Saturday 17 November 2012

दि. ११ नोव्हें.चे भाष्य आणि त्याने निर्मिलेली खळबळ



रविवारचे भाष्य दि. १८ नोव्हेंबर २०१२ करिता


दिनांक ११ नोव्हेंबरला मी भाजपाची अ-स्वस्थताया शीर्षकाचे भाष्य लिहिले. ते मराठीत होते. ते प्रकाशित होताच खूप खळबळ माजली. दि. १२ ला, कुठे तरी त्याची बातमी आली असावी. त्यामुळे, सर्व प्रसारमाध्यमे खूप सक्रिय झालीत. सर्वांना वाटले की, त्यांना एक मसालेदार बातमी मिळाली आहे. दि. १२ लाच, नागपूरला, माझ्या घरी ६-७ टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी आले. मीच सर्वांना एकत्र यावयास सांगितले.

माझे निवेदन
त्यांना मी सांगितलेल्या निवेदनाचे सार हे होते की,
(१) हे माझे वैयक्तिक मत आहे. राम जेठमलानी यांना ज्याप्रमाणे आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तसा मलाही आहे.
(२) या माझ्या मताशी संघाचा संबंध नाही. माझ्याकडे गेल्या नऊ वर्षांपासून संघात कोणतेही पद नाही. एवढेच नव्हे तर गेल्या ४-५ वर्षांपासून अ. भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीसाठी मी अधिकृत निमंत्रितही नाही. शिवाय, अशा प्रकरणाची संघात चर्चा होत नाही, असा माझा अनुभव आहे.
(३) माझे लक्ष्य जेठमलानी होते. त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करणे आणि त्याच वक्तव्यात नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करावे असे सांगणे, यामुळे गडकरींविरुद्ध मोहिमेच्या संशयाची सुई गुजरातकडे जाते, असे मी म्हणालो. तसेच राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी नीतीन गडकरींना कलंकित (टेण्टेड) असे संबोधून भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे पत्रक प्रसिद्ध केल्यामुळे, या मागे काही कारस्थान असावे, असेही मला वाटले.
(४) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार कोण राहील, याची आज चर्चा करणे मला अकालिक व अप्रस्तुत वाटते.

वार्ताहरांची करामत
त्यानंतर त्या दिवशी दिवसभर अनेक प्रसारवाहिन्यांनी ही बातमी आपापल्या दृष्टिकोणाने प्रसारित केली. या वाहिन्यांचे जे प्रतिनिधी आले होते, ते बहुतेक हिंदी भाषी होते. त्यांनी माझ्या ब्लॉगवरील मराठीतील लेख वाचला असणे शक्य नव्हते. माझ्या भाष्याच्या हिंदी अनुवादाची नागपुरातच व्यवस्था आहे, व तो लेख ग्वाल्हेरवरून प्रकाशित होणार्‍या स्वदेशदैनिकात प्रकाशित होत असतो. वाहिन्यांचे प्रतिनिधी निघून गेल्यानंतर त्या मराठी लेखाचे हिंदी भाषांतर झाले काय, याची चौकशी केल्यानंतर, ते झाले आहे पण पाठविण्यात आले नाही असे मला सांगण्यात आले. भाषांतरात त्रुटी असू नये म्हणून मी ते तपासले व नंतर ते स्वदेशकडे पाठविण्यात आले व ब्लॉगवरही टाकण्यात आले. हे सांगण्याचे कारण असे की, माझ्या घरी आलेल्या कोणत्याही वाहिनीच्या प्रतिनिधीने समग्र भाष्यवाचलेले नव्हते. त्यांनी आपापल्या रुचीप्रमाणे त्याला भडकाऊ रूप (सेन्सेशनॅलिझम्) देऊन ते प्रसारित करणे आपण स्वाभाविकच समजले पाहिजे. वृत्तपत्रांचे वार्ताहर एखाद्या घटनेला कसे विचित्र वळण देऊ शकतात, याचे एक चपखल उदाहरण माझ्या वाचनात आहे.

एक उदाहरण
ती एका कॅथॉलिक धर्मगुरूची (कार्डिनल) गोष्ट आहे. हे धर्मगुरू वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना आपल्या जवळही येऊ देत नसत. ते न्यूयॉर्कला आले असताना विमानतळावरच न्यूयॉर्क टाईम्सच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली. त्याने, चर्चच्या गर्भपाताला असलेल्या विरोधापासून अनेक विषयांवर त्यांना प्रश्‍न विचारले, पण त्यांनी एकाचेही उत्तर दिले नाही. अखेरीस त्या वार्ताहराने विचारले, ‘‘न्यूयॉर्कच्या आपल्या मुक्कामात आपण नाईट क्लबला भेट देणार आहात काय?’’ त्यावर धर्मगुरू विचारते झाले, ‘‘न्यूयॉर्कमध्ये नाईट क्लब आहेत?’’ आपण वार्ताहराची चांगली जिरवली या आनंदात ते निघून गेले. दुसर्‍या दिवशीच्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये अशी बातमी प्रकाशित झाली. ‘‘अमुकअमुक धर्मगुरू न्यूयॉर्कला आले. आल्याबरोबर त्यांनी चौकशी केली की, न्यूयॉर्कमध्ये नाईट क्लब आहेत काय?’’
बातमी इतकी वाकविली आणि वळविली जाऊ शकते. दि. १२ ला बहुतेक सर्व वाहिन्यांनी वैद्य विरुद्ध मोदी असे चित्र रंगविले. मी संशयाची सुईएवढेच म्हटले. त्यांनी तो माझा आरोपआहे, असा आभास निर्माण केला.

दोन खुलासे
स्वाभाविकच यावर खूप प्रतिक्रिया आल्या. ज्या प्रतिक्रिया दूरध्वनीवरून आल्या त्यांना मी संपूर्ण भाष्यवाचायला सांगितले. एक मजेदार गोष्ट लक्षात आली की, भाजपाच्या समर्थकांच्या आणि काही पदाधिकार्‍यांच्याही ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यांना त्या भाष्यामुळे क्रोध आलेला दिसला नाही. उलट बरे वाटलेले जाणवले. संघ स्वयंसेवकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या मात्र मिश्रित होत्या आणि त्या त्यांची मानसिक अस्वस्थता दर्शविणार्‍या होत्या. संघातर्फे अधिकृतपणे सांगण्यात आले की, ‘‘हे वैद्यांचे वैयक्तिक मत आहे. संघ त्याच्याशी सहमत नाही.’’ भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनीही नि:संदिग्धपणे सांगितले की, ‘‘ते वैद्यांचे वैयक्तिक मत आहे. भाजपात फूट नाही. सर्व भाजपा आणि सर्व मुख्य मंत्री यांची एकजूट आहे.’’ ही खरेच चांगली गोष्ट आहे. मला भाजपात फूट जाणवली, हे खरे आहे. असे जाणवणे आणि दिसणे मला योग्य वाटले नाही, म्हणून तर भाष्यलिहिले. त्या भाष्याचा शेवट असा आहे : ‘‘तो (भाजपा) एकजूट आहे, तो एकरस आहे, त्याच्या नेत्यांमध्ये परस्पर सद्भाव आहे, त्यांच्यात मत्सर नाही, असा ठसा उमटावा, अशी भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांची व सहानुभूतिदारांची अपेक्षा आहे. यातच पक्षाचे भले आहे व त्याच्या वर्धिष्णुतेची ग्वाही आहे.’’ 

दोन चांगल्या घटना
मला आनंद आहे की, पक्ष एकजुटीने गडकरींच्या पाठीशी उभा राहिला. गडकरींवर भ्रष्टाचाराचे व अनियमिततेचे आरोप आहेत. त्या आरोपांची चौकशी सरकारतर्फे सुरू आहे. सरकार भाजपाचे नाही; कॉंग्रेसचे आहे. त्यामुळे, गडकरींच्या बाजूने पक्षपात होण्याची तिळमात्रही शक्यता नाही. म्हणून, मी हे आग्रहाने प्रतिपादित केले आणि आताही करीत आहे की, सरकारप्रणीत चौकशीचे निष्कर्ष समोर येऊ द्या आणि नंतर गडकरींच्या बाबत निर्णय घ्या. या दोन दिवसांमध्ये दोन चांगल्या घटना घडल्या. पहिली ही की, सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट एस. गुरुमूर्ती यांनी गडकरींच्या पूर्ती कंपनीची कागदपत्रे तपासली. त्यामध्ये त्यांना गडकरींचा दोष दिसला नाही. तथापि त्यांनी हेही म्हटले की, मी गडकरींना क्लीन चिटदिली नाही. याचा अर्थ काय करावयाचा ते तेच जाणोत आणि दुसरी ही की, गडकरी गुजरातेत निवडणूक प्रचारासाठी जात आहेत. या घटनेने मोदींनी स्वत:ला जेठमलानी पितापुत्रांच्या अभिप्रायापासून अलग केले, हे स्पष्ट होते. हे चांगले झाले.

प्रतिक्रियांची विविधता
माझ्या ई-मेलवर सुमारे १६ प्रतिक्रिया आल्या. याशिवाय ४-५ दूरध्वनीवरून आल्या. पांढरकवड्यावरून (जि. यवतमाळ) कट्टर भाजपाकार्यकर्ता दूरध्वनीवर म्हणाला, ‘‘तुम्ही आमच्या मनातील बोललात.’’ हरयाणातील भाजपाच्या एका जिल्हा समितीच्या अध्यक्षाने दूरध्वनीवरून माझे अभिनंदन केले; तर सिमल्याहून हिमालय परिवारचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणाले, ‘‘आपण उत्तम लेख लिहिला.’’ दिल्लीचे भाजपाचे एक ज्येष्ठ पुढारी, जे आजही भाजपात उच्च पदावर आहेत, त्यांनी हिंदी ब्लॉग वाचून, मला कळविले की, ‘‘आपण अगदी निरपेक्ष भावनेने लिहिले आहे.’’ याच्या उलट  नागपूरचा एक स्वयंसेवक रागारागाने म्हणाला की, ‘‘स्वयंसेवक म्हणून तुम्ही नापास झाला आहात. तुम्ही महामूर्ख आहात. तुम्ही सर्व स्वयंसेवकांचा अपमान केला आहे.’’ मी विचारले, आपण ब्लॉग वाचला आहे काय? ते म्हणाले, त्याची मला गरज नाही; आणि दूरध्वनी ठेवून दिला.
ई-मेलवर आलेल्या प्रतिक्रियांमध्येही अशीच संमिश्रता आहे. कोचीन (केरळ)वरून एका स्वयंसेवकाची प्रतिक्रिया अनवसरे यत् कथितम्म्हणजे अयोग्य वेळी केलेले कथन, या शीर्षकाची आहे. गुरुमूर्तींच्या अहवालाची प्रशंसा करून हा स्वयंसेवक म्हणतो की, ‘‘तुमच्या कथनामुळे आपले म्हणणे लोकांप्रत पोचविण्याची संधी गडकरींच्या हातून गेली.’’ लखनौचे एक लेखक म्हणतात की, ‘‘वैद्यांनी संघ व भाजपा यांना आत्मचिंतनाची संधी दिली. संघ व भाजपात श्रेष्ठ काय आहे? तत्त्वनिष्ठा की व्यक्तिनिष्ठा?’’ तिसरी प्रतिक्रिया म्हणते, ‘‘जेठमलानींनी आगाऊपणा केला हे खरे. पण मा. गों. नी मोदींशी त्यांचा संबंध जोडून एक नको असलेला मुद्दा तयार केला. जेठमलानींची उपेक्षा करणेच योग्य.’’ एकाने तर कमालच केली. तो म्हणतो, ‘‘गडकरींच्या निंदेमागे मोदी नाहीत, जेटली आहेत. त्यांनीच प्रशांत भूषण यांना गडकरींच्या विरोधात साहित्य पुविले.’’ आणखी एक विचारतो, ‘‘आपण जेठमलानींनी आपले मत पक्षसभेत मांडावे, असे सांगता, मग आपण आपले मत परिवाराच्या बैठकीत का मांडले नाहीत?’’ एक महिला अभिप्राय देते, ‘‘संघाच्या प्रतिमेला धक्का लागेल असे मत जाहीर रीत्या व्यक्त करणे अयोग्य आहे.’’ आणखी एक प्रतिक्रिया आहे, ‘‘भाजपाच्या शेकडो समर्थकांचे मतच आपण मांडले आहे. भाजपा कॉंग्रेसपेक्षा वेगळी दिसली पाहिजे.’’ नागपूरचे एक मुस्लिम कार्यकर्ते म्हणतात, ‘‘मोदी आज भाजपाहून मोठे झाले आहेत. ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे.’’ त्यांनी अनेक भाजपाच्या नेत्यांची नावे घेऊन म्हटले की, ‘‘या नेत्यांनी कोणते दिवे लावले? मोदीच भाजपाला विजय मिळवून देतील.’’ एक जण विचारतो, ‘‘पुरावे नसतानाही भाजपाविरुद्ध रान उठविण्यासाठी टपलेल्या मीडियावाल्यांना खाद्य पुरविणे कितपत उचित आहे?’’ एक प्रतिक्रिया सांगते की, ‘‘मोदींना पर्याय नाही. भाजपाचे बाकीचे सारे नेते (त्यांनी नावे घेतली आहेत) त्यांच्याहून लहान आहेत. म्हणूनच ते आपण प्रधानमंत्र्याच्या शर्यतीत नाही, असे सांगत असतात.’’ दुसर्‍या एकाने सूचना केली की, ‘‘श्रीमती इंदिरा गांधींप्रमाणे मोदींनी नवा पक्ष काढावा.’’ आणखी एक म्हणाला, ‘‘ऋषिसत्तेने भाजपाला ताळ्यावर आणावे.’’ अन्य दोघांनी, ब्लॉग वाचून ‘‘तो आमच्या भावना प्रकट करणारा आहे’’, असे म्हटले, तर एकाने प्रश्‍न केला की, ‘‘हा लेख लिहिण्यासाठी कॉंग्रेसने तुम्हाला किती पैसे दिले?’’

अकालिक चर्चा
किती प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू शकतात, याचे हे निदर्शक आहे. त्यातून एक (गैर)समज प्रकट होतो की, मी नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. हा गैरसमज प्रकट होण्याचे एक कारण, या मंडळींनी संपूर्ण भाष्यनीट वाचले नसणे, हे असू शकते. माझ्या भाष्याचे टोक जेठमलानींकडे आहे. सुमारे आठ दिवसांपासून ते गप्प आहेत, हे चांगलेच आहे. माझा मोदींना किंवा त्यांच्या प्रधानमंत्रिपदासंबंधीच्या महत्त्वाकांक्षेला विरोध असण्याचे कारणच नाही. मी स्पर्धेतला प्रतिस्पर्धी नाही. मात्र हे खरे की, या पदावरील संभाव्य व्यक्तींची चर्चा करणे या क्षणी मला अप्रस्तुत वाटते. श्री बाळासाहेब ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांना प्रधानमंत्री करावे, असे म्हटले होते. तेव्हाही मी असेच म्हटले होते. २०१४ साली होणार्‍या प्रधानमंत्र्याची चर्चा यावेळी अकालिक आहे, असे माझे ठाम मत आहे. आपला नेता कोण हे निवडून आलेले लोकसभेचे सदस्य ठरवतील.

लोकसत्ताचे संपादकीय
या माझ्या भाष्यावर दैनिक लोकसत्तेने एक विस्तृत संपादकीय लिहिले आहे. त्याचे शीर्षक आहे वैद्य की कसाई’. या संपादकीयाच्या प्रकाशनानंतर लोकसत्ताकार्यालयातून मला दूरध्वनी आला आणि विचारणा केली की, ‘‘या संपादकीयाबद्दल आपले काय मत आहे?’’ त्यांनी संपादकीयाचे लेखक गिरीश कुबेर आहेत, हेही कळविले. मला खरेच, संपूर्ण लेख वाचून मौज वाटली. मी वृत्तपत्र व्यवसायात होतो. निदान दोन मोर्चे ‘‘वैद्य मुर्दाबाद’’चे नारे गर्जत, मी संपादक असताना त. भा. कार्यालयावर आले होते. खुनाची धमकी देणारी दोन निनावी पत्रेही आली होती. तेव्हाही मला मौजच वाटली. मी ती पत्रे, पोलिसांकडे पाठविली नाहीत. एकाने स्वयंसेवक अशी ओळख देऊन मला नापासआणि महामूर्खम्हटले, त्या मानाने गिरीश कुबेरांचा लेख खूपच मवाळ आहे. मी मुख्य संपादक असताना, वाचकांचा पत्रव्यवहार प्रकाशित करताना, त. भा.च्या संपादकीयावर आक्षेप घेणारी, त्यातील प्रतिपादनाचा विरोध करणारी व दुसरे मत मांडणारी पत्रे आवर्जून प्राथम्य क्रमाने प्रकाशित करावीत, असा स्पष्ट निर्देश दिला होता. त्या पत्रातील अशिष्ट शब्द, क्वचित शिवराळही शब्द, तसेच कायम ठेवावेत, असा माझा आग्रह असे. या बाबत संबंधित सहायक संपादकाने प्रश्‍न केला असता, मी म्हटले होते, ‘‘ते शब्द असू द्यात. त्यावरून पत्रलेखकाची बौद्धिक व सांस्कृतिक पातळी स्पष्ट होते.’’

उपमानाची निवड
म्हणून गिरीश कुबेरांच्या लेखाचा मला राग नाही. मला कसाईम्हटले, हेही बरोबरच नाही काय? कसाईही चाकू चालवितो आणि वैद्यही (म्हणजे शल्यक्रिया करणारा डॉक्टर असे मी समजतो) रुग्णाच्या पोटावर किंवा अन्य दोषयुक्त इंद्रियावर चाकू चालवितो. चाकूचा दोन्ही ठिकाणी उपयोग होत असल्यामुळे वैद्य व कसाई यांची तुलना करण्याचा मोह होणे असंभाव्य नाही. पण वैद्याचा चाकू रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी असतो, तर कसायाचा प्राण घेण्यासाठी असतो, हा फरक जोशपूर्ण मानसिक अवस्थेत ध्यानात घेतला गेला नसेल, तर ते स्वाभाविकच नाही काय? कोणी कोणते उपमान वापरायचे हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक व सांस्कृतिक संस्कारावर अवलंबून असणार की नाही? कुबेरांनी मला लेखन थांबविण्याचा सल्ला दिला आहे, त्याचा मी अवश्य विचार करीन. पण एक गोष्ट स्पष्ट कराविशी वाटते. ब्लॉगवगैरे प्रकरण मला खरेच माहीत नव्हते. कलकत्त्यावरून प्रसिद्ध होणार्‍या टेलिग्राफच्या या भागातील प्रतिनिधीने भाष्यवाचायला मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनीच ब्लॉग काढायला सांगितले. माझा एक मुलगा ई-न्यूज भारतीत काम करतो. त्याला हे तंत्र माहीत होते. त्याने ब्लॉगवर भाष्यटाकणे सुरू केले. पण त्यापूर्वीच ते औरंगाबाद व सोलापूर येथून प्रकाशित होणार्‍या त. भा.तून प्रसिद्ध होत होते; आणि आजही प्रसिद्ध होते. त्याचे हिंदी भाषांतर ग्वाल्हेरवरून निघणार्‍या स्वदेशमध्ये येते. मी खरेच भाष्यलिहिणे बंद केले होते. पण या तिघांकडून विनंती आल्यानंतर पुन्हा लेखन सुरू केले. कुबेरसाहेब देवगिरी त. भा.चे माजी संपादक दिलीप धारूरकर यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेऊ शकतात. त्यांना लेख आवडत नसेल, तर तो त्यांनी खरेच वाचू नये. आपल्या नागपूर कार्यालयालाही मला लेख न मागण्याची सूचना द्यावी.
त्या लेखातील एक गोष्ट मात्र मला खटकली. ती म्हणजे संघाच्या प्रचारकव्यवस्थेबद्दल कुबेरांनी एवढे अज्ञान दाखवावे ही. मी प्रवक्ता असताना प्रचारकम्हणजे काय हे विदेशी पत्रकारांना समजावून सांगणे मला कठीण जाई. कुबेर तर या देशातील व महाराष्ट्रातीलच आहेत. त्यांना हे कळू नये की, प्रचारक वंशपरंपरेने येत नाही. त्याने स्वीकारलेल्या जीवनव्रतानेच, तो, ‘प्रचारकया श्रेणीत दाखल होण्याला पात्र होत असतो. एक मजेची गोष्ट सांगतो. माझ्यानंतर २००३ मध्ये राम माधव संघाचे प्रवक्ते झाले होते. मला एक सज्जन म्हणाले, ‘आपला मुलगा जो प्रवक्ता झाला आहे तोही चांगली उत्तरे देतो.मी उत्तरलो, ‘चांगली उत्तरे देतो ना! पण तो माझा मुलगा नाही.त्या सज्जनाचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. कारण माझ्या त्या मुलाचे नाव रामआहे; आणि मी माधव. झाला की नाही तो राम माधव! हा राम, सध्या इंग्लंडमध्ये प्रचारक आहे. म्हणजे तेथे त्याचे मुख्यालय आहे. प्रचारकाचे कार्यक्षेत्र, स्थान आणि पद त्याचे वडील ठरवीत नसतात. पण कुबेर जोशात आलेले आहेत. मी जाणीवपूर्वक नशेतम्हणत नाही. संघ-भाजपातला गोंधळ संपविण्याचे त्यांनी ठरविलेले दिसते. त्यांचे चांगले उद्दिष्ट आहे. पण यासाठी काय उचित आणि काय अनुचित याचा विवेक त्यांनी ठेवला पाहिजे. जोशात येऊन असे विवेक करण्याचे विसरणे योग्य नाही. तथापि मी त्यांना दोष देत नाही. अर्धवट माहिती असली की असे दोष होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मी ठरविले आहे की माझ्यापुरता हा विषय येथेच संपला.

-मा. गो. वैद्य
नागपूर,
दि. १७-११-२०१२
babujivaidya@gmail.com

3 comments:

  1. तुमच्या वैयक्तिक मताला कोण विचारतो ? संघाशी सम्बन्धित आहात व होता म्हणून तुमच्या कडे लोकांचे लक्ष जाते . नाहीतर कोण वैद्य ? पोटातली मोदिन्विश्यीची मळमळ बाहेर काढली आणि टीका होवू लागली म्हणून वैयक्तिक मत या शब्दामागे लपून कसे चालेल ?

    ReplyDelete
  2. आदरणीय
    वैद्य बाबा ,
    वैचारिक मत प्रवाहात आपण आपले मत मांडने आणि माध्यमांनी त्याचा वापर टी आर पि साठी करने खरेच मजेदार वाटले .सामान्य , स्वयंसेवक आणि संपादक या तिन्ही सदरातिल सत्पात्र लोकांच्या प्रत्रिक्रिया आपण स्विकार करुन आपल्या ह्रदय सागराला विस्तारित केले म्हणून पुन्हा एकदा अभिवादन
    महेशचंद खत्री
    मेहकर

    ReplyDelete
  3. वैद्यजी,
    आपल्या मोदी आणि जेठमलानी यांच्या विषयीच्या लेखाच्या नेटवरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषत: विविध ब्लॉगांवर तसेच फेसबुकसारख्या कम्युनिटीवर प्रतिक्रिया दिसून आल्या. फेसबुक, ब्लॉग यांचा मोठा वाचकवर्ग आहे. समांतर माध्यमच या निमित्ताने तयार झाले आहे. त्यामुळे इथल्या चर्चाही एका पातळीपर्यंत महत्त्वाच्या आहेत.

    तुमच्या लेखावर लिहिल्या गेलेल्या लेखांच्या काही लिन्क्स :

    http://anita-patil.blogspot.in/2012/11/blog-post_13.html

    ReplyDelete