Saturday, 16 July 2011

जिहादी आतंकवादाचा बंदोबस्त कसा करता येईल?

रविवारचे भाष्य दि. १७ जुलै २०११ साठी
‘देशाची आर्थिक राजधानी’ असा लौकिक असलेले मुंबई शहर पुन: क्रूर जिहादी आतंकवादाने हादरलेले आहे. हे खरे आहे की, जवळजवळ अडीच वर्षांनंतर, मुंबईत हा आतंकी हल्ला झाला. पण याबद्दल कुणीही आपली पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही किंवा पाकिस्तानशी आपली तुलनाही करण्याचे प्रयोजन नाही. गृहमंत्री चिदंबरम् असोत की, कॉंग्रेसचे बडबोले सरचिटणीस दिग्विजयसिंग असोत अथवा युवराज राहुल गांधी असोत, यांच्या वक्तव्यात सत्यता असली, तरी ती वक्तव्ये समयोचित नाहीत. एवढेच नव्हे तर सरकार हतबल झालेले आहे आणि त्या सरकारातील धुरीणांची जबाबदारी स्वीकारणारा कॉंग्रेस पक्ष किंकर्तव्यमूढ झाला आहे, याची ती कबुली देणारी आहेत.
आघातलक्ष्य अमेरिका
हे खरे आहे की, पाकिस्तानात दर आठवड्याला असे स्फोट होत असतात. पण हे केव्हापासून आणि कशाकरिता? पाकिस्तानचे विद्यमान सरकार हे अमेरिकी सरकारच्या हातचे बाहुले बनलेले आहे, याचा निषेध करण्यासाठी ते हल्ले आहेत. त्यात मारणारे व मरणारे दोघेही मुसलमानच आहेत. तरी ते हल्ले होत आहेत आणि अमेरिकेने, पाकिस्तानला, पाकिस्तानच्या लष्कराला आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला अंगठा दाखवून अल-कायदा या हिंसक, आतंकवादी संघटनेचा क्रूर म्होरक्या ओसामा बिन लादेन याची वासलात लावली, एवढेच नव्हे तर इस्लामी धर्मसूत्राची ऐसीतैसी करीत त्याचे प्रेत समुद्रात फेकून दिले, याचा हा सूड आहे. पाकिस्तानातील स्फोटात मरणारे मुसलमान असले, तरी जिहादी आतंकवाद्यांचे ते आघातलक्ष्य नाही. आघातलक्ष्य आहे अमेरिका. हा मूलभूत फरक ध्यानात न घेता भारताची पाकिस्तानशी तुलना करणे, धादांत मूर्खपणा आहे.
अमेरिकेचा वचक
या मंडळींनी तसेच सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याच मनात विचार करावा की, अमेरिकेवर तो जिहादी हल्ला झाल्यानंतर आज जवळजवळ दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ काळात, त्या देशावर पुन: हल्ला का होऊ शकला नाही? जिहादी आतंकवाद्यांना अमेरिकेचा पुळका आला होता म्हणून काय? कॉंग्रेसच्या धुरीणांनी, आणि संपुआ सरकारतील श्रेष्ठींनी या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे. अमेरिकेने आपला धाक बसविला म्हणूनच हे होऊ शकले, हे त्या प्रश्‍नाचे सरळ निस्संदिग्ध उत्तर आहे. अमेरिकेवर हल्ल्याचा कट रचणारा ओसामा, अफगानिस्थानात लपून बसला आहे, हे कळताच, अमेरिकेने अफगानिस्थान भाजून काढला. तेथील तालीबानी राजवट उलथवून टाकली; आणि ओसामा तेथे सापडला नाही म्हणून अमेरिकेचे सरकार चूपही बसले नाही. मध्यंतरीच्या काळात अमेरिकेत सत्तापालट झाला. रिपब्लिकन पार्टीऐवजी डेमोक्रॅटिक पार्टीचा नवा अध्यक्ष बनला. बुश गेले आणि ओबामा आले. पण म्हणून अमेरिकेच्या जिहादी आतंकवादाविरुद्धच्या धोरणात बदल झाला नाही. नव्या प्रशासनाला जाणवले की, ओसामा पाकिस्तानात दडलेला आहे, म्हणून त्याने पाकिस्तानला ते कार्य निपटण्याची विनंती केली. पण, पाकिस्तान, आपल्या शब्दाला जागणारे नाही, हे ध्यानात येताच, पाकिस्तानची म्हणजे तेथील सरकारची व लष्कराची पर्वा न करता, ओसामाचा काटा ठेचून काढला. चीन पाकिस्तानचा मित्र आहे ना! तो का गप्प बसला? निदान अमेरिकेचा जोरदार निषेध तरी त्याने करावयाला हवा होता की नाही? पण तसे काही घडले नाही. कारण, अमेरिकेचा धाक आहे, वचक आहे. तो त्याने आपल्या कृतीने निर्माण केला आहे.
संधी गमाविली
आपल्या देशातील सरकारांना हे का सुचू नये? तशी नामी संधी रालोआ सरकारच्या काळातील कारगील युद्धाच्या वेळी आली होती. तेव्हा आगळीक करणारे पाकिस्तान होते. जिहादी आतंकवाद्यांची प्रशिक्षणस्थळे, पाकिस्तानने जबरदस्तीने लाटलेल्या काश्मीरच्या प्रदेशात होती. तो प्रदेश आपला आहे, याबाबतीत देशात सर्वांचे एकमत होते आणि आजही आहे. मग नियंत्रणरेषा ओलांडून आपल्या विमानदलाने त्या स्थळांवर हल्ले का केले नाहीत? आपण बचावाची लढाई का लढलो? आपण अगदी प्रारंभालाच, आपल्या पैदल सैन्याला विमानदलाचे संरक्षण का देऊ शकलो नाही? आपण, ते नंतर दिले हे खरे आहे. पण हवाईदलातील बर्‍याच उंच पदावरून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकार्‍याने, प्रारंभी हवाईदलाचा वापर न केल्याची तक्रार माझ्याशी बोलण्यात केली होती. कुणाची भीती आपणांस त्यावेळी वाटली? अमेरिकेची की पाकिस्तानची? हे खरे आहे की, अमेरिकेने पाकिस्तानच्या या आगाऊ, बेकायदा कृत्याची दखल घेतली आणि पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री नवाज शरीफ यांना वॉशिंग्टनमध्ये बोलावून व त्यांचे हात पिरगाळून, पाकिस्तानला आपली सेना मागे घ्यावयाला भाग पाडले. पाकिस्तानच्या सेनेला हा आपला अपमान वाटला आणि तिच्या प्रमुखाने- परवेझ मुशर्रफ याने- नवाज शरीफ यांचीच उचलबांगडी केली. काय केले अमेरिकेने नवाज शरीफ यांच्याबाबत? हे खरे आहे की, त्यावेळी पाकिस्तानवर अमेरिकेची कृपा होती; अमेरिकेवर आतंकी हल्ला झाला नव्हता. कदाचित त्यावेळी अमेरिकेने नंतर हस्तक्षेप केलाही असता. पण सुरवातीचे दोन-चार दिवस आपण का विलंब लावला? खुल्या युद्धात, तीन वेळा पाकिस्तानला, आपल्या शूर सैन्याने पाणी पाजले होते. आपली सेना तेव्हाही आपला पराक्रम दाखवू शकली असती. पाकिस्तानला आणि आपल्या विरुद्ध छद्मयुद्धाची आखणी आणि प्रयोग करणार्‍या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला आणखी आतंकी कारवाया चालू ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागला असता. हे मान्यच करावयाला पाहिजे की, कारगीलबाबत तत्कालीन रालोआ सरकारने तडजोड केली नाही. कारगील अजूनही आपल्याच ताब्यात आहे. जम्मू-काश्मीर राज्याचाच तो भाग आहे.
चिंता मतपेढीची
परंतु, जे कार्य, रालोआ सरकार करू शकले नाही, ते संपुआ सरकारने करू नये असे थोडेच आहे. जुन्या सरकारवर मात करण्याची, त्याच्या तुलनेत श्रेष्ठत्व प्रकट करण्याची ही संधी संपुआने का दवडावी? पण ‘यस्मिन् कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते’ म्हणजे ज्या कुळात तू जन्मलास, त्या कुळात हत्ती मारला जात नाही, हा जो उपदेश सिंहिणीने पाळलेल्या कोल्ह्याला केला, तोच संपुआला आणि विशेषत: कॉंग्रेस पक्षाला लागू आहे. जेथे कुठे मुसलमानांचा संबंध येतो- आणि जिहादी आतंक हा मुस्लिम धर्ममतावर आधारलेला व पोसलेला आहे- तेथे कॉंग्रेस पक्ष अगदी लुळा पडून जातो. त्याच्या ठिकाणी, थोडे जरी धैर्य असते, देशाच्या इभ्रतीची जराही तमा असती, तर संसदेवरील- आजकाल संसदेच्या सार्वभौमत्वाची चर्चा चालू आहे ना, म्हणून म्हणतो सार्वभौम संसदेवरील- हल्ल्याच्या अपराधासाठी ज्याला मृत्युदंडाची शिक्षा झालेली आहे, जिच्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, तो अफजल गरू अजून जिवंत राहू शकला नसता; अडीच वर्षांपूर्वीच्या मुंबईवर केलेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी कसाब तुरुंगाचा पाहुणचार घेत स्वस्थ जीवन जगू शकला नसता; किंवा कर्नाटकात बॉम्बस्फोट घडवून आणणारा अब्दुल नासेर मदानी या गुंडाला तुरुंगातही सरकारी पाहुण्याची बडदास्त लाभू शकली नसती. हे संपुआचे सरकार राष्ट्रहिताचे, राष्ट्रात चैतन्य संचरविणारे कार्य हाती घेऊच शकत नाही. त्याला म्हणजे त्यातल्या प्रमुख घटक असलेल्या कॉंग्रेस पक्षाला आपली अल्पसंख्यकांची मतपेढी कशी कायम राहील याचीच चिंता आहे. एरवी, त्या पक्षाचे सरचिटणीस त्या क्रूरात्म्याला ‘ओसामाजी’चा गौरव देऊच शकले नसते. ओसामाचे प्रेत समुद्रात फेकून दिल्याबद्दल दु:ख त्यांनी प्रकट केले नसते किंवा बटालात मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांच्या कुटुंबीयांच्या समाधानासाठी ते धावूनही गेले नसते. म्हणून हे सरकार बदलविणे अत्यंत गरजेचे व निकडीचे झाले आहे.
मानसिक परिवर्तन
सरकार म्हणजे सरकारी यंत्रणा आपले काम करील. त्या यंत्रणांनी ते करावेच. मुंबईवरील या हल्ल्याचे गुन्हेगार शोधून काढलेच पाहिजेत. पण समाजाचीही काही कर्तव्ये आहेत. विशेषत: मुस्लिम समाजाची. हे खरे आहे की, १५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वी, भारतातील मुसलमानांची जी मानसिकता होती, ती आता राहिलेली नाही. इतिहास सर्वांना माहीत आहे की, १९४६ साली झालेल्या केंद्रीय असेम्ब्लीच्या निवडणुकीत, कॉंग्रेसतर्फे अखंड भारत, तर मुस्लिम लीगतर्फे भारताची फाळणी व पाकिस्तानची निर्मिती, ही घोषवाक्ये होती. त्या निवडणुकीत, भारतातील ८५ टक्के मुसलमानांनी फाळणीच्या बाजूने म्हणजे पाकिस्तानसाठी मतदान केले होते आणि केवळ १५ टक्क्यांनी अखंड भारताच्या बाजूने. त्यावेळी मुसलमानांसाठी वेगळे मतदारसंघ होते. उमेदवारही मुसलमान आणि मतदारही मुसलमानच, अशा प्रकारचे ते स्वतंत्र मतदारसंघ होते. या सर्व मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसचेही मुस्लिम उमेदवार उभे होते. पण त्यापैकी एकही निवडून आला नाही. या निवडणुकीतील अत्यंत आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ९५ टक्के मुसलमानांची संख्या असलेल्या वायव्य सरहद्द प्रांतात, मुसलमानांनी बहुसंख्येने कॉंग्रेसला म्हणजे अखंड भारतासाठी मतदान केले होते. १५ ऑगस्टला फाळणी झाली. या पाकिस्तानवादी मुस्लिमांपैकी फारच थोडे पाकिस्तानात गेले. बहुसंख्य म्हणजे ९० टक्क्यांहून अधिक भारतातच राहिले. पाकिस्तानात गेलेल्यांची सध्या काय दुर्गती आहे, हा एक वेगळा विषय आहे. तो येथे प्रस्तुत नाही. पण कॉंग्रेसने, ज्या १५ टक्क्यांनी त्याला मतदान केले होते, त्यांना मजबूत करण्याऐवजी, जे पाकिस्तानवादी होते, त्यांची खुशामत सुरू केली. कारण ती मोठी मतपेढी होती. त्या पेढीपुढे १५ टक्क्यांचे महत्त्व तरी कोणते? पण आता ती पिढी समाप्त झाली आहे. मुसलमानांमध्येही परिवर्तन आले आहे. हा परिवर्तनाचा प्रवाह अजूनही म्हणावा तसा प्रभावी नाही, हे खरे आहे. पण याला कारणीभूत आपल्या देशातील तथाकथित सेक्युलर पक्षच आहेत. त्यांनी मतपेढीचा लोभ सोडला तर हा मानसिक परिवर्तनाचा प्रवाह अधिक जोर पकडू शकतो. तथापि, कॉंग्रेस किंवा अन्य तथाकथित सेक्युलर पक्ष यांच्याकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. मुस्लिम समाजानेच अग्रेसर होऊन हा प्रवाह बलवान केला पाहिजे. या नव्या पिढीच्या हे नक्कीच लक्षात आले असेल की, पाकिस्तानात काय स्थिती आहे. पाकिस्तानातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या कराची शहरात, केवळ एक आठवड्यापूर्वीच दंगा झाला. त्यात जवळजवळ शंभर लोक मारले गेले. अखेरीस सरकारला, देखताक्षणीच गोळी घालण्याचा आदेश द्यावा लागला. कुणामध्ये झाला होता हा दंगा? हिंदू आणि मुसलमानांत? नाही. तेथे दंगेखोरांना, दंगा करून ठार करण्यासाठी हिंदू उरलाच नाही. दंगा मुसलमानांच्या दोन गटांत झाला होता; आणि त्यांनी एकमेकांना ठार केले. मला नाही वाटत की, भारतातील बहुसंख्य मुसलमानांना आपण पाकिस्तानात जावे, असे वाटत असेल.
मुस्लिमांकडून अपेक्षा
मात्र पाकिस्तानसमर्थक मुस्लिम अजून भारतात आहेत. काश्मीरच्या खोर्‍यात तर त्यांची संख्या बरीच आहे. हुरियत कॉन्फरन्सच्या उग्रवादी गटाचे नेते सय्यद अली गिलानी हे पाकसमर्थकांचे पुढारी आहेत. भारताच्या अवशिष्ट भागातही या वृत्तीचे लोक आहेत. त्यांच्याकडूनच लष्कर-ए-तयबा, इंडियन मुजाहिदीन किंवा सिमी किंवा अन्य नावांनी आतंकवादी कारवाया करणार्‍या संस्थांच्या कार्यकर्त्यांना आश्रय मिळतो. त्यांच्याकडूनच, पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन येणार्‍या आतंकवाद्यांना हवी ती माहिती पुरविली जाते. गुप्तपणे वावरणार्‍या या मंडळींचा शोध घेणे सरकारी गुप्तचर यंत्रणेला सोपे नाही. पण मुस्लिम समाजातील भारतनिष्ठांना ते तेवढे कठीण नाही. त्यांनी या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे. आवश्यक ती माहिती, सरकारी यंत्रणेला दिली पाहिजे. कोण पाकसमर्थक आहेत आणि कोण तसे नाहीत, हे त्यांना नक्कीच माहीत असू शकते. आपल्या मोहल्ल्यात कोण परके आलेले आहेत, हेही त्यांच्या दृष्टीत येऊ शकते. त्यांच्या या माहितीचा उपयोग गुप्तचर यंत्रणेला होऊ शकतो. त्यांची ही कृती मुस्लिमविरोधी समजली जावयाची नाही. उलट, जे थोडे आतंकवादी आपल्या क्रूर आणि हिंस्र कारवायांनी संपूर्ण मुस्लिम समाजाला संशयाच्या घेर्‍यात आणतात, त्यांच्या विरुद्ध ही कृती राहील. आज अमेरिकेत आणि संपूर्ण युरोपात सर्वच मुस्लिमांकडे संशयाच्या नजरेने बघितले जाते. त्यांच्यावर विविध प्रकारची बंधने लादली जात आहेत. अगदी मशिदीच्या मनोर्‍याच्या उंचीसंबंधीही स्वित्झरलंडसारख्या जिहादी आतंकवादापासून अलिप्त असलेल्या देशांनाही मुस्लिमविरोधी पवित्रा घ्यावा लागला आहे. निदान भारतातील मुस्लिम समाज तरी या संशयाच्या घेर्‍यात राहू नये, असे आम्हाला वाटते. सध्या तो आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. पण अधिकांश मुसलमान भारतनिष्ठ आहेत, हेही सत्य आहे. त्यांनी साठ वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांच्या फुटीर वारशाचा परित्याग केला आहे. ओसामा बिन लादेन याच्या हत्येनंतर म. प्र.तील अनेक शहरांत मुसलमानांनी आनंदोत्सव साजरा केल्याची चित्रे मी बघितली आहेत. ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’ मुस्लिम समाजाला राष्ट्रहिताशी, राष्ट्रभावनेशी तसेच पंथनिरपेक्ष लोकशाही मूल्यांशी जोडून ठेवण्यासाठी कसा प्रयत्नशील आहे, हेही मला ज्ञात आहे. देवबंदच्या फतव्याला न जुमानता, या मंडळींनी, अनेक ठिकाणी ‘वंदे मातरम्’चे गायन केले होते. ‘देवबंद’च्या कट्टरतेपासून बरेलवीवाले स्वत:ला दूर करीत आहेत, हेही मला माहीत आहे. या सर्वांनी एकत्र येऊन किंवा स्वतंत्रपणे पुढाकार घेऊन पाकसमर्थक मानसिकतेतून आपल्या समाजाच्या त्या हिश्श्याला दूर करण्याचे, जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. ते ‘जिहाद’चा अर्थ आपल्या समाजाला समजावून सांगू शकतात आणि तेच केवळ आपल्या समाजालाच नव्हे, तर आपल्या इस्लामलाही बदनामीपासून वाचवू शकतात.

   
       -मा. गो. वैद्य
नागपूर
दि. १६-०७-२०११

No comments:

Post a Comment