Saturday, 29 September 2012

महाराष्ट्रातील घडामोड

  
रविवारचे भाष्य दि. ३०-०९-२०१२ करिता


मराठीत भाषेत घडामोडहा एक सुंदर अर्थवाही शब्द आहे. घडामोडम्हणजे जी घडतही असते आणि मोडतही असते. सरळ घडण चालू नसते; आणि सरळ सरळ मोडतही नसते. मध्ये मध्ये ती बिघडतमात्र असते. अशीच घडामोड महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षात घडून आली.

चर्चा प्रासंगिक
महाराष्ट्रात सध्या जे आघाडीचे सरकार सत्तारूढ आहे, त्याची घडामोडउपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याने चालू झाली होती. संपूर्ण सरकारची घडामोडचालू झाली असे म्हणणे काहीसे चूकही ठरू शकते. मात्र या सत्तारूढ आघाडीचा जो दुसर्‍या क्रमांकाचा घटक पक्ष त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (राकॉं) मात्र घडामोड नक्कीच चालू झाली. तिचा निर्णय तूर्त तरी लागलेला आहे. या घटक पक्षातील घडामोडीवर सरकारचे भवितव्यही अवलंबून होते. म्हणून त्याची चर्चा प्रासंगिक आहे.

राकॉंचे महत्त्व
कॉंग्रेस पक्षाकडे, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी ८६ जागा आहेत, तर राकॉंकडे ६२ जागा आहेत. दोन्ही मिळून १४८ जागा होतात आणि या आघाडीला बहुमत प्राप्त होते. काही अपक्षही या आघाडीबरोबर आहेत, असे म्हणतात, पण त्यांची संख्या आणि प्रभावही नगण्य आहे. ज्याची खरेच फिकीर करावी, असा एकमात्र घटक पक्ष आहे राकॉं. मुख्य मंत्री कॉंग्रेसचा आहे, तर उपमुख्य मंत्री राकॉंचा. विद्यमान सरकारमध्ये उपमुख्य मंत्रिपद अजित पवार यांच्याकडे होते. ते, राकॉंचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे आहेत. या नातेसंबंधालाही महत्त्व आहे.

अजित पवार
२००९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर पुन: या आघाडीकडे सत्ता आली. ती २००४ ते २००९ या काळातही होती. तेव्हा उपमुख्य मंत्री छगन भुजबळ होते. पण २००९ मध्ये ते त्यांना मिळू नये, असा पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या अजित पवारांची इच्छा होती;  आपण उपमुख्य मंत्री व्हावे, अशी त्यांची जबर इच्छा होती आणि या संबंधात त्यांना पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता. असे सांगितले जाते आणि ते खरे असावे की ६२ पैकी ६० आमदार अजित पवारांच्या बाजूचे आहेत. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन, चाणाक्ष काकाने, पुतण्याच्या उपमुख्य मंत्रिपदावर आरूढ होण्याला संमती दिली. उपमुख्य मंत्री असलेल्या अजित पवारांकडे अर्थ व जलसंपदा ही दोन महत्त्वाची खाती होती.

महाराष्ट्रातील सिंचन विभाग
सरकारी सिंचन प्रकल्पांमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा झाल्याचे आरोप गेल्या कित्येक महिन्यांपासून होत आहेत. तेव्हा आघातलक्ष्य सुनील तटकरे हे मंत्री होते. तेही राकॉंचेच. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आकडेवारीनिशी तटकरेंवर आरोप केले आहेत. आता तर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे; तेव्हा त्यासंबंधी काही लिहिणे योग्य नाही. पण अजित पवारांचे तसे नव्हते. हे खरे की जलसंपदा खात्यातील मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी सरकारवर काही गंभीर आरोप केले होते. ते त्यांनी मुख्य मंत्री व राज्यपाल यांनाही पत्रे लिहून कळविले होते. अशी माहिती आहे की, राज्यपालांनी या पत्राची गंभीर दखल घेतली आणि अजित पवारांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. काय आहे म्हणता, महाराष्ट्रातील सिंचनाची स्थितिगती? तर गेल्या दहा वर्षांमध्ये सिंचन प्रकल्पांवर ६० हजार कोटी रुपये खर्च झाले; आणि सिंचनक्षमता किती वाढली म्हणता? तर फक्त एकदशांश टक्के! जून ते ऑगस्ट २००९ या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत २० हजार कोटी रुपयांच्या ३२ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. विदर्भासाठी सिंचनाकरिता साधारणत: वर्षाकाठी एक हजार कोटी रुपयांचे बजेट असते. ते सहापट झाले. मजेची गोष्ट ही की, धरण बांधायचे म्हणजे जमीन अधिगृहीत करायची असते; पण घोटाळा करण्याच्या उत्साही घाईत हे मूलभूत प्राथमिक कामही करण्यात आलेले नाही. पैनगंगा नदीवरील धरणाचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. हे एक मोठे धरण आहे. महाराष्ट्र व आंध्र मिळून ते व्हावयाचे आहे. या धरणासाठी १३ हजार हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात फक्त ३२५ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. टेंडरे मात्र सर्व प्रकल्पांसाठी आहेत. नियमांचे पालन न करणे, अपात्र ठेकेदारांना ठेके देणे, त्यांना शेकडो कोटींची बयाणा रक्कम देणे इत्यादी अन्यही आरोप आहेत. त्या आरोपांचे टोक अजित पवारांच्या दिशेने वळलेले आहे.

कॉंग्रेसची चरित्रशैली
परंतु, अशा आरोपांनी कॉंग्रेस पक्ष आणि त्याच पक्षाच्या पोटातून निघालेला राकॉं पक्ष यांनी बावरून जावे, असा इतिहास नाही. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा, लवासा घोटाळा, आदर्श इमारत घोटाळा किंवा अगदी अलीकडचा कोळसा घोटाळा, हे घोटाळे विस्मृतीत विरून जावेत इतके जुने झालेले नाहीत. दिला काय आपण होऊन कोणी राजीनामा? नाव नको. खूप अंगाशी आले, तेव्हा ए. राजा या मंत्र्याने राजीनामा दिला. ते द्रमुकचे होते. कॉंग्रेस खासदार सुरेश कलमाडी यांच्या आणि त्यांच्यामुळे दिल्लीतील कॉंग्रेस प्रशासनाच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले, तेव्हा कलमाडींनी राजीनामा दिला. कोळसा खाण वाटप घोटाळ्याची संसदेत आणि संसदेच्या बाहेर एवढी चर्चा होत आहे. दिला काय कोळसा वाटप मंत्री श्रीप्रकाश जैसवाल यांनी राजीनामा? भुजबळ व तटकरे यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. पण अजून ते मंत्रिपदाला चिकटूनच आहेत. अशी पृष्ठभूमी आणि चरित्रशैली असताना, अजित पवारांनी एकदम राजीनामा द्यावा, हे खरेच अप्रूप आहे. त्यांनी सांगितले की, श्‍वेतपत्रिका काढायला माझी हरकत नाही. नि:पक्ष चौकशी समितीकडून अवश्य चौकशी व्हावी. पण माझा राजीनाम्याचा निर्धार पक्का आहे. इतका पक्का की चौकशीतून मी निर्दोष आढळलो, तरी मी राजीनामा परत घेणार नाही.
अजित पवारांचे हे वक्तव्य निश्‍चितच अभिनंदनीय आहे. पण येथेच तर राकॉंच्या अंतर्गत राजकारणातील मेख आहे. अजित पवारांनी, राकॉंचे सर्वेसर्वा आपले काका शरद पवार यांना राजीनाम्याची ही वार्ता सांगितली आणि नवल म्हणजे शरद पवारांनी त्यांना राजीनामा द्यावयाची अनुमती दिली. राकॉंचे अन्य एक प्रमुख नेते आणि शरद पवारांचे घनिष्ठ सहकारी, केंद्रीय मंत्री, प्रफुल्ल पटेल यांनीही तेच सांगितले; आणि येथून मग एका महानाट्याला सुरवात झाली. अजित पवारांचा राजीनामा गेल्याबरोबर राकॉंच्या बाकीच्या १९ मंत्र्यांनीही आपले राजीनामे पक्षाध्यक्षाकडे पाठविले. म्हणजे महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार कोसळले की! हे राजीनामे म्हणजे निदान ६० आमदारांचा, सरकारचा पाठिंबा काढून घेणे आहे. मग अगदी अपक्ष धरले तरी कॉंग्रेसकडे शंभरही आमदार उरत नाहीत. सरकारचे कोसळणे ही काळ्या दगडावरची रेघ ठरते. आणि अजित पवारांना हेच अपेक्षित असावे. पण शरद पवारांना हे नको आहे. त्यांना केंद्रातील संपुआच्या सरकारात रहावयाचे आहे. त्यापासून दूर व्हावयाचे नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही कॉंग्रेसचे सरकारने आपला पूर्ण कार्यकाळ म्हणजे २०१४ पर्यंत पूर्ण करावा, अशी त्यांची इच्छा आहे. अजित पवारांना राजीनामा देण्याची परवानगी देताना, त्यांच्या पाठीशी राकॉं पक्ष असा भक्कमपणे उभा राहील याची कदाचित शरद पवारांना कल्पना नसावी. म्हणून, या घटनेने तेही चकित झाले असणार. गुरुवारीच त्यांनी या संबंधी, राजीनामा देणार्‍या मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना समजाविले असते, पण त्या दिवशी राकॉंचे एक ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी सर्वांना उपस्थित राहणे आवश्यक असल्यामुळे, त्या दिवशी ही सभा झाली नाही. शुक्रवारी दुपारी राकॉंच्या सर्वच आमदारांची बैठक घेण्याचे ठरले.

फक्त अजित दादांचा राजीनामा
त्यानुसार ही बैठक संपन्न झाली. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे प्रभृती पक्षाचे ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. अजित पवारांनी आपल्या भाषणात आपण राजीनाम्यावर ठाम आहोत, असे पुन: सांगितले आणि आपण आपला पक्ष मजबूत करण्यासाठी झटू, अशी ग्वाहीही दिली. तथापि, आपल्या राजीनाम्यावर आपण ठाम आहोत, असे सांगतानाच, आपले काका शरदराव पवार आपले दैवत आहेत व त्यांचा शब्द आपण पाळू, अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे. याचा काय अर्थ निघेल, याचे अंदाज व्यक्त होऊ लागले होते. माझा अंदाज हा होता की, शरद पवार, अजित पवारांना राजीनामा देऊ देतील, पण ज्या अन्य १९ मंत्र्यांनी राजीनामे दिलेत, त्यांना ते परत घ्यावयाला लावतील आणि साहेबांचा शब्द ते मंत्री पाळतील. अन्यथा पक्षातच फूट पडेल. आता सर्व गोष्टी साफ झाल्या आहेत. फक्त अजित पवार राजीनामा देतील हे ठरले असून, बाकीच्या १९ मंत्र्यांचे जे राजीनामे राकॉंच्या प्रदेशाध्यक्षाकडे आहेत, त्यांना ते परत घेण्यास सांगण्यात येतील. त्याप्रमाणेच हे सर्व घडलेले आहे.

उद्दिष्ट सफल
शरद पवारांचे उद्दिष्ट, या निर्णयामुळे पूर्ण सफल होईल. अजित पवारांचा स्वाभिमान राखला गेला हेही लोकांना दिसेल आणि त्यांचे पक्षातील वर्चस्व कमी करण्याचे कार्यही साध्य होईल. दोघेही पवार, एकाच घराण्यातील असले, तरी पक्षांतर्गत श्रेष्ठत्वासाठी दोघांमध्ये संघर्ष असणे असंभवनीय नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात हे अनेकदा घडलेले आहे. अजित पवार, उपमुख्य मंत्रिपदावरून हटले म्हणजे लगेच, त्यांना पक्षाचे अध्यक्षपद मिळेल असे समजण्याचे कारण नाही. मग पक्ष मजबूत करण्याची त्यांची इच्छा कितीही तीव्र असो. विद्यमान अध्यक्ष मधुकरराव पिचड यांना असे बेमुर्वतखोरपणे काढले जावयाचे नाही. म्हणजे अजित पवार सत्तेतूनही गेले आणि पक्षसंघटनेच्या सर्वोच्च पदावरूनही गेले, अशीच एकूण परिस्थिती राहणार आहे आणि त्याबद्दल, या घटकेला तरी कुणीही शरद पवारांना दोष देणार नाही किंवा आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या प्रमुखपदी आरूढ करण्याचा त्यांचा डाव आहे, असेही कोणी म्हणू शकणार नाही.

आपसातील चुरस
तात्पर्य असे की, महाराष्ट्रातील घडामोडीत सरकार मोडीत निघण्याचा अजीबात धोका नाही. मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर कॉंग्रेसजन खुष आहेत, असे नाही. पण या वेळी ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सिंचन प्रकल्पांसंबंधीची श्‍वेतपत्रिका असो अथवा भुजबळांचा आरोपित महाराष्ट्र सदन बांधणीतील घोटाळा असो, मुख्य मंत्र्यांनी कठोर निर्णय घ्यावेत, अशीच कॉंग्रेस आमदारांची इच्छा असणार. यापैकी श्‍वेतपत्रिका काढायचा शरद पवारांनीच आग्रह धरला आहे. म्हणजे ती पत्रिका लवकरच निघणार, हे निश्‍चित. कारण, सरकार आघाडीचे असले, तरी दोन घटक पक्षांमध्ये ना सामंजस्य आहे, ना समन्वय. पण हे सरकार चालू द्यावे, तथाकथित जातीयवादी पक्ष म्हणजे शिवसेना व भाजपा यांची सत्ता येऊ नये, या बाबतीत दोघांचेही एकमत आहे. किंबहुना केवळ याच एका बाबतीत त्यांच्यात एकोपा आहे. बाकी महाराष्ट्राच्या राजकारणात कोण पुढे असेल, या बाबतीत त्यांच्यात चुरस आहे. पूर्वीही होती आणि पुढेही राहणार आहे. आता काही दिवसांवरच नांदेड महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्ष परस्परांविरुद्ध उभे आहेत. नगर परिषदा असोत अथवा जिल्हा परिषदा- यांच्या निवडणुकीत कोण कुणाला मात देऊ शकतो, याच्याच रणनीतीला प्राधान्य असते. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदभार स्वीकारतानाही, आपण दुसर्‍याला कशी मात देऊ शकू, याचाच मुख्यत: विचार असतो. मग त्यासाठी, स्थानिक पातळीवर जातीयवादीशिवसेनेशी किंवा भाजपाशी हातमिळवणी करण्याचा कुणालाही संकोच वाटत नाही. दुसर्‍याला कशा रीतीने खाली पाहायला लावता येईल, याचाच विचार प्रधान असतो व तशीच रणनीती आखली जाते.

पृथ्वीराजांना शक्ती
या सर्व घडामोडीत सर्वात आनंद कुणाला झाला असेल, तर तो पृथ्वीराज चव्हाणांना. ते कार्यक्षम मंत्री नाहीत, तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नाहीत, वगैरे मते, राकॉंकडून आडूनपाडून व्यक्त केली जात असतात. प्रसारमाध्यमेही या गोष्टीचा गाजावाजा करीत असतात. पृथ्वीराज चव्हाणांना परत केंद्रात बोलाविले जाईल, अशा वावड्याही उडविल्या जात असतात. मला वाटते, असे काही व्हावयाचे नाही. चव्हाण मुख्य मंत्री राहतील. राकॉंमधील अंतर्गत संघर्षामुळे त्यांचे स्थान पक्के झाले आहे. आणि त्यांचे नाकही वर राहिलेले आहे. याचा ते नक्कीच लाभ करून घेतील. आपण सर्व जण सामान्य जनतेतील आहोत. आपणासही हायसे वाटले की तूर्तास तरी सरकारला धोका नाही, आणि फेरनिवडणूकही नाही. आपण आशा करू या की, नवी शक्ती लाभलेले मुख्य मंत्री, पाटबंधारे विभागातील कार्यकलापावर यथाशीघ्र श्‍वेतपत्रिका काढतील आणि त्यात भ्रष्टाचार करणार्‍या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवितील. या घडामोडीतून एवढे घडले तरी पुष्कळ झाले.
                                                           
                                                           
 -मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २९-०९-२०१२
babujivaidya@gmail.com

No comments:

Post a Comment