Friday 9 November 2012

भाजपाची अ-स्वस्थता



रविवारचे भाष्य दि. ११ नोव्हेंबर २०१२ करिता 


भाजपात अस्वस्थता आहे. भाजपावर टीका करण्यासाठी किंवा त्या पार्टीची निंदा करण्याकरिता मी हे म्हणत नाही. भाजपाचे स्वास्थ्य चांगले दिसत नाही, असे मला जाणवते. त्या पार्टीचे स्वास्थ्य चांगले रहावे, तीत एकजूट रहावी, तिच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेषत: नेत्यांनी, आपल्याच पक्षाला कमजोर करू नये, या इच्छेने मी हे म्हणत आहे; आणि असे वाटणार्‍यांमध्ये मी एकटाच नाही. भाजपाविषयी सहानुभूती असणार्‍या, २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने अग्रेसरत्व प्राप्त करावे अशी इच्छा असणार्‍या असंख्य लोकांना असे वाटते. विशेष म्हणजे असे वाटणार्‍यांमध्ये जे भाजपामध्ये सक्रिय आहेत, लहानमोठ्या पदांवर आहेत, त्यांनाही असे वाटते.

अकालिक व अप्रस्तुत
त्यामुळे, त्यांना राम जेठमलानी यांनी जे वक्तव्य जाहीर रीतीने केले, त्या विषयी खेद वाटतो. नीतीन गडकरींनी राजीनामा द्यावा, असे भाजपाच्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा खासदाराला वाटू शकते. असे वाटण्यात काही गैर नाही. पण हा मुद्दा त्यांनी पक्षपातळीवर काढायला हवा. तशीही गडकरी यांची अध्यक्षपदाची मुदत डिसेंबरात म्हणजे महिना दीडमहिन्यांनी संपते. पक्षाने, आपल्या घटनेत बदल करून, लागोपाठ दोन वेळा एकच व्यक्ती त्या पदावर राहू शकते, असे ठरविले आहे. त्यामुळे, गडकरी पुन: तीन वर्षांसाठी अध्यक्ष राहू शकतात. पण ही झाली शक्यता. त्यांना त्या पदावर येऊ द्यावयाचे किंवा नाही, हे पार्टीने ठरवावे. जेठमलानी यांनी गडकरींनी लगेच राजीनामा द्यावा असे ज्यावेळी म्हटले, त्याच वेळी, नरेंद्र मोदी यांना प्रधान मंत्री करावे, असेही सांगितले. हेही सांगण्याचा त्यांना अधिकार आहे. पण २०१४ मध्ये प्रधान मंत्री कोण असावा, याची चर्चा २०१२ मध्ये करणे अकालिक आहे, अप्रस्तुत आहे, असे मी यापूर्वी या स्तंभात लिहिले आहे.

संशयाची सुई
एकाच व्यक्तीच्या एकाच वक्तव्यात, गडकरींनी जावे आणि मोदींना प्रधानमंत्री करावे, असे उल्लेख आल्यामुळे, गडकरीविरोधी कारस्थानाचे केंद्र गुजरातमध्ये आहे, असा संशय कुणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे आणि गुजरात म्हटले की, मग नरेंद्र मोदी यांच्याकडेच संशयाच्या सुईचे टोक जाणार. मोदींना प्रधान मंत्री व्हावेसे वाटणे, यातही काही गैर नाही. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात असणार्‍या व्यक्तींच्या ठायी उच्च पदावर जाण्याची महत्त्वाकांक्षा असणे अस्वाभाविक नाही. कालच्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीवरून लालकृष्ण अडवाणींनी स्वत:ला या स्पर्धेपासून दूर ठेवले आहे, असे स्पष्ट होते. नीतीन गडकरींनीही आपण या पदाच्या स्पर्धेत नाही, असे पूर्वीच सांगितले आहे. या संदर्भात नरेंद्र मोदीसंबंधीच्या बातम्या मात्र प्रसारमाध्यमांमध्ये खूप झळकत असतात. या बातम्यांचे मोदींनी खंडन केल्याचे कुठे दिसले नाही. त्यावरून मोदींना प्रधान मंत्री होण्यात रस आहे, तशी त्यांची आकांक्षा आहे, असा कुणी अर्थ काढला, तर त्याला दोष देता येणार नाही.

अकालिक चर्चा
परंतु, नेमकी कोण व्यक्ती प्रधान मंत्री होईल, हे ठरविण्याची वेळ अजून आलेली नाही. वस्तुत: निवडून आलेले खासदार आपला नेता निवडतात. ज्या पक्षाकडे किंवा पक्षाने पुरस्कृत केलेल्या ज्या आघाडीकडे लोकसभेत बहुमत असेल, त्याला राष्ट्रपती प्रधान मंत्रिपदाची शपथ देतील. हे खरे आहे की, काही पक्ष निवडणुकीपूर्वीच आपला प्रधान मंत्रिपदाचा उमेदवार ठरवीत असतात व त्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवीत असतात. भाजपानेही याचप्रकारे निवडणुकी लढविल्या होत्या. त्यावेळी, पक्षाने अटलबिहारी वाजपेयी यांना प्रधान मंत्रिपदाचे उमेदवार ठरविले होते. १९९६, १९९८ आणि १९९९ मधील तिन्ही लोकसभेच्या निवडणुकी भाजपाने अटलबिहारी यांच्या नेतृत्वात लढविल्या होत्या. पण हे भाग्य नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला येईल, अशी आज तरी चिन्हे दिसत नाहीत. माझ्या अल्पमतीप्रमाणे, २०१३ मधील विधानसभांच्या निवडणुका झाल्याशिवाय, भाजपा आपली रणनीती ठरविणार नाही. मग ती प्रकट करण्याची गोष्टच दूर. २०१३ मध्ये ज्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आहेत, त्यांत भाजपाचा प्रभाव असलेली बहुतांश राज्ये आहेत. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक ही ती राज्ये होत. यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आहेत. दिल्ली व राजस्थानमध्ये भाजपाची सरकारे नाहीत, कॉंग्रेसची सरकारे आहेत, पण या दोन्ही ठिकाणी भाजपाची सरकारे येण्यासारखी परिस्थिती आहे. अलीकडेच पार पडलेल्या दिल्ली राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपाने कॉंग्रेसला पराभूत करून तेथील महापालिकांवर आपला अधिकार स्थापन केला आहे. भाजपाची २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती २०१३ मधील विधानसभांच्या निवडणुकींच्या निकालानंतरच ठरण्याची अधिक शक्यता आहे.

उचित पाऊल
राम जेठमलानी यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. आपल्या राजीनाम्याच्या पत्रात ते म्हणाले की, ‘‘भ्रष्टाचाराच्या आरोपाचा कलंक लागलेल्या अध्यक्षाच्या हाताखाली मी काम करू शकणार नाही. ते मला बौद्धिक आणि नैतिक या दोन्ही दृष्टींनी अनुचित वाटते.’’ महेश जेठमलानींनी जो मार्ग स्वीकारला तो मला योग्य वाटतो. राम जेठमलानी यांनीही त्याच मार्गाचे अनुसरण करून आपली राज्यसभेची सदस्यता त्यागणे उचित ठरेल. राम जेठमलानी म्हणाले की, यशवंत सिन्हा, जसवंतसिंग आणि शत्रुघ्न सिन्हा यांचेही मत त्यांच्या मतासारखेच आहे. त्यांनीही पक्षातील पद सोडण्याचा निर्णय घेणे योग्य. ज्या पक्षाच्या सर्वोच्च पदी कलंकितव्यक्ती असेल, त्या पक्षात कोणता शहाणा माणूस संतुष्ट राहील?

पक्ष पाठीशी
एका व्यक्तीने आणि प्रसारमाध्यमांच्या एका चमूने मला प्रश्‍न केला की, राम जेठमलानी यांच्या वक्तव्याला किती गंभीरपणे घ्यावे. मी म्हणालो, फारशा गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या वक्तव्याची उपेक्षा करणे हेच योग्य. आणि खरेच विचार केला तर भाजपाच्या उभारणीत आणि शक्तिसंपादनात जेठमलानींचे योगदान तर कितीसे आहे? शिवाय, अनेक विषयांवरील त्यांची मते पक्षाच्या मताशी जुळणारी नाहीत. जसे काश्मीरच्या प्रश्‍नासंबंधी किंवा प्रभू रामचंद्रांसंबंधी. श्रीराम एवढे वाईट असते तर जेठमलानींच्या मातापित्यांनी त्यांचे नाव रामका ठेवले असते? पण तो एक स्वतंत्र विषय आहे. त्याची चर्चा येथे अप्रस्तुत आहे. एवढे मात्र खरे की, जेठमलानी पितापुत्रांच्या वक्तव्यांनी खळबळ माजवून दिली. गडकरींच्या सुदैवाने, पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला.
भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील अंतरंग नेत्यांची (कोअर ग्रुप) दिल्लीत एक बैठक झाली. त्या बैठकीने श्री गडकरी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्‍वास व्यक्त केला. त्या बैठकीत जेठमलानी पितापुत्र असण्याची शक्यता नाही. पण यशवंत सिन्हा व जसवंतसिंग हे अपेक्षित असावेत. ते उपस्थित होते वा नाही, हे कळले नाही. अडवाणी मात्र अनुपस्थित होते. औचित्याचा विचार करता, त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, असे मला वाटते. या बैठकीतही सर्वांनी आपापली मते मांडली असतील. पण जो निर्णय झाला, तो मग बहुमताने झालेला असो, अथवा एकमताने, तो सर्वांचाच निर्णय ठरतो. या बैठकीचे वैशिष्ट्य हे की, गडकरी त्या बैठकीत नव्हते. त्यांनी योग्य निर्णय घेतला असेच कुणीही म्हणेल. त्यामुळे, त्या बैठकीत मोकळेपणाने चर्चा झाली असेल.

प्रश्‍न कायम
जेठमलानींनी मागितल्याप्रमाणे गडकरी ताबडतोब राजीनामा देणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. पण ते पुन: दुसर्‍यांदा अध्यक्ष बनतील किंवा नाही, हा प्रश्‍न कायम आहे. त्या संबंधीचा निर्णय पक्षच घेईल. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सरकारतर्फे चौकशी केली जात आहे. एक चौकशी, कंपनी खात्याकडून तर दुसरी आयकर खात्याकडून होत आहे. या चौकशीला गडकरी हिमतीने सामोरे गेले आहेत. रॉबर्ट वढेरासारखा पळपुटेपणा त्यांनी दाखविला नाही. या चौकशीचे कोणते निष्कर्ष येतात, यावर त्यांची अध्यक्षपदाची दुसरी खेप अवलंबून राहू शकते. येत्या दीड महिन्यात या चौकशी समितीचा अहवाल येईल वा नाही, हे सांगता येणार नाही. काल मला, चेन्नईवरून प्रकाशित होणार्‍या हिंदूया दैनिकाच्या वार्ताहराने आयकर खात्याच्या प्राथमिक अहवालाची त्याच्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीची प्रत दिली. याचा अर्थ आयकर खात्याने वृत्तपत्रांना बातमी पुरविणे सुरू केले आहे, असा करता येऊ शकतो. माझ्या मते हे अयोग्य आहे. त्या बातमीत असे म्हटले आहे की, गडकरींनी स्थापन केलेल्या पूर्ती कंपनीत ज्या कंपन्यांनी पैसा गुंतवला, त्यांच्या व्यवहारात काही अनियमितता आहे.
हा अहवाल खरा मानला, तरी तो त्या कंपन्यांचा प्रश्‍न आहे. माझा अंदाज असा आहे की, गडकरींना पुन: अध्यक्षपद लाभू नये, यासाठी विरोधी पक्षातील मंडळी जशी सक्रिय आहे, तशीच भाजपामधील काही मंडळीही सहभागी आहेत. विरोधी पक्षांना आणि विशेषत: कॉंग्रेसला, गडकरी भ्रष्टाचारी आहेत, हे दाखविण्यात रस या कारणासाठी आहे की, त्या द्वारे त्यांना भाजपाही त्यांच्या पक्षासारखाच भ्रष्टाचारात बुडलेला पक्ष आहे, हे जनतेच्या मनावर ठसावे. आम्हीच केवळ भ्रष्ट नाही, तुम्हीही भ्रष्टच आहात, हे त्यांना जनमानसावर बिंबवायचे आहे. जेणेकरून २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत, भाजपातर्फे कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारी चारित्र्याची जशी चिरफाड केली जाण्याची शक्यता आहे, त्या प्रचाराच्या शिडातील हवा निघून जावी. पक्षांतर्गत जो विरोध आहे, त्याचे केंद्र, वर उल्लेखिल्याप्रमाणे गुजरातेत आहे. नरेंद्र मोदींना हे वाटत असावे की गडकरी पक्षाध्यक्ष असतील, तर आपली प्रधान मंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांना हेही दाखवायचे असू शकते की, संजय जोशी प्रकरणात जसे आपण गडकरींना वाकवू शकलो, त्याचप्रमाणे याही बाबतीत आपण त्यांना हतप्रभ करू शकतो. त्यासाठीच ते जेठमलानींचा उपयोग करून घेत असतील. अर्थात हे सारे अंदाज आहेत. ते गैरसमजातून किंवा पूर्वग्रहातूनही उत्पन्न झालेले असू शकतात. पण हे संशय भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनात आहेत, हे खरे आहे. आमची इच्छा एवढीच आहे की, व्यक्ती तेवढी महत्त्वाची नाही, नसावीही; पण महत्त्वाची असावी आपली संस्था, आपली संघटना, आपला पक्ष. भाजपा हा राजकीय पक्ष आहे. तो एकजूट आहे, तो एकरस आहे, त्याच्या नेत्यांमध्ये परस्पर सद्भाव आहे, त्यांच्यात मत्सर नाही, असा ठसा उमटावा, अशी असंख्य भाजपाच्या कार्यकर्त्यांची आणि सहानुभूतिदारांचीही अपेक्षा आहे. यातच पक्षाचे भले आहे; आणि त्याच्या वर्धिष्णुतेची ग्वाही आहे. भाजपाचे नेते ही अपेक्षा पूर्ण करतील काय? भाजपाचे आरोग्य ठीक आहे, असे ते दर्शवतील काय? पुढील काळच या प्रश्‍नाचे खरे उत्तर देऊ शकेल.


-मा. गो. वैद्य
नागपूर
babujivaidya@gmail.com
दिनांक १०-११-२०१२ 

9 comments:

  1. Shri Mago Vaidya ji,
    Aap bahot hi vidvan hai isme bemat nahi, Sangh ka pracharak kabhi aise hi naho bolta, Modi ji ki karya Shaily Galat ho sakti hai, parantu Modi ji ka aise Sarvajanik rit se virodh karke ham kisko Madad kar rahe hai ? aaj jab pure vishwa ki Hindutva Vorodhi Shaktiya Modi ji aur Hinduo ke virodh me 1 jut ho rahi hai tab Sangh ka 1 Nishthavan Karya Karta aise Virodh karte rahenge to Fayda kisko ho raha hai ? mere matanusar Sarvajanik rup se aise mude nahi Uchhalna Chahiye
    - Deepesh Shah, Bhuj, Gujarat

    ReplyDelete
  2. I used to attend RSS shakhas during my school days. I was close follower of this organization till they supported Atalji. It was good cultural organization then.

    I see them as a completely out dated group now. Look at this gentleman talking so openly against their own cadre. Is he out of his mind ? Is not this helping Sonia and her supporters to strengthen their argument ? People like MGV would not hesitate to blame their own people openly and indirectly help foreign forces. What a pity !!!

    Now RSS looks mentally corrupt and useless organization ..... They lack honesty, transparency and consistency. I did not tell my sons and relatives to join Shakha, for the same reason. Good that they are already shrinking ....

    ReplyDelete
    Replies
    1. Sanjay ji,
      koi Vyakti ke karan RSS ko aap Out dated nahi man sakte, Vaykti me kabhi bhi Kharabi aa sakati hai, isi liye RSS me kabhi koi Vyakti ko Vyakigat rup se Maan nahi diya jata, aap Shakha me gaye hai to aap ko pata hi hoga ki RSS me "Bhagva Dwaj" hi sabe upar hai koi Vyakti nahi... aaj ke samay me Shakha hi Shreshth (Best) hai baki koi System nahi hai jo Vyakitva Nirman kar sake... so, i request you to send your sons to join RSS shakha, it is only way to change our currept system

      Deepesh Shah,
      Bhuj, Gujarat
      9825205712

      Delete
  3. Mr. M.G.Vaidyaji..
    hum aap ki kadar karte hai.. pr aap ko ye nhi lagta ki aap jo bol rahe hai usme kuch galatfemiya bhi hai!! aap bjp ko ek nhi kar sakte to kam se kam usko todne ki koshis na kare.. esa kaam kar ke aap khud apni garima kam kar rahe hai...

    ReplyDelete
  4. बाबूजी,
    जेठमलानीनी त्यांचे मत कार्य कारिणी मधेच द्यावयास पाहिजे असल्याचा आपला सल्ला आपणच आपले मत परिवाराच्या बैठकीत न देता ब्लोग मधून सार्वजनिक केले असे नाही का वाटत ?
    यामुळे भाजपा मध्ये विशेषता गुजराथच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फारच भयंकर ठरेल असे वाटते. आपण जेष्ठ आहात. त्यामुळे आपण तातडीने याचा खुलासा करणे सयुक्तिक होईल असे वाटते.

    ReplyDelete
  5. जेठमलानी ह्यांनी नक्कीच आगाऊपणा केला. त्यंची भाजपा मधे काहीही "औकात" नाही. निदान माझ्या सारख्या भाजपा बद्दल सहानुभूती असलेल्या "आम" माणसाला तर मुळीच त्यांचे काही महत्व नाही. किती वेळा आणि किती पक्ष बदलून ते भाजप मधे आले आणि त्यांचे किती योगदान आहे ? जेठमलानी ह्यांनी उगीच प्रसिद्धीसाठी केलेला हा एक प्रयत्न आहे असे दिसते. आणि आजकाल NEWS channels चा सुकाळ झाला आहे त्यामुळे जेठमलानीचे फावले. पण मा. गो. तुम्ही ह्याचा संबंध थेट मोदींशी लाऊन एक नको असलेला मुद्धा तयार केला आहे. मला वाटते जेठमलानी ला संघा ने मुळीच थारा देऊ नये. असे केल्याने त्यंची फुकट प्रसिद्धी होयील...

    ReplyDelete
  6. मला इंदिरा गांधींनी कोन्ग्रेस सोडून इदिरा कोन्ग्रेस काढली तसे काहीसे मोदी करतील असे वाटते . राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेला स्वच्च चारित्र्याचा नेता जो लोकप्रिय आहे असा आजघडीला तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही . भाजप व संघ यांनी जर त्यांचा फायदा करून घ्यायचा ठरवले तर नक्कीच सत्ता प्राप्ती होईल पण त्यांना विरोध करण्यातच हे धन्यता मनात आहेत . मोदींनी अवश्य हिंदुत्ववादी विचारांचा नवीन पक्ष काढावा भाजपमधील व इतरही हिंदुत्ववादी कार्यकर्ते नवीन पक्षात जातील आणि भाजपमध्ये फक्त नेते राहतील . मुरलीमनोहर , जेटली , वसुंधराराजे , अडवाणी आणि गडकरी यापैकी १ काला तरी संपूर्ण देशातील जनता ओळखते का ?

    ReplyDelete
  7. आदरणीय ,
    वैद्य बाबा ,
    आपल्या सम्पूर्ण लिखानातुन असे वाचावायास मिळाले की ,या सर्व प्रकरणात आपण शंका आहे असे नीवेदित केले आहे . खरे आहे राम जेठ मलानी ज्यांना स्वत:ला िकंवा ज्यांच्या मतिला म्लानी आली आहे असे लोक जर उघड पने आमच्या अस्मिते चे मर्यादा पुरुषोत्तम प्रभु भगवान रामचंद्र यांच्या विषयी स्वतः चे विचार मलीन करुण धर्म विरोधी भाषा वापरतात त्याना पक्ष काहीही शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत नाही . जे हिंदुत्व रक्षक प्रतिमा जोपासतात ते देखिल चिड़ीचुप बसतात असा प्रश्न येथे निर्माण होतो मग त्या पक्षा ला त्या पक्षा च्या कुना विषयी फ़क्त शंका व्यक्त केलेली का अवघड वाटावी .
    आपण आपल्या लेखनी तून सर्वसामान्या च्या भावना देखिल प्रकट केल्या.
    भाष्य आवडले .
    अतिशय मार्मिक !
    # महेशचंद खत्री
    कळंबेश्वर
    तालुका - मेहकर विदर्भ

    ReplyDelete
  8. Do we need foreign forces to destroy and divide country when respectable people like you make such a comments without any proof?. I think it has become fashion to link anything with Modi. I know there are bad aspects of Modi. But then everybody has negative shades. But at least he is the one leader to stand and talk tall. He has the potential to achieve the goal which has not been achieved till now. so pls..

    ReplyDelete