Saturday, 5 January 2013

कठोर कायदा हवाच; पण संस्कारव्यवस्थाही हवी

रविवारचे भाष्य दि. ६ जानेवारी २०१३ करिता

दिनांक १६ डिसेंबरला, राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर जो पशूलाही लाजविणारा राक्षसी लैंगिक अत्याचार मानवदेहधारी बदमाशांनी केला, त्याने आपल्या देशातील संपूर्ण समाजमन ढवळून निघाले. सामान्यत: आपल्याच विश्‍वात रममाण असणारा मध्यमवर्ग प्रचंड संख्येत रस्त्यावर आला; आणि त्यांनी त्या गुंडांना फासावर लटकविण्याची जोरदार मागणी केली. ही कठोर शिक्षा देणे शक्य व्हावे, म्हणून विद्यमान कायद्यात बदल करावा अशीही मागणी करण्यात आली. आपल्या सुदैवाने सरकारने हे कार्य मनावर घेतले आणि निवृत्त न्या. मू. जे. एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही नेमला. त्याच्याकडे लोकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात, अशी अधिकृत सूचनाही केली.

अनेक सूचना
फाशीची तरतूद ही एक मागणी आहे. एकमेव मागणी नाही. महिलेवर बलात्कार करणार्‍यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असली, तरी तेवढ्याने कार्यभाग होणार नाही, उलट बलात्काराला बळी पडलेल्या महिलेची हत्याही केली जाण्याची शक्यता राहील, असे मत काहींनी व्यक्त केले. कुणी गुन्हेगार व्यक्तीला नपुंसक करावे अशी सूचना केली, तर अन्य काहींनी, नपुंसक करून त्या गुन्हेगाराला सोडून देऊ नये; सांडाला ठेचून जसा त्याचा बैल बनविला जातो आणि त्याला ओझे वाहण्यासाठी वापरले जाते, तसेच या नरपशूला नपुंसक केल्यानंतरही शिक्षा म्हणून त्याच्याकडून कठोर कामेही करून घ्यावीत, अशी सूचना केली. या आणि अशाच अन्य सूचनांची वर्मा आयोग दखल घेईलच. त्या आयोगाकडून कोणत्या शिफारसी येतात, हे लवकरच कळेल. येथे हेही ध्यानात घेतले पाहिजे की, मुंबई उच्च न्यायालयाने महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकारांनीही कायदे करावे, से सूचित केले आहे. संसद कायदा करीपर्यंत राज्यांनी थांबण्याची गरज नाही. केवळ महाराष्ट्रानेच नव्हे, तर अन्य राज्यांनीही मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्देशाचा गांभीर्याने विचार करावा.

जलदगती न्याय
त्याचप्रमाणे, बलात्काराच्या खटल्यांचे मामले नेहमीच्या न्यायप्रक्रियेप्रमाणे म्हणजे ज्यात विलंब हा गृहीत धरलेलाच असतो, चालू नयेत, त्यांचा निकाल त्वरेने व्हावा व पीडित व्यक्तीला न्याय मिळावा, अशीही सूचना आली असून, सरकार त्याप्रमाणे कामालाही लागले आहे. दिनांक २ जानेवारीलाच दिल्लीत अशा एका जलदगती न्यायालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. मू. अल्तमस कबीर यांच्या हस्ते झाले आहे. लैंगिक बलात्काराच्या अत्यंत संवेदनशील मामल्यांबाबत सरकार पुरेशा गांभीर्याने विचार करीत आहे, हेच यावरून प्रकट होते.

कायदा आवश्यकच
तथापि, सर्वांनी हेही समजून घेतले पाहिजे की, कायद्याच्या शक्तीच्याही काही मर्यादा असतात. कठोर कायदा हवाच व त्याची काटेकोर अंमलबजावणीही व्हावीच, याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. हे खरेच आहे की चोरी, हत्या, बलात्कार यांच्या संदर्भात कायदे आहेतच. तरीही चोर्‍या होतातच. खूनही होतात आणि बलात्कारही होतात. म्हणून कायदा नको, असे कुणी म्हणत नाही. हे येथे नमूद करण्याचे कारण असे की, जेव्हा भ्रष्टाचाराच्या घटनांची तत्काळ व प्रभावी दखल घेतली जावी आणि भ्रष्टाचार्‍यांना त्वरित व कठोर शिक्षा व्हावी म्हणून सक्षम लोकपालाच्या नियुक्तीसाठी अण्णा हजारेंचे आंदोलन जोरात चालू होते, तेव्हा दुसर्‍या बाजूने असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता की, कायद्याने भ्रष्टाचार संपणार आहे काय? त्या विषयावर याच स्तंभात मी लिहिले होते की, अशा प्रभावी लोकपालाची नियुक्ती करणारा कायदा आवश्यक आहे. तेव्हाही मी म्हटले होते की, चोरी, खून, बलात्कार या गुन्ह्यांच्या विरोधात कायदे असतानाही ते गुन्हे घडत असतात, म्हणून ते कायदे व्यर्थ आहेत, असे आपण म्हणतो काय? म्हणून बलात्काराच्या प्रकरणातील गुन्हेगारांना वचक बसेल, अशा कायद्याची नितांत आवश्यकता आहे; आणि सध्याच्या सरकारची तसेच विरोधी पक्षांचीही मानसिकता लक्षात घेता, असा कायदा संसदेत पारित होण्याला अडचण यावयाची नाही.

संस्कारव्यवस्थेचा विचार
पण हा झाला वचक व धाक निर्माण करण्याचा प्रश्‍न. समाजाला कलंकभूत असणार्‍या गुन्ह्यांकडे बघताना ते गुन्हे समाजात घडूच नयेत, असे वातावरण निर्माण करता येईल काय, याचा मला येथे विचार करावयाचा आहे; आणि मला वाटते की या दृष्टीनेही समाजाने व त्याचे प्रतिनिधित्व करणार्‍या सरकारने विचार करावा. तो विचार म्हणजे संस्कारव्यवस्थेचा विचार.
माझ्या मते संस्कार आवश्यक आहेत. संस्कारच माणसाला पशूपासून वेगळा करतात. पशू आणि मानव यांची प्रकृती काही बाबतीत समानच आहे. आहारनिद्राभयमैथुनं च समानमेतत् पशुभिर्नराणाम् ही उक्ती प्रसिद्ध आहे. पण पशूंचे, एक चांगले असते. ते प्रकृतीनेच वागतात. त्यांच्यात जशी संस्कृती येत नाही, तशीच विकृतीही येत नाही. मी अनेकदा एक उदाहरण दिले आहे. समोर पडलेल्या हिरव्यागार गवताच्या ढिगार्‍याकडे, तो खाण्यासाठी दोन बैल एकाच वेळी पोचले व त्यातला धष्टपुष्ट व दुसरा दुबळा असला, तरी धष्टपुष्ट बैल त्या दुसर्‍या दुर्बल बैलाला तो चारा प्रथम खा असे म्हणावयाचा नाही. पोटात भूक आहे, समोर चारा पडलेला आहे, तो त्याच्यावर तुटून पडेल आणि दुसर्‍या बैलाला शिंगांनी दूर हटविण्याचाही प्रयत्न करील. ही पशूंची प्रकृती आहे. दुबळ्याला पहिले खाऊ द्यावे, आपण मग खावे, किंवा दोघे मिळून चारा खाऊ, असे म्हणणे ही संस्कृती आहे. ती बैलांमध्ये यावयाची नाही. पण पशूत विकृतीही येत नाही. पोट भरले, आणि चारा उरला, तर त्याची पेंडी बांधून बैल घेऊन जात नाही! माणसाचा भरवसा नाही! म्हणून, माणूस विकृतीकडे जाऊ नये, उलट प्रकृतीच्याही वर उठून, त्याने संस्कृतिसंपन्न व्हावे, दुर्बलाची, भुकेलेल्याची गरज त्याने अगोदर पूर्ण करावी, सर्वांनी मिळून खावे, यासाठी शिक्षणाची आणि त्या द्वारा उचित संस्कारांची गरज असते.

संस्कार म्हणजे काय?
असे संस्कार घरातून म्हणजे कुटुंबातून, शिक्षणव्यवस्थेतून आणि सामाजिक व्यवहारातून, जसे न कळत होत असतात, तसेच ते जाणीवपूर्वकही केले जाऊ शकतात. प्रश्‍न असा उत्पन्न होईल की संस्कार म्हणजे काय? त्याची व्याख्या सोपी आहे. ती अशी- दोषापनयेन गुणाधानं संस्कार:’- म्हणजे दोषांना बाजूला सारून गुणांना वर आणणे म्हणजे संस्कार. माणूस त्रिगुणांचा बनलेला आहे. सत्त्व, रजस् व तमस् हे तीन गुण सर्व प्राणिमात्रांमध्ये आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सत्त्वगुणी म्हणतो, याचा अर्थ त्याच्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुण नसतो असा नाही. ते गुण असतातच. पण सत्त्वगुणाचे प्रमाण खूप जास्त असते. रजोगुण व तमोगुण यांचे कमी असते. संस्कार, सत्त्वगुणाला प्राधान्य अर्पण करतात. म्हणून त्यांची आवश्यकता आहे. संस्कारहा शब्दच चांगले करणेया अर्थाचा आहे. संस्कृत व्याकरणशास्त्रच तसे सांगते. चांगले करणे असा भाव नसेल, तर शब्द त्याच सम्+कृधातूपासून संकरअसा तयार होईल. भूषणभूत होणेअसा अर्थ अभिप्रेत असेल, तरच संस्कारशब्द सिद्ध होईल. आणि माणसाने चांगले होणे म्हणजे काय, तर व्यापक होणे, व्यापकतेशी स्वत:ला जोडून घेणे, स्वार्थाच्या वर उठणे. जपानप्रमाणे 'Me Last, Others First' असे मानणे व त्याप्रमाणे वागणे. संस्काराचाहा अर्थ आहे.

संस्कारांची शिकवण
आपल्या आवडत्या मुलासाठी आपण बाजारातून चॉकलेट विकत आणले, तर तो सगळा पुडा आपण त्याच्या हाती देत नाही. एक चॉकलेट देतो आणि म्हणतो की, हे दादाला दे, दुसरे ताईला दे, आणखी कुणी असेल, तर त्याला दे; आणि मग आपण त्याला ते खायला देतो. प्रथम इतरांना द्यावे आणि नंतर आपण खावे, हा संस्कार या कृतीतून आणि अभ्यासातून आपण त्याला देत असतो आणि एकट्याने खाऊ नये हे तत्त्व आपण त्याच्या मनावर ठसवीत असतो. श्रीमद्भगवद्गीतेत भगवान् श्रीकृष्णांनी एकटे खाणार्‍याची अत्यंत कठोर शब्दात निंदा केली आहे. ते वचन आहे भुञ्जते ते त्वघं पापा, ये पचन्त्यात्मकारणात् (अध्याय ३, श्‍लोक १३) जे फक्त स्वत:करिता अन्न शिजवितात, ते अन्न भक्षण करीत नाहीत, पाप भक्षण करीत असतात, असा या श्‍लोकार्धाचा अर्थ आहे. परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम् असेही एक सुभाषित आहे. त्याचा अर्थही परोपकार पुण्यकारक असतो तर परपीडन पापाला कारणीभूत असतेअसा आहे. मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत् ही उक्ती तर आपल्या संस्कृतीचे सारच व्यक्त करते. ती सांगते, परस्त्रीकडे मातेप्रमाणे बघा आणि परद्रव्याला मातीचे ढेकूळ समजा. अशी आणि अशा प्रकारची शिकवण घराघरातून समाप्त झाली नसली, तरी खूपच क्षीण झाली आहे. पैशाची प्राप्ती वाढली आहे, पण संस्कारांनी येणारी संस्कृती वाढलेली नाही. त्यामुळे ऐष-आरामाकडे, व्यसनांकडे प्रवृत्ती होऊ घातलेली आहे. विदर्भाच्या एका तालुकास्थानच्या महाविद्यालयातील ५० टक्के प्राध्यापक दारूचे भक्त बनले आहेत असे मला सांगण्यात आले. कारणांचा शोध घेतला, तर असे ध्यानात आले की, त्या सर्वांचे पगार मासिक ७० हजार रुपयांच्या वर आहे. पैशाचा कसा सदुपयोग करावा, हे त्यांच्या मनावर कोणी उचित संस्कारांनी ठसविलेच नाही.

शिक्षणाचा परिणाम
मी हिस्लॉप कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो, त्या काळात, वेळापत्रकात सर्वांसाठी बायबलचा (स्क्रिप्चर) वर्ग आवश्यक असे. पुढे त्याला नैतिक शिक्षणहा पर्याय देण्यात आला. नैतिक शिक्षणाचा एक वर्ग घेण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले होते. त्यामुळे, निदान काही चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या कानावर नक्कीच जात असत. मी एका शिक्षणसंस्थेचा अध्यक्ष असताना, संस्थेतर्फे चालविण्यात येणार्‍या माध्यमिक शाळेत, आठवड्यातून दोन दिवस, एक सेवानिवृत्त वयोवृद्ध प्राचार्य भगवद्गीतेवर प्रवचन करतील अशी आम्ही योजना केली. उपस्थिती ऐच्छिक ठेवली आणि हा प्रवचनवर्ग शाळा सुटल्यानंतर होईल अशी व्यवस्था केली. वर्ग ८ ते १० मधील विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आली. शंभराहून अधिक मुले त्याला उपस्थित राहत असत. अर्थात् हा आकडा एकूण संख्येच्या २० टक्केच होता. पण त्या २० टक्क्यांना गोडी लागली. ज्याचा परीक्षेत मिळवावयाच्या गुणांशी संबंध नाही, जेथे उपस्थिती अनिवार्य नाही, अशा व्यवस्थेचा ज्या अर्थी ते लाभ घेत होते, त्या अर्थी त्यांच्यावर काही संस्कार निश्‍चितच होत होते. निदान ज्याचा आर्थिक अथवा व्यावहारिक लाभ नाही, अशा कार्यासाठी पाऊण तास देण्याची त्यांना सवय लागली. माझ्या मते हा संस्कार आहे.
दिल्लीचे रामकृष्ण गोस्वामी नावाचे गृहस्थ अपराधनिवारण- चरित्रनिर्माणया नावाने एक कार्य करीत असतात. ते तुरुंगातील कैद्यांना गीता शिकवीत असतात. मी त्यांच्याबरोबर दोनदा तिहार तुरुंगात, एकदा साबरमती तुरुंगात आणि एकदा नागपूर तुरुंगात गेलो आहे. आता तिहारमध्ये कैदीच गीता शिकवीत असतात. तुरुंगाधिकार्‍यांचा अनुभव सांगतो की, या गीतावर्गाचा कैद्यांच्या आचरणावर चांगला परिणाम झाला आहे.

संपत्ती आणि संस्कृती
आपल्या देशात सेक्युलॅरिझम्चा जो विकृत अर्थ करण्यात येत असतो, त्यामुळे शाळांमधून असे संस्कारवर्ग कायमचे बंद झाले आहेत. सरकारने सेक्युलरचा अर्थ धर्मनिरपेक्षअसा न करता सेक्युलरम्हणजे सर्वपंथसमादरअसा केला, तर अनेक शिक्षण संस्था धर्मशिक्षणाचे म्हणा, नीतिशिक्षणाचे म्हणा, संस्कारप्रद कार्य करावयाला सरसावतील. मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की, असे वर्ग ज्या शिक्षणसंस्था चालवितील, त्यांना सरकारने विशेष रूपाने पुरस्कृत करावे. शाळेतील मुले संस्कारक्षम वयातील असतात. त्यांचे जीवन उदात्त, उन्नत, व्यापक करू शकणारे विचार त्यांच्या समोर आले, तर मला नक्की वाटते की, त्यांचा त्यांच्या मनावर चांगलाच परिणाम होईल. कितीतरी सामाजिक दुष्ट रूढी सुटतील. असहिष्णुता आणि लोकोपयोगी कायद्यांचा अनादर करण्याची प्रवृत्ती क्षीण होईल. रस्त्यावरील वाहतूक मी नित्य बघत असतो. लाल बत्ती लागली की ७५ ते ८० टक्के वाहनचालक आपले वाहन थांबवितात. २०-२५ टक्के त्याची पर्वा न करता आपले वाहन पुढे दामटीत असतात. हा नियम मोडणारे अशिक्षित नसतात. गरीब तर नसतातच. पण संपत्तीबरोबर संस्कृती आलेली नसते; आणि ती येऊ शकणारे जे वातावरण हवे असते, ते ना घरात असते, ना शिक्षणसंस्थेत मिळते. घरात लहानपणापासूनच करीअरचे पाठ दिले जातात. त्याचाच आग्रह धरला जातो. मात्र या करीअरचे सामाजिक प्रयोजन काय, हे कुणी सांगतच नाही. निदान, शिक्षणसंस्थांनी तरी ते सांगायला हवे. वाचन, श्रवण व दर्शन या तिन्ही विधांचे मनावर परिणाम होतच असतात. म्हणून तर आपण वाचण्यासाठी पुस्तके आणतो. ती काय केवळ मनोरंजनासाठी असतात? टीव्हीवरील दृश्यांचाही आपण जो साधकबाधक विचार करीत असतो, तो कशासाठी? आपले जीवन संस्कृतिसंपन्न व्हावे म्हणूनच की नाही? एकदा संस्कृतिसंपन्नेकडे पाऊल पडू लागले की मग आपोआप विकृतीचा मार्ग सुटेल. व्यक्ती प्रकृतीच्याही वर उठेल. आणि पशू व मानव यातला फरक त्याच्या नित्याच्या आचरणातून प्रदर्शित होईल. कायदा हवाच. पण तो पुरेसा नसतो. त्याला जोड संस्कारांची मिळाली की त्या कायद्याचाही आदर होईल. मी तर असेही म्हणण्याचे धाडस करीत आहे की, अशा संस्कृतिसंपन्न व्यक्तींकरिता कायद्याच्या धाकाचीही गरज राहणार नाही. समाजमनावर परिणाम करणारे जे जे उपक्रम, सध्या चालू आहेत, त्या सर्वांचा या दृष्टीने विचार करावा आणि त्या दृष्टीने त्यांचे मूल्यांकन करावे, असे मला वाटते.


-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ०४-०१-२०१३
babujivaidya@gmail.com

1 comment:

 1. आदरणीय
  वैद्य बाबा ...
  सादर प्रणाम ...
  संस्कारहीन पीढ़ी वाम मार्गा ला लागल्याने त्यांच्या हातून घडनारे कुकर्म यासाठी कुठेतरी यापुर्विची पीढ़ी जवाबदार आहे असे म्हटले तर त्याचा अर्थ चुकीचा काढला जावू नये .
  वेळीच वाममार्गाला लागलेल्या पिढीला रोखता येवू शकत नव्हते का?
  त्यांना संस्कारहीन बनविन्यात हेच लोक जवाबदार नाहीत का ?
  पूर्वी शिक्षण पद्धति मधे गुरुशिष्य अशी असलेली परंपरा अमान्य करुण आपली भावी मुले कान्वेंट संस्कृति कड़े पोह्चविन्याचे काम याच लोकांनी केलेले आहे .
  आता याला आवर घालण्यासाठी घयावी लागणारी मेहनत तोकडी पडत आहे .
  पुन्हः संस्कार रुजविन्या मधे वाढलेली पश्चिमि संस्कृति आणि दृकश्राव्य माध्यमें मोठी अडचन निर्माण करीत आहेत .सोबतच धर्मनिरपेक्षतेचा सरकारने लावलेला सोयिचा अर्थ यामुळे खरोखर अगदी परिस्थिति लयाला गेली आहे .
  काही संस्कारी नितिमूल्या चे शिक्षण देणारे संत आणि संघटन आज देखिल या कार्यात आपला पूर्ण वेळ देत असल्याने सुसंस्कारित राष्ट्र निर्मितिला चालना मिळत आहे .
  ज्यातून स्वामी विवेकानंदा च्या स्वप्नातील भारत जगद्गुरुपदी विराजमान होणार हे देखिल तेवढेच सत्य आहे .
  भाष्य आवडले .
  ---------------
  महेशचंद खत्री
  कळंबेश्वर
  मेहकर जिल्हा

  ReplyDelete