Thursday, 30 April 2015

श्री बाळासाहेब देवरस : आपल्या मर्यादांचे भान असणारा महापुरुष

लेखाचे हे शीर्षक वाचून वाचक संभ्रमात पडू शकतात. ज्याला आपल्या मर्यादा माहीत आहेत, तो महापुरुषकसा होऊ शकतो, असा प्रश्‍न अनेकांना पडणे स्वाभाविक आहे. मला येथे सॉक्रेटिसाची आठवण येते. सॉक्रेटिस ग्रीस देशातल्या अथेन्स शहराचा नागरिक होता. तेथील गॉडेस ऑफ डेल्फीया देवतेने सॉक्रेटिस हा अथेन्समधला सर्वात शहाणा मनुष्य आहे, असा कौल दिला होता. सॉक्रेटिसाला याचे खूप आश्‍चर्य वाटले. अथेन्स शहरात विद्वान म्हणून नावाजलेले अनेक लोक होते. त्यांना डावलून मला कसे काय सर्वात शहाणा म्हटले, याचे त्याला आणि इतरांनाही आश्‍चर्य वाटले. तेव्हा, सॉक्रेटिस विद्वान म्हणून ज्यांची ख्याती होती, त्यांच्याकडे गेला. त्यांच्याशी त्याने चर्चा केली. त्या चर्चेतून त्याला असे आढळले की, या मंडळींकडे ज्ञान पुष्कळ आहे. परंतु जे त्यांना ज्ञात आहे, त्यापेक्षा आपणास अधिक ज्ञान आहे, असे ते समजतात. मला मात्र एवढेच कळते की, मला काहीच कळत नाही. सॉक्रेटिसाचे शब्द आहेत- They know much but they think that they know more than what they actually know; probably I am the wisest man because I know that I know nothing.
नम्रता
बाळासाहेबांना आपल्या मर्यादित ज्ञानाचे निरंतर भान होते. श्रीगुरुजींच्या निधनानंतर गुरुजींच्याच निर्णयानुसार ते सरसंघचालक बनले. प्रारंभीच्या अनेक भाषणांमध्ये गुरुजींशी आपली तुलना करू नये, हे ते आवर्जून सांगत असत. त्यासाठी एका संस्कृत श्‍लोकाचा ते उच्चार करीत. तो श्‍लोक असा-
हठादाकृष्टानां कतिपयपदानां रचयिता
जन: स्पर्धालुश्चेदहह कविना वश्यवचसा ।
भवेदद्य श्वो वा किमिह पापिनि कलौ
घटानां निर्मातुस्त्रिभुवनविधातुश्च कलह: ॥
या श्‍लोकाचा अर्थ असा की, ‘ला ‘ट’ आणि ला असे कसेबसे जुळवून एखादा कविता करणारा कवी जर ज्याचे वाणीवर प्रभुत्व अशा अभिजात कवीशी स्पर्धा करू लागला, तर या कलियुगात, आज ना उद्या, मडकी घडविणारा कुंभारही त्रिभुवने निर्माण करणार्‍या ब्रह्मदेवाशी वर्चस्वासाठी भांडण करील. श्री बाळासाहेबांनी या श्‍लोकाचे उद्धरण इतके वेळा केले की, अखेरीस त्यांना सूचना करावी लागली की, स्वयंसेवकांना तुमचे हे प्रतिपादन आवडत नाही. त्यानंतर त्यांनी पुन: तो श्‍लोक म्हटला नाही.
डॉक्टरांनंतर सरसंघचालक
1940 साली प. पू. डॉक्टरांचे निधन झाल्यानंतर नागपुरातील अनेक कार्यकर्त्यांना असे वाटले की, बाळासाहेब देवरसच सरसंघचालक होतील. कारण डॉक्टरांशी त्यांचा 1927 पासून संबंध होता. घनिष्ठ संबंध होता. श्रीगुरुजी उशिरा संघाच्या संपर्कात आले होते. संघात आल्यानंतरही, त्यांनी आपल्या एका मित्राला, लिहिलेल्या पत्रानुसार, ‘हिमालयाकडे माझे मन धाव घेत आहेही त्यांची वृत्ती संपली नव्हती; आणि त्यांनी संन्यास घेण्याकरिता बंगालमधील सारगाछीच्या आश्रमात, स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंदांच्या आश्रमाकडे धावही घेतली होती; आणि स्वामी अखंडानंदांच्या सूचनेवरूनच ते परत नागपुरात आले होते. 1938 च्या संघ शिक्षावर्गाचे ते त्यानंतर सर्वाधिकारी होते आणि 1939 मध्ये, नागपूरजवळील सिंदी येथे, संघाची नवीन प्रार्थना आणि नव्या संस्कृत आज्ञा यांची रचना करण्यासाठी जी बैठक झाली होती, त्या बैठकीनंतर गुरुजींना सरसंघचालक करण्याचा विचार डॉक्टरांच्या मनात पक्का झाला. या बैठकीला श्रीगुरुजींबरोबर श्री बाळासाहेब देवरस व श्री आप्पाजी जोशीही उपस्थित होते. येथेच डॉक्टरांनी आप्पाजींना विचारले होते की, भावी सरसंघचालक म्हणून श्रीगुरुजी त्यांना कसे वाटतात? अर्थात् आप्पाजींचा या सूचनेला होकार होताच. ही हकीकत स्वत: आप्पाजींनीच नागपूरच्या तरुण भारतातप्रसिद्ध झालेल्या एका लेखात दिली होती. त्यामुळे डॉक्टरांनंतर श्रीगुरुजी सरसंघचालक झाले, याचे संघाच्या वरिष्ठ वर्तुळात तरी कुणाला आश्‍चर्य वाटले नाही.
कर्तृत्वाची जाणीव
श्रीगुरुजींना बाळासाहेबांच्या श्रेष्ठ कर्तृत्वाची जाणीव होती. पुण्याच्या संघ शिक्षावर्गात श्रीगुरुजी व श्री बाळासाहेब दोघेही उपस्थित असताना, श्रीगुरुजींनी बाळासाहेबांचा स्वयंसेवकांना परिचय करून देताना म्हटले होते की, ‘‘तुमच्यापैकी अनेकांनी प. पू. डॉक्टरांना बघितले नसेल. त्यांनी बाळासाहेबांना पहावे म्हणजे तुम्हाला डॉक्टरजींचा परिचय होईल.’’ तसे म्हटले तर बाळासाहेब व डॉक्टरजी यांच्यात शारीरिक दृष्ट्या कसलेच साम्य नव्हते. डॉक्टर सावळ्या रंगाचे तर बाळासाहेब गोरे. डॉक्टरांचा देह धिप्पाड म्हणावा असा, बाळासाहेब असे तेव्हाही नव्हते आणि पुढेही तसे बलदंड झाले नव्हते. डॉक्टरांसारखे बाळासाहेब असे म्हणताना श्रीगुरुजींनी बाळासाहेबांच्या श्रेष्ठ कर्तृत्वासंबंधी संसूचन केले होते. डॉ. वि. रा. करंदीकर यांनी तीन सरसंघचालकया शीर्षकाचा जो ग्रंथ लिहिला आहे, त्यातही गुरुजींच्या मनात बाळासाहेबांविषयी किती श्रेष्ठभाव वसत होता, याचे निदर्शक असलेला एक प्रसंग वर्णन केला आहे. एकदा श्रीगुरुजी टांग्यात बसून रेशीमबागेकडे एका कार्यक्रमासाठी चालले होते; तर बाळासाहेब काही स्वयंसेवकांसोबत पायी चालले होते. ते बघून टांग्यात बसलेल्या कृष्णराव मोहरीलांना गुरुजी म्हणाले, ‘‘खरे संघचालक पायी चालले आहेत आणि नकली टांग्यातून.’’ (तीन सरसंघचालक, पृष्ठ 553)
डॉक्टरही बाळासाहेबांची योग्यता जाणून होते. त्यांनी बाळासाहेबांना बंगाल प्रांतात प्रचारक म्हणून पाठविले होते. पण लवकरच त्यांना परत बोलाविले आणि नागपूरच्या संघकार्याची धुरा त्यांच्यावर सोपविली. त्यांची नागपूरचे कार्यवाह म्हणून नियुक्ती केली. नागपुरातून जे अनेक प्रचारक प्रांतोप्रांती गेले, त्याचे श्रेय कुणा एका व्यक्तीला द्यावयाचे असेल, तर ती व्यक्ती आहे बाळासाहेब देवरस.
परस्पर विश्‍वास
महात्मा गांधींच्या हत्येचा खोटा आरोप लावून संघावर बंदी घातल्याच्या काळातही बाळासाहेबांचा खंबीरपणा प्रत्ययाला आला. संघावरील बंदी उठविण्याच्या बाबतीत, इंग्रजांच्या काळात अ‍ॅडव्होकेट जनरल असलेले मद्रासचे श्री व्यंकटराम शास्त्री यांनी पुढाकार घेतला होता. श्री शास्त्रीजी तत्कालीन गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना भेटले. नंतर गुरुजींनाही भेटले. गुरुजी बैतुलच्या तुरुंगात बंदी होते. त्यांनी गुरुजींना खूप आग्रह केला की, संघाची लिखित घटना नाही, ती तयार करावी, अशी सरकारची इच्छा आहे. गुरुजींनी त्यांना उत्तर दिले की, आमच्याजवळ लिखित घटना नाही, म्हणून आमच्यावर बंदी घातली आहे काय? गांधीजींच्या हत्येत संघाचा सहभाग आहे, हा आरोप लावून आमच्यावर बंदी घातली. हजारो स्वयंसेवकांच्या घरांच्या झडत्या घेण्यात आल्या. हजारोंना तुरुंगात टाकण्यात आले. आम्ही सरकारला पुरावा मागत होतो, पण सरकारजवळ काडीमात्रही पुरावा नव्हता. सरकारने बिनाशर्त बंदी उठवायला हवी, असे गुरुजींनी स्पष्ट शब्दात सांगितले. पण अखेरीस शास्त्रीजींची वयोज्येष्ठता बघून संघाची लिखित घटना देण्याचे मान्य केले. या घटनेचा मसुदा तुरुंगाच्या बाहेर असलेल्या बाळासाहेबांसारख्या व्यक्तींनीच केला होता. तो गुरुजींकडे पाठविण्यात आला आणि गुरुजींनी अंतिम प्रारूप व्यंकटराम शास्त्रींच्या स्वाधीन केले. पण मग सरकारची प्रतिष्ठा आडवी आली. घटना, गुरुजींच्या द्वारेच यायला हवी, असा सरकारचा आग्रह राहिला. श्रीगुरुजींनी त्यावर स्वाक्षरी करून तो आलेख सरकारकडे पाठविला. मग सरकारने त्यातील त्रुटी प्रकट करण्याचा सपाटा लावला. तेव्हा श्रीगुरुजींनी सरकारशी पत्रव्यवहार करणेच थांबविले. यामुळे, सरकारची कोंडी झाली. सरकारजवळ तिळमात्रही पुरावा नसल्यामुळे, त्याला बंदी उठवायची होतीच. पण संघाची घटना देण्याचे मान्य केल्यामुळे गुरुजी नमते घेत आहेत, असा सरकारचा समज झाला व त्यांना आणखी वाकविण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण गुरुजींनी, दिलेल्या घटनेत कसलाही बदल करायचा नाही, हे ठरवून, सरकारशी पत्रव्यवहार करायचा नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला. मग, सरकारने पं. मौलिचंद्र शर्मा यांना मध्यस्थ म्हणून पाठविले. ते प्रथम नागपूरला आले. श्री बाळासाहेबांना भेटले. बाळासाहेबांनीही त्यांना हेच सांगितले की, गुरुजी सरकारला काहीही लिहून देणार नाहीत. आल्या पावलीच पं. शर्मा दिल्लीला परत गेले. मग एक मध्यम मार्ग काढण्यात आला की, गुरुजींनी सरकारला काही लिहून देण्याचे कारण नाही. मात्र पं. मौलिचंद्र गुरुजींना प्रश्‍न विचारतील, त्यांची उत्तरे त्यांनी द्यावीत. त्यानुसार पंडितजी तुरुंगात गुरुजींना भेटायला गेले; आणि गुरुजींनी पं. मौलिचंद्र शर्मा यांच्या नावाने एक पत्र दिले. त्यात संघाची भूमिका पुन: एकदा स्पष्ट करण्यात आली. माय डिअर पं. मौलिचंद्रजीअशी त्या पत्राची सुरुवात आहे. पंडितजी हे पत्र घेऊन विमानाने दिल्लीला गेले आणि त्याच दिवशी सायंकाळी संघावरील बंदी हटविण्यात आल्याची घोषणा आकाशवाणीवरून झाली. श्रीगुरुजी आणि श्री बाळासाहेब यांचा परस्परावर किती विश्‍वास होता, विचारांची पातळी कशी समान होती, याचेच हे निदर्शक आहे.
संघातले वादळ
1949 साली संघावरील बंदी उठली. संघाच्या शाखा पूर्ववत् सुरू झाल्या. पण 1950 नंतर संघातच एक अंतर्गत वैचारिक वादळ सुरू झाले. जुन्या संघाच्या प्रतिज्ञेत हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्याकरिता मी संघाचा घटक झालो आहे’- अशा आशयाचे वाक्य होते. ते 1950 मध्ये बदलविण्यात आले. कारण आता देश स्वतंत्र झाला होता. आताचे वाक्य आहे, ‘‘हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करण्याकरिता मी संघाचा घटक झालो आहे.’’ 1949 च्या शेवटी आपली नवीन राज्यघटना तयार झाली होती आणि 26 जानेवारी 1950 पासून तिची अंमलबजावणीही सुरू झाली होती. अनेकांच्या मनात असा प्रश्‍न निर्माण झाला की, आता संघाच्या दैनंदिन शाखेचे प्रयोजन काय? काहींचे मत होते की, राजकारणात शिरून सत्ता काबीज करावी व देशाचे कल्याण करावे. इतर काहींचे मत होते की, संघाने हे रोजचे दक्ष-आरम्बंद करून सेवाकार्ये सुरू करावीत. मला 1950 आणि 1953 च्या पुण्याच्या संघ शिक्षावर्गाचा मुख्य शिक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. 1950 मध्येच ही कुजबूज माझ्या कानी आली होती. त्या वर्गात, म्हैसाळ्याच्या हरिजन सेवक समितीचे निर्माते श्री मधु देवल, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक श्री आप्पा पेंडसे, याच विचाराचे श्री हेमंत सोमण प्रभृती मंडळी शिक्षक म्हणून उत्तरदायित्व निभवीत होते. पण ते नंतर आपापल्या उद्योगाला लागले. म्हैसाळ्याची समिती किंवा ज्ञानप्रबोधिनी ही समाजोपयोगीच कार्ये आहेत, याविषयी वाद नाही. मा. बाळासाहेब देवरसांना टिळक पुरस्कार मिळाला असताना त्यांना मिळालेली 51 हजार रुपयांची सत्कार राशी त्यांनी श्री देवल यांच्या संस्थेला दिली. तथापि, ही कार्ये उपयुक्त असली तरी ती संघाला पर्याय नाहीत. संघ पूर्वीप्रमाणेच आपले शाखा कार्य चालू ठेवील, असा श्रीगुरुजींचा निर्धार होता. मूळ विचारात परिवर्तन झाल्यामुळे 1953 च्या  संघ शिक्षावर्गात ही मंडळी शिक्षक म्हणून आली नाहीत. उलट, संघाची आता आवश्यकता नाही या विचाराने ती इतकी झपाटलेली होती की, संघ, त्याची कार्यपद्धती, त्याचे नेतृत्व यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीकेचे आसूडही ओढले जात होते. पुण्याहून प्रकाशित होणार्‍या केसरीवृत्तपत्रात या शाखाविरोधी मंडळींचे विचारही प्रकाशित होत असत.
लोकप्रियतेचा भ्रम
1949 च्या जुलै महिन्यात तुरुंगातून सुटल्यानंतर प. पू. श्रीगुरुजींचे देशभरातल्या मोठमोठ्या शहरात सत्काराचे भव्य कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी जमत असे. दिल्लीच्या, गुरुजी सत्काराच्या कार्यक्रमाची दखल तर बी.बी.सी.ने देखील घेतली होती. संघातील अनेक कार्यकर्त्यांना वाटले की, संघाच्या लोकप्रियतेचे हे गमक आहे. राजकीय पक्ष काढून व या लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन आपण सत्ता काबीज केली पाहिजे. याच सुमारास डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी गुरुजींना भेटले आणि त्यांनी एका नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचा विचार मांडला. गुरुजींनी त्यांना पं. दीनदयाल उपाध्याय, श्री अटलबिहारी वाजपेयी, श्री नानाजी देशमुख, श्री सुंदरसिंह भंडारी, श्री कुशाभाऊ ठाकरे इत्यादी उत्तम कार्यकर्ते दिले. सर्व जण संघाचे प्रचारक होते आणि 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली. पण गुरुजींनी तेव्हाच स्पष्ट केले की, संघ राजकारणात पडणार नाही. 1952 ला निवडणूक झाली आणि संघाच्या तथाकथित लोकप्रियतेचा फुगा फुटला. ज्या पंजाब प्रांतात, संघ स्वयंसेवकांनी जिवाची बाजी लावून पाकिस्तानातील हिंदूंना वाचविण्याचा पराक्रम केला होता; त्यांच्या पुनर्वसनासाठी जिवापाड मेहनत केली होती; त्या पंजाबातही जनसंघाला एकही जागा जिंकता आली नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात जनसंघ तेव्हा पोचलाच नव्हता. पण विदर्भात तो होता. तेथेही जनसंघाच्या वाट्याला यश आले नाही. लोकसभेत जनसंघाचे क्त तीन सदस्य निवडून आले होते. त्यातले दोन होते बंगालचे. (1) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि (2) बॅ. निर्मलचंद्र चॅटर्जी आणि एक तेव्हाच्या मध्य भारतातून निवडून आलेले बॅ. उमाशंकर त्रिवेदी.
निष्क्रियतापर्व
या पराभवानंतरही राजकारणाचे आकर्षण कमी झाले नाही. संघाने जनसंघाला पुरेशी मदत केली नाही, असे आरोपही झाले. या नव्या वातावरणाने श्री बाळासाहेबांनाही आकृष्ट केले असावे. 1953 पासून त्यांनी संघातील जबाबदारीचे पद सोडले. मात्र सामान्य स्वयंसेवक म्हणून त्यांचे आदर्श वर्तन होते. ते गुरुदक्षिणेला नियमितपणे उपस्थित राहात. विजयादशमीच्या कार्यक्रमात, सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे गणवेषात उपस्थित असत. हिवाळी शिबिरातही पाचही दिवस गणवेषासह उपस्थित असायचे आणि सर्व कार्यक्रमात भाग घ्यायचे. 1956-57 ची गोष्ट असावी. मी त्या वेळच्या हिवाळी शिबिराचा मुख्य शिक्षक होतो. शिबिरापूर्वी शाखाशाखांमध्ये कबड्डीचे सामने झाले होते. अंतिम सामना शिबिरात झाला. या विजयी चमूबरोबर संघ-अधिकार्‍यांचा एक दर्शनी सामना व्हावा, असे ठरले. मी बाळासाहेबांना विचारले, तुम्ही खेळाल काय? मी त्यांच्या तरुणपणात कबड्डी सामन्यात खेळताना त्यांना बघितले होते. ते खेळायला तयार झाले. या सामन्यात त्यांच्या गुडघ्यांना बराच मार लागला. शिबिरात त्यावर मलमपट्टी झाली; पण ते मला म्हणाले, यानंतर मला खेळायला सांगू नको.
या अंतर्गत खळबळीच्या काळातही प. पू. गुरुजींसंबंधी एकही अवाक्षर त्यांनी काढले नाही. काही थोर मंडळींचे उद्गार मी ऐकले होते. डॉक्टर काय त्यांनाच (गुरुजींनाच) समजले?’, ‘आम्हीही डॉक्टरांच्या सोबत काम केले आहे!वगैरे- असे अभिप्राय असायचे. पण बाळासाहेबांच्या तोंडून असा अनादराचा एक शब्दही कधी निघाला नाही. ते गावावरून (कारंजा- जि. बालाघाट) नागपूरला आल्यानंतर कार्यालयातच उतराचे. पुढे त्यांनी बर्डीवर एक घरही भाड्याने घेतले होते. पण ते तेथे क्वचितच राहात.
1960 मध्ये ते पुन: संघकार्यात सक्रिय झाले. त्यांच्या पूर्वीच्या काळात ते सहसरकार्यवाह होते. आता त्यांनीच श्रीगुरुजींपाशी आग्रह धरला की, अनेक वर्षे मी प्रत्यक्ष कार्यात नव्हतो. तेव्हा मला एक छोटीशी जबाबदारी द्या. अखिल भारतीय कोणतीही जबाबदारी नको. त्यांच्या विनंतीला मान देऊन 1960 मध्ये नागपूर महानगराचे कार्यवाह म्हणून त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली. अनेकांना याचेही नवल वाटले.
मनाचा प्रांजळपणा
बाळासाहेबांच्या कामाचा झपाटा थक्क करणारा असे. संघाच्या नियमित कार्याबरोबरच, त्या काळात ज्या आनुषंगिक संघटना निर्माण झाल्या, त्यांकडेही त्यांचे लक्ष असे. नागपूरचे तरुण भारतचालविणार्‍या श्री नरकेसरी प्रकाशन लि. या संस्थेचेही ते अध्यक्ष झाले. अर्थात 1965 मध्ये तोपर्यंत मा. भय्याजी दाणी श्री नरकेसरी प्रकाशन लि.चे अध्यक्ष होते. भय्याजींच्या मृत्यूनंतर मा. बाळासाहेब अध्यक्ष झाले. तथापि, सुरवातीपासूनच तरुण भारताच्या कार्याकडे त्यांचे लक्ष असे. त्यांच्याच पुढाकाराने बंद पडलेले तरुण भारत पुन्हा सुरू झाले होते. ही 1950 मधली गोष्ट आहे.
विद्यालयात शिकविणार्‍या शिक्षक स्वयंसेवकांची त्यांनी नागपुरात एक बैठक घेतली होती. संघाचे परिवर्तन करण्याच्या आवेशात ज्यांनी नागपुरात नवीन संघ स्थापन करण्याचा अयशस्वी प्रयोग केला होता, असे एक शिक्षक या बैठकीत हजर होते. ते म्हणाले, ‘‘मला प्रश्‍न विचारायचा आहे.’’ बाळासाहेब नेहमीच प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम पसंत करीत असत. त्यांनी अनुमती दिली. प्रश्‍न काय, जवळजवळ 10 मिनिटे त्यांनी भाषणच केले. ते बसल्यावर बाळासाहेबांनी एका वाक्यात उत्तर दिले. ‘‘तुमच्यासारखेच माझेही गैरसमज होते. ते दूर झालेत. तुमचेही दूर होतील.’’ बस्स. सुमारे शंभर लोकांमध्ये माझेही गैरसमज होतेअशी कबुली द्यायला हिंमत लागते. मनाचा प्रांजळपणा लागतो. या दोन्ही गुणांचे बाळासाहेब धनी होते. मौज अशी की, पूवी प्रचारक असलेले ते गृहस्थ पुन: सक्रिय झाले. ते उत्तम कार्यकर्ते होते. शिक्षक मतदारसंघातून ते विधान परिषदेवर नंतर निवडूनही आले. विचारांचा स्पष्टपणा आणि मनाचा प्रांजळपणा हे बाळासाहेबांच्या व्यक्तित्वाचे अभिन्न पैलू होते.
ते मांसाशन करीत. पण सरसंघचालक झाल्यानंतर ते त्यांनी सोडले, ते कायमचे. त्यांच्या सरसंघचालक झाल्याच्या सुरवातीच्या काळात त्यांच्या एका मित्राने त्यांना भोजनासाठी बोलाविले. तेथे माझ्यासह आणखी काही लोक उपस्थित होते. ते त्या मित्राला म्हणाले, ‘‘मला तू का जेवायला बोलावीत आहेस, हे मला समजले. पण मी आता ते खाणे सोडले. तुझ्या घरी खायचे आणि बाहेर मी खात नाही असे सांगायचे, असा दांभिकपणा मला जमणार नाही.’’ सामान्यत: जशी वाणी तसे वर्तन हे वैशिष्ट्य जे महापुरुष असतात, त्यांचेच असते.
सरसंघचालकपदावर
1970 मध्ये श्रीगुरुजींच्या आजाराचे निदान होऊन तो कॅन्सर आहे, हे निश्‍चित झाले. एक मोठी शस्त्रक्रियाही झाली. आपली जीवनयात्रा संपणार आहे, याची त्यांना कल्पना आली. त्यांनी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांनाच विचारले की, मी आणखी किती काळ जगू शकेन. डॉक्टरांनी 2-2॥ वर्षे नक्की असे उत्तर दिले. श्रीगुरुजी जणू काही काही झालेच नाही, अशा वृत्तीने पूर्वीप्रमाणेच प्रवास करू लागले.  पहिल्या संघबंदीनंतर सर्वांना नव्या स्वरूपातील संघकार्याचे विशदीकरण आवश्यक होते.  ते त्यांनी 1954, 1960 आणि 1972 या तीन वर्षात सुमारे एक आठवड्याच्या चिंतन बैठकीत स्पष्ट करून सांगितले की, संघ हे संपूर्ण समाजाचे संघटन आहे. समाजजीवनाच्या कोणत्याही एका अंगाचे नाही. 1972 ची बैठक ठाण्याला झाली होती. म्हणजे कॅन्सरवरील शस्त्रक्रियेनंतर. पण 1973 च्या प्रारंभालाच त्यांना काळ जवळ येत आहे, अशी जाणीव झाली. म्हणून त्यांनी 2 एप्रिल 1973, सर्व स्वयंसेवकांना उद्देशून पत्र लिहून श्री बाळासाहेब देवरस यांची सरसंघचालक म्हणून नियुक्ती केल्याचे लिहून ठेवले. त्या पत्रातील शेवटचे वाक्य असे आहे : ‘‘अपने कार्य की स्नेहपूर्ण एकात्मता की पद्धति, व्यक्तिनिरपेक्षता, ध्येयनिष्ठा आदि विशेषताओं को ध्यान में रख कर सब छोटे-बडे स्वयंसेवक बंधु अपने परमपूज्य सरसंघचालक जी के मार्गदर्शन में संघकार्य की पूर्ति हेतु काया वाचा मन से जुटे रहेंगे और कार्य शीघ्र लक्ष्यपूर्ति कर सकेगा ऐसा मेरा विश्‍वास है’’। आणि श्रीगुरुजींच्या निर्देशाप्रमाणे बाळासाहेब सरसंघचालक झाले.
वास्तवाचे भान
श्री बाळासाहेबांचे लक्ष वास्तवाकडे अधिक असे. आदर्शांचे त्यांना वावडे होते असे नाही. पण त्यांचे मन वास्तव ठीक करण्याकडे अधिक वळलेले असे. आंग्ल कवी विल्यम वर्डस्वर्थ याची स्कायलार्कपक्ष्यासंबंधी एक प्रसिद्ध कविता आहे. त्या कवितेत त्याने स्कायलार्कला शहाणपणाचा नमुना असे संबोधून त्याचा गौरव केला आहे. कारण हा पक्षी आकाशात उंच उडत असतो, पण कधीही भरकटत नाही. स्वर्ग आणि धरा या दोहोंशी त्याची सारखीच बांधीलकी असते. मूळ कवितेच्या ओळी आहेत-
Type of the wise who soar but never roam
      True to the kindred points of heaven and home
बाळासाहेबही नित्य वास्तवाचे भान ठेवणारे होते.
नव्या प्रथा
त्यांनी प्रारंभीच सांगितले की माझ्या नावाच्या अगोदर परमपूजनीयहे उपधान लावायचे नाही. डॉक्टर आणि श्रीगुरुजी यांच्या योग्यतेनुसार ते त्यांच्याकरिता शोभून दिसते. माझ्याकरिता नाही. हाँ, सरसंघचालक या पदासाठी ते वापरावे. म्हणजे परमपूजनीय सरसंघचालकअसे म्हणायला हरकत नाही. पण त्या पदावरील व्यक्तीच्या नावामागे, ‘माननीयम्हणणे पुरेसे. त्यांच्यापासून सुरू झालेली ही प्रथा आता रूढ झाली आहे. संघाच्या कार्यक्रमातही प. पू. डॉक्टरजी आणि प. पू. गुरुजी यांचीच छायाचित्रे ठेवावीत, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्याप्रमाणे आजही तसेच चालू आहे.
संघाच्या विचारधारेत एकचालकानुवर्तित्वहा एक मुद्दा असे. बाळासाहेबांनी तो बाजूला सारला. सर्व निर्णय सामूहिक चर्चेतून घेतले जावेत हे त्यांनी सांगितले आणि त्याप्रमाणे आचरणातही आणले. एवढेच काय, पण संघ शिक्षावर्गातील बौद्धिक वर्गाच्या विषयांतून एकचालकानुवर्तित्वहा विषय तेव्हापासून बाद झाला आहे.
प. पू. डॉक्टर हेडगेवार आणि प. पू. श्रीगुरुजी यांचा दाहसंस्कार रेशीमबागेत झाला. पण बाळासाहेबांनी रेशीमबागेला सरसंघचालकांचा दहनघाट बनू दिला नाही. त्यांनी आपला दाहसंस्कार सर्व सामान्य स्मशानभूमीत व्हावा, हे सांगितले. तसा त्यांचा दाहसंस्कार झाला आणि त्यांच्या नंतर आलेल्या सरसंघचालकांचाही.
मा. बाळासाहेबांच्या कार्यकाळातील एक आणखी विशेष बाब सांगण्यासारखी आहे. ती म्हणजे नव्या एकात्मता स्तोत्राची रचना. पूर्वी प्रभात शाखांमध्ये प्रात:स्मरण म्हटले जायचे. ते एक प्रकारचे पारंपरिक स्तोत्र होते. कराग्रे वसते लक्ष्मी: पासून त्या स्तोत्राचा प्रारंभ होता. बाळासाहेबांनी ते अधिक व्यापक व आधुनिक करावयाचे ठरविले. भारताच्या सर्व प्रदेशातील प्राचीन व अर्वाचीन महापुरुषांचा यात सहभाग आहे. विशेषत: आधुनिक काळात ज्यांनी समाजसुधारणेच्या बाबतीत पुढाकार घेतला त्या सर्वांचा त्यात समावेश आहे. त्यात स्वामी दयानंद सरस्वती, राममोहनराय, दादाभाई नौरोजी, रवींद्रनाथ ठाकूर, रामतीर्थ, महात्मा ज्योतीराव फुले, भीमराव आंबेडकर यांची नावे आहेत. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद तर आहेतच, पण लो. टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांचाही उल्लेख आहे. तसेच आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांचीही त्यात नावे आहेत. हे एकात्मता स्तोत्र म्हणजे भारताच्या एकात्मतेचे स्मरण करून देणारे स्तोत्र, आता सर्व सायम् व प्रभात शाखांमधून म्हटले जाते. ते संस्कृत भाषेत आहे आणि ही संस्कृतरचना सुप्रसिद्ध संस्कृत पंडित व कवी श्री श्री. भा. वर्णेकर यांनी केली आहे.
मी पत्रकार झालो
1939 ते 1946 ते नागपूरचे कार्यवाह होते. मी 1945 साली एका सायम् शाखेचा मुख्य शिक्षक होतो. त्या काळात त्यांच्याशी घनिष्ठ परिचय झाला नाही. त्यांच्या प्रेरणेने मी जेव्हा प्राध्यापकाची नोकरी सोडून 1966  साली तरुण भारताच्या संपादकीय वर्गात सामील झालो, तेव्हापासून त्यांच्याशी खूपच घनिष्ठ संबंध आला. ते त. भा. चालविणार्‍या श्री नरकेसरी प्रकाशन लि.चे अध्यक्ष होते आणि मी मुख्य संपादक. त्यामुळे घनिष्ठता वाढली. मी लेखक म्हणून प्रसिद्ध नव्हतो. मी वृत्तपत्रात कसलेही लेखन केले नव्हते. म्हणून मला आश्‍चर्य वाटले की, मला बाळासाहेब त. भा.त का बोलवीत आहेत. त्यासाठी एक कारण घडले असावे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या ठरावांचे प्रारूप पं. दीनदयाल उपाध्याय लिहीत असत. बहुधा 1965 ची गोष्ट असावी. त्यावेळी बाळासाहेब संघाचे सरकार्यवाह होते. पं. दीनदयालजी त्या बैठकीसाठी येऊ शकत नव्हते. मी त्या काळात प्राध्यापकाची नोकरी करीत असताना, नागपूर महानगर व नागपूर जिल्हा भारतीय जनसंघाचा संघटन मंत्री होतो. पूर्व विदर्भाचे संघटन मंत्री श्री बबनराव देशपांडे होते. ते प्रचारक होते.  बबनराव देशपांडे संघ कार्यालयातच राहात असत. त्यांना बाळासाहेबांनी विचारले की, तुमच्या जनसंघात ठराव कोण लिहितात? बबनरावांनी माझे नाव सांगितले. त्यांनी मला बोलविले आणि दोन विषयांवर ठरावाचे प्रारूप लिहून आणण्यास सांगितले. मी म्हणालो, ‘‘मला हिंदी चांगले येत नाही. मी मराठीत लिहीन.’’ ते म्हणाले, ‘‘ठीक आहे.’’ मी मराठीत त्या दोन ठरावांचे प्रारूप लिहून त्यांना नेऊन दिले. ते त्यांना पसंत पडले. बहुधा याच कारणास्तव त्यांनी 1966 मध्ये त. भा.त मी यावे असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला असावा. मी चकित झालो. तेव्हा त. भा.चे संपादक सिद्धहस्त लेखक श्री. ग. त्र्यं. उपाख्य भाऊसाहेब माडखोलकर होते. त्यांची जागा मी कशी काय घेऊ शकणार, अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली व मी, त्या कामासाठी लायक नाही, असे बाळासाहेबांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन काम करू शकेल अशी व्यक्ती हवी. तुम्ही यावे असे वाटते.’’ मी होकार दिला. नंतर मी प. पू. गुरुजींनाही भेटलो. माझी तीच अडचण त्यांनाही सांगितली. तेही म्हणाले, ‘‘सवयीने येईल.’’
भाऊसाहेब माडखोलकरांसारखे शैलीदार लेखन करणे मला शक्यच नव्हते. मी साध्या बाळबोध शैलीत लिहायला लागलो. मी एक बर्‍यापैकी शिक्षक होतो. मी ठरविले की, आपण विद्यार्थ्यांना जवळजवळ वीस वर्षे शिकवीत आलो आहोत. ते विद्यार्थी आपल्या समोर बसलेले असतात. आपण असे समजायचे की आपले सारे वाचक विद्यार्थीच आहेत. त्यांना विषय समजून सांगत आहोत. या भावनेने लिहावे; आणि तसे लिहू लागलो. ते लोकांना आवडले किंवा नाही कोण जाणे. पण बाळासाहेबांना आवडले.
मी एक लेखनिक
1973 मध्ये बाळासाहेब सरसंघचालक झाले; आणि 1994 मध्ये त्यांनी ते पद सोडले. या 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत एक वर्षाचा अपवाद वगळता, विजयादशमीच्या त्यांच्या सर्व भाषणांचा मी लेखक होतो. साधारणत: गणपति विसर्जनानंतर ते मला बोलावीत; आणि प्रश्‍न करीत की, यावेळच्या विजयादशमीच्या उत्सवात कोणते मुद्दे मांडावेत. मी मौन बाळगून असे. मग ते उशी खालून कागद काढून माझ्या हाती देत. त्यात त्यांना अभिप्रेत असलेल्या मुद्यांचा अंतर्भाव असे. माझे काम केवळ त्यांचा विस्तार करण्याचे असे. पण ते मला स्वातंत्र्यही देत. यातील एखादा मुद्दा गाळावासा वाटला तर तो अवश्य गाळा आणि काही जोडावेसे वाटले, तर तो त्यात अवश्य टाकाअसे ते आवर्जून म्हणत. मला त्यांना आवडणार्‍या सुबोध शैलीची जाण असल्यामुळे भाषण त्यांचे आहे, असे वाटावे या पद्धतीने त्या मुद्यांचा विस्तार करावयाचा.
सौम्य भाषेचा आग्रह
भाषा सोपी, सोज्ज्वळ असावी, ती प्रखर नसावी, पण सूचक असावी, असा त्यांचा आग्रह असे. एकदा एक प्रसंग घडला. 1992 चा विजयादशमीचा उत्सव. त्या काळात त्यांची प्रकृती नीट नव्हती. त्यांनी आपले मुद्दे देण्याचे काम यापूर्वीच थांबविले होते. मला संपूर्ण स्वातंत्र्य असे. आता मी हिंदीतही लिहायला लागलो होतो. 1992 मध्ये अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा गाजत होता. बाळासाहेबांना आवडणार्‍या सौम्य भाषेत मी तो त्यांच्या भाषणात अंतर्भूत केला होता. त्या वेळी मी संघ कार्यालयातच राहात असे. मी ते भाषण लिहून बाळासाहेबांचे निजी सचिव श्री श्रीकांत जोशी यांच्याकडे दिले आणि मी त. भा.च्या कार्यालयात गेलो. त्यावेळी मी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातून प्रसिद्ध होणार्‍या व संघाच्या कार्यकर्त्यांनी चालविलेल्या सर्व मराठी व हिंदी दैनिकांची जी समन्वय समिती होती आणि जिचे नाव तरुण भारत असोसिएट्सहोते, त्या समितीचा मानद कार्यकारी संचालक होतो. त्या कार्यासाठी भोजनोत्तर मी नेमाने त.भा.च्या कार्यालयात जात असे. दुपारी 1 वाजता ही माझी संघ कार्यालयातून निघण्याची वेळ असे. त्या दिवशी मी निघून गेल्यानंतर तेथे मा. रज्जूभैया आले. ते प्रवासातून आले होते आणि 3-4 तासांनीच त्यांना मद्रासकडे (आताचे चेन्नई) जायचे होते. श्रीकांत जोशींनी बाळासाहेबांच्या संकल्पित भाषणाचे प्रारूप त्यांना वाचायला दिले. ते वाचन रज्जूभैय्या श्रीकांतला म्हणाले, ‘‘बाबूरावजीने राममंदिर का मुद्दा बहुत ही ढिलाई से रखा है। श्रीकांत जोशींनी ते प्रारूप बाळासाहेबांना न देता आपल्या जवळच ठेवले आणि सायंकाळी मी आल्यानंतर ते लिखाण मला देऊन, मा. रज्जूभैयांचा अभिप्राय मला सांगितला. मी ते सौम्य शब्दातील वर्णन बाजूला सारले आणि जरा कडक शब्दात तो विषय मांडला व दुसरे दिवशी सकाळी ते प्रारूप श्रीकांतजवळ दिले. ते वाचल्यावर बाळासाहेबांनी मला बोलाविले आणि म्हटले, ‘‘सरसंघचालकांच्या तोंडी असे शब्द तुम्हाला योग्य वाटतात काय?’’ मी म्हणालो, ‘‘हां जरा कडक शब्द योजण्यात आले.’’ मी रज्जूभैयांच्या अभिप्रायासंबंधी काहीही सांगितले नाही. सुदैवाने जुने कागद मी फाडून टाकले नव्हते. ते जोडून ते भाषण त्यांना दिले; आणि सायंकाळी मीच त्यांना त्याबाबत विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे ठीक आहे.’’
सरसंघचालक झाल्यानंतर एक महिन्यानंतर बाळासाहेबांनी करावयाचे भाषण मी तयार करून दिले. ते तत्कालीन सरकार्यवाह मा. माधवराव मुळे यांनी वाचले. त्यांना ते पूर्णपणे पसंत पडले नाही. मी बाळासाहेबांना भेटलो. ते म्हणाले, ‘‘माधवराव म्हणतात ते लिही.’’ मी त्यात योग्य ते बदल केले. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतील त्यांचे भाषणही मीच तयार करून दिले होते. हिंदू संघटन आणि सामाजिक एकताया आशयाचा विषय असावा. मी केलेल्या प्रत्येक विधानासाठी त्यांनी पुरावा मागितला. मी सर्व तयारीनेच गेलो होतो. त्यात अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात डॉ. हेडगेवारांच्या काळातील एका घटनेचा उल्लेख करताना मी एका जातिविशेषाचा उल्लेख केला होता. ही घटना बाळासाहेबांनीच आम्हाला सांगितली होती. मला त्यांनी तो उल्लेख काढायला सांगितले. हे भाषण त्यांनी, माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला श्री दत्तोपंत ठेंगडी यांना आणि पुण्याला मा. बाबाराव भिडे यांना दाखविले होते. हे सांगण्याचा उद्देश हा की, बाळासाहेब सर्वांच्या सहमतीने वागत असत. एकचालकानुवर्तित्वाचा मागमूसही त्यांच्या वाणीत आणि कृतीत नव्हता.
आणखी एक परंपरा
1996 मध्ये बाळासाहेबांचे निधन झाले. पण 1994 मध्येच त्यांनी सरसंघचालक हे सर्वोच्च पद सोडले. त्याला मुख्य कारण होते 3-4 वर्षांपासून त्यांची खालावलेली प्रकृती. त्या काळात, विजयादशमीच्या प्रकट उत्सवात ते 2-4 वाक्ये बोलत, आणि त्यांचे भाषण वाचायला मला सांगत. प्रकृतीच्या या स्थितीत, त्यांना त्या पदावर राहणे योग्य वाटले नाही आणि त्यांनी 1994 मध्ये मा. रज्जूभैयांना सरसंघचालक म्हणून घोषित केले. संघाच्या संविधानात असे नमूद आहे की, विद्यमान सरसंघचालक, आपल्या ज्येष्ठ सहकार्‍यांशी विचारविनिमय करून आपला उत्तराधिकारी नियुक्त करतील. बाळासाहेबांनीही असाच विचारविनिमय केला असेलच. कारण, मलाही त्यांनी याबाबत विचारले होते. मा. रज्जूभैयांनीही त्याचे अनुकरण करीत, माझ्याशी चर्चा केली होती. मा. सुदर्शनजींनी तर किमान 20-25 कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. मा. रज्जूभैया सरसंघचालक झाल्यानंतर दोन वर्षांनी बाळासाहेबांचे निधन झाले. रज्जूभैयांनी आणि सुदर्शनजींनही आपल्या हयातीतच आपले उत्तराधिक़ारी नेमले. ही तशी साधी गोष्ट वाटते. पण अत्युच्चपद सोडून, एखाद्या सामान्य स्वयंसेवकासारखे वागणे, ही सामान्य गोष्ट नाही.
एक सुगंधी पुष्प
भारत हा देश प्राचीन आहेच पण आधुनिक काळाशीही त्या प्राचीनाचा संबंध आहे, हे अधोरेखित करणारे बाळासाहेब देवरस होते. भगिनी निवेदितांनी हिंदू समाजाचे वर्णन करताना By the past, through the present, to the future असे वाक्य उच्चारले होते. बाळासाहेबांचे वर्तन या वचनाप्रमाणेच होते. भूतकाळ विसरायचा नाही. पण भूतकाळाकडे तोंड करून जायचेही नाही.  By the past, does not and should not mean towards the past. वर्तमानाशी म्हणजेच विद्यमान वास्तवाशी आपला संबंध असलाच पाहिजे; आणि तरी दृष्टी भविष्याकडेही असली पाहिजे. आपल्या समाजाने म्हणजेच आपल्या राष्ट्राने अशी वाटचाल केली, म्हणूनच आपण आजही राष्ट्र म्हणून जिवंत आहोत. अर्नेस्ट रेनाँ नावाचा फ्रेंच विचारवंत म्हणतो, To share the glories of the past, and a common will in the present; to have done great deeds together, and to desire to do more- these are the essential conditions of a people's being. ...........The Spartan song "We are what we were, and we shall be what we are." is, in its simplicity, the abridged version of every national anthem.
(भावानुवाद- भूतकाळातील वैभवाचे स्मरण, वर्तमानात समान भावना आणि सर्वांनी मिळून केलेली महान कार्ये आणि अशीच महान कार्ये भविष्यात करण्याची आकांक्षा या कोणत्याही राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आवश्यक बाबी आहेत........ स्पार्टातील लोकांचे गीत जे सांगते की, आम्ही जे पूर्वी होतो, ते आज आहोत आणि जे आज आहोत तेच आम्ही पुढेही राहणार आहे, ते गीत प्रत्येक राष्ट्रगीताची संक्षिप्त आवृत्ती असते.) भूतकाळाचा मागोवा घेत, वर्तमानाचे वास्तव जाणत, भविष्याकडे जाण्याची प्रेरणा देणार्‍या महापुरुषांच्या मालिकेत मा. बाळासाहेबांच्या जीवनाचेही एक सुगंधी पुष्प आहे.

                                                                                                -मा. गो. वैद्य
नागपूर,
दि. 23-02-2015

No comments:

Post a Comment