Wednesday 19 December 2012

‘अर्जुनाने युद्ध करावे, हेच श्रीकृष्णाला अभिप्रेत’


                                                                                      नागपूर,
                                                                                      दि. २०-१२-२०१२

श्री. डॉ. म. बा. कुलकर्णी
यांना सादर सस्नेह नमस्कार

माझे मित्र प्रा. सुरेश देशपांडे यांनी आपले पुनर्जन्म : भगवद्गीतेतील विवेचनहे पुस्तक मला माझ्या घरी आणून दिले; आणि या पुस्तकावर मी आपला अभिप्राय आपणांस कळवावा अशी आपली इच्छा असल्याचे मला आवर्जून सांगितले. आपली ही इच्छा, मी माझा बहुमान मानतो; आणि त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
आपले संपूर्ण पुस्तक यथाशक्ति अवधानपूर्वक वाचले. परंतु मला हे कळविण्यास खेद होतो की, आपल्या बर्‍याचशा विधानांशी मी सहमत नाही.

हे खरेच आहे की, गीतेमध्ये जन्म व मृत्यू म्हणजे त्यांच्या सातत्याची चर्चा आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च या दुसर्‍या अध्यायातील श्‍लोकात स्पष्टच तसे म्हटले आहे. परंतु, जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, मोक्ष, संन्यास इत्यादी अध्यात्मविषयक म्हणा अथवा पारलौकिक म्हणा, प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी अर्जुन कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर आला नव्हता. तो युद्ध करण्यासाठी आला होता. पहिल्या अध्यायाच्या २१ ते २३ या तीन श्‍लोकांमध्ये त्याने आपले मनोगत पुरेशा स्पष्टपणे प्रकट केले आहे. ‘‘मला कुणाशी लढायचे आहे आणि दुष्टबुद्धी दुर्योधनाचे प्रिय करण्याच्या इच्छेने जे लढायला कोण कोण आलेले आहेत, त्यांना मला बघायचे आहे.’’ हे या तीन श्‍लोकांचे सार आहे. हाच उपक्रमआहे. आणि शेवटी तो ते युद्ध लढला व विजयी झाला, हा त्याचा उपसंहारआहे. आपण जे म्हणता की, ‘‘मुक्तीचा म्हणजे पुनर्जन्मांच्या साखळीतून सुटण्याचा मार्गही अखेर कृष्णाने सांगितला’’, हा गीतेचा उपसंहार आहे, (पृ. १४०) हे पटण्यासारखे नाही. कारण उपक्रमएका दिशेने आणि उपसंहारअगदी विरुद्ध दिशेने अशा प्रकारचे वैपरीत्य मला समर्थनीय वाटत नाही.

अभ्यासम्हणजे पुनरावृत्ती, या निकषाचा विचार केला, तरी वारंवार युद्ध्यस्वम्हणजे युद्ध कर, याचीच सर्वाधिक पुनरावृत्ती झालेली आहे. दुसर्‍या अध्यायाच्या ३७ व्या श्‍लोकात युद्धाय कृतनिश्चय:’,  ३८ व्या श्‍लोकात युद्धाय युज्यस्व हे श्रीकृष्णाच्या तोंडचे शब्द आहेत. युद्ध्यस्वहा शब्द दुसर्‍या, तिसर्‍या, एवढेच काय पण ११ व्या अध्यायातही आला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, श्रीकृष्णाला अर्जुनाने युद्ध करावे, हेच अभिप्रेत होते. सर्व ज्ञान सांगून झाल्यावर कृष्ण म्हणाला, यथेच्छसि तथा कुरुआणि अर्जुनाचे उत्तर आहे, करिष्ये वचनं तव म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागतो. आणि हे जे वागणेघडले, ते युद्धात पराक्रम गाजवून ते युद्ध जिंकण्याचे आहे.
गीतेचा शेवटचा श्‍लोकही या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम या श्‍लोकार्धात श्री, विजय, आणि भूति, यांच्याच प्राप्तीची हमी दिलेली आहे.
अर्जुनाच्या मनात शंका आली होती की, युद्धात आपण जिंकू की ते आपल्याला जिंकतील? श्रीकृष्णाचे नि:संदिग्ध उत्तर आहे, ‘‘सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ| ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवापस्यसि.’’

हे खरेच आहे की, दोन्ही सैन्यांचे मधोमध रथ आल्यानंतर, कौरवसैन्याचा महान विस्तार बघून आणि समोर भीष्माद्रोणादि कौरव सैन्यातील वीरांना पाहून अर्जुन गांगरला. बावरला. भीष्म, द्रोण, कर्णादि सेनापती आणि दुर्योधनादि कुरुकुलातील वीर यांच्याशी त्याचे असलेले नाते, त्याला, रथ मध्यभागी स्थापन करण्यापूर्वी, माहीत नव्हते, असे समजणे उचित नाही. कारण, काहीही असो, त्यांना पाहून तो गांगरला, हे सत्य आहे. त्याच्या मनात व्यामोह निर्माण झाला. आणि त्याने आपली व्यथा भगवान कृष्णाला सांगितली. ती व्यथा आपल्या कुलाच्या भवितव्याची आहे. आपण मेल्यानंतर स्त्रिया विधवा होतील, दुराचार वाढेल व वर्णसंकर होईल, ही अर्जुनाची व्यथा आहे. म्हणून तो म्हणतो की, ‘गुरुजनांना मारून रक्तलांछित भोग भोगण्यापेक्षा भीक मागणे श्रेयस्कर आहे.’’ आणि कृष्णाचा त्याला टोमणा आहे की, तू, नको त्याचा शोक करतोस आणि वर बुद्धिवादाच्या बाता मारतोस. प्रज्ञावादांश्च भाषसे हे कृष्णाचे शब्द आहेत. आणि हेही कृष्ण प्रहसन्निवसांगत आहे.

आपले पुस्तक वाचताना, माझा असा समज झाला की, (कदाचित् तो चुकीचाही असेल) आपण श्रेय:हा जो शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे, त्याचा अर्थ, एखादा अपवाद सोडल्यास (हा अपवाद मला पृष्ठ १२४ वर श्रेयो हि ज्ञानमभ्यासाद् या वाक्यांशात आढळला) मोक्षअसा केला आहे. माझ्या मते हा अर्थ चुकीचा आहे. मोक्षासाठी सर्वत्र प्रचलित असलेला नि:श्रेयसशब्द गीताकर्त्यांना माहीत नसेल काय? मग त्या शब्दाचा वारंवार प्रयोग का नाही? फक्त पाचव्या अध्यायातील दुसर्‍या श्‍लोकात संन्यास व कर्मयोग दोन्ही नि:श्रेयसकर आहेतअसे कृष्णाने म्हटले आहे. याच्या उलट श्रेय:शब्द निदान ८-१० वेळा आलेला आहे व त्याचा अर्थ हितकारक’, ‘कल्याणकारकअसाच केला पाहिजे. श्रेय:म्हणजे मोक्षकिंवा जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटकाहा अर्थ त्यावर लादणे मला अनुचित आग्रहाचे वाटते.

कुणी असा प्रश्‍न करू शकतो की, गीतेत, अध्यात्म, ब्रह्म, अधिभूत, अधियज्ञ, संन्यास, मोक्ष, गुणत्रय, श्रद्धात्रय इत्यादि अनेक विषयांची चर्चा नाही काय? याचे उत्तर असे की, हे सारे विषय गीतेत आलेले आहेत. पण ते, अगदी सौम्य शब्द वापरायचा म्हटले तरी आनुषंगिक आहेत. हे विषय मूळ गीतेचा गाभा नाहीत. या विषयांच्या अंतर्भावाचे कारण, माझ्या मते, महाभारताची झालेली तीन संस्करणे हे आहे. जय’, ‘भारतमहाभारतही त्यांची नावे आहेत. व्यासकृत जयसहा हजार श्‍लोकांचा होता. वैशंपायनकृत भारत२४ हजार श्‍लोकांचा झाला आणि सौतिकृत महाभारत आजचे ९० की ९२ हजार श्‍लोकांचे आहे. मूळ कथा तीच आहे. कौरवपांडवांची कथा. पण जनमेजयाच्या यज्ञात, तीच वैशंपायनाने विस्तारून सांगितली आणि सौतीला तर ती शौनकाच्या यज्ञात १२ वर्षे सांगावी लागली. रोजचे एक सत्र म्हटले तरी चार हजारांहून अधिक सत्रांमध्ये ती सांगितली गेली असली पाहिजे. हेही लक्षात घेतले पाहिजे की, श्रीमद्भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ नाही. महाभारताच्या भीष्मपर्वातील एक प्रकरण म्हणा उपपर्व म्हणा ते आहे. गीतेचा पहिला अध्याय भीष्मपर्वातील २५ वा अध्याय आहे. सौतीचा खरेच गौरव केला पाहिजे की त्याने महाभारताला आजची यदिहास्ति तदन्यत्र, यन्नेहास्ति न तत् क्वचित् (जे इथे आहे तेच अन्यत्र आढळेल. इथे जे नाही, ते कुठेही सापडणार नाही) अशी एका प्रचंड ज्ञानकोशाची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या विस्तारीकरणात त्याने अत्युच्च तत्त्वज्ञानाचे विषय चर्चिले. तसेच तीर्थयात्रा आणि अन्य उपाख्याने त्यात अंतर्भूत करण्यात आली. त्यामुळे महाभारतअसा मूळ ग्रंथाचा प्रचंड विस्तार झाला. महाभारताच्या या विस्तारीकरणात गीतेचेही विस्तारीकरण अपरिहार्यच म्हटले पाहिजे. म्हणूनच जे प्रश्‍न, रणांगणात, अर्जुनाच्या किंवा कोणत्याही योद्ध्याच्या मनात येणे असंभाव्य, तेही प्रश्‍न अर्जुनाने विचारले, असे दाखविण्यात आले असावे. त्यामुळे तत्त्वज्ञानविषयक गूढ विषयांची चर्चा गीतेत आली आहे. या प्रश्‍नांमध्ये पुनर्जन्मासंबंधी प्रश्‍न येणे स्वाभाविकच होते. त्यामुळे, आपण जी चर्चा केली, ती योग्यच आहे. मात्र हे गीतेचे तात्पर्य नव्हे. हेही विसरता कामा नये की, हे प्रश्‍न विचारण्यासाठी अर्जुन, ना कुरुक्षेत्राच्या  समरभूमीवर आला होता, ना या प्रश्‍नांनी त्याच्या मनात संभ्रम वा शंका उत्पन्न होण्याचे कारण होते. म्हणून, आपल्या पुस्तकाच्या पृष्ठ ९ वर अर्जुनाच्या मनोभूमिकेसंबंधी आपण जे विवेचन केले आहे, ते मला अप्रस्तुत वाटते.
काही शब्दांचे म्हणा अथवा शब्दावलीचे म्हणा आपण दिलेले अर्थ बरोबर नाहीत असे मला वाटते. हे मी भीतभीतच लिहीत आहे. कारण मी संस्कृतचे अध्यापन सोडण्याला आता ४६ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. असे एक स्थळ आहे कैर्मया सह योद्धव्यम्. याचा सरळ अर्थ, मला कुणाशी लढायचे आहे, हाच राहील. कारण हे अर्जुनाच्या तोंडचे वाक्य आहे. कुणाकुणाला माझ्याशी लढायचे आहे, हे अर्जुन कशाला मनात आणील? जे लढणारे आहेत, त्यांच्याकरिता हा प्रश्‍न राहील.
तसेच ७ व्या अध्यायातील १६ व्या श्‍लोकात, भक्तांचे जे चार प्रकार सांगितले आहेत, त्यातील अर्थार्थीचा आपण दिलेला मोक्षपुरुषार्थाची कामना करणारा’ (पृ. ११२) हा अर्थ पटण्यासारखा नाही. श्रीमच्छंकराचार्यांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत सर्वांनी धनकाम:किंवा धनादिकाम्यवासना मनात ठेवणारे’, असा जो अर्थ दिला आहे, तो मला योग्य वाटतो. विनोबांनीही अर्थार्थीचा अर्थ हितार्थीअसा देऊन, विश्‍वहिताची चिंता करणारा, जनहितकारी, असे त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अर्थशब्दाला पुरुषार्थाशी जोडणे मला योग्य वाटत नाही; आणि त्यातही मोक्षपुरुषार्थाशीच का? ‘धर्मपुरुषार्थाशी का नाही?

असो. मला जे वाटले, ते मी मोकळेपणाने लिहिले. आपण रागावणार नाही, या विश्‍वासापोटीच हे धार्ष्ट्य मी केले आहे. माझ्या ज्ञानाच्या आणि ग्रहणशक्तीच्या मर्यादांची मला जाणीव आहे.
                                                                       

स्नेहांकित
(मा. गो. वैद्य)

No comments:

Post a Comment