या अल्प आयुष्यात त्याने अनेक पुस्तके लिहिली. त्यातील बहुतेकांचा जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. त्याची मर्मज्ञता, प्रतिभा आणि अगदी थोडक्यात सखोल आशय व्यक्त करण्याची त्याची शैली खरोखरच असामान्य आहे.
जिब्रानच्या कथांमधील एक पात्र अल मुस्ताफा तो देशकसा याचे वर्णन करीत आहे. ते वर्णन आपल्या या देशालाही किंबहुना सर्वच देशांना कसे लागू पडते, ते बघण्यासारखे आहे. जिब्रान लिहितो-
‘‘तो देश दयनीय आहे, जो निर्दयी माणसाला शूरवीर समजतो आणि दिमाख दाखविणार्‍याला उदार समजतो.’’
‘‘तो देश दयनीय आहे, जो स्वत: बनवलेले कपडे परिधान करीत नाही आणि आपल्या देशात बनलेली मदिरा पीत नाही.’’
‘‘तो देश दयनीय आहे, जो स्वप्नात विशिष्ट इच्छेचा तिरस्कार करतो आणि जागृतीत त्याच इच्छेच्या स्वाधीन असतो.’’
‘‘तो देश दयनीय आहे, जो प्रेतयात्रेशिवाय अन्य वेळी आपला आवाज उठवीत नाही, आपल्या इतिहासाच्या प्राचीन अवशेषांशिवाय अभिमान बाळगण्याची कोणतीही वस्तू ज्याच्याजवळ नाही, जो मानेवर तलवारीचा वार होण्याची वेळ आल्याशिवाय कधी बंड करून उठत नाही.’’
‘‘तो देश दयनीय आहे, ज्याचा राजनीतिज्ञ एक कोल्हा आहे, ज्याचा तत्त्वज्ञ एक जादूगार आहे आणि ज्याची कला बहुरूप्याच्या सोंगाच्या पुढे गेलेली नाही.’’
‘‘तो देश दयनीय आहे, जो आपल्या नव्या राजाचे धूमधडाक्यात स्वागत करतो आणि लगेच त्याची छी थू करून त्याला निरोप देतो- यासाठी की नव्या राजाचे धूमधडाक्यात स्वागत करण्याची सोय व्हावी.’’
‘‘तो देश दयनीय आहे, ज्याचे थोर पुरुष अनेक वर्षांपासून मुके आहेत आणि ज्याचे शूरवीर सध्या पाळण्यात झोपलेले आहेत.’’
‘‘तो देश दयनीय आहे, जो अनेक तुकड्यांमध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक तुकडा स्वत:ला संपूर्ण देश समजत आहे.’’
***        ***        ***

टपाल तिकिटावर राम
इंडोनेशियात १९६२ साली रामायणावर आधारित ६ टपाल तिकिटांची एक मालिका काढण्यात आली. १० रुपयांच्या तिकिटावर रामाचे, तर ३० रुपयांच्या तिकिटावर राम, सीता व सुवर्णमृग, असे चित्र होते. इंडोनेशिया हा मुस्लिमबहुल देश आहे. तेथे मुसलमानांची संख्या ८६ टक्क्यांच्यावर आहे; आणि हिंदू २ टक्क्यांच्या आसपास. पण देश मुस्लिम असला, तरी तो, आपल्या पूर्वजांना, आणि आपल्या परंपरांना विसरला नाही. राम आणि रामायण यांच्याबद्दल त्या देशाला आत्यंतिक प्रेम व आदर आहे.
इंडोनेशियाप्रमाणेच दक्षिणपूर्व आशिया म्यांमार आणि व्हिएतनाम यांच्या मध्ये लाओस नावाचा देश आहे. हा कम्युनिस्ट देश आहे. पण त्या देशानेही अनेकदा राम आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर टपाल तिकिटे काढली आहेत. हा बौद्धांचा देश आहे. ९४ टक्के जनसंख्या बौद्ध आहे. त्याने १९७३ साली रामायणाधारित ८ डाक तिकिटे प्रकाशित केली आणि १९९६ साली आणखी ४.
आपल्या भारताबद्दल मात्र विचारू नका. या दुर्दैवी देशातील सरकारनेच रामाचे ऐतिहासिक अस्तित्व नाकारले आहे.
***        ***        ***

सेंट मेरी चर्चमध्ये हिंदू दिवस
इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागात सेंट मेरी चर्च आहे. या चर्चद्वारा, ब्रिडपोर्ट या गावी एक प्राथमिक शाळा चालविली जाते. त्या शाळेने २०१२ च्या मे महिन्यात, एक दिवस हिंदू दिवसम्हणून पाळला. सर्व मुले हिंदू पद्धतीचा वेष करून आली होती. त्या मुलांनी नमुनेदार हिंदू पद्धतीने संपन्न झालेला विवाहसोहळाही बघितला; आणि हिंदू पद्धतीच्या नृत्यांचेही प्रदर्शन घडविले.
या शाळेची वेबसाईट सांगते की, मुलांमध्ये हिंदू धर्मासंबंधी अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. आपल्या मुलांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी शाळा संचालकांची इच्छा आहे. त्या दृष्टीने हिंदू धर्मासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली जात असते.
***        ***        ***

अंतराळात उपनिषदे
सुनीता विल्यम्स या भारतीय मूळ असलेल्या धाडसी महिलेचा संपूर्ण जगाला परिचय आहे. गेल्या १४ जुलै रोजी तिने अंतराळात उड्डाण केले आहे. हा अंतरिक्ष प्रवास सहा महिने चालणार आहे. या दीर्घ प्रवासात तिच्या बरोबर वाचायला कोणती पुस्तके आहेत हे माहीत आहे? सर्व पुस्तकांची यादी कुणास ठावूक? पण त्या पुस्तकांत उपनिषदे आहेत. तिच्या वडिलांचे नाव दीपक पंड्या असे आहे. त्यांनीच तिच्या बरोबर उपनिषदांचे इंग्रजी अनुवाद दिले आहेत. श्री पंड्या म्हणतात, ‘‘ती या पृथ्वीपासून जितकी अधिक उंच जाईल, तितके अधिक तिला आपल्या भारतीय मुळाचे ज्ञान होईल.’’ तेच पुढे सांगतात, ‘‘गेल्या वेळच्या अंतराळ प्रवासात मी तिच्या बरोबर भगवद्गीतेचे पुस्तक दिले होते. ते तिने वाचले. परत आल्यावर त्या संबंधी तिने मला अनेक प्रश्‍न विचारले. तिला त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे नक्कीच उपनिषदांमध्ये मिळतील.’’
***        ***        ***

दिव्यराज यांची मानवसेवा
कुमार नावाची एक व्यक्ती. म्हणजे ती व्यक्ती या नावाने ओळखली जाते. ती काही करीत नाही. भटकत असते. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपत असते. कुणी जे काही दिले, त्याच्यावर गुजराण करीत असते. तो तिरुपूर या गावचा रहिवासी. तामीळनाडूत ते गाव आहे.
एक दिवस अप्रूप घडले. तो रस्त्यावर पहुडला असताना एक कार त्याच्या शेजारी थांबली. त्यातून काही लोक उतरले. त्यांच्या हातात कात्री व कंगवा होता. त्यांनी या कुमारला उठविले. नीट बसविले. त्याचे केस नीट कापले. वाढलेली दाढीही नीट कापली. त्यांनी त्याला एक नवा सदरा व खाण्यासाठी काही अन्न दिले आणि ते निघून गेले.
कुणाचा होता हा आगळावेगळा उपक्रम. त्या व्यक्तीचे नाव आहे एन. दिव्यराज. तो हेअर स्टायलिस्टआहे. न्यू दिव्या हेअर आटर्स ट्रस्टया नावाची संस्था तो चालवितो. या संस्थेत त्याचे काही मित्र आणि त्याच्या घरची माणसेही त्याला मदत करतात. जे मानसिक दृष्ट्या अथवा शारीरिक दृष्ट्या अपंग आहेत, भणंग भिकारी आहेत, त्या सर्वांच्या चेहर्‍यांना दिव्यराजाचा हा ट्रस्ट नवे, सुंदर रूप देतो. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे.
दिव्यराजसोबत आणखी १२ लोक काम करतात. ही मंडळी अशा माणसांचा शोध घेत असतात. ते त्या दिवसापुरती त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था करतात. तीन महिन्यांतून एक दिवस ते तिरुपूरबाहेर जाऊन आपली सेवा देत असतात. या उपक्रमात त्यांनी दिंडीगल, त्रिचनापल्ली, इरोड, नामक्कल आणि करूर या गावांना भेटी दिल्या आहेत. ९४४२३७२६११ या भ्रमणध्वनीवर कुणीही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो.
***        ***        ***

मोरगाव
मध्यप्रदेश राज्यात नीमच या नावाचा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात बासनियां या नावाचे छोटेसे गाव आहे. गावाची लोकसंख्या फक्त ४००. पण गावातील मोरांची संख्या त्याच्या दुप्पट म्हणजे ८०० आहे. हे बासनियां खर्‍या अर्थाने मोरगावबनले आहे.
अरवली पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या या गावातील लोकांचे पशुपक्ष्यांशी खूपच प्रेमाचे नातेसंबंध जडलेले आहेत. गावात जाऊन आपण कुणीकडेही बघा, आपणांस सर्वत्र मोरच मोर दिसतील. शेतात दिसतील, रस्त्यावर दिसतील आणि घरांच्या छपरावरही दिसतील.
मोर आणि माणसे यांच्यात असे प्रेमसंबंध निर्माण झाले आहेत की, माणसांना बघून मोर पळून जात नाहीत. धावत धावत त्यांच्याकडे येतात. त्यांची खात्री पटली आहे की, माणसांपासून त्यांना धोका नाही.
(‘संस्कारवानमासिक, जुलै २०१२ मधून)
***        ***        ***

मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे शिबिर
गेल्या जून महिन्यात राजस्थानातील पुष्कर या पवित्र क्षेत्री मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे (मुरामं) तीन दिवसीय शिबिर पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन माजी सरसंघचालक श्री सुदर्शनजी यांच्या हस्ते झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘भारतीय मुसलमान बाहेरून आलेले नाहीत. ते याच देशाचे आहेत; आणि हिंदूंप्रमाणे तेही येथील राष्ट्रीय जीवनाचे अभिन्न घटक आहेत.’’
सुदर्शनजी पुढे म्हणाले, ‘‘या देशात राहणारे सारे हिंदू आहेत.’’ त्यांनी दिल्लीच्या जामा मशिदीच्या इमामावर बेतलेला प्रसंग सांगितला. ते जेव्हा हज यात्रेला गेले होते, तेव्हा त्यांना आपला परिचय द्यावा लागला. ते म्हणाले, मी हिंदुस्थानातून आलो आहे. त्यांची नोंद हिंदू अशी करण्यात आली. म्हणून, सुदर्शनजी म्हणाले, ‘‘आपण सारे हिंदू आहोत आणि आपला देश हिंदुस्थान आहे.’’
यावेळी मंचावर मुरामंचे राष्ट्रीय संयोजक महंमद अफजल, सहसंयोजक आणि या शिबिराचे प्रमुख अब्बास अली बोहरा, छत्तीसगड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सलीम अश्रफी आणि माजी राष्ट्रीय संयोजक सलाबतखान उपस्थित होते.
आपल्या भाषणात राष्ट्रीय संयोजक महंमद अफजल म्हणाले, ‘‘१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हिंदू व मुसलमान एकजुटीने लढले होते. पण ब्रिटिशांनी, त्यांच्यात फूट पाडली. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस पक्षाने, मुसलमानांना फक्त एक व्होट बँक बनविले.’’ त्यांनी, जम्मू-काश्मीरचे संस्थान भारतात विलीन करण्यासाठी, संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांनी, संस्थानचे महाराज हरिसिंग यांचे मन कसे वळविले, हेही स्पष्ट केले. त्यांनी मुस्लिम बांधवांना कॉंग्रेसची चाल ओळखून केवळ एक व्होट बँक म्हणून स्वत:चे अस्तित्व कायम ठेवण्यापासून सावध राहण्याचाही इशारा दिला.
इस्लाम हा शांतीचा धर्म आहे आणि इस्लाममध्ये दहशतवादाला स्थान नाही, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. दारूल-उलूम-देवबंदने दहशतवादाच्या विरोधात जो फतवा काढला, या मागे मुरामंच्या भूमिकेचा प्रभाव आहे, असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, ‘‘सर्व प्रकारचे धोके पत्करून, ‘रामुमंने श्रीनगरात तिरंगा फडकविला होता आणि तेथे वंदे मातरम्चेही गायन केले होते. याशिवाय अमरनाथयात्रा आंदोलनातही आम्ही भाग घेतला आणि १० लाख मुस्लिमांच्या सह्यानिशी गोहत्याबंदीची मागणी करणारे निवेदनही राष्ट्रपतींना सादर केले.’’
सरसंघचालक श्री मोहन भागवत यांच्या एका विधानाचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘‘भारताचा भावी प्रधानमंत्री रा. स्व. संघाचा स्वयंसेवक असला पाहिजे.’’ यावर सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.
या शिबिरात मंचाचे एक मार्गदर्शक श्री इंद्रेशकुमार यांचेही भाषण झाले. त्यांनी रामुमंएक रक्तपेढी स्थापन करणार असल्याची माहिती दिली. राजस्थानचे संयोजक डॉ. मुन्नावर चौधरी यांनी प्रास्ताविक केले, तर राष्ट्रीय सहसंयोजक अबुबकर नकवी यांनी सूत्रसंचालन केले. या त्रिदिवसीय शिबिरात २५ राज्यांतून आलेल्या २०० प्रतिनिधींनी भाग घेतला होता.
***        ***        ***

वेद सर्वांचे आहेत
वेद सर्वांचे आहेत आणि संन्यास कुणालाही घेता येतो, हे आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी शृंगेरी मठाने दाखवून दिले आहे. शिवानंद नावाच्या, जन्माने दलित असलेल्या, व्यक्तीला संन्यासाची दीक्षा तेथे देण्यात आली असून, तो तेथे आजन्म ब्रह्मचारी म्हणून राहणार आहे. अर्थात् त्याचा उपनयन संस्कारही झाला असून, त्याने वेदोपनिषदांचेही अध्ययन केले आहे.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २५-०८-२०१२

No comments:

Post a Comment