Saturday, 30 July 2011

येदीयुरप्पांचे नखरे चालू देऊ नका!

रविवारचे भाष्य दि. ३१ जुलै २०११ करिता 

 कर्नाटक राज्याचे मुख्य मंत्री बूकनकेरे सिद्धलिंगप्पा येदीयुरप्पा यांनी अद्यापि राजीनामा दिलेला नाही. ते उद्या रविवारी दुपारी १ वा. राजीनामा देणार आहेत, अशी वार्ता नुकतीच दूरदर्शनवर झळकली. त्यांना म्हणे त्यांच्या पसंतीचा मुख्य मंत्री हवा आहे. मुख्य मंत्र्याची निवड करावयाचीच झाली, तर आमदारांनी करावी. ज्याच्या बाजूला बहुमत असेल, तो मुख्य मंत्री बनेल. राजकीय लोकशाही प्रणाली धरून केलेला हा निर्णय राहील. नवा मुख्य मंत्रीही येदीयुरप्पांसारखाच भ्रष्टाचाराकडे झुकलेलाच असेल, तर भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी सरळ विधिमंडळ पक्ष बरखास्त करावा. येदीयुरप्पा किंवा त्यांचा लाडका मुख्य मंत्री एक दिवसही त्या पदावर राहू शकणार नाही. होऊ द्यावी विधानसभा बरखास्त. येदीयुरप्पा फार तर नवा पक्ष काढतील. भाजपाची सत्ता जाईल. पण ही किंमत मोजायला भाजपाची तयारी असली पाहिजे. यापूर्वीही अनेकांनी आपल्या अहंकारापायी पक्ष फोडला आहे, त्यातल्या काहींनी नवा पक्षही स्थापन केला होता. त्यांचे पुढे काय झाले, ते, अगदी राष्ट्रीय पातळीवरील बलराज मधोक यांच्यापासून तो राज्य पातळीवरील गुजरातचे शंकरसिंग वाघेला, उत्तरप्रदेशातील कल्याणसिंग, मध्यप्रदेशातील उमा भारती यांची उदाहरणे समोर आणून लक्षात घ्यावे. कर्नाटकात येदीयुरप्पा भाजपाचे सरकार पाडू शकतात, पण ते किंवा त्यांचा कोणी पित्तू मुख्य मंत्री बनू शकणार नाही. भाजपाचे श्रेष्ठी हे वास्तव ध्यानात घेतील, अशी आशा आहे.


आश्चर्य नाही

हेही म्हणणे भाग आहे की, येदीयुरप्पा प्रकरणी पक्षश्रेष्ठींनीही विनाकारण विलंब केला. त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे श्रेष्ठींच्या कानावर नक्कीच आली असतील. हा केवळ एक अंदाज नाही, वस्तुस्थिती आहे. काहीच दिवसांपूर्वी प्रकाशित झालेले शांताकुमार यांचे वक्तव्य त्याचा सबळ पुरावा आहे. शांताकुमार, कोणी लुंगेसुंगे नेते नाहीत. ते हिमाचल प्रदेशाचे मुख्य मंत्री होते. भाजपाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात ते विद्यमान उपाध्यक्ष आहेत. ते पक्षातर्फे नियुक्त केलेले कर्नाटकाचे प्रभारी होते. बहुधा ते आता नसावेत. सुरवातीला त्यांनीच जाहीर रीतीने येदीयुरप्पांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. का? त्यांचा आणि येदीयुरप्पांचा वैयक्तिक संघर्ष होता काय? नाही. असण्याचे कारणच नाही. एक उत्तरेतील हिमाचल प्रदेशातले, तर दुसरे दक्षिणेतील कर्नाटकातले. काय म्हणाले शांताकुमार? ते म्हणाले, ''लोकायुक्तांचे निष्कर्ष वाचून आश्चर्य करण्याचे कारण नाही. पक्षश्रेष्ठींना या प्रकरणाची पूर्वीपासूनच माहिती होती. त्यांनी त्यावेळी येदीयुरप्पांवर कारवाई का केली नाही, याची कारणे तेच जाणोत.'' शांताकुमार पुढे सांगतात, ''मंत्र्यांसह अनेकांनी, तसेच रा. स्व. संघानेही, ही प्रकरणे श्रेष्ठींच्या कानावर घातली होती. पण श्रेष्ठींनी कृती केली नाही. त्यांनी वेळीच कृती केली असती, तर पक्षाची बदनामी वाचू शकली असती.'' त्यांनी अखेरीस त्यावेळी वैतागाने म्हटले होते की, ''मलाच कर्नाटकाच्या प्रभारीपदाच्या दायित्वातून मुक्त करा.''


संधी गमाविली
हेही सर्वांना माहीत आहे की, भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने फार पूर्वीच, येदीयुरप्पांना पायउतार व्हावयाला सांगण्याचा निर्णय घेतला होता. बहुधा कर्नाटकाचे प्रभारी शांताकुमार यांच्या अहवालानंतर तो घेतला गेला असेल. पण पक्षश्रेष्ठी त्या निर्णयावर ठाम राहू शकले नाहीत. अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या की, येदीयुरप्पांनी, विधानसभा बरखास्त करण्याची धमकी दिली आणि श्रेष्ठींनी हातपाय गाळले. मला नाही वाटत की याशिवाय, दुसरे कोणते कारण असेल. श्रेष्ठींचा निर्णय कायम असता तर काय झाले असते? येदीयुरप्पांनी विधानसभा बरखास्त केली असती आणि पुनः निवडणूक घ्यावी लागली असती; आणि कदाचित्‌ त्या निवडणुकीत भाजपाचा पराभवही झाला असता. त्याने भाजपा या अ. भा. पक्षावर असे कोणते आभाळ कोसळले असते? गेली असती एका राज्यातील सत्ता. पण ती पुनः मिळविता आली असती. कर्नाटकाची जनता भ्रष्टाचाराची पाठीराखी आहे, असे समजण्याचे कारण काय? हां, दक्षिणेतील भाजपाची सत्ता असलेले एकमेव राज्य भाजपाच्या हातून गेले असते. पण भाजपाची प्रतिष्ठा राहिली असती. काँग्रेस राज्यांमधील आणि केंद्र शासनातीलही भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचार करायला एक मोठी नैतिक शक्ती भाजपाला मिळाली असती. ती संधी भाजपाने गमाविली, असेच म्हटले पाहिजे.


'बी' टीम नको

येदीयुरप्पांबरोबर, त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखी तीन मंत्र्यांनाही जावे लागणार आहे. लोकायुक्ताने त्यांच्यावरही आरोप लावले आहेत. त्यातले दोघे बेल्लारीचे रेड्डी बंधू आहेत. एका राज्याच्या मंत्रिमंडळात, दोन सख्खे भाऊ मंत्री म्हणून विराजमान व्हावेत, हे नैतिकदृष्ट्या किंवा व्यवहारदृष्ट्याही कितपत उचित आहे, याचा विचार केला पाहिजे. रेड्डी बंधूंनी, नक्कीच भाजपाला भरघोस मदत केली असेल. पण त्या मदतीच्या मोबदल्यात, एका घरातील दोघांना मंत्री करून देणे शहाणपणाचे आहे काय? रेड्डी बंधू राजकारणी आहेत वा नाहीत; भाजपाच्या शक्तिवर्धनासाठी त्यांनी काही परिश्रम केलेत वा नाहीत, काही झीज सोसली वा नाही, याची आपल्याला कल्पना नाही. पण बेल्लारीच्या काँग्रेसप्रभावी क्षेत्रातून त्यांनी काँग्रेसला हटवून भाजपाला समोर आणले हे सत्य आहे. का केली असेल त्यांनी भाजपाची मदत? नक्कीच स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि आपल्या स्वार्थासाठी, धनदांडगे, चलाख लोक पक्षविक्ष जाणत नाहीत. आंध्रप्रदेशाचे, अलीकडेच अपघातात ठार झालेले मुख्य मंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनाही बेल्लारीचे हे रेड्डी बंधू भरघोस मदत करीत होते. राजशेखर रेड्डींशीही त्यांचे मधुर संबंध होते. राजशेखर रेड्डींचेही खाण उद्योगात हितसंबंध होते. हे जगजाहीर आहे. शिवाय, आंध्रप्रदेशाच्या सरहद्दीवरच बेल्लारी जिल्हा आहे. हे सर्व जण जाणतात की, राजशेखर रेड्डी काँग्रेस श्रेष्ठींचे लाडके मुख्य मंत्री होते. त्यांच्याकडून भरपूर मलिदा वर जात असला पाहिजे; आणि तेच या लाडकेपणाचे मुख्य कारणही असेल. पण भाजपा म्हणजे काँग्रेस काय? भाजपा हा काँग्रेसचा पर्याय म्हणून समोर आला आहे. त्याचे याबद्दल सर्वत्र स्वागतच राहील. पण हा पर्याय, काँग्रेससारखा असून चालणार नाही. तो काँग्रेसची 'बी' टीम बनून चालायचे नाही. त्याची स्वतंत्र प्रतिमा आणि ओळख असली पाहिजे. तो एक 'वेगळा पक्ष' (पार्टी विथ्‌ अ डिफरन्स) कसा बनेल आणि दिसेल, या चिंतेने पक्षश्रेष्ठी व्याकुळ झाले पाहिजेत. अशा पक्षात येदीयुरप्पांसारख्यांना किंवा रेड्डी बंधूंसारख्यांना स्थान असता कामा नये.


रोग घराणेशाहीचा
शांताकुमार यांच्या निवेदनात आणखी एक चिंताजनक बाब आहे. ते म्हणाले, ''घराणेशाही राजकारणाकडे (भाजपा) पक्षाची प्रवृत्ती वाढत आहे. पक्षापुढे हे एक मोठे संकट आहे. हिमाचल प्रदेशापासून तो कर्नाटकापर्यंत, भाजपा हा, मुले, मुली व नातलग यांचा पक्ष बनत चाललेला दिसतो.'' शांताकुमारांचा हा अभिप्राय पक्षश्रेष्ठींनी खूप गांभीर्याने विचारात घेतला पाहिजे. 'उचलली जीभ अन्‌ लावली टाळूला' अशा वृत्तीचे शांताकुमार नाहीत. 'हिमाचल प्रदेशापासून कर्नाटकापर्यंत' म्हणजे सारा भारतच आला की! हिमाचलच्या मुख्य मंत्र्यांचा मुलगा खासदार आहे; कर्नाटकाच्या मुख्य मंत्र्यांनी आपल्या पुत्रांवर मर्जी बहाल केली आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसचेच अनुकरण सुरू आहे. कुण्या एका मंत्र्याचा मुलगा आणि पुतण्या किंवा कुण्या दुसर्‍या मंत्र्याची मुलगी आमदार, खासदार असतील तर भाजपाच्याही खासदारांची मुलगी अन्‌ पुतण्या काही फार मागे नसतात. म्हणून म्हणायचे की, भाजपाची काँग्रेस बनता कामा नये. राजकारण हा दलदलीचा प्रदेश आहे, हे खरे आहे; पण या दलदलीत उतरणार्‍यांनी, स्वतःबरोबर शुद्ध पाण्याचा एक शक्तिशाली प्रवाह घेऊन उतरले पाहिजे. याच दृष्टीने भाजपाच्या पूर्वावताराची म्हणजे भारतीय जनसंघाची स्थापना झाली आहे. याच उद्दिष्टासाठी संघाचे काही उत्तमोत्तम कार्यकर्ते या राजकीय पक्षाला उपलब्ध झाले होते. 'अ' ला किंवा 'ब' ला अधिकाराच्या व प्रतिष्ठेच्या पदावर आरूढ करण्यासाठी नाही.


संघाची रीत
दि. २९ जुलैच्या 'टाईम्स ऑफ इंडिया'त येदीयुरप्पांचा परिचय देताना त्यांचा 'संघनिर्मित '(RSS-bred) असा उल्लेख केला आहे. संघावर टीका करायला मिळलेली संधी ही सेक्युलर वृत्तपत्रे कधीही सोडायची नाहीत, हे खरेच आहे. पण संघाशी ज्यांना आपला संबंध जोडून ठेवायचा आहे, त्यांनीही आपल्या आचरणाचा नित्य विचार केला पाहिजे. केव्हा तरी संघात गेलेले असून आणि दरवर्षी गुरुदक्षिणा समर्पण करून खरा संघ स्वयंसेवक बनता येत नाही. संघ अंगी मुरावा लागतो, मुरवावा लागतो. मग अगदी स्वाभाविकपणे संघाला अभिप्रेत असणारे आचरण घडत जाते. एक अनुभव सागंतो. तरुण भारताच्या संपादकीय विभागात माझ्याकडे अधिकारपद आले असताना, तीन संपादकांची निवड इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेऊन करण्याचे मी ठरविले. या परीक्षेला बाळासाहेब देवरस याचे सख्खे मामेभाऊ बसणार होते. मला बोलावून बाळासाहेबांनी सांगितले की, तुमच्या परीक्षेत तो योग्य वाटला तरच त्याला तुम्ही घ्या; माझा नातलग म्हणून त्याचा विचार करू नका. आणि खरेच त्या परीक्षेत तो आमच्या कसोटीला उतरला नाही. आम्ही त्याची नेमणूक केली नाही. बाळासाहेबांनी त्याबद्दल मला एका शब्दानेही पुनः विचारले नाही. बाळासाहेब देवरस त्या वेळी जसे संघाचे माननीय सरकार्यवाह होते, तसेच तरुण भारत चालविणार्‍या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्षही होते. त्यांना आपल्या जवळच्या नातलगाला नोकरीवर लावून घेणे कठीण होते काय? पण त्यांनी तो मार्ग स्वीकारला नाही. एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षानेही आपल्या मुलीला, आपल्या संस्थेत नोकरी मिळविण्यासाठी, तिच्या ठिकाणी उचित अर्हता असतानाही, अर्ज करायला मना केले होते. तिने कारण विचारले असता, ते उद्‌गारले होते, ''कारण, तू अध्यक्षाची मुलगी आहेस!'' अशी किती तरी उदाहरणे आहेत. ही संघाची रीत आहे. स्वतःला संघाचे समजणार्‍यांच्या सार्वजनिक व्यवहारातून असे आचरण प्रकटले पाहिजे.


सिद्धांतनिष्ठेचा मुद्दा
माझे एक निरीक्षण आहे. ते हे की, पायाभूत सिद्धांतांचे विस्मरण झाले, सिद्धांतांशी बांधीलकी उरली नाही, सिद्धांतांचा वारंवार परिचय करून देणारी व्यवस्था नसली की स्वार्थ बोकाळतो, परिणामी भ्रष्टाचार सोकावतो. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्यकाळात वर्षा-दोन वर्षांतून असे चिंतन बैठकीचे कार्यक्रम होत असत. ती प्रथा सध्या बंद पडली आहे. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना याची आवश्यकता नसेलही, पण नवागतांना त्याची अत्यंत जरुरी असते. सिद्धांताशी बांधीलकी सुटली किंवा तिचे विस्मरण झाले की, भरकटणे सुरू होते. भाजपाचे असेच झाले. जनसंघ संपून वा संपवून भाजपा अवतरला, तर तो ङङ्गगांधीवादी' समाजवाद घेऊन! हे निखळ सत्य आहे की, समाजवादाचे आणि लोकशाहीचे किंवा विविधतेच्या सन्मानाचे सूत नसते. आर्थिक व राजकीय शक्तींचे एकत्रीकरण म्हणजे समाजवाद. शहाणे, चतुर समाजवादी ही यथार्थता ओळखत असतात आणि म्हणून समाजवादाची सर्वंकषता दूर करण्यासाठी, ते त्याला कोणते तरी एक विशेषण चिकटवीत असतात. कुणी लोकशाही समाजवाद (डेमोक्रॅटिक सोशॅलिझम्‌) म्हणतात, कोणी गांधीवादी समाजवाद म्हणतात, तर कोणी क्रमबद्ध समाजवाद (फेबियन सोशॅलिझम्‌) म्हणतात. पण हे सर्व समाजवाद अपयशी ठरले आहेत.
एका काळी, 'समाजवाद' हा फार आकर्षक शब्द होता. आता तो तसा राहिलेला नाही. याच आकर्षणास्तव भाजपाच्या धुरीणांनी 'गांधीवादी समाजवाद' स्वीकारला होता. पण चार वर्षांच्या आतच त्यांचा भ्रमनिरास झाला. सध्या त्या पक्षाचा आधारभूत सिद्धांत कोणता, हे किती कार्यकर्ते सांगू शकतील हा प्रश्नच आहे. काँग्रेस पक्षाने सिद्धांतनिष्ठा केव्हाच सोडलेली आहे. महात्माजींचे नाव तेवढे वर्षातून एक-दोनदा घेतले जाते. मात्र त्यांच्या विचाराशी त्या पक्षाचे आता कसलेही देणेघेणे नाही. काही काळानंतर काँग्रेसने समाजवादाचा सिद्धांत स्वीकारला. पण आता दोन दशके झाली आहेत, समाजवादाची पार ऐसीतैसी करण्यात आलेली आहे. काहीही करून, कोणतेही समझोते करून, प्रसंगी लाच देऊनही सत्तेला चिकटून राहणे हेच एकमेव काँग्रेसचे उद्दिष्ट उरले आहे. म्हणून त्याचा भटकाव चालू आहे. भाजपाची अशी स्थिती होता कामा नये.  'एकात्म मानववादाचा' त्याने पुनः रोखठोकपणे स्वीकार केला पाहिजे. त्याचे तत्त्वज्ञान सर्व कार्यकर्त्यांना कालोचित भाषेत समजावून सांगितले पाहिजे. 'एकात्म मानवदर्शन' हा व्यापक हिंदुत्वाचाच एक आविष्कार आहे. हिंदुत्व वैश्विक सामंजस्याचे सूत्र आहे. हिंदू हा कोणताही पंथ, संप्रदाय नाही. हिंदुत्व म्हणजे आध्यात्मिकता व भौतिकता यांचा संगम, चारित्र्य आणि पराक्रम यांचा समन्वय, निष्कलंक सार्वजनिक व वैयक्तिक आचरणाचा आरसा, विविधतेचा सन्मान, सर्वपंथसंप्रदायांचा समादर आणि त्यामुळेच लोकशाही व पंथनिरपेक्ष राज्यरचनेची ग्वाही, हे भाजपाला आत्मविश्वासाने सांगता आले पाहिजे; आणि ते आपल्या यच्चयावत्‌ कार्यकर्त्यांच्या मनावर अंकित करता आले पाहिजे. शुद्ध सार्वजनिक आचरणासाठी हे आवश्यक आहे. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. पण त्या कार्यक्रमांच्या किंवा धोरणांच्या म्हणजे त्यांच्या प्राथमिकतेच्या निर्धारणासाठी, पायाभूत ध्येयाशी नाही. असा वेगळा, सिद्धांतनिष्ठ, चारित्र्यसंपन्न, एकजुटीने कार्य करणारा भाजपा लोकांना हवा आहे. एकमेकांचे पाय ओढणारा, जातीचा बडेजाव मिरविणारा, गटबाजीत विभाजित झालेला काँग्रेससारखाच भ्रष्टाचारलिप्त भाजपाही असेल, तर त्याचे स्वार्थी, अधिकारलोभी लोकांशिवाय इतर कुणाला आकर्षण वाटेल?

तपशीलाचे मुद्दे द्या

कर्नाटकातील खाणीच्या उद्योगात किती भ्रष्टाचार झाला, सरकारचे म्हणजेच जनतेचे किती कोटी रुपये गडप झाले, हे कसे घडले, येदीयुरप्पांच्या पूर्वीच्या मुख्य मंत्र्यांचेही हात किती बरबटलेले होते वगैरे सारे तपशीलाचे मुद्दे आहेत. त्याची अधिक चर्चा करण्याचे कारण नाही. कायाने व न्यायालयाने आपले काम करावे. कायाने जे होणार असेल ते होऊ द्यावे. त्यात कुणी दोषी ठरले तर त्याने सजा भोगावी. कर्नाटकात, नेतृत्वबदल झाला तरी सत्ता भाजपाचीच राहील, अशी चिन्हे दिसतात. चांगली गोष्ट आहे. पण ती जनहितकारक, स्वच्छ, तेजस्वी अशा भाजपाची रहावी, एवढीच अपेक्षा आहे. एक 'अप्पा' गेले तर 'दुसरे अप्पा' आले एवढ्यापुरतेच परिवर्तन मर्यादित राहू नये.

                                     
  -मा. गो. वैद्य
   नागपूर
   दि. ३०-०७-२०११

No comments:

Post a Comment