Monday, 30 May 2011

ओसामा, अमेरिका, पाकिस्तान आणि मुसलमान

'अल्‌-कायदा' या इस्लामी दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा-बिन-लादेन, दिनांक २ मे २०११ ला मारला गेला. हे जे झाले ते चांगले झाले. आता चर्चा सुरू आहे की, तो कसा मारला गेला? त्याच्या निवासस्थानावर अमेरिकी सैनिकांनी केलेल्या आक्रमणात म्हणजे त्या आक्रमणाचा प्रतिकार करणार्‍या लढाईत तो मारला गेला की, अमेरिकन कमांडोजनी त्याला जिवंत पकडले व नंतर त्याला ठार केले, याची चर्चा सुरू आहे. ओसामाची १२ वर्षांची मुलगी म्हणते की, तो निःशस्त्र होता, तरी त्याला ठार करण्यात आले. पण ही सारी चर्चा निरर्थक आहे. तो निःशस्त्र अवस्थेत मारला गेला की लढताना मारला गेला, या वादाला अर्थ नाही. तो मारला गेला हे सत्य आहे. या सत्यालाही नाकारणारे कुणी नाहीत, असे मात्र नाही.


संशयात्म्यांचे हवेतील किल्ले
   अतिरेकी इस्लामी संघटन, जे अनेक वर्षे अफगानिस्थानात राज्य करीत होते आणि ज्याची शक्ती अजून संपलेली नाही, ते तालिबान म्हणते की, ओसामा मारला गेला तर त्याचे ते शरीर दाखवा! अमेरिका जोपर्यंत त्याचे मृत शरीर दाखविणार नाही, तोपर्यंत आम्ही ओसामा मेला हे मानणार नाही. ज्या अबोटाबाद शहराजवळील ठिकाणी ओसामाला ठार करण्यात आले, तेथील काही रहिवासीही ओसामाच्या मृत्यूवर विश्वास ठेवीत नाहीत. त्यांचे म्हणणे असे की, ही सारी पाकिस्तानला बदनाम करण्याची चाल आहे. अमेरिकेला हे दाखवायचे आहे की, पाकिस्तान ओसामाला संरक्षण देत आहे. इजिप्तची वेगळीच तर्‍हा आहे. तेथील काही लोक म्हणतात की, ओसामा पाच वर्षांपूर्वीच मेला. इस्लामी देशांवर आक्रमण करण्यासाठी अमेरिकेने जिवंत ओसामाचे काल्पनिक भूत उभे केले. हवेत कल्पनेचे किल्ले उभारावयाला कुणाचीच ना नसणार. पण सत्य हे आहे की, ओसामा मारला गेला आहे; आणि त्याला अमेरिकेन सैनिकांनी ठार केले आहे.


स्वर्गसुखासाठी
   त्याचे प्रेत अमेरिकेने समुद्रात बुडविले, हेही सत्य आहे. याबद्दलही कुणी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कट्टर मुसलमानांना मात्र वाईट वाटू शकते. त्यांचे म्हणणे नक्कीच असे असेल की, इस्लामच्या धर्मरूढीप्रमाणे, त्याचे जमिनीत दफन करावयाला हवे होते. त्यांची अंधश्रद्धा आहे की, कयामतच्या दिवशी पापपुण्याचा हिशेब लागतो आणि जो पुण्यवान असतो, त्याला स्वर्गात अढळ स्थान मिळते. अल्‌-कायाचे अमेरिकेविरुद्ध म्हणजेच काफिरांविरुद्ध युद्ध म्हणजे पवित्र जिहादच होय. या जिहादात ओसामा शहीद झाला. अर्थात्‌ त्याचे स्वर्गात स्थान पक्के. पण त्याचे शरीर कब्रस्थानात हवे ना. ते समुद्रात टाकल्यामुळे नष्ट होणार आणि तो स्वर्गसुखापासून वंचित राहणार. ज्यांचा या अंधश्रद्धेवर विश्वास असेल आणि सर्व जिहादींचा आणि त्यातही सर्व आत्मघातकी आतंकवाांचा त्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांना वाईट वाटणे व त्यांनी अमेरिकेला शिव्याशाप देणे स्वाभाविकच आहे. या टोळीत, काँग्रेसचे म्हणजे सोनिया काँग्रेसचे दिवटे सरचिटणीस दिग्विजयसिंगही सामील आहेत. त्यांनी, काँग्रेस पक्षाची मुसलमानांमध्ये- म्हणजे जिहादी वृत्तीच्या हिंसाचारी मुसलमानांमध्ये- खूपच लोकप्रियता वाढविल्याबद्दल तमाम काँग्रेसजनांनी त्यांचा गौरव करावयाला हवा! काँग्रेससाठीच्या त्या शानदार गौरवमय दिवसाची आम्ही बावळे वाट बघत आहोत! मागे एका लेखात मी असे लिहिल्याचे स्मरते की, आपल्या भारतात जे इस्लामी आतंकवादी पकडले जातात आणि ज्यांना फाशीची शिक्षा होते- जसे अफजल गुरू- किंवा जे झटापटीत मारले जातात, त्यांची प्रेते त्यांच्या नातेवाईकांना देऊ नयेत, सरकारने त्यांचा दाहसंस्कार करावा; या रीतीने इस्लामी आतंकवादाचा संपूर्ण नायनाट झाला नाही, तरी तो बराचसा संपेल. आत्मघाती हल्ले तरी नक्कीच बंद होतील. कारण, हे तरुण, कोवळे, आतंकवादी मृत्यूनंतरच्या स्वर्गसुखाच्या मोहापायी मृत्यूला कवटाळायला तयार होत असतात. इस्लामचे धर्मपंडितही याला आक्षेप घ्यावयाचे नाहीत. कारण, आतंकवाद इस्लामला मान्य नाही, असे त्यांचे जाहीर वक्तव्य आहे.
असो. हे जरा विषयांतर झाले. अमेरिकेने तूर्तास तरी ठरविले आहे की, ओसामाचे क्षतविक्षत शरीर दाखवायचे नाही. त्याचा दफनविधी केला नाही, हेही चांगलेच झाले. कट्टर इस्लामिस्टांचे तेच एक पवित्र स्थळ बनले असते. प्रतापगडावर अफजलखानाचे बनले तसे.


पाकिस्तानचा रोष
   ओसामाला संपविण्याची ही जी कारवाई अमेरिकेने केली, तीत त्याने पाकिस्तानला सहभागी करून घेतले नाही, हेही चांगलेच झाले. अमेरिकन गुप्तचर विभागाचे प्रमुख लिओन पॅनेट्टा यांनी दोनदा स्पष्ट केले की, आम्ही पाकिस्तानला यात सहभागी केले असते, तर ओसामाला आमच्या योजनेचा सुगावा लागला असता, व तो सावध होऊन निसटू शकला असता. पाकिस्तानला अमेरिका आपला मित्र समजते. पण तो बिनभरवशाचा मित्र आहे, हे त्याला एवढ्या उशिराने कळले, हे ठीक झाले. पाकिस्तानला न कळविता, त्याची परवानगी न घेता, अमेरिकेने पाकिस्तानच्या भूमीवर येऊन ही कारवाई केली, यात पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला छेद दिला गेला, अशी पाकिस्तानची तक्रार आहे. ती रास्त आहे. पण ११ सप्टेंबर २००१ ला आपल्या इभ्रतीच्या दोन ठिकाणांवर- वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पँटॅगॉन याच्यावर- अल्‌-कायदाच्या अतिरेक्यांनी हल्ला करून, व सुमारे तीन हजार लोकांना ठार करून अमेरिकेचे जे नाक कापले, त्याची वेदना व अपमान अमेरिका विसरली नाही. अल्‌-कायदाचा म्होरक्या ओसामा अफगानिस्थानात लपलेला आहे व त्याला त्यावेळच्या अफगानिस्थानातील तालिबान सरकारचे साहाय्य आहे, हे कळताच, अमेरिकेने अफगानिस्थान भाजून काढला. तालिबानची सत्ता समाप्त केली. हमीद करजाईला सत्तेवर बसविले. करजाईच्या सरकारनेही ओसामाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो सफल झाला नाही. सफल होणे शक्यच नव्हते, कारण ओसामा अफगानिस्थानातून पळाला होता व त्याने पाकिस्तानात आश्रय घेतला होता. अमेरिकेला हे कळले होते. पण त्याला विश्वास वाटत होता की, आपला मित्र पाकिस्तान ओसामाचा शोध घेण्याच्या कार्यात मदत करील. पण पाकिस्तान बहाणे बनवीत राहिले. अमेरिकेने पाकिस्तानात लोकशाही आणली. जरदारी व गिलानी हे लोकनियुक्त सत्ताधारी आहेत. पण पाकिस्तानात खरी सत्ता त्यांची नाही. तशी तेथे नागरी सत्ता खर्‍या अर्थाने केव्हाच नसते. ना जिना-लियाकत अलीखान यांची होती- (जिना लवकर मरण पावले म्हणून वाचले. अन्यथा त्यांचाही मुजीबुर रहमान झाला असता, आणि लियाकत अलीखानांचा तर चक्क खूनच करण्यात आला) ना झुल्फिकार अली भुत्तोची, अथवा बेनझीरची किंवा नवाज शरीफ यांची होती. नवाज शरीफांना किती लीलया जनरल मुशर्रफ यांनी दूर केले, हे कळण्यासाठी फार दूर जावयाला नको. जरदारींचे दृश्य आसन व शासन, अमेरिकेच्या दडपणामुळे आहे. खरी सत्ता जनरल कयानी यांची आहे. अमेरिकेने पाकिस्तानची पर्वा न करता, त्याच्या सार्वभौमत्वाची जी ऐसीतैसी केली, त्याबद्दलचा रोष जरदारी-गिलानी यांनी उग्रतेने प्रकट केला नाही. ती उग्रता कयानी यांनी प्रकट केली आहे आणि अमेरिकेलाही ताकीद दिली की, हे यापुढे चालवून घेतले जाणार नाही. या प्रतिक्रियेवरून पाकिस्तानातात खरी सत्ता कुणाची आहे, हे स्पष्ट व्हावे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय' कयानींच्या इशार्‍यावर चालते, जरदारींच्या नाही. एक बातमी अशी आहे की, प्रधानमंत्री गिलानी आणि सेनापती कयानी यांचे मेतकूट जमले आहे.


पाकिस्तानचा बहाणा
   अमेरिकेच्या लक्षात ही गोष्ट आली नसेल असे नाही. तिला नक्कीच हे कळले असेल. म्हणून अबोटाबादची कारवाई तिने पाकिस्तानला अंधारात ठेवून केली. अमेरिकेला आणि सर्वच युरोपीय नाटो राष्ट्रांना पाकिस्तानच्या संदर्भात पुनर्विचार करणे आवश्यक आहे. शीतयुद्धाच्या काळात, रशियावर हेरगिरी करण्यासाठी या राष्ट्रांना पाकिस्तानशी मैत्री व जवळीक आवश्यक होती. आता परिस्थिती बदलली आहे. आता चीनला आवरणे ही निकड आहे आणि पाकिस्तान त्या दृष्टीने भरवशाचे नाही. पाकिस्तानला म्हणजे पाकी लष्करशहांना आपल्या बाजूने राखण्यासाठी, पाकिस्तानच्या भारतविरोधी प्रकट आणि अप्रकट सर्व कृष्णकारस्थानांना या अमेरिकनगोटाचा पाठिंबा असे. कानाडोळा तर नक्कीच असे. युद्ध १९४७ चे असो, अथवा १९६५ चे, ते या पाकिस्तानच्या गोर्‍या मित्रराष्ट्रांच्या सल्लामसलतीशिवाय झालेले नाही. पाकिस्तानपुरस्कृत सर्व भारतविरोधी आतंकवादी कारवायांकडे या राष्ट्रांची बुद्धिपुरस्सर डोळेझाक असे. ११ सप्टेंबर २००१ नंतर मात्र त्यांचे डोळे उघडले. ओसामा प्रकरणानंतर ते साफ उघडले असावेत. पाकिस्तानच्या राजधानीपासून केवळ ६० कि. मी. अंतरावर आणि अबोटाबादच्या लष्करी तळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात, ओसामा ५-६ वर्षांपासून लपून राहावा आणि पाकिस्तान सरकारला म्हणजेच पाकिस्तानच्या सैन्याला व गुप्तचर संस्थेला, त्याची जाणीव नसावी, हे आश्चर्य नव्हे काय? शेंबडे पोरही पाकिस्तानच्या 'आम्हाला माहीत नव्हते' या कानावर हात ठेवण्याच्या चलाखीवर विश्वास ठेवणार नाही.


पाकिस्तानचे भवितव्य
   सुमारे एक महिन्यापूर्वीच्या 'भाष्यात' मी लिहिले होते की, पाकिस्तानचे स्थैर्य हे भारताच्या हिताचे नाही. अफगानिस्थानच्याही हिताचे नाही. अमेरिका लवकरच अफगानिस्थानातून आपली फौज बाहेर काढून घेणार असे अमेरिकेचे अधिकृत वक्तव्य आहे. नाटो राष्ट्रेही अमेरिकेचीच वाट धरणार. त्यानंतर अफगानिस्थानचे काय होईल, याचा ही राष्ट्रे गांभीर्याने विचार करतील, अशी आशा आहे. आजही अर्ध्या अफगानिस्थानात तालिबानचीच अनधिकृत सत्ता चालते. नाटो सैन्य गेल्यावर तालिबानच तेथे सत्तेवर येणार आणि पाकिस्तानची त्या सत्तेला मदत राहणार याविषयी शंका नको. करजाईचा नजीबुल्ला आणि जरदारींचा भुत्तो किंवा नवाज शरीफ होणे हीच नियती राहील. अफगानिस्थान तालिबानमुक्त असण्यात भारताचेही हित आहे. पाकिस्तान, मी मागच्या ङङ्गभाष्यात' लिहिल्याप्रमाणे एक ङङ्गराष्ट्र' नाही. ङङ्गइस्लाम' हे, भलेही पराक्रमाला, आक्रमणाला आणि शहादतला बळ देणारे रसायन असो, पण, लोक, त्यांचे वंश, त्यांचे पंथ, त्यांच्या भाषा यांना जोडणारा तो गोंद नाही. ज्या घटकांचे विमान पाकिस्तान हे कृत्रिम राज्य बनले आहे, त्यांच्या संबंधी काय नीती ठरवायची हा राजकीय मुत्सद्देगिरीचा विषय आहे. त्यासंबंधी आजच अधिक काही लिहिणे उपयुक्त नाही, उचितही नाही. पण या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.


नवक्रांतीचे वारे
   अरब देशांमध्ये, खरे म्हणजे मुस्लिम देशांमध्ये, एका नव्या क्रांतीचे वारे वाहू लागले आहेत. ट्युनिशिया व इजिप्तमध्ये त्या क्रांतीला यश मिळाले आहे. लिबियात रक्तरंजित संघर्ष चालू आहे. सीरिया, येमेन, बहरीन या देशांमध्येही नवचैतन्य सळसळताना दिसत आहे. ही सळसळ, फक्त प्रस्थापित हुकुमशहांविरुद्ध आहे की, तिला वैचारिक अधिष्ठान आहे, हे स्पष्ट झालेले नाही. अमेरिका लोकशाहीवादी देश आहे, याविषयी वाद नाही. पण त्याने, आपल्या राजकारणासाठी, सर्वत्र हुकुमशहांना जवळ केले आहे, हेही कटू असले तरी १०० टक्के सत्य आहे. इजिप्तमध्ये सत्तापरिवर्तनाच्या मोहिमेत ङङ्गमुस्लिम ब्रदरहूड' ही मतांध संघटना सामील होती. तिला लोकशाही व्यवस्थेशी देणे घेणे असण्याचे कारणच काय? अन्य अरब देशांसारखेच परिवर्तनाचे वारे पाकिस्तानातही वाहू लागले, तर आश्चर्य कोणते?


प्रश्न इस्लामचाही
   माझ्या मते, प्रश्न केवळ राजकारणाचा नाही. इस्लामचाही आहे. इस्लामचा इतिहास आणि त्या इतिहासातून मिळणारी शिकवण ही एकाधिकारशाहीला पोषक आहे. एक तुर्कस्थानचा अपवाद सोडला, तर कोणत्याच मुस्लिमबहुल देशात लोकशाही स्थिरावली नाही. ब्रिटिशसदृश संसदीय लोकशाही व्यवस्था व मूल्ये यांच्याशी संबंध तर आज पाकिस्तान व बांगला देश म्हणून जो प्रदेश ओळखला जातो, त्या प्रदेशातील लोकांचाही आलेला होता. मग तेथे लोकशाही का रुजली नाही? अन्य मतावलंबी लोकांना तेथे सन्मानाने का राहता आले नाही? पश्चिमेकडच्या पाकिस्तानात १९४७ साली १८ टक्के असलेले हिंदू आता २-३ टक्क्यांवर का आले? बांगला देशात हिंदूंची संख्या ३० टक्क्यांच्या वर होती, आता ती १० टक्केही का नाही? काश्मीरच्या खोर्‍यातील ४०-४५ लाख मुसलमानांबरोबर ४-५ लाख हिंदू का राहू शकले नाहीत? या सर्व प्रश्नांचे एकमेव उत्तर हे आहे की, ते मुसलमान बनले नाहीत म्हणून. मुसलमानांची बहुसंख्या असल्यामुळे राजकारण व धर्मसंप्रदाय यांची फारकत ते करू शकले नाहीत. त्यांनी इस्लामला राज्याचा धर्म म्हणून मान्यता दिली आणि जे इस्लामला मानणारे नाहीत, त्यांना ङङ्गकाफीर' समजून त्यांच्याशी व्यवहार केला. ज्या अरब देशांमध्ये नवक्रांतीची सळसळ सुरू आहे, ते राजकारण व आपला संप्रदाय यांची फारकत करू शकतात काय, हा खरा मौलिक प्रश्न आहे. इराणचा अनुभव, या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देण्याला उत्साहित करीत नाही.
म्हणून, एक ओसामा ठार करण्यात आला किंवा एका 'अल्‌-कायदा'चे कंबरडे मोडले, म्हणून जगात सर्वत्र शांतता नांदेल अशी भाबडी आशा बाळगण्यात अर्थ नाही. अमेरिकेच्या दडपणाने, लोकशाही व्यवस्था स्थापित होईलही. पण ती टिकण्याची खात्री नाही. शिवाय बाह्य दडपणाने आलेली व्यवस्था लोकशाहीची मूल्ये स्थिरपद करूही शकणार नाही. ख्रिस्ती धर्मही इस्लामप्रमाणेच असहिष्णू होता. त्याची मूलभूत तत्त्वे आजही सहिष्णुतेला पोषक नाहीत. पण १६ व्या शतकातील पुनरुज्जीवनापासून (रिनासान्स) ख्रिस्ती राष्ट्रांनी आपले चरित्र बदलविले. प्रथम धर्मशक्ती व राजशक्ती यांची फारकत केली. सेक्युलर राज्याची संकल्पना स्वीकारली. या व्यवस्थेनंतरही तेथे हुकुमशहा निर्माण झाले नाहीत, असे नाही. हिटलर, मुसोलिनी, फ्रँको ही अगदी अलीकडची उदाहरणे आहेत. पण ख्रिस्ती राष्ट्रांनीच या हुकुमशहांना संपविले; आणि आपले एक नवीन चरित्र उपस्थित केले. इस्लामी देशात हे घडले नाही. ते घडू शकते, इजिप्त कदाचित्‌ हे दाखवू शकेल.  पाकिस्तानला व इराणला ते दाखविण्याची संधी मिळाली. पण हे देश जुन्याच वळणावर गेले. इराणचे अधिकृत नामाभिधान 'जम्हूरी-इ-इस्लामी-इ-इराण' असे आहे; तर पाकिस्तानचे 'इस्लाम-इ-जम्हूरिया-इ-पाकिस्तान' असे आहे. लोकशाही प्रणालीच्या प्रतिष्ठापनेसाठी व प्रतिष्ठेसाठी वेगळ्या वैचारिक व सैद्धांतिक निष्ठेची गरज असते.
आतंकवाद संपलेला नाही
   तात्पर्य असे की, एक ओसामा-बिन-लादेन समाप्त झाला किंवा एक 'अल्‌-कायदा' संपली म्हणून सारा आतंकवाद संपला असे समजण्याचे कारण नाही. आजच्या घटकेला अमेरिकेने सर्व जिहादी वृत्तीच्या इस्लामी कट्टरपंथीयांचा रोष स्वतःवर ओढवून घेतला आहे. तो आज ना उदया  अमेरिका आणि त्याचे मित्र यांच्या देशात प्रकट झाल्याशिवाय रहावयाचा नाही. कदाचित्‌, कुणी सांगावे, तो तिसर्‍या महायुद्धाचीही नांदी ठरू शकेल.

                                             -मा. गो. वैदय
   वैशाख शु॥ ३, ५११३
   नागपूर, दि. ०६-०५-२०११

No comments:

Post a Comment