Thursday 29 November 2012

भवितव्य : शिवसेनेचे व महाराष्ट्राच्या राजकारणाचे


रविवारचे भाष्य ० दि. २५-११-२०१२ करिता


शिवसेनेचे संस्थापक आणि त्या संघटनेचे सर्वश्रेष्ठ प्रभावी नेते श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे दि. १७ नोव्हेंबरला निधन झाले. त्यांच्या उंचीचा, त्यांच्या ताकदीचा आणि त्यांच्यासारखा लक्षावधी अनुयायांवर वचक असलेला नेता शिवसेनेजवळ नाही, हे सर्वमान्य आहे. यात विद्यमान नेतृत्वाची निंदा नाही. फक्त वस्तुस्थितीचे निदर्शन आहे.

घराणेशाही
व्यक्तिकेंद्रित संघटना असो की, राजकीय पक्ष असो, सर्वोच्च पदी असलेली व्यक्ती काळाआड झाली की, असे प्रश्‍न उद्भवणे स्वाभाविकच समजले पाहिजे. म्हणून जुन्या राजघराण्यांप्रमाणे, घराणेशाहीने चालणारे पक्ष, शक्य तोवर, विद्यमान नेता आपल्या हयातीतच, आपल्या उत्तराधिकार्‍याची नेमणूक करून ठेवीत असतो. पंजाबात, अकाली दलाचे नेते मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी, आपल्या पुत्राला उपमुख्यमंत्री करून तशी सोय करून ठेवली. मुलायमसिंगांनी तर चक्क आपल्या मुलाला मुख्यमंत्रीच केले. लालू प्रसादांनी आपल्या पत्नीला मुख्यमंत्री केले होते. द्रविड मुन्नेत्र कळघमचे सर्वेसर्वा करुणानिधी यांचे दोन्ही पुत्र कर्तबगार आहेत. त्यातला एक केंद्र सरकारात मंत्रीही आहे. तो करुणानिधींचा ज्येष्ठ पुत्र आहे. पण करुणानिधींची मर्जी, धाकटा मुलगा स्टॅलिनवर आहे. करुणानिधी जोपर्यंत हयात आहेत, तोपर्यंत सर्व सुरळीत चालूही शकेल. पण त्याच्यानंतर संघर्ष अटळ आहे. ही सर्व छोट्या म्हणजे प्रादेशिक पक्षांची उदाहरणे झालीत. पण सर्वांत मोठा पक्ष म्हणून ज्याची ख्याती आहे, तो कॉंग्रेस पक्षही घराणेशाहीचाच पुरस्कर्ता आहे. श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी या परंपरेनुसार, आता राहुल गांधींचा अनौपचारिक का होईना, राज्यारोहणविधी झालेला आहे आणि देशभरातील कॉंग्रेसजनांनी त्याला मान्यताही दिलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीही आपले पुत्र उद्धव ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्ष करून त्याच परंपरेचे पालन केले. एवढेच नव्हे, तर उद्धव ठाकरे यांच्या पुत्राला- आदित्यला शिवसेनेतील युवकांच्या संघटनेच्या मूर्धन्य स्थानी बसविले.

मनसेची शक्ती
तेव्हा, शिवसेनेच्या भवितव्यासंबंधी चिंता करण्याचे किंवा त्या प्रश्‍नाचा विचार करण्याचे प्रयोजन नसायला हवे होते. पण प्रयोजन आहे. कारण, ठाकरे घराण्यातीलच बाळासाहेबांचे सख्खे पुतणे राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करण्याला नकार दिला. बाळासाहेबांसारख्या प्रचंड ताकतीच्या नेत्याच्या इच्छेपुढे मान न तुकविता, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा नवा पक्ष काढला; आणि २००९च्या विविध पातळ्यांवरील निवडणुकीत शिवसेनेची पर्वा न करता आपली शक्ती प्रकट केली. महाराष्ट्र राज्य विधानसभेत मनसेचे १३ आमदार आहेत. २८८ सदस्यांच्या विधानसभेत १३ म्हणजे लक्षणीय संख्या नव्हे, असे कोणी म्हणेलही. पण तेवढी संख्या बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रिय असताना मनसेने गाठली, हे लक्षणीय आहे. त्यानंतर झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुकीतही मनसेने आपली शक्ती दाखविली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद या महापालिकांमध्ये मनसेची शक्ती डोळ्यात भरण्यासारखी आहे. राज ठाकरे हे जे करू शकले, ते प्रकाशसिंग बादल यांच्या पुतण्याला जमले नाही. त्यांचे पूर्ण नाव माझ्या ध्यानात नाही. पण त्यांच्या नावाच्या शेवटी मानआहे. मान हेही अकाली दलापासून वेगळे झाले. वेगळे होऊन त्यांनी पंजाब विधानसभेची निवडणूकही लढविली, पण त्यांना यश मिळाले नव्हते. त्यामुळे ते सध्या पंजाबच्या राजकारणात उपेक्षित अवस्थेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मनसेची शक्ती वाढणार आहे. आणि मनसेची शक्ती वाढणे याचा अर्थ शिवसेनेची शक्ती घटणे हा आहे.

एकीकरण?
शिवसेना आणि मनसे एकत्र येतील काय, असा प्रश्‍न विचारता येऊ शकतो. तो अगदीच अप्रस्तुत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या आजारात, तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेच्या वेळी राज ठाकरे, आपले सर्व विरोधित्व विसरून त्यांच्या भेटीला गेले होते. बाळासाहेबांच्या अंत्यकाळी ते उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. ही त्यांची कृती राजकीय खेळी समजावी काय, असा प्रश्‍न कोणीही विचारू शकतो. माझ्या मते ती खेळी राजकीय नसावी, नसेलही. पण राज ठाकरे यांच्या वर्तनाने, त्यांची उंची वाढली आहे, एवढे मात्र निश्‍चित. असे, मनाचा मोठेपणा दाखविणारे राज ठाकरे आपला पक्ष शिवसेनेत विलीन करतील काय आणि त्याद्वारे स्व. बाळासाहेबांच्या आत्म्याला आनंद देतील काय, हे प्रश्‍न अधिक महत्त्वाचे आहेत. असे एकीकरण होऊ शकते. पण ते राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच होईल, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाही. स्वतः उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी, रामदास कदम, संजय राऊत या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना हे मान्य होईल काय, हा खरा आणि कळीचा प्रश्‍न आहे. मात्र शिवसेनेचे नाव आणि प्रतिष्ठा टिकवायची असेल, तर यापरता दुसरा मार्ग नाही, असे मला वाटते.

तडजोडीची संभावना
शिवाय, उद्धव ठाकरे यांची प्रकृतीही म्हणावी तितकी सुदृढ नाही. दोनदा हृदयावर ऍन्जोप्लास्टीझालेली आहे. ते वयाने खूप मोठे नसले, तरी या हृदयविकाराने त्यांच्या कार्यशक्तीला निश्‍चितच बाधित केले असणार. आपल्या प्रकृतीच्या या अवस्थेत, उद्धव ठाकरे, दुय्यमत्व स्वीकारून राज ठाकरे यांच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवितील काय, हा खरा प्रश्‍न आहे; आणि तो शिवसेनेच्या भवितव्याशी म्हणजे नावाशी आणि प्रभावाशीही निगडित आहे. हे दोन्ही पक्ष आताच्या सारखेच वेगवेगळे राहिले तर २०१४ च्या विधानसभेच्या म्हणा अथवा लोकसभेच्या म्हणा- निवडणुकीत मनसेने शिवसेनेवर मात केली, तर आश्‍चर्य वाटायला नको. वेगळे-वेगळे राहूनही २०१४ ची विधानसभेची निवडणूक लढविली जाऊ शकते. आणि दोन्ही मिळून १०० च्या आसपास ते जागा जिंकू शकले, तर सत्ताग्रहणासाठी ते एकत्र येऊही शकतात. पण ही झाली सोयीसाठी केलेली तडजोड. हे हृदयांचे एकत्र येणे नव्हे. त्यामुळे शक्तिसंपन्नतेचे ते आलंबनही असू शकणार नाही.

महायुतीचे भवितव्य
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्भवणार्‍या परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावरही होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात शिवसेना, भाजपा आणि रामदास आठवले यांची रिपाइं यांची महायुती आहे. ही महायुती शक्तिशाली आहे. नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुकीत, या महायुतीचा म्हणावा तसा प्रभाव दिसला नसला, तरी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव दिसू शकतो. महापालिकांच्या निवडणुका मोठ्या शहरांच्या संदर्भात होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत ग्रामीण भागाला अधिक महत्त्व असणार; आणि म्हणून रिपाइंची सोबत सेना-भाजपा युतीला उपकारक ठरणार, याविषयी शंका नको. अर्थात, यात रिपाइंचाही फायदा आहेच. पण राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व आले, तर रिपाइं युतीबरोबर राहील काय, हा प्रश्‍न आहे. आठवलेंचा, युतीत मनसेला समाविष्ट करण्याला विरोध आहे. याचे कारण तेच जाणोत. पण विरोध आहे, हे स्पष्ट आहे. मनसेला युतीत सामील करून घ्यावे, असे भाजपातील शक्तिशाली नेत्यांचे मत आहे. अजून, संपूर्ण भाजपाने याबाबत नेमकी अधिकृत भूमिका घेतलेली नाही. पण ती भूमिका त्या पक्षाला घ्यावी लागेल. राज ठाकरे यांच्याकडेच शिवसेनेचे नेतृत्व आले, तर मग विचार करण्याचा प्रश्‍नच नाही. कारण, युती शिवसेनेशी आहे व्यक्तीशी नाही. पण हे घडले नाही आणि मनसे वेगळीच राहिली, तर भाजपाचे धोरण काय राहील? मनसेची आजची शक्ती, आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्या शक्तीत फार मोठ्या प्रमाणात वृद्धी होण्याची संभाव्यता ध्यानात घेता, भाजपाने, शिवसेनेला बाजूला सारून, मनसेशी युती करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आघाडीची बिघाडी
भाजपा आणि मनसे यांची युती प्रभावशाली होऊ शकते. ही युती कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस (राकॉं) यांच्यातील धुसफुशीच्या पृष्ठभूमीवर निश्‍चितच अधिक प्रभावी ठरणार आहे. कॉंग्रेस व राकॉं यांच्यात सध्या अ-स्वस्थतेचे वातावरण असले, तरी त्याचा परिणाम २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीवर होणारही नाही. आघाडी, लोकसभेची निवडणूक एकोप्यानेच लढवील. शरद पवार आघाडी तुटू द्यावयाचे नाहीत. पण हा एकोपा लोकसभेच्या निवडणुकीनंतर ४-५ महिन्यांनी येणार्‍या राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिसावयाचा नाही. कदाचित आघाडी कायमही राहील. पण दोघांचेही प्रयत्न एकमेकांच्या तंगड्या ओढण्यासाठी राहतील. आतापर्यंत, संख्याबळ तुल्य असले, तरी मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असावा, याला राकॉंने मान्यता दिली. पण यानंतर ते शक्य होईल, अशी चिन्हे नाहीत. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हे तडजोडीचे सूत्र राहू शकते. या परिस्थितीत, आपले आमदार अधिक संख्येने निवडून यावेत, या सकारात्मक रणनीतीबरोबरच, दुसर्‍याचे आमदार आपल्या आमदारांच्या संख्येपेक्षा कमी कसे राहतील, ही नकारात्मक रणनीतीही कार्यरत राहीलच. अशा परिस्थितीत मनसे व भाजपा यांच्या युतीला सत्ता काबीज करण्याची फार मोठी संधी राहील. काही अघटित घडून, शिवसेना, मनसे व भाजपा यांची युती तयार झाली व या युतीत आठवले यांची रिपाइंही सामील झाली, तर २०१४ मध्ये युतीचे सरकार स्थापन होण्याची खूपच शक्यता राहील.

भवितव्य
या सर्व संभावना, आणि हे प्रश्‍न बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे ऐरणीवर आले आहेत. त्यांची निश्‍चयात्मक उत्तरे याच क्षणी देता येतील, अशी परिस्थिती नाही. थोडा काळ त्यासाठी जाऊ द्यावा लागेल, त्यानंतरच या प्रश्‍नांची उत्तरे क्रमाक्रमाने स्पष्ट होऊ लागतील. या सर्व संभावना आणि प्रश्‍न यांच्यावरच शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहे. केवळ शिवसेनाया नावाचेच नाही, तर शिवसेनेच्या नेतृत्वपदी जी मंडळी आरूढ आहेत, त्यांचेही राजकीय भवितव्य यावर अवलंबून राहील. तेव्हा जरा थोडी वाट बघू या.

                                                                       
मा. गो. वैद्य
 नागपूर
दि. २३.११.२०१२
babujivaidya@gmail.com

1 comment:

  1. आदरणीय
    वैद्य बाबा ,
    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनोपरांत पक्ष व हिंदुत्वाची खूप मोठी हानि झाली ती भरायाला वेळ लागेल मात्र दोन्ही ठाकरे द्वयींमधे जर एकत्रीकरण झाले तर हानि भरायाला सोपे जाईल .मात्र असे होण्या पासून रोखन्या साठी हितशत्रु सक्रीय असतिल यात शंका नाही .
    दोहोनी एकत्र यावे ही गरज असून महाराष्ट्रीय जनता देखिल याकडे एका शुभ भावनेने पाहत आहे .
    कदाचित यातुनच शिवसेनेचे शिवनिर्माण होवू शकते हेही तितकेच खरे !
    भाष्य आवडले .
    -महेशचंद खत्री .
    मेहकर जिल्हा .

    ReplyDelete