Thursday, 9 May 2013

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकालकर्नाटक विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक 5 मे रोजी झाली होती. काल दि. 8 मे ला त्या निवडणुकीत झालेल्या मतदानाचा निकाल प्रकट झाला. तो काहीसा अनपेक्षित आहे. यासाठी नाही की भाजपाची हार झाली. ती अपेक्षितच होती. पण निदान पक्षाला 60 जागा जिंकता येतील, असे मला वाटत होते. तसेच कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असा माझा अंदाज होता. माझे हे दोन्ही अंदाज खोटे ठरले.

पराभवाची मीमांसा
येदीयुरप्पांची भाजपातून हकालपट्टी झाल्यानंतर व त्यांनी आपली वेगळी चूल मांडल्यानंतर, भाजपाच्या समर्थक मतांमध्ये फूट पडणार हे स्पष्टच दिसत होते. 2008 साली 110 जागा जिंकणार्‍या भाजपातून बाहेर पडलेले दोन पक्ष होते. एक येदीयुरप्पांची ‘कर्नाटक जनता पार्टी’ (कजपा) आणि दुसरी रेड्डी ब्रदर्सच्या प्रभावक्षेत्रात निर्माण झालेली ‘बीएसआर काँग्रेस पार्टी’ (बीकापा). या दोन्ही पक्षांनी स्वत:साठी जास्त जागा जिंकल्या नाहीत. मात्र भाजपाचे फार मोठे नुकसान केले. पूर्वी मुंबई इलाख्याचा भाग असलेल्या उत्तर कर्नाटकात 2008 साली भाजपाला 33 जागा मिळाल्या होत्या. यावेळी ती संख्या 13 वर आली. या भागात लिंगायत समाजाची जवळजवळ एकतृतीयांश लोकसंख्या आहे. पण येदीयुरप्पांची कजपा फक्त 2 जागा जिंकू शकली. पण तिने भाजपाचे 20 जागांचे नुकसान केले. या भागात गेल्या वेळी काँग्रेसला 12 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी तो आकडा 31 पर्यंत फुगला. हैदराबाद संस्थानाचा जो भाग कर्नाटकात सामील झाला आहे, त्या भागातही भाजपाची अशीच पडझड झाली. 2008 मध्ये भाजपाने 19 जागा जिंकल्या होत्या. 2013 मध्ये त्याला फक्त 4 जागा मिळाल्या, तर काँग्रेस 17 वरून 20 वर गेली. बीकापाला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. भाजपाच्या या पराभवासाठी येदीयुरप्पाच जबाबदार आहेत, याविषयी शंका नको. समुद्राकाठचा मंगलोरचा परिसर म्हणजे भाजपाच्या शक्तीचा गड होता. पण तेथेही भाजपा 2008 ची स्थिती कायम राखू शकली नाही. समुद्र किनार्‍याला लागून असलेल्या प्रदेशात 2008 साली भाजपाने 15 जागा जिंकल्या होत्या. यावेळी तो आकडा 4 पर्यंत घसरला. कर्नाटकात मुसलमानांची संख्या सुमारे 13 टक्के आहे. त्यातली सर्वाधिक या किनारपट्टीवर आहे. त्यांनी एकजुटीने काँग्रेसला मतदान केले; आणि 2008 साली 7 जागा जिंकलेल्या काँग्रेसला 12 जागांवर यावेळी विजय मिळाला.

लक्षणीय विजय
काँग्रेसचा विजय खरेच लक्षणीय आहे. माझा अंदाज होता की, 100 च्या आसपास त्या पक्षाला जागा मिळतील, विधानसभा त्रिशंकू राहील आणि काँग्रेस पक्षाला कुणा तरी पक्षाशी जुळवून घेऊन सत्ता प्राप्त करता येईल. पण माझा तो अंदाज चुकला. 224 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसने 121 जागा जिंकल्या आहेत. यावेळी 223 जागांसाठीच निवडणूक झाली होती. भाजपाच्या एका उमेदवाराचे प्रचाराच्या कालावधीत निधन झाल्यामुळे, तेथील निवडणूक स्थगित झाली आहे. 223 पैकी 121 जागा जिंकणे हे केव्हाही स्पृहणीयच समजले जाईल. काँग्रेसने ते यश संपादन केले, याबद्दल त्या पक्षाचे अभिनंदन. 2008 मध्ये काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. आता त्या पक्षाला दीडपटीहून अधिक जागा मिळाल्या आहेत. कर्नाटकातील जनतेचेही अभिनंदन केले पाहिजे. लोकांनी एका पक्षाला निर्भेळ बहुमत देऊन, कोणत्याही सहयोगी पक्षाच्या दडपणाखाली न वाकता व तसा बहाणा शोधण्याची संधीही न ठेवता स्वतंत्रपणे राज्यकारभार करण्याची संधी काँग्रेसला अर्पण केली आहे. कोणत्याही प्रादेशिक पक्षापेक्षा अखिल भारतीय स्तरावरील पक्ष, राज्यातही सत्तारूढ होणे, हे देशाच्या एकात्मतेसाठी उपयुक्त असते. आपण तामीळनाडू किंवा पश्‍चिम बंगालकडे बघा. तेथील सरकारांची अशी वागणूक असते की, जणू काही त्यांचे वेगळे परराष्ट्रीय धोरण आहे. त्यांच्या भूमिकांच्या योग्यायोग्यतेचा मुद्दा मला उपस्थित करावयाचा नाही. कदाचित्, त्यांचे धोरण योग्यच असेल. मला एवढेच अधोरेखित करावयाचे आहे की, श्रीलंका व बांगलादेश यांच्या बाबतीत त्या राज्यांमधील सरकारांचा दृष्टिकोण केंद्र सरकारच्या दृष्टिकोणापेक्षा वेगळा आहे व त्या दृष्टिकोणावर ती सरकारे ठाम आहेत.

काँग्रेसचे चरित्र
काँग्रेसचे बडे बडे नेते आपल्या पक्षाच्या या अनपेक्षित भरघोस विजयाचे श्रेय राहुल गांधींना देत आहेत, हे त्यांच्या स्वभावधर्माला धरूनच आहे. व्यक्तिपूजा व घराणेशाही हे काँग्रेसच्या चरित्राचा अभिन्न भाग बनलेले आहेत. सोनिया गांधींनी मात्र श्रेय सर्वांच्या प्रयत्नांना दिले आहे. राहुल गांधींचा उदो उदो काँग्रेसच्या नेत्यांनी करावा, याबद्दल अन्यांनी आक्षेप घेण्याचे तसे कारण नाही. पण मग, गुजरात, बिहार आणि उत्तरप्रदेशातही राहुल गांधींनी प्रचार केला होता, तेथे का काँग्रेसची धूळधाण झाली? पराभवाची जबाबदारी तेव्हा पक्षावर टाकण्यात आली होती. म्हणजे विजय झाला तर तो राहुलजींमुळे आणि पराभव झाला, तर तो पक्षसंघटनेमुळे, असे काँग्रेसचे अजब तर्कशास्त्र आहे. काँग्रेसने खरे म्हणजे आपल्या विजयाचा श्रेयाचा थोडा तरी वाटा येदीयुरप्पांच्या पदरात टाकला पाहिजे व त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. भाजपाच्या निराशाजनक पराभवाचे आणि परिणामी काँग्रेसच्या भरीव विजयाच्या श्रेयात येदीयुरप्पांची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. (आज दिनांक 9 मे च्या ‘इंडियन एक्सप्रेस’ दैनिकाच्या नागपूर आवृत्तीत पान 9 वर, कर्नाटकातील निवडणूक निकालासंबंधी माझी प्रतिक्रिया प्रकाशित झाली आहे. त्यात, मी भाजपाची स्थिती "disgusting" असल्याचे त्यांनी प्रकाशित केले. त्यांनी माझी टिप्पणी कुठून घेतली ते मला माहीत नाही. बहुधा टी. व्ही. वाहिन्यांवरून घेतली असेल. माझी त्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी झालेली मुलाखत मराठी व हिंदीत होती. मी भाजपाच्या पराभवासाठी ‘निराशाजनक’ असे विशेषण वापरले होते. ‘निराशाजनक’चा अनुवाद "disgusting" होईल काय? वस्तुत: त्याचा अनुवाद "disappointing" असा करायला हवा होता.  याबाबत मी त्या वृत्तपत्राला पत्रही पाठवीत आहे.)

मतांची टक्केवारी
2008 सालच्या निवडणुकीत काँग्रेसला 34 टक्के मते मिळाली होती. भाजपाची टक्केवारी त्यावेळी काँग्रेसपेक्षा थोडी कमी होती. पण जागा मात्र काँग्रेसपेक्षा अधिक मिळाल्या होत्या. यावेळी एक सूत्र म्हणाले की, काँग्रेसला 42 टक्के मते मिळालीत. मी त्याबाबत अधिक चौकशी करता असे आढळले की, यावेळी काँग्रेसच्या टक्केवारीत फक्त 3 टक्क्यांची भर पडून ती जवळपास 37 टक्के झाली आहे. भाजपाची टक्केवारी मात्र जवळजवळ 13 टक्क्यांनी कमी झाली आहे. यासाठी येदीयुरप्पांची कजपा कारणीभूत आहे, याविषयी शंका नको. काँग्रेसच्या मताधिक्यात मुस्लिम मतांचा मोठा वाटा आहे. वर सांगितलेच आहे की, कर्नाटकात मुसलमानांची संख्या 13 टक्के आहे. तो समाज यावेळी भरभक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला. मंगलोरच्या परिसराची माहिती असलेल्या व्यक्तीने मला सांगितले की, त्या भागातील मुसलमानांनी अगदी एकजूटपणे काँग्रेसला मतदान केले. त्यामुळे भाजपाचा तो बालेकिल्ला दुर्बल ठरला. संपूर्ण कर्नाटकातही असे झाले असू शकते.

शंकेची पाल
गुजरातचे मुख्य मंत्री नरेंद्रभाई मोदी कर्नाटकात प्रचारार्थ गेले होते. चलाख काँग्रेस नेत्यांनी मोदींना पुढे करून मुस्लिम समुदायात भयगंड निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय स्तरावर जणू काही मोदी हे भाजपाचे अधिकृत भावी प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार आहेत, असे चित्र काही दूरचित्रवाहिन्या उपस्थित करीत असतात. भाजपाने तसे म्हटले नाही. योग्य वेळी आम्ही आपला उमेदवार जाहीर करू अशीच त्या पक्षाची भूमिका आहे व ती रास्तही आहे. मात्र काही दूरचित्रवाहिन्या असे वातावरण निर्माण करीत आहेत की, मोदी हेच भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. मग शंकेची पाल चुकचुकते की, या प्रचारामागे काँग्रेसची तर चाल नाही? मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते आपल्यालाच मिळावीत, सपा, बसपा, डावे पक्ष यांच्याकडे ती जाऊ नयेत, हा तर डाव त्या मागे नसेल? मतांसाठी काँग्रेस आणि तथाकथित सेक्युलर मीडिया यांचे साटेलोटे तर नाही? राहुल गांधी व नरेंद्रभाई मोदी यांची तुलनाही प्रसारमाध्यमांनी सुरू केली आहे. का? राहुल गांधी जसे काँग्रेसचे भावी अलिखित उमेदवार आहेत, तसे मोदी आहेत काय? मग दोघांमधील तुलनेचे प्रयोजन काय?

लोकसभा निवडणुकीवर परिणाम
या वेळच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला, म्हणून कर्नाटकात तो पक्ष संपला असे समजण्याचे कारण नाही. येदीयुरप्पांना पुन: पक्षात आणावे, असेही काहींचे मत दिसते. पण ते भाजपाच्या हिताचे ठरणार नाही. पक्षाचे संघटन पुन: नीट बांधण्याची, सर्व लोकसमूहांना बरोबर घेऊन जाण्याची आणि भ्रष्टाचार्‍यांना आमच्या पक्षात स्थान नाही, हे निक्षून बजावण्याची व त्यानुसार पक्षाची पुनर्बांधणी करण्याची संधी भाजपाला या निवडणुकीने दिली आहे. काल काही दूरचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी मला भेटायला आले होते. त्यांचा प्रश्‍न होता की, कर्नाटकच्या या निवडणुकीचा 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल? मी उत्तर दिले होते, कसलाही परिणाम होणार नाही. येत्या नोव्हेंबरात दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र अशा अनेक राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीच्या निकालानंतरच लोकसभेच्या निवडणुकीसंबंधी काही भाकीत करता येईल. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतानाही, कर्नाटकात काँग्रेसला विजय मिळाला, हेही त्या प्रतिनिधींनी माझ्या ध्यानात आणून दिले. मी म्हणालो, केंद्रातील भ्रष्टाचार हा कर्नाटकाच्या निवडणुकीत मुद्दाच नव्हता. काँग्रेसही असे समजण्याची चूक करणार नाही की, कर्नाटकाच्या जनतेने त्यांना भ्रष्टाचारासाठी जनादेश दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने, कोळसा घोटाळा आणि सीबीआयची चौकशी याबाबत जे फटकारे मारले आहेत, त्यांनी केवळ सीबीआयची बदनामी झालेली नाही, तर काँग्रेसची आणि केंद्र सरकारचीही बदनामी झाली आहे. हा भ्रष्टाचाराचा व स्वायत्त संस्थांच्या कारभारात अवैध घुसखोरी करण्याचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीत कळीचा राहणार आहे. माझ्या दृष्टीने कर्नाटक विधानसभेची निवडणूक इतर कोणत्याही एका राज्याच्या निवडणुकीसारखीच आहे. तिला अवास्तव अखिल भारतीय स्तरावरचे महत्त्व देणे मला उचित वाटत नाही.

मा. गो. वैद्य
नागपूर
09-05-2013
babujivaidya@gmail.com

No comments:

Post a Comment