Saturday, 25 June 2011

मुंडे प्रकरणापासून काय शिकायचे?

रविवारचे भाष्य दि. २६ जून २०११ साठी...

    गोपीनाथ मुंडे यांचा बंडाचा झेंडा खाली आला, हे चांगले झाले. हे प्रकरण थांबले, पण शमले असेलच असे नाही. व्यक्तिगत अहंकाराने अभिभूत झालेल्या व्यक्तीचा तो अहंकार पुनः केव्हा उसळी मारील याचा नेम नसतो. तथापि, तूर्तास हे थांबले हे सर्वांच्याच हिताचे झाले. सर्वांच्या म्हणजे भाजपाच्या आणि स्वतः मुंडे यांच्याही.


जेथे धूर तेथे अग्नी
    मुंडे यांच्या नाराजीवरून अनेक तर्क करण्यात आले. नाना प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये आणि अन्य प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या. ते छगन भुजबळांना भेटले; राष्ट्रवादीचे अध्यक्ष मधुकरराव पिचड यांना भेटले; ते काँग्रेसमध्ये जाणार; स्वतःसाठी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद आणि आपल्या समर्थकांसाठी राज्य मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदे या त्यांच्या मागण्या होत्या; ते अहमद पटेलांनाही भेटले; पृथ्वीराज चव्हाण, मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशासंबंधी काँग्रेस हायकमांडशी बोलणी करण्याकरिता दिल्लीला गेले- वगैरे वगैरे. या सर्व अफवा होत्या असे म्हणता येईल काय? मुंडे म्हणतात त्यांची बदनामी करण्यासाठी पक्षातील त्यांच्या विरोधकांनी या बातम्या पेरल्या. मग मुंडेंनी लागलीच त्यांचा प्रतिवाद का केला नाही? खाली आग असल्याशिवाय धूर दिसायचा नाही हे सत्य आहे. धूर असेल, तर अग्नी असेलच. मात्र जेथे अग्नी असेल, तेथे धूर असेलच असे नाही. अफवा म्हणा बातम्यांच्या वावड्या म्हणा यांचा जो धूर दिसला, त्यावरून लोकांनी आपापले तर्क मांडले. ते अवास्तवही असू शकतात. पुष्कळदा खरी बातमी काढण्यासाठी वावडी सोडून देण्याची वृत्तपत्रीय चलाखी अप्रूप नाही. पण धूरच नव्हता, तो काल्पनिक होता, असे मुंडे यांना म्हणावयाचे आहे काय?


पक्षसंघटनेला स्थान कोणते?
    पण ते तसे म्हणू शकणार नाहीत. कारण आपल्या काही व्यथा आणि वेदना आहेत, असे त्यांनी स्वतःच म्हटलेले आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, मला स्वतःला काहीही मागावयाचे नाही. माझी नाराजी माझ्यासाठी नाही. कार्यकर्त्यांच्या मनात काही वेदना आहेत, त्यांची दखल घेतली गेली पाहिजे. माझा प्रश्न असा आहे की, हे कार्यकर्ते कुणाचे आहेत? भाजपा या पक्षाचे की गोपीनाथजी मुंडे या व्यक्तीचे? ते स्वतःला भाजपाचे कार्यकर्ते समजत असतील, तर त्यांनी आपली तक्रार भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडे करावयाला हवी होती. पण तसे काही केल्याची वार्ता नाही. प्रदेशाध्यक्षांकडून त्यांना न्याय मिळाला नसेल, तर ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे जाऊ शकतात. पक्षाचे एक संघटन आहे; जसे राज्य पातळीवर आहे, तसेच केंद्रीय पातळीवरही आहे. तेथेही न्याय मिळाला नाही, आणि संघटनेतील पदाधिकार्‍यांच्या वागणुकीमुळे त्यांची घुसमटच होत राहिली, तर त्यांना पक्ष सोडून जाण्याचा अधिकार आहे. या सामान्य आणि सर्वमान्य प्रक्रियेचा त्यांनी अवलंब केल्याचे दिसत नाही. आपण अशी कल्पना करू की, भाजपाच्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदी मठकरी यांची नियुक्ती केली आणि गोगावले यांना डावलले, हा अन्याय झाला, तर गोगावलेंनी तक्रार करावयाला हवी. गोपीनाथजींनी त्यात पडण्याचे कारण काय? आणि कारणच असले, तर ते हे आहे की, गोगावले मुंडे गटाचे आहेत; मठकरी तसे नाही. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीवरूनही वाद झाला होता. मधु चव्हाण यांची त्या पदावरील निवडणूक मुंडे यांना पसंत नव्हती. प्रकरण लालकृष्ण अडवाणींपर्यंत गेले. त्यांचे वजन आणून चव्हाण यांना हटविण्यात आले. कुणी शेट्टी त्यांच्या जागी अध्यक्ष बनले. त्यावेळी जे साधले गेले, ते यावेळी साधले गेलेले दिसत नाही; म्हणून गोपीनाथजींनी ही आदळआपट केली, असा कुणी निष्कर्ष काढला, तर त्याला दोष देता येईल काय?


कार्यकर्ते! पण कुणाचे?
    वरच्या परिच्छेदात मी एक प्रश्न उपस्थित केला आहे. नाराज कार्यकर्ते कुणाचे? मुंडे यांचे की भाजपाचे? प्रश्नाचे उत्तर अवघड नाही. मुंडे त्यांना आपले कार्यकर्ते मानतात. म्हणजे मुंडे पक्षात आपला एक गट निर्माण करून कार्य करतात. त्यांना संपूर्ण पक्षाच्या हिताशी काही देणेघेणे नाही. ही गोष्ट पक्षाच्या हिताची समजायची काय? मुंडे, आता, महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत, अशी बातमी प्रकाशित झाली आहे. चांगली गोष्ट आहे. पण ते या दौर्‍यात काय सांगणार आहेत? भाजपाला मजबूत करावयाला की विशिष्ट गटाला मजबूत करण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे? मुंडे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात. संपूर्ण भारतीय समाजाचे नेते का नाही स्वतःला समजत? राजकारणाचे वास्तव विसरून चालता येणार नाही, एवढे समजूनही घेता येईल. पण जे वास्तव आहे, तेच निरंतर व चिरंतन कायम राहिले पाहिजे की, त्या वास्तवाच्या वर जे उन्नत आणि उदात्त आहे, समग्रतेचे जे भान आहे, त्या दृष्टीने पावले पडली पाहिजेत? एका काळी अस्पृश्यतेचे पालन हे वास्तव होते. थांबलो का आपण त्या वास्तव बिंदूपाशी, की पुढे सरकलो? हे पुढे सरकणे प्रगती आहे की अधोगती? इतक्या वर्षांपासून भाजपामध्ये मोठमोठ्या पदावर कार्य करणार्‍या त्यांच्यासारख्या नेत्याला याचे भान राहू नये याचे कुणाला नवल वाटणार नाही? मायावती, मुलायमसिंग, लालूप्रसाद यांचे जसे जातीय राजकारण चालू असते, तसेच राजकारण भाजपाने करावे, हे गोपीनाथजींना अभिप्रेत आहे काय? मग जनगणनेत जातीचा उल्लेख हवाच हा त्यांचा आग्रह का? १९४१ च्या जनगणनेपासून २००१ च्या जनगणनेपर्यंत, जातीचा उल्लेख नसल्यामुळे, समाजाचे- संपूर्ण हिंदू समाजाचे -कोणते नुकसान झाले? विचार समग्र समाजाचा असला पाहिजे की नाही? की विशिष्ट जातींची मतपेढी तयार करण्याचा विचार असावा?


संघटन म्हणजे काय?
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करण्याचे व्रत स्वीकारून कार्यरत आहे. समाज व्यामिश्र असतो. त्याच्या जीवनाची अनेक क्षेत्रे असतात. राजकीय हे त्यातले एक क्षेत्र. ते महत्त्वाचे आहे; पण एकमात्र नव्हे. धर्म, शिक्षण, अर्थ अशी अनेक क्षेत्रे आहेत. एकेका क्षेत्राची अनेक उपक्षेत्रे आहेत. समाजजीवनाचे घटकही अनेक असतात. विदयार्थी, नोकरदार, शेतकरी, यंत्रकामगार, छोटे छोटे दुकानदार, महिला- असे किती तरी. संपूर्ण समाजाचे संघटन याचा अर्थ या सर्व क्षेत्रांचे आणि घटकांचे संघटन. आणि संघाचा, संघटनेचा अर्थ आहे, प्रत्येक क्षेत्र, राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानाने अनुप्रणित आणि त्यात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या चारित्र्याने प्रकाशित होणे. या उद्देशानेच तर दीनदयाल उपाध्याय, नानाजी देशमुख, अटलबिहारी वाजपेयी, जगन्नथराव जोशी, सुंदरसिंह भंडारी, कुशाभाऊ ठाकरे प्रभृती श्रेष्ठ दर्जाचे प्रचारक संघाने या राजकीय क्षेत्रासाठी मोकळे केले; आणि त्यांनी प्रथम भारतीय जनसंघ वाढविला आणि नंतर त्यातून भारतीय जनता पार्टी हा नवा अवतार निर्माण झाला. भाजपातही, आजही संघाचे अनेक प्रचारक कार्य करीत आहेत. ते कोणत्या पदांची अपेक्षा करीत आहेत? ते पद मिळाले नाही, तर कुणी कधी अकांडतांडव केले आहे काय? मला माहीत नाही गोपीनाथींसमोर कोणता आदर्श आहे? एका जातीचे किंवा जातिसमूहाच्या हिताचे राजकारण करणे म्हणजे ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी, पदाची, सन्मानाची, एवढेच काय पण नावलौकिकाचीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी कार्य केले आहे, त्यांचा अपमान करणे आहे. त्यांनी का म्हणून अशा संकुचित  विचाराच्या लोकांसाठी पायाचे दगड बनून आत्मलोपी बनावे? सांगा, मुंडेसाहेब या प्रश्नाचे तुमच्याजवळ कोणते उत्तर आहे?


चिखल साफ करण्यासाठी
    राजकारण सत्तेसाठी असते हे खरे आहे. पण ते काय केवळ सत्तेसाठीच असते? की त्या राजकारणालाही काही सिद्धांत असतात, त्या सिद्धांतांना मूर्तरूप देण्यासाठी काही धोरणे असतात, ती धोरणे अंमलात आणण्यासाठी काही कार्यक्रम असतात? या सर्वांचे उद्दिष्ट राष्ट्राचे हित हे असते; नव्हे तेच असले पाहिजे. सर्वांना याची जाणीव आहे की, सत्ता माणसाला भ्रष्ट करते. सध्या आपल्या देशाचे राजकारण भ्रष्टाचाराने किती बरबटलेले आहे, याची सर्वांना कल्पना आहे. ही घाण कोण आणि कोणत्या पद्धतीने दूर करणार? घाण साफ करण्यासाठी घाणीत उतरावेही लागते. त्यामुळे, त्या घाणीचे काही शिंतोडे अंगावर उडूही शकतात. पण घाण साफ करण्यासाठी त्या  चिखलात उतरलेल्यांनी त्या चिखलातच आनंद मानायचा काय? की घाण साफ करण्याचा हेतू ठेवून तीत उतरायचे? साफ करण्याचे उद्दिष्ट असेल तर स्वच्छ पाण्याचा प्रवाहही सोबत असला पाहिजे. हा स्वच्छ प्रवाह असतो, सिद्धांतांवर निष्ठा आणि त्या सिद्धांतांचे सतत स्मरण आणि ते व्रत घेतलेल्यांचे चारित्र्य. यात उतरलेले सारेच जण कसे वागतात, संकुचित स्वार्थाने प्रेरित कोणते चाळे करतात, याची उदाहरणे आम्हाला दिसतात, आम्हीही तसेच वागलो, तर बिघडले कुठे, असे म्हणून चालायचे नाही. मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक कोणता? वेगळ्या प्रकारचा पक्ष- 'पार्टी विथ्‌ अ डिफरन्स'- असे म्हणता ना! मग तुमचे वेगळेपण कोणते? आणि कोणत्याही स्वार्थाने म्हणा, लालसेने म्हणा, हे वेगळेपण तुमचे संपलेले असेल, तर, ज्यांच्या मनात सत्ता मिळविण्याचा विचारही आलेला नाही, अशा समाजाने, तुमचे समर्थन का करावे? तुमच्याविषयी सहानुभूती तरी का बाळगावी?


संघटनेच्या भल्यासाठी
    ज्या कार्यकर्त्यांच्या वेदनांनी गोपीनाथजी व्यथित आहेत, त्यांची कोणती व्यथा आहे? ईप्सित पद मिळाले नाही, हीच की नाही? आणि पदाची लालसा का? प्रतिष्ठा मिळावी म्हणून की पैसा मिळावा म्हणून? की दोन्ही मिळावीत म्हणून? संघटनेतील पद हे पक्षाची शक्ती आणि व्यापकता वाढविण्यासाठी उपयोगात आणायचे असते. आमदारकी, खासदारकी, निदान जि. प.चे पद किंवा एखादया सरकारी यंत्रणेतील आयोगाचे पद मिळविण्यासाठी, एक शिडी, एक पायरी, असा संघटनेतील पदाचा अर्थ झाला आहे. म्हणूनच एखादया नगराच्या अध्यक्षपदावर नेमणूक न झाल्याबद्दल आदळआपट आहे, असे समजणे चूक ठरेल काय? भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने, या दृष्टीने आपल्या पक्षाची संघटनात्मक बाजू बळकट करण्याचे धोरण अवलंबिले पाहिजे. या दृष्टीने पक्षाच्या विमान संविधानाचे पुनरीक्षण केले पाहिजे. असा आचरण-व्यवहार प्रस्थापित केला पाहिजे की, संघटनेत पदाधिकारी राहूनही किंवा कोणतेही पद नसतानाही, पक्षाचे कार्य करता येऊ शकते, असे कार्यकर्त्यांना वाटेल. कम्युनिस्ट पक्षाकडे बघा ना. मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस श्री प्रकाश कारत, हे ना आमदार आहेत, ना खासदार. उजव्या कम्युनिस्टांचे सर्वोच्च नेते अर्धेंदुभूषण बर्धनही ना आमदार आहेत, ना खासदार. पक्षातील गटबाजीला स्वाभाविकपणे आळा बसण्यासाठी हेही एक उत्तम साधन आहे. भाजपानेही त्या दृष्टीने विचार करावयाला हवा, असे मला वाटते.


संघापासून शिकण्यासारखे
    संघापासून आणखी एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ''मैं नहीं, तू ही''- या श्रीगुरुजींच्या आदर्शवचनात तिचे सार दडलेले आहे. स्वतःचा, आपल्या पुत्रपुत्रीचा, भावाबहिणींचा, भाच्या-पुतण्याचा विचार करण्याऐवजी, निदान लाभार्थी पदासाठी तरी पक्षातील अन्य कार्यकर्त्यांचा विचार प्रथम मनात आला पाहिजे. नेत्याचे नातलग असणे, ही अपात्रता मानण्याची आवश्यकता नसली, तरी प्रथम अन्यांचा विचार झाला पाहिजे. घराणेशाहीवर हा उपाय आहे. मुलायमसिंगानंतर त्यांचा मुलगा, लालूप्रसादानंतर राबडीदेवी, प्रकाशसिंग बादलानंतर त्यांच मुलगा, करुणानिधीनंतर स्टॅलिन, बाळासाहेब ठाकरेनंतर उद्धवजी, पं. जवाहरलाल नेहरूनंतर इंदिराजी, इंदिराजीनंतर राजीवजी, त्यांच्यानंतर सोनियाजी आणि त्यांच्यानंतर राहुल गांधी- अशीच परंपरा राहिली, तर घराणेशाहीपासून राजकीय क्षेत्राची सुटका होऊ शकेल काय? निदान भाजपाने तरी वेगळी परंपरा पाडली पाहिजे. श्रेष्ठ-कनिष्ठता ही सरकारी कर्मचार्‍यांमध्ये असते. पक्षसंघटनेत ती असता कामा नये. संघातलेच उदाहरण देतो. बाळासाहेब देवरस सरसंघचालक असताना, प्रो. राजेंद्रसिंग ऊर्फ रज्जूभैया सरकार्यवाह होते. नऊ वर्षे ते त्या उच्च पदावर होते. नंतर त्यांनीच शेषाद्रींचे नाव सुचविले आणि स्वतः ते त्यांचे सहकारी- सहसरकार्यवाह- बनले. त्यामुळे रज्जूभैयांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उत्पन्न झाले काय? त्यांची प्रतिष्ठा कमी झाली काय? नाही. त्या दुय्यम पदावर असलेल्यांचीच, बाळासाहेबांनी, आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. अर्थात्‌ संघाच्या संविधानाप्रमाणे सहकार्‍यांशी विचारविनिमय करून.


गोपीनाथजींकडून अपेक्षा
    इंग्लंडमध्येही असे घडले आहे. द्वितीय महायुद्ध सुरू झाले, तेव्हा चेंबरलेन प्रधानमंत्री होते. इंग्लंडचा हिटलरकडून पराभव होत असताना, सत्तारूढ पक्षाला वाटले की, प्रधानमंत्री बदलवावा. त्यानंतर चर्चिल प्रधानमंत्री झाले; आणि विशेष म्हणजे स्वतः चेंबरलेन त्यांच्या मंत्रिमंडळात एक साधे मंत्री म्हणून सामील झाले! एका काळी काँग्रेस पक्षाही अशी प्रथा होती. दरवर्षी पक्षाचा अध्यक्ष बदलायचा. पूर्वीचा अध्यक्ष, पक्षाच्या कार्यकारी मंडळात एक सदस्य म्हणून सामील व्हायचा. श्रीमती इंदिरा गांधींनी ती प्रथा मोडली. त्याच प्रधानमंत्री व त्याच पक्षाध्यक्ष बनल्या. राजीवजींनी व त्यांच्यानंतर नरसिंहरावांनीही तीच परंपरा चालू ठेवली. सोनियाजीही त्याच परंपरेला पाळणार्‍या आहेत. फक्त त्यांच्या दुर्दैवाने त्यांना प्रधानमंत्री बनता आले नाही. राहुल गांधींच्या रूपाने ती उणीव त्या भरून काढणार आहेत. भाजपाने नवीन आदर्श प्रस्तुत केले पाहिजे. नवीन परंपरा पाडली पाहिजे. वेगळ्या प्रकारचा पक्ष अशी त्याची प्रतिमा जनमानसात ठसली पाहिजे.

मुंडे प्रकरणानंतर हे बदल होतीलच असे नाही. पण स्वतः मुंडे नवे पायंडे पाडू शकतात. ते आता महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. त्या दौर्‍यातून हे जाणवले पाहिजे की, ते पक्ष मजबुतीचा विचार करीत आहेत, आपल्या गटाच्या मजबुतीचा नाही. कार्यकर्त्यांचाच पक्ष बनत असतो. तरी पण कार्यकर्त्यांपेक्षा पक्ष मोठा असतो, हे सर्व कार्यकर्त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. बघायचे मुंडे यांच्यासारखे अनुभवी उच्चपदस्थ नेते कसे वागतात ते.

                                        -मा. गो. वैदय
    नागपूर
    दि. २५-०६-११

No comments:

Post a Comment