रविवारचे भाष्य दि. २ डिसेंबर २०१२ करिता
जगात अशीही माणसे असतात
(१) एक आय. ए. एस. अधिकारी आणि १०४ कि. मी.चा रस्ता
त्याचे नाव आहे आर्म्सस्ट्रॉंग पामे. तो नागालँडमधील तामेंगलॉंग या जिल्ह्याच्या स्थानी डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आहे. त्याच्या जनजातीचे नाव ‘झेमे’. या जनजातीतून तोच पहिला आय. ए. एस. उत्तीर्ण केलेला तरुण आहे. इ. स. २००५ मध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफेन्स कॉंलेजमधून त्याने पदवी प्राप्त केली होती.
त्याने ठरविले की, मणिपूरला, नागालँड व आसामशी जोडणारा १०० कि. मी.चा रस्ता तयार करावयाचा. वस्तुत: केंद्र सरकारने हा रस्ता तयार करण्यासाठी १९८२ मध्ये १०१ कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण ती कागदावरच राहिली. या भागात, मोटर जाऊ शकणारा रस्ता नसल्यामुळे, टायफाईड किंवा मलेरियाच्या आजाराच्या रुग्णाला पायी न्यावे लागते आणि अगदी जवळच्याच दवाखान्यात भरती करावयाचे म्हटले, तरी दोन दिवस पायपीट करावी लागते. पुष्कळदा बासांचे स्ट्रेचर बनवूनच रुग्णाला नेले जाते. स्वाभाविकच फारच थोडे रुग्ण, दुरुस्त होऊन परत येतात.
या अशा भागात, सर्व ऋतूंमध्ये, मोटारींची वाहतूक करू शकणारा रस्ता तयार करणे हे अत्यंत जिकीरीचे काम होते. सरकारकडून काही मदत मिळण्याची जेव्हा आशा संपली, तेव्हा पामेने आपले कुटुंब आणि सहानुभूतिदार यांच्या मदतीनेच हे कार्य करावयाचा निर्धार केला. या आर्म्सस्ट्रॉंगचा मोठा भाऊ, दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहे. त्याने आपल्या धाकट्या भावाच्या उद्दिष्टाला मदत करण्याचे ठरविले. त्याने व त्याच्या पत्नीने आपला एक महिन्याचा पगार आर्म्सस्ट्रॉंगला दिला. स्वत: आर्म्सस्ट्रॉंगने आपले पाच महिन्यांचे वेतन दिले. आणि त्यांच्या आईने, तिला पतीच्या निधनानंतर जी पेन्शन मिळते, ती एक महिन्याची पेन्शन दिली. त्यांचा धाकटा भाऊ नुकताच नोकरीला लागला आहे. त्यानेही आपला एक महिन्याचा पगार दिला.
अशा रीतीने त्यांनी ४ लाख रुपयांचा निधी जमविला आणि रस्त्याचे काम सुरू केले. एक बुलडोझर भाड्याने घेतला; आणि माती उकरणारी दोन यंत्रे विकत घेतली. पण एवढ्याने काम भागणार नव्हते. त्यांनी इंटरनेटची मदत घेतली. त्यावर एक जाहिरात टाकली; आणि चमत्कार घडला. केवळ तीन दिवसांमध्ये १ लाख २० हजार रुपये गोळा झाले. त्यात ५० रुपये देणारे जसे होते, तशीच एक व्यक्ती एक हजार डॉलरही देणारी निघाली. एक हजार डॉलर म्हणजे पन्नास हजार रुपयांहून अधिक रक्कम. आसपासच्या खेड्यांमधील लोकांनीही मदतीचा हात पुढे केला. त्यातले काही रस्त्यावर मजुरी करणार्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात, तर अन्य काही, त्यांच्या निवासाची सोय बघतात. काही जण श्रमदानही करतात.
आर्म्सस्ट्रॉंग सांगतात, आम्ही कुणीही ठेकेदार नेमलेला नाही. लोकच स्वत:हून कामे करीत आहेत. मात्र देणग्या प्राप्त करण्यासाठी दिल्ली, पुणे, बंगलूर, चेन्नई, गुवाहाटी इ. ठिकाणी निधी गोळा करण्यासाठी केंद्रे आहेत. कॅनडा, इंग्लंड, अमेरिका इ. देशांतून अप्रवासी भारतीयांचीही मदत होत आहे.
रस्त्याचे नाव आहे तामेंगलॉंग- हाफलॉंग रोड. नागालँड, आसाम व मणिपूर यांना हा रस्ता जोडेल. गेल्या ऑगस्ट महिन्यात रस्त्याचे काम सुरू झाले. पावसामुळे, काही दिवस काम थांबवावे लागले. आता ७० कि. मी. लांबीचा रस्ता तयार झाला आहे.
*********
(२) हा ‘युगपुरुष’?
त्याचे नाव आहे कल्याणसुंदरम्. नावाप्रमाणेच त्याची कृती आहे. कल्याणकारक आणि सुंदरही. ग्रंथपाल म्हणून त्याने ३६ वर्षे नोकरी केली. या नोकरीच्या काळात तो आपला संपूर्ण पगार गरजवंतांच्या मदतीसाठी खर्च करीत असे आणि आपल्या उपजीविकेसाठी, नोकरीनंतरच्या वेळात एका हॉटेलमध्ये काम करीत असे. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याने आपली सगळी पेन्शनही गरजवंतांसाठीच अर्पण केली.
अशी व्यक्ती खरेच जगात असेल? हो, आहे. खरेच अशी व्यक्ती आहे. अमेरिकेने त्याच्या या लोकविलक्षण दातृत्वाची दखल घेतली. त्याला ‘युगपुरुष’ (मॅन् ऑफ द मिलेनियम्) असा किताब देऊन त्याचा गौरव केला. या किताबाचे ३० कोटी रुपये त्याला मिळाल. पण याने ते सर्व लोकांना वाटून टाकले. त्याचे हे औदार्य बघून सुप्रसिद्ध तामीळ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी या कल्याणसुंदरम्ला चक्क आपला पिता म्हणून दत्तक घेतले!
*********
(३) डोळस आंधळा
हरिहरन् अय्यर असे त्याचे नाव. तो जन्मांध आहे. सध्या वय ५० च्या पुढे. तसा तो मूळचा केरळमधला. पण शिकला कलकत्त्याला. रामकृष्ण मिशनतर्फे चालविण्यात येणार्या अंध विद्यालयात. तेथीलच विवेकानंद कॉलेजमधून त्याने बी. ए.ची पदवी घेतली. त्या परीक्षेत विद्यापीठात त्याचा पहिला क्रमांक होता. त्याला अनेक भाषा येतात. तामीळ व मल्याळी तर येतेच; पण बंगालमध्ये शिक्षण घेतल्यामुळे बंगालीही येते. हिंदी व इंग्रजी बरोबरच तो आसामी आणि उडियातूनही बोलू शकतो. शांतिनिकेतनमध्ये तो सतारवादन शिकला. त्याची आई कर्नाटक संगीताची जाणकार आहे. हरिहरन्ला हीही संगीतविधा अवगत आहे. तो सध्या नेवेली इग्नाईट कार्पोरेशनच्या कार्यालयात स्वागताधिकारी (रिसेप्शनिस्ट) म्हणून कार्यरत आहे. पण आपल्या फावल्या वेळात शेजारी राहणार्या मुलांना तो इंग्रजी शिकवीत असतो.
*********
(४) षण्मुखम् आणि सूर्यशक्ती
तामीळनाडूच्या कोयमतूर जिल्ह्यात ओडापालयम् या नावाचे एक खेडे आहे. त्या गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत श्री षण्मुखम्. षण्मुखम् म्हणजे कार्तिकेय. गेल्या पंधरा वर्षांपासून तेच तेथे सरपंच आहेत. त्यांच्या असे लक्षात आले की ग्रामपंचायतीला जे उत्पन्न होते, त्याचा ४० टक्के भाग रस्त्यावरील दिव्यांना पुरविण्यात येत असलेल्या विजेसाठी खर्च होतो. त्याने ठरविले की सडकांवरील सर्व दिवे सूर्याच्या ऊर्जेने प्रकाशित करायचे; आणि ही आपली योजना त्याने सफल करूनही दाखविली. पण तो येथेच थांबला नाही. आपल्या गावाजवळच त्याने एक पवनचक्की सुरू केली. त्यासाठी कर्ज काढले. ही पवनचक्की दरवर्षी ६.७५ लाख किलो वॅट इतकी वीज निर्माण करते. मजा म्हणजे ही ग्रामपंचायत वीज बोर्डाला आपली अधिकची वीज विकत आहे! या उत्पन्नातून ग्रामपंचायतीने, घेतलेल्या कर्जाची पूर्णपणे परतफेड केली. आपण वीज बोर्डाकडून वीज विकत घेतो. ओडापालयम्ची ग्रामपंचायत वीज बोर्डाला वीज विकते.
*********
(५) अशीही धडाडी
ही चार तरुण मुलींची कहाणी आहे. त्या चौघीही दिल्ली शेजारच्या नोएडा या उ. प्र.तील शहरात राहणार्या आहेत. चौघीही १२ वीच्या विद्यार्थिनी आहेत. पण त्या आपल्या विद्यालयात केवळ शिकत नाहीत, तर त्यांनी गरिबांच्या मुलांना शिकविण्याचेही व्रत घेतलेले आहे. त्यांची नावे आहेत अक्षिता, अंबा, रागिणी आणि सौम्या.
त्या दर शनिवार-रविवारी, दुपारी ३ ते ५, आपल्या परिसरात राहणार्या गरिबांच्या मुलांना शिकवितात. या मुलांची संख्या- यात मुलीही आहेत- आता २५ झाली आहे. या बालकांचे वडील एक तर मजुरी करतात किंवा सायकलरिक्षा चालवितात. त्यांच्या आया घरोघरी मोलकरणीचे म्हणजे धुणी, भांडी घासण्याचे काम करतात. बहुतेक मुली, मुले १०-११ वर्षांची आहेत. गरिबीमुळे, हे आईवडील त्यांना शाळेत पाठवू शकत नाहीत. त्यामुळे ती दिवसभर गल्लीबोळांत किंवा रस्त्यावर हुंदडत असतात.
सुरवातीला, या मुलांना शिकविण्याला त्यांच्या आईवडिलांचा विरोध होता. आया सांगत, हे शाळेत गेले, तर घरच्या छोट्यांकडे लक्ष कोण देणार? पण अक्षिताने पुढाकार घेऊन त्यांची समजूत काढली. शिकण्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत, हे समजावून दिले. शनिवार-रविवारीची ही शाळा अक्षिताच्या घरी भरते. तेथे तिच्या त्या तीन मैत्रिणी येतात. या चौघीही संपन्न, सुखवस्तू घरातील आहेत. पण त्यांना आपल्या श्रीमंतीचा गर्व नाही.
अक्षिताच्या मते, या मुलांचा शाळेत प्रवेश करवून त्यांना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. पण अडचण प्रवेशाची आहे. कारण त्यांचे वय. पुष्कळ प्रयत्नानंतर नोएडाच्या सेक्टर ३६ मधील सरस्वती बालिका मंदिरात पाच बालिकांना प्रवेश मिळाला. या मुलींचे शाळेचे शुल्क अक्षिता भरत असते. तिला घरून ‘पॉकेट मनी’ म्हणून जे पैसे मिळतात, त्यातून ती ते शुल्क भरते.
या मुलामुलींना अक्षरओळख करून देण्याबरोबरच योग, चित्रकला आदींचेही शिक्षण या मुली देतात. कोण म्हणेल की आजचा तरुण वर्ग बेजबाबदार आणि बहकलेला आहे? असा आरोप करण्यापूर्वी, या मंडळींनी आपल्या घरातील वातावरणाचा विचार करणे आवश्यक आहे. चांगले वातावरण असेल, तर चांगले संस्कार घडतील आणि मग त्या घरातूनही अक्षिता निर्माण होतील.
(पाञ्चजन्य, १६ सप्टेंबरच्या अंकावरून)
*********
दाराविना घरांचे गाव
आपल्या अहमदनगर जिल्ह्यात शनी शिंगणापूर नावाचे एक गाव आहे. ‘शिंगणापूर’ या नावाच्या मागे ‘शनी’ हे उपपद लावण्याचे कारण, त्या गावात शनीचे प्रसिद्ध मंदिर आहे, हे आहे. ते मंदिर खूप भव्य व सुंदर आहे, म्हणून त्याची प्रसिद्धी नाही. तसे ते साधे मंदिर आहे. पण त्याचा प्रभाव असा आहे की, तेथील शनिदेवता सार्या गावाचे रक्षण करते. त्यामुळे त्या गावातील घरांना दरवाजे नाहीत. मी सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी या गावाला गेलो होतो. तेव्हाची ही आठवण आहे. आता काय परिस्थिती आहे, हे मला माहीत नाही. पण या शिंगणापूरची यावेळी आठवण येण्याचे कारण हे की, असेच एक गाव तामीळनाडूमधील रामनाथपुरम् जिल्ह्यात असल्याचे कळले. ‘मीतांकुलम्’ असे त्या गावाचे नाव. ते केवळ १३२ घरांचे. गरिबांची वस्ती असलेले. सर्व घरांवर गवताची छपरे आहेत. एकाही घराला दार नाही. कुणी घराला दार लावले तर ग्रामदेवतेचा म्हणजे ‘शिवम् पुनियप्पा स्वामी’चा कोप होतो, अशी समजूत आहे. ही देवता एका झाडाखाली उघड्यावर स्थित आहे. ही देवताच या गावाचे चोरांपासून रक्षण करते, अशी लोकभावना आहे. देवतेच्या भोवती अनेक घंटा लावलेल्या आहेत. दिवसभर त्या घंटांचा आवाज येत असतो. कारण भक्तांची वर्दळ अव्याहत चालू असते.
*********
भारत विरुद्ध इंडिया
जालंदरवरून प्रकाशित होणार्या ‘पथिक संदेश’ या नियतकालिकाच्या ऑक्टोबर महिन्याच्या अंकात भारत आणि इंडिया यांची तुलना करणारी एक मजेदार कविता प्रकाशित झाली होती. ती अर्थातच हिंदीमध्ये आहे. हिंदी सोपी आहे. म्हणून कवितेचा मराठी अनुवाद मी देत नाही. मूळ कविताच देत आहे.
भारत इंडिया
भारत में गॉंव है, गली है, चौबारा है इंडिया में सिटी है, मॉल है, पंचतारा है॥
भारत में घर है, चबूतरा है, दालान है इंडिया में फ्लैट और मकान है॥
भारत में काका है, बाबा है, दादा है, दादी है| इंडिया में अंकल-आंटी की आबादी है॥
भारत में खजूर है, जामुन है, आम है |इंडिया में मैगी, पिज्जा, माजा का नकली आम है॥
भारत में मटके है, दोने हैं, पत्तल है |इंडिया में पोलिथीन, वाटर व वाईन की बोटल है॥
भारत में गाय है, गोबर है, कंडे (गोवरी) है |इंडिया में सेहतनाशी चिकन बिरयानी अंडे है॥
भारत में दूध है, दही है, लस्सी है| इंडिया में खतरनाम विस्की, कोक, पैप्सी है॥
भारत में रसोई है, आँगन है, तुलसी है |इंडिया में रूम है, कमोड की कुर्सी है॥
भारत में कथडी है, खटिया है, खर्राटे हैं |इंडिया में बेड है, डनलप है और करवटें है॥
भारत में मंदिर है, मंडप है, पंडाल है |इंडिया में पब है, डिस्को है, हाल है|
भारत में गीत है, संगीत है, रिदम है | इंडिया में डान्स है, पॉप है, आईटम है॥
भारत में बुआ (आत्या) है, मौसी है, बहिन है| इंडिया में सब के सब कजन है॥
भारत में पीपल है, बरगद है, नीम है| इंडिया में वाल पर पूरे सीन है॥
भारत में आदर है, प्रेम है, सत्कार है| इंडिया में स्वार्थ, नफरत है, दुत्कार है॥
भारत में हजारो भाषा हैं, बोली है| इंडिया में एक अंग्रेजी बडबोली है॥
भारत सीधा है, सहज है, सरल है| इंडिया धूर्त है, चालाक है, कुटिल है॥
भारत में संतोष है, सुख है, चैन है| इंडिया बदहवास, दुखी, बेचैन है॥
क्यौकि...
भारत को देवों ने, संतों ने, वीरों ने रचाया है| इंडिया को लालची, अंग्रेजों ने बसाया है|
-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ०१-१२-२०१२
babujivaidya@gmail.com
खूप छान लेख आहे आणि प्रकाशित कविता सुद्धा प्रेरणादायी आहे.
ReplyDeleteआदरणीय ,
ReplyDeleteवैद्य बाबा ....
श्री आर्मस्ट्रोंग पामे ,श्री कल्याणसुंदरम,श्री हरिहरन अय्यर ,सरपंच श्री षण्मुखम ,अक्षिता ,अम्बा ,रागिनी आणि सौम्या यांच्या कर्तुत्वाला अभिवादन !
अशी स्वपनातली पात्र वास्तवात आहेत खरेच त्यांना आणि त्यांचे माता पित्यांना पुन्हः अभिवादन !
कविता देखिल अतिशय छान आहे !
माहितीपूर्ण लेख
आवडला
----------------
महेशचंद खत्री
कळंबेश्वर
मेहकर जिल्हा
विदर्भ ..........