Thursday, 19 May 2011

ईशान्य भारतातील काही घडामोडी

गारो व राभा
आसाम आणि मेघालय या दोन राज्यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. मेघालय हा पूर्वी आसामचाच एक भाग होता. मेघालयची राजधानी शिलाँग, ही १९७० पर्यंत आसामचीच राजधानी होती. १९७० मध्ये मेघालय वेगळे राज्य बनल्यावर ती मेघालयची व दिसपूर आसामची राजधानी झाली. मेघालयात ख्रिस्ती लोकांची बहुसंख्या आहे. आसामपासून वेगळे राज्य बनण्याचे तेही एक कारण आहे. गारो, जयन्तीया व खासी या तीन मुख्य जमाती मेघालयात आहेत. त्यातल्या गारो व जयन्तीया जमाती ९० टक्के ख्रिस्ती झाल्या आहेत. खासी अजून हिंदूबहुल आहेत.
आसामात आणि मेघालयातही राभा नावाची आणखी एक जनजाती आहे. ती ख्रिस्ती झालेली नाही. या राभांना ख्रिस्ती करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आसामला लागून असलेल्या मेघालयाच्या भागात राभा अल्पसंख्य आहेत, तर गारो बहुसंख्य; पण आसामच्या सीमेत राभा बहुसंख्य आहेत. काही महिन्यांपूर्वी मेघालयात, गारो लोकांनी राभांवर आक्रमण केले. अनेकांची कत्तल झाली. राभांची अनेक घरे जाळण्यात आली. या अत्याचारामागे चर्चचा हात असल्याचा आरोप आहे. राभांना भयभीत करून ख्रिस्ती होण्यासाठी दडपण आणण्याचा हा प्रकार आहे.
या भागातील जनजातींच्या नेत्यांना याची जाणीव आहे. येथे अनेक जनजाती एकत्र येऊन ख्रिस्तीकरणाच्या उग्र कारवायांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. 'जनजाति फेथ ऍण्ड कल्चर प्रोटेक्शन फोरम' ही या सर्वांची संघटना आहे. या मंचाचे अध्यक्ष विक्रमबहादूर जमातीया हे आहेत. या मंचाने प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र लिहून विनंती केली आहे की, ईशान्य भारतातील ख्रिस्ती चर्चच्या राष्ट्रविरोधी कारवायांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून चर्चच्या कारवायांचा पत्ता काढावा. त्यांनी राभा व गारो यांच्या परस्पर संघर्षात बेघर झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठीही केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. मेघालयातील ईस्ट गारो हिल्स डिस्ट्रिक्टमध्ये गारोंची बहुसंख्या आहे, तर आसामातील गोलपारा जिल्ह्यात राभा बहुसंख्य आहेत.
*** *** ***

मेघालय : ख्रिस्ती राज्य?

मेघालयात ख्रिस्ती बहुसंख्य आहेत, हे वर सांगितलेच आहे. पण ते 'ख्रिस्ती राज्य' (ख्रिश्चन स्टेट) आहे काय? आपल्या सेक्युलर भारतात असा प्रश्न विचारणे म्हणजे धाडसाचेच ठरेल की नाही? पण आता संकोच करण्याचे कारण नाही. मेघालयाच्या सरकारनेच उत्तर दिले आहे. माहितीच्या अधिकारात, हरिश्चंद्र पवार या गृहस्थाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मेघालयाच्या सरकारनेच अधिकृतपणे सांगितले की, मेघालय हे ख्रिस्ती राज्य आहे. जनसंपर्क विभागाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती एम. मणी यांनी लेखी कळविले की, ''आमचे राज्य ख्रिस्ती राज्य आहे. म्हणून आम्ही रविवारी सुटी घेतो. त्या दिवशी कुणीही कामावर जात नाही. बाजारही बंद असतात. त्यामुळे रविवारी काम करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.'' जय सेक्युलर भारत!
*** *** ***

भगवान्‌ रंगफ्रा दिवस

भगवान्‌ रंगफ्रा ही अरुणाचल प्रदेशातील एक देवता आहे. ३१ डिसेंबर २०१० ला तिचा उत्सव साजरा करण्यात आला. 'इंडिजिनस फेथ ऍण्ड कल्चर सोसायटी ऑफ अरुणाचल' या संस्थेने या उत्सवाचे आयोजन केले होते. समाजाच्या सर्व स्तरातून लोक आले होते. त्यांच्या हातात पताका व फलक होते. 'भगवान्‌ रंगफ्रा की जय', 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्‌', 'हम सब एक हैं' इत्यादी घोषणांनी वातावरण दुमदुमले होते.
भगवान्‌ रंगफ्राची मिरवणूक सकाळी ९ वाजता निघाली. मिरवणुकीत ट्रक, टॅक्सी, टेम्पो, द्विचक्र वाहने होती. ११ वा. ही मिरवणूक विवेकानंद केंद्र विालयाच्या पटांगणात थांबली. तेथेही अनेक कार्यक्रम झाले. विवेकानंद केंद्र विद्‌यालयाच्या विद्‌यार्थ्यांनी ढोल, संवादिनी व मंजीरींच्या तालावर अनेक देशभक्तिपर गीते गायिली. नंतर समारोपाचा कार्यक्रम, कोहिमा (नागालॅण्ड) येथील 'राणी माँ गाईडिनलू मेमोरियल' विद्‌यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तसिले झेलीयांग यांच्या हस्ते झाला. त्यांनी जनजातीच्या श्रद्धा व संस्कृती यांचे महत्त्व विशद करून सांगितले. मुख्य अतिथी ब्रह्मोजी राव होते. ते पूर्वोत्तर जनजाति शिक्षा समितीचे संघटनमंत्री आहेत. त्यांनी पैशाला किंवा धाकाला बळी न पडता आपला धर्म व संस्कृती वाचविण्यासाठी सज्ज राहा, असा उपदेश केला. याप्रसंगी नामसाल बुद्धविहाराचे प्रमुख एक भंतेही उपस्थित होते.
*** *** ***

नव्या नागालॅण्डची मागणी

१९६३ साली नागालॅण्ड राज्य अस्तित्वात आले. त्यापूर्वी, तेथे भारतापासून अलग होण्यासाठी सशस्त्र आंदोलन झाले होते. पण ते शमविण्यात आले. पण बंडखोरांच्या समाधानासाठी नागालॅण्ड या राज्याची निर्मिती करण्यात आली. बंडखोरी करणार्‍यांमध्ये ख्रिस्ती संप्रदाय स्वीकारलेल्यांचाच भरणा होता. त्यांनी 'नागालॅण्ड' या नावाचा आग्रह धरला व तो भारत सरकारने मान्य केला. तथापि, नवे राज्य देऊनही बंडखोरी मिटली, असे मात्र झाले नाही. बंडखोरीची भाषा तेवढी थांबली आहे. सध्या तेथे युद्धविराम आहे!
पण हे नागालॅण्डही एकसंध नाही. नागालॅण्डच्या पूर्वेकडील मोन, त्यूएनसंग, लांगलेंग आणि खिफायर हे चार जिल्हे वेगळ्या 'फ्रांटियर नागालॅण्ड'ची मागणी करीत आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये कोन्याक, फोम, चांग आणि संगथाम या प्रमुख जनजाती आहेत. त्यांचे गार्‍हाणे असे आहे की, नागालॅण्डच्या सरकारने नेहमीच त्यांना भेदभावाची वागणूक दिली. त्यामुळे हे जिल्हे अविकसित राहिले. ते म्हणतात की, आम्हाला १९४७ पासून केवळ आश्वासनेच मिळत राहिली. त्यामुळे, आता येथील जनजातींनी वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. ते दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे.
*** *** ***

एका मुसलमानाचे औदार्य

औदार्य! हो औदार्य! पण धनाचे नाही. धारणेचे औदार्य. विचारांचे औदार्य. सर्वपंथसमादाराचे औदार्य. ख्रिस्ती व इस्लाम हे दोन धर्मपंथ एकांगी आहेत. आपलाच मार्ग स्वर्गाला नेणारा, इतर सारे नरकाची वाट दाखविणारे, अशी त्यांची निष्ठा आहे. मूर्तिपूजेला तर त्यांचा प्रचंड विरोध. एवढेच नव्हे, तर मूर्तिभंजन हे पुण्यकर्म आहे, अशी त्यांची धारणा.
या पृष्ठभूमीवर आशिक अली नथानी या मुस्लिम उद्‌योगपतीचे उदाहरण खूपच प्रशंसनीय समजले पाहिजे. आशिक अली मूळचे राजस्थानचे पण आता मुंबईत स्थायिक झालेले आहेत. राजस्थानात रणथंभोर नावाचे एक क्षेत्र आहे. हा भाग वाघांच्या अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. वाघांसाठी ते आरक्षित म्हणजे 'रिझर्व्हड्‌' आहे. अनेक पर्यटक, दरवर्षी तेथे येत असतात.
याच परिसरात एक प्राचीन मंदिर आहे. गणेशधाम मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. या मंदिराची इमारत खूपच जुनी आहे. ती पडायलाच आली होती. एक प्रकारच्या निर्जन भागात ते असल्यामुळे, त्याच्याकडे सामान्यांचे लक्षही नसे. अशा परिस्थितीत आशिक अली नथानी यांच्या नजरेला ते पडले. त्या मंदिराची दुरवस्था बघून नथानी कळवळले आणि त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. थोडेथोडके नाही, दोन कोटी रुपये खर्चून नवे भव्य मंदिर त्यांनी उभे केले. स्वाभाविकच कठमुल्लांनी आशिक अलीचा निषेध केला, पण तो त्यांनी जुमानला नाही आणि एक प्रशंसनीय उदाहरण प्रस्तुत केले. ('हिमालय परिवार'- वरून साभार)
*** *** ***

मुसलमान आणि संस्कृत

बिहार राज्यात, मुस्लिम विद्‌यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषा अधिकाधिक प्रिय होत आहे. बिहार राज्य संस्कृत बोर्डाच्या परीक्षेला बसणार्‍या मुस्लिम विद्‌यार्थ्यांची संख्या वाढत आहे. २००८ साली, या परीक्षेला ९६८ विद्‌यार्थी बसले होते. २००९ मध्ये ही संख्या १०२६ झाली, तर २०१० मध्ये हा आकडा १०५४ वर पोचला.
या विद्‌यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे असे की, संस्कृतचे ज्ञान असले, तर नोकरी मिळणे अधिक सोपे जाते. त्यामुळे सातवीपर्यंतचे शिक्षण मदरशांमध्ये घेतल्यानंतर, या पालकांनी आपल्या पाल्यांना संस्कृत शिकविणार्‍या शाळांमध्ये घातले. सुरवातीला त्यांना संस्कृत कठीण वाटले. पण आता त्यांना सराव झाला आहे. मुस्लिम विद्‌यार्थी गुणवत्ता यादीतही आले आहेत.
*** *** ***

चीनमध्ये संस्कृत

कर्नाटक विधान परिषदेचे एक शिष्टमंडळ नुकतेच चीनला जाऊन आले. त्यांना कळले की, चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरातील विश्वविद्‌यालयात संस्कृत व पाली भाषा विभाग आहे. शिष्टमंडळाने या विभागातील अध्यापक व विद्‌यार्थी यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळात, संस्कृतचे जाणकार श्री मधुसूदन हे एक सदस्य होते. त्यांनी इंग्रजी भाषेत विद्‌यार्थ्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही संस्कृतमधील कोणती पुस्तके वाचली? प्रश्नाचे उत्तर संस्कृतमधून आले. ते म्हणाले, ''वयं हितोपदेशं, शाकुन्तलं, रघुवंशं, मेघदूतं पठितवन्तः''. मधुसूदन यांना खूप आनंद झाला. अध्यापिका होत्या ए. चौयंग. त्यांनी मुलांना एक सुभाषित म्हणायला सांगितले. मुलांनी कालिदासाच्या रघुवंशातला पहिला 'वागर्थाविव संपृक्तौ' हा श्लोक म्हटला. आपण संस्कृत का शिकता असे विचारले असता ते म्हणाले, ''संस्कृतशिवाय आम्हाला भगवान्‌ बुद्ध कसे समजतील?'' या विभागाच्या प्रमुखही एक महिलाच आहेत. त्यांचे नाव दवंग चौंग. त्यांनी जर्मनीत जाऊन पीएच. डी. पदवी प्राप्त केली. या शिष्टमंडळाचे प्रमुख कर्नाटक विधान परिषदेचे अध्यक्ष बी. एच. शंकरमूर्ती यांनी त्यांना विचारले की, भारताकडून आपली काय अपेक्षा आहे. उत्तर आले की, आपण अधूनमधून, निदान दोन वर्षातून एकदा, चांगल्या संस्कृत पंडिताला आमच्या येथे पाठवा. त्यामुळे, इथले अध्यापक चांगल्या रीतीने संस्कृत शिकवू शकतील. शिष्टमंडळाला, पाली भाषेतील देवनागरी लिपीत लिहिलेली भूर्जपत्रेही दाखविण्यात आली.
-मा. गो. वैद्‌य
नागपूर
२४ एप्रिल २०११

No comments:

Post a Comment