Thursday, 23 June 2011

इतस्तत:

रविवारचे भाष्य दि. १९ जून २०११

अग्निहोत्र आणि प्रदूषण
‘अग्निहोत्र’ हे एक व्रत आहे. अग्नीच्या उपासनेचे व्रत. अग्नी तीन आहेत : १) गार्हपत्य २) आहवनीय आणि ३) दक्षिण. पण मी येथे अग्निहोत्राचा विधी सांगणार नाही. पाश्‍चात्त्य देशांमध्ये अग्निहोत्राची उपासना सुरू झाली आहे, हे मी येथे सांगणार आहे. ही उपासना स्वर्गप्राप्तीसाठी नाही; तर तिचे उद्दिष्ट अगदी ऐहिक आहे.

प्रदूषणमुक्तीसाठी, तसेच पिकांच्या संरक्षणासाठी अग्निहोत्राची उपासना केली जात आहे. अग्निहोत्राच्या या प्रयोगाला उपासना म्हणा अथवा नका म्हणू, पण या प्रक्रियेला ‘होम थेरपी’ असे नाव देण्यात आले आहे. ‘होम’ म्हणजे यज्ञात आहुती टाकणे. डॉ. उलरिच बर्क या वैज्ञानिकाने या होम थेरपीचा उपयोग करून, रशियात १९८६ साली चेर्नोबिल येथे आण्विक रिऍक्टरचा जो स्फोट झाला होता आणि ज्यातील रेडिओऍक्टिव् उत्सर्गामुळे जे प्रदूषण आसमंतात पसरले होते, त्यावर मात केली.
उलरिच बर्क हे जर्मन वैज्ञानिक आहेत. त्यांनी रशियन वैज्ञानिकांच्या मदतीने, होम करून, प्रदूषण आटोक्यात आणले. त्यासाठी त्यांनी पिरॅमिडच्या आकाराचे तांब्याचे यज्ञकुंड बनविले. गाईच्या शेणाच्या गोवर्‍या तयार केल्या. त्या गोवर्‍या जाळून अग्नी तयार केला व त्यात गाईच्या तुपाच्या आहुती दिल्या. आणि त्यांना चकित करणारे परिणाम दिसून आले. आसपासच्या शेतातील पिके, भाज्या, बगीच्यातील फळे, यात, ते प्रदूषण भयंकर प्रमाणात शिरले होते. मानवाच्या शरीरावरही त्याचे दुष्परिणाम दृग्गोचर होत होते. त्यावर उपाय म्हणून या यज्ञकुंडातील गोवर्‍यांचे भस्म या रुग्णांना देण्यात आले. गोवर्‍यांबरोबरच काही ‘नॉन् रेडिओऍक्टिव्’ पदार्थांचीही आहुती देण्यात आली होती. हे भस्म रुग्णांना खायला दिले आणि रोगी दुरुस्त झाले. या वैज्ञानिकांच्या पाहणीत असेही दिसून आले की, भारतातील आणि ऑस्ट्रेलियातील गाईंचे शेण, तूप आणि तांदूळ या द्रव्यांच्या आहुतीतून बनलेले भस्म अधिक गुणकारी असते.
हा होम रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या समयी करण्यात आला. आता अलीकडेच जपानमधील प्रचंड भूकंपात आण्विक रिऍक्टरमध्ये स्फोट झाले होते. त्या स्फोटांनी फार मोठ्या प्रमाणात रेडिओऍक्टिव् प्रदूषण पसरविले होते. डॉ. उलरिच बर्क यांनी जपान सरकारलाही आपल्या या ‘होम थेरपी’ची माहिती कळविली आहे.

वरील माहिती, २०११च्या मे महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘हिमालय परिवार’ या नियतकालिकाच्या अंकात, दिल्लीचे सूर्यप्रकाश कपूर यांनी दिलेली आहे.
श्री. कपूर यांचा पत्ता असा आहे, ६०, गगनविहार विस्तार, दिल्ली-११००५१

*********
‘स्पेक्ट्रम’ काय आहे?
अलीकडे २ जी स्पेक्ट्रम, ३ जी स्पेक्ट्रम, एस बँड स्पेक्ट्रम असे शब्द वारंवार कानावर येत आहेत. पण ‘स्पेक्ट्रम’ म्हणजे काय, हे फारच थोड्यांना माहीत असेल. ‘विकल्पवेध’ पाक्षिकाच्या १६ ते २८ फेब्रुवारी २०११ च्या अंकात यासंबंधी माहिती आली आहे. ती येथे उद्धृत करीत आहे.
ध्वनिलहरी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून जातात, त्या तरंगांच्या (कंपनांच्या) स्वरूपात. एखाद्या माध्यमात ध्वनीच्या वहनाचा वेग एका सेकंदात निर्माण होणारी कंपने आणि तरंगांची लांबी यावर अवलंबून असतो. ध्वनी निर्माण होताना एका सेकंदात जेवढी कंपने निर्माण होतात त्यांना त्या ध्वनीची ‘फ्रिक्वेंसी’ असे म्हटले जाते. फ्रिक्वेंसीचे मोजमाप ‘हटर्झ’ या एककात केले जाते. ‘१ हटर्झ फ्रिक्वेंसी म्हणजे १ सेकंदात १ कंपन’ होय. १ किलो हटर्झ म्हणजे १ सेकंदात १००० कंपने होत, तर १ मेगा हटर्झ म्हणजे १ सेकंदात १० लाख कंपने होत.
व्यापारी दळणवळणात वेगवेगळ्या उपयोगांसाठी वेगवेगळ्या फ्रिक्वेंसी वापरल्या जातात. त्यांचीच काही माहिती खाली एकत्रित केली आहे.

१) स्पेक्ट्रम : AM रेडिओ, फ्रिक्वेंसी मर्यादा : ५४० किलो हटर्झ, उपयोग : आकाशवाणीकडून देशभरात प्रसारण
२) शॉट वेव्ह (SW) रेडिओ, फ्रिक्वेंसी मर्यादा : ५.९५ ते २६.१ मेगा हटर्झ, उपयोग : दूर अंतरावर प्रसारणासाठी जगभरातील रेडिओ केंद्रांकडून वापर
३) प्रादेशिक दूरचित्रवाणी (Terrestrial TV), फ्रिक्वेंसी मर्यादा : ५४-८८ मेगा हटर्झ, उपयोग : दूरदर्शनच्या २ ते ६ चॅनल्सकडून वापर
४) FM रेडिओ, फ्रिक्वेंसी मर्यादा : ८८ ते १०८ मेगा हटर्झ, उपयोग : आकाशवाणी (विविधभारती) आणि देशभरातील अनेक खाजगी रेडिओंकडून वापर, अन्य माहिती : २००६ साली ६४ स्लॉट विकून सरकारला रु. ४५० कोटी प्राप्त.
५) केबल टीव्ही, फ्रिक्वेंसी मर्यादा : १४५ ते ८०० मेगा हटर्झ, उपयोग : लोकांच्या घरात चॅनल्स प्रसारणासाठी केबल ऑपरेटर्सकडून वापर
६) २ जी मोबाईल, फ्रिक्वेंसी मर्यादा : ८०० ते १९०० मेगा हटर्झ, उपयोग : मोबाईल सेवेसाठी जीएसएम आणि सीडीएमए कंपन्यांकडून वापर, अन्य माहिती : सरकारला प्रति स्लॉट रु. १६५० कोटींचे शुल्क प्राप्त
७) ३ जी मोबाईल, फ्रिक्वेंसी मर्यादा : २१०० मेगा हटर्झ, उपयोग : उच्च दर्जाच्या आवाज आणि डाटा वहनासाठी वापर, अन्य माहिती : १५ मेगा हटर्झच्या लिलावातून सरकारला रु. ६७७१८ कोटींची प्राप्ती
८) ब्रॉडबँड वायरलेस ४-जी, फ्रिक्वेंसी मर्यादा : २३०० मेगा हटर्झ, WiMax, LTE अशा अतिवेगवान इंटरनेट, ब्रॉडबँड सेवांसाठी वापर, अन्य माहिती : ४० मेगा हटर्झ लिलावातून सरकारला ३८३०० कोटींची प्राप्ती
९) ‘एस’ बँड, फ्रिक्वेंसी मर्यादा : २५०० मेगा हटर्झ, उपग्रह दळणवळण. अंतराळ विभागाकडून वापर, अन्य माहिती : २० मेगा हटर्झ बँडमधून सरकारला बीएसएनएलकडून रु. १२८४५ कोटी प्राप्त.

तक्त्यातील ’S’ बँड फ्रिक्वेंसी सेवा जगभरात मोबाईलमधून ब्रॉडबँड इंटरनेट जोडणी देण्यासाठी, तसेच उपग्रहाद्वारे दळणवळणासाठी वापरली जाते. मोबाईल दळणवळणाच्या '4-G' तंत्रज्ञानापैकी WiMax आणि LTE (Long Term Evolution)  सेवा ही फ्रिक्वेंसी वापरतात.
S’ बँड पट्ट्यात मोठा स्पेक्ट्रम (सुमारे १९० मेगा हटर्झ) मोबाईल सेवेसाठी उपलब्ध होतो. भारतातील या १९० मेगा हटर्झ पट्ट्यापैकी १५० मेगा हटर्झ स्पेक्ट्रम अंतराळ खात्याला ३० वर्षांपूर्वी उपग्रह दळणवळणासाठी देण्यात आला आहे. उर्वरित ४० मेगा हटर्झपैकी २० मेगा हटर्झ स्पेक्ट्रम बीएसएनएल आणि एमटीएनएल ब्रॉडबँड सेवांसाठी देण्यात आला आहे. बीएसएनएलकडून यासाठी सरकारने १२८४७ कोटी रुपये मागितले आहेत. याउलट आता ओरड सुरू झालेल्या अँट्रिक्स-देवास करारानुसार अंतराळ विभागाच्या १५० मेगा हटर्झ स्पेक्ट्रमपैकी ७० मेगा हटर्झ स्पेक्ट्रम ‘देवास मल्टिमीडिया’ या खाजगी कंपनीस केवळ १००० कोटी रुपये दराने वापरण्यास देण्याचे ठरले आहे. आणि तेही कुठलेही टेंडर न काढता. यामुळेच हा मोठा घोटाळा आहे, हे स्पष्ट होते.
जागतिक स्तरावर ’S’ बँड स्पेक्ट्रम त्याच्या व्यापारी उपयोगांमुळे अतिशय मौल्यवान बनला आहे. बहुतेक देशातली सरकारे त्याची विक्री लिलावाने करतात. २००९ साली हॉंगकॉंगमध्ये ३ कंपन्यांनी ’S’ बँडमधील १० मेगा हटर्झ स्पेक्ट्रमसाठी १.५३ बिलियन हॉंगकॉंग डॉलर्स मोजले.
आता जगभरात ’S’ बँडवर आधारित '4-G' मोबाईल सेवा वापरात यायला लागल्या आहेत. म्हणूनच भारतातही या स्पेक्ट्रम फ्रिक्वेंसीला सोन्यापेक्षाही अधिक भाव आला आहे. साहजिकच त्यामुळे त्यात घोटाळे होण्याची शक्यताही वाढली आहे.
*********
जलार्पण, दफन की दहन?
अरुणाचलचे मुख्य मंत्री दोरजी खांडू यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सर्वविदित आहे. त्यांच्या शवाचा अंत्यसंस्कार कसा करायचा यावर तेथे वाद झाला.
श्री खांडू बौद्धधर्मातील, ‘मोन्या’ जमातीतील, ‘गेलुम्पा’ संप्रदायाचे आहेत. मोन्यांची, परंपरा म्हणा रूढी म्हणा, प्रेताचे नदीत जलार्पण करण्याची आहे.
परंतु, खांडू आधुनिक विचाराचे होते. पर्यावरणप्रेमी होते. त्यामुळे, त्यांच्या नातेवाईकांचा आणि मित्रांचा, प्रेताच्या जलार्पणाला विरोध होता. उरले दोन पर्याय दफन की दहन? याचा निर्णय स्थानिक लामांशी (बौद्धधर्मगुरू) विचारविनिमय करून घेऊ, असे त्यांनी ठरविले. लामांनी दहन संस्कारला अनुमती दिली. त्याप्रमाणे दि. १० मे ला, त्यांच्या पार्थिवावर दहनसंस्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मशालेवरून आलेले तिबेटी धर्मगुरूही उपस्थित होते. यावेळी सुमारे १० हजार लोक तेथे हजर होते. नवे मुख्य मंत्री जारबोम गॅमलीन यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांसह हजेरी लावली होती. राज्य सरकारतर्फे खांडूंना सरकारी इतमामात मानवंदना देण्यात आली.

(‘ईशान्य वार्ता’वरून साभार)


*********
वनवासी कल्याण आश्रमाची आरोग्यसेवा
नुकतेच विशाखापट्टण येथे वनवासी कल्याण आश्रमाचे एक आरोग्य शिबिर संपन्न झाले. त्या शिबिरात २५ राज्यांमधून आलेले ४५ डॉक्टर सहभागी होते.
तेथे वाचण्यात आलेल्या अहवालावरून हे कळले की, संपूर्ण भारतात, कल्याण आश्रमाद्वारे २४०० आरोग्य केंद्रे चालविली जातात. २०१० मध्ये या केंद्रांमधून १९ लाख ८ हजार ९१८ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

शिबिरात डॉ. अनुज सिंघल यांनी केरळातील ‘सिकलसेल’ या रोगाच्या प्रसाराबद्दल माहिती दिली. डॉ. शशी ठाकूर यांनी स्त्रियांच्या रोग-समस्या या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन केले. शिबिराचे उद्घाटन डॉ. पी. विश्‍वेश्‍वरराव यांनी केले. त्यांनीच या प्रकल्पाला १ लाख रुपयांची देणगीही दिली. याप्रसंगी कल्याण आश्रमाचे महासचिव कृपाप्रसाद सिंग आणि संघटनमंत्री सोमयाजुलूही उपस्थित होते.

*********
संकटप्रसंगी जपानी जनतेचे वर्तन
जपानवर भूकंपाने कहर केला. या घोर संकटप्रसंगी जपानी जनतेने कसे वर्तन केले, याचे एका नियतकालिकात सुरेख वर्णन करण्यात आले आहे. जपानी जनतेच्या दहा गुणांचे त्यांच्या वर्तनाने प्रकटीकरण केले आहे.

१) गांभीर्य- कुठेही छाती पिटून आकांत करण्यात आला नाही.
२) अनुशासन- पाणी आणि अन्य खाद्यपदार्थ प्राप्त करण्यासाठी सर्वत्र रांगा (क्यू) दिसून आल्या. कुणीही आरडाओरड केली नाही.
३) क्षमता- या घोर भूकंपातून इमारती हलल्या. पण पडल्या नाहीत. जपानच्या वास्तुनिर्माणतज्ज्ञांची ही किमया होती.
४) शहाणपण- लोकांनी, जेवढी त्यांना गरज होती, तेवढीच खरेदी केली. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या गरजेपुरते मिळू शकले.
५) सभ्यता- कोणतेही दुकान लुटले गेले नाही. रस्त्यावर वाहने धावत असताना, ती सारी रांगेत चालली. कोणत्याही वाहनाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. कुणीही कारचा भोंगा वाजविला नाही.
६) बलिदान- ५० कामगार, त्या मरणप्राय संकटप्रसंगी, प्राणांची पर्वा न करता, आण्विक संयंत्रांच्या (न्यूक्लिअर रिऍक्टर)जवळ थांबले. या संयंत्रांमध्ये घुसलेले पाणी त्यांनी पंपाद्वारे बाहेर काढले.
७) दया- कोणत्याही दुकानदाराने, संकटाचा फायदा घेऊन वस्तूंचे भाव वाढविले नाहीत. उलट, उपाहारगृहांनी तर आपल्या पदार्थांच्या किमती कमी केल्या. बाल आणि वृद्धांना, तरुणांनी अग्रक्रम दिला.
८) संस्कार- म्हातारे व मुले, यांनी त्यांच्याकडून जे अपेक्षित होते तेच केले. त्यांनी प्राप्त केलेल्या शिक्षणाचे प्रात्यक्षिकच जणू काही त्यांनी दाखविले.
९) संयम- प्रसारमाध्यमांनी दाखविलेला संयम वाखाणण्यासारखा होता. कुणीही सनसनाटी वृत्ते दिली नाहीत. सर्व वृत्तप्रसारण संयमाने केले.
१०) सद्वर्तन- एका रात्री अचानक वीज गेली होती. एका दुकानात बरेच ग्राहक जमले होते. कुणीही अंधाराचा लाभ घेऊन दुकानातील वस्तू लांबविल्या नाहीत. त्यांनी हाती घेतलेल्या वस्तू तेथेच ठेवून दिल्या.
उगीच नव्हे, सुमारे ६५ वर्षांपूर्वी अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेला जपान दिमाखाने जगातील आठ बड्या राष्ट्रांमध्ये गणला जातो.

(‘अनुलय-अनुबोध’वरून साभार)

*********

सेवाभारतीचा अनुकरणीय उपक्रम
राजस्थानमध्ये, त्याची राजधानी असलेल्या जयपुरात सेवा भारतीचे मुख्यालय आहे. या सेवा भारतीशीच संलग्न अशी ‘श्रीराम जानकी विवाह समिती’ नावाची एक समिती आहे. ती गरीब वस्तीतील मुला-मुलींचे सामूहिक विवाह संपन्न करीत असते. सर्व खर्च ही समितीच करीत असते.
या वर्षी, गेल्या मे महिन्यात २९ जोडप्यांचा या समितीने सामूहिक विवाहसोहळा साजरा केला. या जोडप्यांत दोन मुस्लिम जोडपीही होती.
२९ स्थांनांवरून नवरदेव मिरवत आले. नियोजित स्थळी पोचताच वधूच्या नातलगांनी आपापल्या रिवाजाप्रमाणे त्यांचे स्वागत केले. नंतर वरमाला समर्पणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर २७ हिंदू जोडप्यांचा पाणिग्रहणविधी पुरोहितांनी पार पाडला. मुस्लिम जोडप्यांचा विवाह त्यांच्या पद्धतीप्रमाणे झाला. या प्रसंगी ‘श्रीराम जानकी विवाह समिती’चे मुख्य संरक्षक महामंडलेश्‍वर आचार्य बालमुकुंदाचार्य आणि संत हरीशचंद्रदास महाराज यांची आशीर्वादपर भाषणे झालीत.

*********

-मा. गो. वैद्य

No comments:

Post a Comment