Saturday, 22 December 2012

गुजरात वि. स. निवडणूक व त्यानंतररविवारचे भाष्य दि. २३ डिसेंबर २०१२ करिता


गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकीचे निकाल परवा म्हणजे दि. २० डिसेंबरला जाहीर झाले. हिमाचल प्रदेशात तर निवडणूक गेल्या नोव्हेंबर महिन्यातच पार पडली होती. पण मतमोजणी तेव्हा झाली नव्हती. गुजरात वि. स.ची निवडणूक दि. १३ व १७ डिसेंबर या दोन दिवशी झाली आणि दि. २० ला दोन्ही निवडणुकींचे निकाल जाहीर झाले.

सत्तापरिवर्तन
हिमाचल प्रदेशात सत्तापरिवर्तन झाले. तेथे गेल्या पाच वर्षांपासून भाजपाचे सरकार होते. पण २०१२ मध्ये भाजपाचा पराभव झाला. कॉंग्रेसची सत्ता तेथे स्थापन होणार हे निश्‍चित झाले. पण या निवडणुकीच्या निकालाची फारशी चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात अथवा प्रसारमाध्यमांमध्ये झाली नाही. एक तर ते राज्य अगदी लहान. लोकसभेत, ५४३ सदस्यांपैकी, त्या राज्याच्या वाट्याला फक्त ४ जागा; आणि दुसरे म्हणजे जनमत सामान्यत: परिवर्तन इच्छित असते. भाजपाची सत्ता येण्यापूर्वी तेथे कॉंग्रेसचे सरकार होते, तर तत्पूर्वी तेथे भाजपाचे सरकार होते. हिमाचलची जनता, कुणाही पक्षाला सलग पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेवर राहू देत नाही, असेही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हिमाचलचा निकाल कुणालाही अप्रूप वाटला नाही.

गुजरातचे वेगळेपण
गुजरातची परिस्थिती वेगळी आहे. तेथे १९९५ पासून भाजपाची सत्ता आहे. २०१२ मध्ये पुन: भाजपाच सत्तेवर येणार आहे. म्हणजे मुख्य मंत्रिपदी विराजमान होणारी २०१२ मधली भाजपाचीच व्यक्ती सलग पाचव्यांदा त्या पदावर येत आहे. हे खरे की, मुख्य मंत्रिपदावरील व्यक्ती बदलली, पण सत्तारूढ पक्ष बदलला नाही. वस्तुत:, यावेळी गुजरातमध्ये भाजपासमोर आव्हान जोरदार होते. २००२ आणि २००७ च्या वि. स. निवडणुकीच्या वेळी, २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगली, आणि त्या दंगलींमध्ये मुसलमानांची झालेली प्राणहानी, हा भाजपाविरोधी पक्षांसाठी- खरे म्हणजे कॉंग्रेस पक्षासाठी- हा महत्त्वाचा मुद्दा होता. कॉंग्रेसाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी, मुख्य मंत्रिपदाचे उमेदवार नरेंद्रभाई मोदी यांना मौत का सौदागरम्हणून, भाजपाविरोधी प्रचाराला एक विशिष्ट धार देण्याचा प्रयत्न केला होता. आजही २००२ च्या दंगलींचे भूत जागे केले जातेच. पण, याचा गुजरातच्या बहुसंख्य जनतेवर कसलाही परिणाम होत नाही. गुजरातबाहेरील लोक आणि प्रसारमाध्यमे या दंगलीसाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरतात. त्यांनीच दंगली भडकविल्या, असा त्यांचा आरोप असतो. पण तो गुजरातच्या जनतेला मान्य नाही. गुजरातमधीलच गोध्रा स्टेशनवर २००२ मध्ये ५७ निरपराध कारसेवकांना तेथील मुसलमानांनी, योजनाबद्ध रीतीने, जिवंत जाळून ठार केले, त्याची ती तीव्र प्रतिक्रिया होती. क्रियेची उपेक्षा करावयाची आणि प्रतिक्रियेलाच आघातलक्ष्य बनवायचे, ही चलाखी गुजराती जनतेला मान्य नाही. गुजराती जनतेची ती तिखट प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शिखांचे जे शिरकाण झाले व ज्यात तीन हजार निरपराध शिखांना ठार करण्यात आले, त्या धुंदीचे नेतृत्व कॉंग्रेसच्या पुढार्‍यांनी केले होते. हरकिसनलाल भगत, जगदीश टायटलर, सज्जनकुमार हे कॉंग्रेस पक्षाचे मान्यवर नेते हिंसक जमावाचे नेतृत्व करीत होते. त्यांना बेशरमपणे चिथावणी देत होते. गुजरातमध्ये असे घडले नाही. फार तर एवढेच म्हणता येईल की मुख्य मंत्री मोदी यांनी तातडीने बचावकार्य केले नाही. सामान्यत: शामळू समजला गेलेला गुजराती समाज असा उग्र होऊन का पेटला, याचे आकलन कॉंग्रेसच्या बड्या बड्या नेत्यांना आजही झालेले नाही. त्यामुळे मोदी व भाजपा हे मुस्लिमविरोधी आहेत, हे त्यांच्या प्रचाराचे पालुपद राहिले. २०१२ मध्ये ते थोडे सौम्य झाले. पण, जोपर्यंत कॉंग्रेस पक्ष गोध्रा हत्याकांडाला विस्मृतीत ढकलून फक्त हिंदूंनी केलेल्या प्रतिकारावरच आगपाखड करीत राहील, तोपर्यंत गुजरातेत कॉंग्रेस पक्षाला सत्ता मिळण्याची आशा नाही.

केशुभाईंचे आव्हान
या परिस्थितीमुळे, गुजरातमध्ये भाजपाला हरवून कॉंग्रेस सत्तेवर येईल, असे मला कधी वाटलेच नाही. भाजपापुढे म्हणा अथवा नरेंद्रभाईंपुढे म्हणा, खरे आव्हान होते ते केशुभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पार्टीचे. केशुभाई दोनदा गुजरातचे मुख्य मंत्री राहिलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. त्यांनी २०१२ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारला खाली खेचण्याचा चंग बांला. हा मला फार मोठा धोका वाटला. संघाचे काही जुने कार्यकर्ते केशुभाईंबरोबर आहेत याची मला माहिती आहे. संघाच्या ज्या आनुषंगिक संघटना आहेत, ज्यांना सामान्यपणे संघ परिवाराच्या घटक संघटना मानल्या जातात, त्यांच्यापैकी काही मोदींवर नाराज होत्या. मला अशीही माहिती मिळाली होती की, त्यापैकी काहींच्या श्रेष्ठ पुढार्‍यांनी केशुभाईंच्या बाजूने प्रचारही केला. सामान्य स्वयंसेवकांपुढे खरेच पेच होता. तसे, संघाच्या घटनेप्रमाणे स्वयंसेवक कोणत्याही राजकीय पक्षात जाऊ शकतो. पदाधिकारीही बनू शकतो. अट एकच आहे की, संघात तो पदाधिकारी असणार नाही. पण गुजरातमधील स्वयंसेवकांनी आपल्या विवेकबुद्धीनेच या पेचावर तोडगा काढला. २०१२ मध्ये गुजरातेत भाजपाचा पराभव झाला असता, तर त्याचे विपरीत परिणाम भारताच्या राजकारणावर झाले असते. ते होऊ नयेत म्हणून स्वयंसेवकांनी आपला विवेक वापरला. व्यक्तिनिष्ठेच्या वर तो उठला. व्यक्तीबद्दलची नाराजीही तो विसरला आणि व्यक्तीपेक्षा संघटन श्रेष्ठ असते, हे जे तत्त्व संघात अंत:करणावर बिंबविले जाते, त्याचे त्याने स्मरण ठेवले आणि भाजपाच्या बाजूने मतदान केले. अखेरीस संघटनही व्यक्तींचेच बनत असते. पण प्रधान काय आणि गौण काय, याचा विवेक ठेवायचा असतो. आद्यशंकराचार्यांच्या सुप्रसिद्ध षट्पदीस्तोत्रातील दृष्टान्त द्यायचा झाला तर असे म्हणता येईल की लाट समुद्राची असते, समुद्र लाटेचा होत नाही.शंकराचार्यांचे शब्द आहेत ‘‘सामुद्रो हि तरंग: क्वचन समुद्रो न तारंग:’’

अंदाज चुकले
मतदानाच्या सुमारे पंधरा दिवसांपूर्वी, गुजरातेतील केशुभाईंच्या बरोबर असलेल्या माझ्या परिचयाच्या जुन्या संघ कार्यकर्त्याचा मला दूरध्वनी आला होता. तो म्हणाला, सौराष्ट्र आणि कच्छ मिळून ज्या ५९ वि. स.च्या जागा आहेत, त्यापैकी कमीत कमी २० तरी आम्ही नक्की जिंकू. आमचा प्रयत्न तर अर्ध्या जागा जिंकण्याचा राहील. पण कुठल्याही परिस्थितीत त्या २० च्या कमी येणार नाहीत. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मलाही वाटत राहिले की, गुपपाला निदान ८ ते १० जागा मिळतील. पण तसे घडले नाही. त्या पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या. ही परिवर्तन पार्टी निवडणुकीच्या मैदानात नसती, तर भाजपाच्या जागांची संख्या निश्‍चितच १२५ च्या पुढे गेली असती.

मोदींचे महत्त्व
याचा अर्थ नरेंद्रभाई मोदींनी केलेल्या कार्याला गौण ठरवावे असा नाही. त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले. कुठल्याही अन्य राज्यात होणार नाही, असा गुजरातचा विकास घडवून आणला. भांडवलाच्या गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण केले. अल्पसंख्य मुसलमानांमध्येही स्वत:संबंधी विश्‍वास निर्माण केला. तोही इतका की, देवबंदच्या दारूल उलम या कट्टर धर्मपीठाचे नियोजित कुलगुरू मौलाना वास्तानवी यांनीही मोदींची प्रशंसा केली. ते म्हणाले होते की, मोदींच्या विकासकार्यांमुळे मुसलमानांचाही फायदा झाला आहे. मोदींच्या या प्रशंसेमुळेच, वास्तानवीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुसलमानांचा तीव्र विरोध मावळल्याचे आणि मोदी व पर्यायाने भाजपा याविषयी विश्‍वास वाढल्याचे चित्र २०१२ च्या निवडणुकीत स्पष्ट दिसून आले. ज्या मतदारसंघांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३० ते ६० टक्के आहे म्हणजे ज्या मतदारसंघांवर ते प्रभाव पाडू शकतात अशा नऊ वि. स. मतदारसंघांपैकी सात जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. जमालपूर-खादिया या साठ टक्के मुस्लिमांची वस्ती असलेल्या मतदारसंघातही भाजपाचा हिंदू उमेदवार विजयी झाला आहे. मोदींच्या विकासकार्याचा वेग आणि स्वरूप यामुळे भारतातील उद्योगपती तर प्रभावित झालेच, पण पश्‍चिम युरोपातील देशही प्रभावित झाले आहेत. म्हणून मी म्हणतो की, या वेळच्या भाजपाच्या निवडणुकीत मोदींच्या कर्तृत्वाचाही फार मोठा वाटा आहे. यावेळी भाजपाने जिंकलेल्या ११५ जागांचे मूल्य निदान १४० जागांइतके आहे. परिवर्तन पार्टीच्या विरोधात ११५ जागा जिंकणे ही सामान्य बाब नाही. गुपपा मैदानात नसती तर कॉंग्रेस पक्ष आपल्या २००७ मधील ५९ जागाही टिकवू शकला नसता.

अकाली चर्चा
मतमोजणी चालू असताना दूरदर्शनच्या ३-४ वाहिन्यांचे प्रतिनिधी मला भेटायला आले. त्यांना मी हेच सांगितले की २००७ ला ११७ जागा मिळाल्या होत्या. आता फार तर १-२ कमी होतील. कदाचित १-२ वाढतीलही. पण २००७ च्या तुलनेत भाजपा फार खाली येणार नाही. आणि मग त्यांचे प्रश्‍न भाजपाच्या भावी प्रधानमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या मुद्यावरच स्थिरावले. मी यापूर्वीही सांगितले होते आणि दिनांक २० लाही पुनरुक्ती करून सांगितले की, २०१४ मध्ये भाजपाचा प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार कोण राहील, ही चर्चा २०१२ मध्ये अकालिक (प्रि-मॅच्युअर) आणि अप्रस्तुत (इररेलेव्हन्ट) आहे. गुजरात वि. स.ची निवडणूक त्यासाठी लढली गेली नव्हती. मी हेही सांगितले की, भाजपाकडे त्या पदासाठी योग्य व्यक्तींचे दारिद्र्य नाही. जी ३-४ नावे त्यासाठी योग्य आहेत, त्यात मोदींचाही अंतर्भाव आहे. गुजरात वि. स.च्या निवडणुकीचा निकाल कसाही लागला असता, -म्हणजे २००७ च्या तुलनेत ७ जागा कमी मिळाल्या असत्या- तरी मोदींच्या योग्यतेत फरक पडला नसता. मोदींना भाजपाने आताच आपला प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावे, असे म्हणणारे भाजपात नाहीत, असे नाही. राम जेठमलानींनी ते पूर्वीच म्हटलेले आहे आणि जेठमलानी भाजपाचे राज्यसभेतील सदस्य आहेत. २-३ दिवसांपूर्वी दिल्लीचे एक नामवंत भाजपा कार्यकर्ते मला भेटून गेले. दि. २० च्या पूर्वीची म्हणजे तेव्हा मतमोजणी व्हावयाची होती, तेव्हाची गोष्ट आहे. तेही म्हणाले की, २०१४ मधील लोकसभेची निवडणूक मोदींच्या नेतृत्वातच लढवली जावी. मी त्यांच्या मताशी माझी असहमती व्यक्त केली. दू. द. वाहिन्यांनाही मी सांगितले की, २०१३ मध्ये भाजपाच्या शक्तीची केंद्रे असलेल्या अनेक राज्यांमध्ये, जसे दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक इ. विधानसभेची निवडणूक आहे. त्यांचे कसे निकाल लागतात, हे पाहूनच भाजपा आपली २०१४ ची रणनीती ठरवील. मला कधी कधी संशय येतो की, भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षांना तर मोदींना प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार आगाऊ घोषित करण्यात रस नसेल? मोदींची उमेदवारी जाहीर झाली, तर गठ्ठा मुस्लिम मते तर आपल्याकडे वळतीलच; पण भाजपाचा विद्यमान मित्र पक्ष जद (यू) हाही भाजपापासून दूर जाईल, आणि नवे मित्र पक्ष मिळण्यात अडचण जाईल असा तर त्यांचा हिशेब नसेल? माझा संशय खोटाही असू शकतो. पण मला असे वाटते की, भाजपाने आताच आपला प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करू नये. योग्य वेळीच तो घोषित करावा. आगाऊ घोषणेने कसलाही लाभ पदरात पडावयाचा नाही. भाजपाच्या नेतृत्वाचीही सध्या तरी हीच भूमिका आहे. विशिष्ट प्रसारमाध्यमे मोदींच्या भाषणातून स्वत:च्या सोयीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतीलच. गुजरातच्या मतदारांनी देशासाठी कार्य करण्याचा मार्ग प्रशस्त केला आहेअसे नरेंद्रभाई, विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी जमलेल्या जनतेसमोर बोलल्याचे प्रकाशित झाले आहे. देशासाठी कार्य करणेम्हणजे प्रधानमंत्री बनणे असा सोयीस्कर अर्थ, ज्याला काढायचा असेल, त्याने खुशाल काढावा, पण भाजपाने आपली भूमिका सोडू नये, असे मला वाटते.
सारांश हा की, २०१२ मध्ये जी परिस्थिती होती, ती लक्षात घेता, मोदींच्या नेतृत्वात गुजरात भाजपाने प्राप्त केलेला विजय खरोखर कौतुकास्पद आहे. मी नरेंद्रभाईंचे यासाठी मन:पूर्वक अभिनंदन करतो. कठीण आव्हानांचा सामना करून त्यांनी विजय प्राप्त केला आहे.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २२-१२-२०१२
babujivaidya@gmail.com

2 comments:

 1. "Jabardust Vijay" bjp ka gujarat me...Bahut pariman bhartiya Rajniti me chhod jate hai...Muje jo laga ki "Jatiyata ka Rajkaran" se pare hua election bahut badi "Uplabdhi" hai...

  Narendr Modi Anist kuchh angle se hai...Kintu Soniya Bigrade ka Jordar samna Modi ji kar sakte hai usme koi do-mat nahi. -Yogesh Nalawade,Gujarat.

  ReplyDelete
 2. आदरणीय
  वैद्य बाबा ...
  प्रणाम ......
  भारतीय जनता पार्टी च्या अंतर्गत राजकारणात असलेले गट पक्षाला मागे ओढत आहेत .याचा दुष्परिणाम थेट मतदान करनारा भाजपचा चहेता वर्ग आहे त्याच्या प्रत्यक्ष वागनुकिवर होतो .
  हिमाचल मधे विरोधी गटात बसावे लागने हे ह्याचेच फलित म्हणावे लागेल .
  गुजरात मधे देखिल गटबाजी ने कांग्रेस च्या जागा वाढल्या .केशुभाई या ठिकाणी चुकले .
  खरोखर निकाल छान असला तरी अजुन उताविळपना नको अजुन संयम हवा हेदेखिल खरे .
  लेख आवडला .
  -महेशचंद खत्री
  कळंबेश्वर
  मेहकर जिल्हा

  ReplyDelete