रविवार दि. ११ सप्टेंबर २०११ चे भाष्य
मुस्लिम समाजात मानसिक आणि वैचारिक परिवर्तन होत आहे, ही फार चांगली गोष्ट आहे. आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी, मुसलमानांना अलग ठेवण्याचे प्रयत्न राजकीय पुढार्यांकडून होत असतानाही, बहुसंख्य हिंदू समाजाशी जवळीक साधणारेही प्रयत्न त्यांच्याकडून होत आहेत, ही राष्ट्रकारणाच्या दृष्टीने इष्ट प्रक्रिया आहे.
नतद्रष्टपणा
अण्णा हजारे यांचे आंदोलन चालू असताना, लोक ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तिपर घोषणा देत होते. या घोषणा इस्लामविरोधी आहेत, म्हणून मुसलमानांनी अण्णांच्या आंदोलनापासून दूर रहावे, असा फतवा दिल्लीच्या इमामाने काढला होता. त्याची कुणीही गंभीरपणे दखल घेतली नाही. सर्व लोक, त्यात मुसलमानही समाविष्ट होते, मातृभूमीच्या गौरवाच्या घोषणा देत राहिले. हिंदूंमधलेच काही नतद्रष्ट, मात्र, असे निघाले की, ज्यांना, जंतरमंतरवरील अण्णांच्या उपोषण-आंदोलनात भारत मातेचे चित्र ठेवल्याबद्दल पोटदुखी झाली होती. असे कळते की, अण्णांनीही या अनिष्ट प्रवृत्तीचा आदर केला आणि भारत मातेचे चित्र हटविले. त्यांनी हे केले नसते, तरी आंदोलनाचा जोर तसाच कायम राहिला असता. आक्षेपकांचे म्हणणे होते की, भारत मातेचे चित्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे आंदोलन आहे, असे सूचित करते. रा. स्व. संघाबरोबर भारत मातेला एकरूप करण्यात संघाचा गौरवच आहे. पण, या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना निदान एवढे कळावयाला हवे होते की, असे करण्यात आपण भारत मातेचाच अपमान करीत आहोत. भारत काय फक्त संघ स्वयंसेवकांची माता आहे? मग सर्व जनतेने ‘भारत माता की जय’ असा आसमंत निनादित करणारा जो उद्घोष केला, त्याचा अर्थ काय?
अभिनंदनीय
पण आपला मुद्दा मुसलमानांनीही ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ या घोषणा दिल्या, हे सांगण्याचा आहे. मागे, फार पूर्वी नाही, अगदी अलीकडेच म्हणा, कोणत्याही मुस्लिम धर्मपीठाने ‘वंदे मातरम्’ गीत गाऊ नका, असा फतवा काढला होता. तोही अनेक मुसलमानांनी झिडकारला. अनेक शहरांमध्ये, अनेक ठिकाणी, मुसलमानांनी सामूहिक रीत्या ‘वंदे मातरम्’चे गायन केले. मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये मुस्लिम बांधवांनी सामूहिक रीत्या केलेल्या या कार्यक्रमांची वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली वृत्ते, छायाचित्रांसह, मला दाखविली गेली होती.
परिवर्तन
हे साध्या प्रदर्शनीय कार्यक्रमांचे झाले. पण, मुसलमानांमध्ये मौलिक वैचारिक परिवर्तनही होत आहे. माझ्या समोर, जयपूर (राजस्थान) वरून प्रकाशित होणारा ‘पाथेय कण’ या पाक्षिकाचा १ जुलैचा अंक आहे. त्यात दोन मुस्लिम विद्वानांचे लेख प्रकाशित झाले आहेत. एका लेखाचे शीर्षक आहे, ‘मुस्लिम समाज के गोत्र और चौदराहते’ आणि लेखक आहेत मिर्जा हबीब बेग- ‘पारस’. ते जयपूरचेच रहिवासी आहेत; आणि त्यांनी ‘पाथेय कण’च्या ‘देशज इतिहासकार अंक’ या विशेषांकासाठीच हा लेख लिहिला असावा. दुसर्या लेखाचे शीर्षक आहे ‘‘हां हिन्दू ही हैं सारे मुसलमान.’ या लेखाचे लेखक आहेत, सुहेल वहीद. हा लेख ‘नवभारत टाईम्स’ या प्रसिद्ध हिंदी दैनिकाच्या २७ एप्रिल २००२ च्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. ‘पाथेय कण’च्या संपादकांनी, तेथून तो उद्धृत केला आहे.
गोत्रे
मिर्जा हबीब बेग यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, हिंदूंसारखीच, परमार, चौहान, राठोड, कछुवाह- अशी मुसलमानांचीही गोत्रे आहेत. ते लिहितात- ‘‘परमार अग्निकुळातील हिंदू व मुसलमान आहेत. ते कुळ खूप प्रसिद्ध आहे. राजा राम, आणि राजा भोज परमार कुळाचे राजे होते. मौर्य वंशही परमार कुळाचाच आहे. राजस्थानातील काही मुसलमान राजपूत, चंद्रगुप्त मौर्याशी आपला संबंध जोडीत असतात. आजचे परमार मुसलमान अलवर, भरतपूर, गुडगाव, फरिदाबाद, पानिपत आणि अलीगड या शहरांच्या परिसरात राहतात.’’
बडगुर्जर
‘‘बडगुर्जर लालखानी मुसलमान, आपली परंपरा श्रीरामाचे पुत्र लवाशी जोडतात. ते स्वत:ला सूर्यवंशी समजतात. आमेर टेकड्यांच्या पायथ्याशी यांची मोठी संख्या आहे.’’ ‘‘राठोड आणि तंवर कुळाचे जे राजपूत मुसलमान बनले, ते अरवली पर्वताच्या आसमंतात राहतात. हीही बडगुर्जर कुळाचीच एक शाखा आहे. ‘बडगुर्जर’चा अपभ्रंश ‘बैरगुर्जर’ झाला आहे आणि ते सध्या हेच नाव लावतात. राणा प्रतापाच्या कुळातील लालसिंह उर्फ बदनसिंह मुसलमान बनला. त्याने आपले नाव लालखान असे बदलविले. या लालखानचे वंशज म्हणजेच लालखानी मुसलमान. हिंदू राजपुतांसारखीच यांची रीतभात आहे. तेही सगोत्र विवाह निषिद्ध मानतात. आपल्या मुलींची दोन नावे ठेवतात. एक नाव असते हिंदू आणि दुसरे मुसलमानी. मुलीच्या लग्नात मुसलमानांतही अग्निप्रदक्षिणा (फेरे) रूढ आहे. बडगुर्जर मुसलमानांच्या पाच शाखा आहे. लालखानी, अहमदखानी, विक्रमखानी, कमालखानी आणि रायखानी. लालखानी मुसलमानांचे विवाहसंबंध कछुवाह राजपुतांशी आजही होत असतात.’’
कछुवाह
कछुवाह मुसलमान आपली परंपरा दाशरथी श्रीरामाचे दुसरे पुत्र कुश याच्याशी जोडतात. ही कछुवाह जमात आपल्या शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. कछुवाह राजपूत मुसलमान, जयपूर, अलवर, हरयाणा आणि दिल्लीच्या आसपास मोठ्या संख्येत आहेत. याच जातीचे दोन बंधू जालिमसिंह आणि फूलसिंह यांनी इस्लाम स्वीकारला आणि त्यांचे नावे झाली मिर्जा राजा जालिमबेग आणि मिर्जा राजा फूलबेग. लेखक लिहितो की, ‘याच कुळातील मी मिर्जा राजा हबीब बेग- पारस आहे.’
पुराणकथा
लेखक एक पारंपरिक पुराणकथा सांगतात, ‘‘परसराम नावाच्या राजाच्या कारकीर्दीत हिंदू धर्म नष्ट झाला होता. तेव्हा अबू पर्वतावर राहणार्या ऋषींनी एक यज्ञ केला. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की, आमच्या धर्माला वाचवा. परमेश्वराने त्यांची प्रार्थना मान्य केली आणि त्या अग्निकुंडातून चार देवता निघाल्या. त्यांच्यापासूनच परमार, चालुक्य, प्रतिहार आणि चैहान (चौहान) ही चार क्षत्रियकुळे निर्माण झाली. महाराजा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवानंतर अनेक चव्हाण राजपूत मुसलमान बनले. ते ‘चैहान’ या नावाने ओळखले जातात. चैहानांची ५३ गोत्रे आहेत व तेलघाणी चालविणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.’’
राठौड
‘‘अजमीरच्या आसपास राठौड मुसलमान आहेत. ते चंद्रवंशी राजा किशननाथाचे वंशज आहेत. जोधपूर, राठौड वंशाची राजधानी राहिलेली आहे. काठेवाड आणि गुजरातमधील राठौड स्वत:ला अग्निवंशी समजतात. आणि ते हिंदू राठौडांना आपल्या घरच्या सर्व आनंद व दु:खाच्या प्रसंगी बोलावीत असतात. त्यांचे सर्व रीतिरिवाज राजपुतांच्या सारखेच आहेत.’’
भारतीयता
‘हां, हिन्दूही हैं सारे मुसलमान’ या शीर्षकाच्या आपल्या लेखात लेखक सुहेल वहीद, इस्लामचा स्वीकार केल्यानंतरही मुसलमानांमध्ये हिंदूसारख्याच प्रथा, रीतिरिवाज व परंपरा कशा आहेत, याचे विस्तृत वर्णन करतात. या प्रथा आणि रीतिरिवाज फक्त भारत, पाकिस्तान व बांगलादेश- म्हणजे आपल्या अखंड हिंदुस्थानातील मुसलमानांमध्येच आढळतात. अन्य देशांतील मुसलमानांमध्ये नाही. इस्लामची मान्यता फक्त ‘ईद’ या सणाला आहे. परंतु, मुसलमान हिंदूंच्या पद्धतीने अनेक सण साजरे करतात. शबेबरातमध्ये दिवाळीसारखीच आतषबाजी असते. फटाके फोडले जातात. वस्तुत: शबेबरात हा केवळ भक्तीचा किंवा पूजेचा म्हणा सण आहे. ईदे मीलादुन्नबी म्हणजे हजरत महमद पैगंबरसाहेब यांच्या जन्मदिवसाचा सण. या दिवशी मिरवणूक काढण्याला काही अर्थ नाही. पण हिंदुस्थानात जुलूस निघतातच. मोहर्रम, इस्लामी वर्षाचा पहिला महिना. या मोहर्रमच्या १० व्या तारखेला इमाम हुसैन शहीद झाले. म्हणजे एकप्रकारे हा दु:खाचा दिवस. पण भारतात तो दसर्यासारखा साजरा केला जातो. विजयादशमी आणि मोहर्रमची दहावी तारीख हे दोन्ही दिवस सत्याचा असत्यावर झालेल्या विजयाचे प्रतीक आहेत. मोहर्रम वस्तुत: शहीद दिवस आहे. पण हिंदुस्थानातील मुसलमान वाजंत्री, ताजिये, जुलूस, ढोल, तमाशे हे सारे वापरतात. ईदेच्या दिवशी शेवई खाणे व खाऊ घालणे ही प्रथा फक्त हिंदुस्थानातच आहे. शिया मुसलमानांनी तर होळीसारखाच, आपला ‘नव रोज’ मानणे सुरू केले आहे.
हिंदूपणा
बोहरा समाजात वडील माणसांसमोर नतमस्तक होण्याची प्रथा आहे. राजस्थानातील गावगाड्यात ज्या मशिदी बनलेल्या आहेत, त्यात दगडांची रचना अशी आहे की जणू काही मंदिरच बनविले गेले आहे. बिहार आणि उ. प्र.तील मुसलमान विवाहापूर्वी तिलक लावतात. दर्गा, ख्वाजा चिस्तीचा असो अथवा निजामुद्दीन चिस्तीचा असो, तेथील उर्समध्ये कव्वालीचा कार्यक्रम असतोच. ही शुद्ध भारतीय परंपरा आहे. अखंड भारत सोडला तर इतर कुठेही कोणत्याही पीर-फकिराचा उर्स होत नाही किंवा कव्वालीही होत नाही. मृत्यूनंतर केवळ दहनऐवजी दफन एवढाच काय तो फरक. बाकी विधी जसे हिंदू करतात, तसेच मुसलमानही करतात. म्हणजे तेरवी, तीया, चालीसवां किंवा बरसी (वर्षश्राद्ध). संगीतात तर मुसलमान गायक अग्रणी राहिलेले आहेत. भारताशिवाय, अन्य कुठल्याही देशात मुसलमान संगीतज्ञ बनू शकत नाही. फक्त दहा टक्के मुसलमान सोडले, जे लांब दाढी ठेवतात, दिवसातून पाच वेळा नमाज पढतात, आणि जे हिंदूविरोधाचे जतन करीत त्यांना काफीर म्हणतात, आणि नको तसा व्यवहार करतात, तर बहुसंख्य मुसलमानांनी कळत न कळत हिंदू परंपरा कायम ठेवल्या आहेत. ईदेच्या दिवशी शाही इमामासहित सारे मुसलमान शेवई खातात, खजूर खात नाहीत. हज यात्रा केल्यामुळे किंवा आपण अन्य एकदोन खास इस्लामी विधी पाळल्यामुळे, आमच्या हिंदूपणाला कसलाही धक्का पोचत नाही.’’
राजस्थानच्या मेवात भागातील शेरपूर गावचे माजी सरपंच लिहितात की, आमची ‘मेव’ जात, हिंदूमधील मीणा जातीचाच भाग आहे. जुने मुल्ला आणि पंडित यांनीच आम्हाला अलग केले आहे. ते लिहितात-
‘‘जख्म दिया है फूलों ने कांटो से शिकायत करना क्या
दर्द दिया है अपनों ने गैरों से शिकायत करना क्या
आपल्या छोट्याशा निवेदनात ते शेवटी लिहितात, या देशात जे लोक राहात आहेत, आणि या देशाला आपले घर समजतात, ते कुठलाही पंथ मानणारे असोत, ते हिंदूच आहेत.’’
विशाल हिंदू समाज
या एकतेची भावना जसजशी बळकट होत जाईल, तसतशी हिंदू-मुसलमान ही तफावत आणि त्यातून निर्माण होणारा दुरावा कमी होत जाईल. आपल्या संविधानाप्रमाणे, जैन, शीख आणि बौद्ध हे वेगळे धर्म-संप्रदाय, मजहब (रिलिजन) असले, तरी विशाल हिंदू समाजाचे घटक मानले गेले आहेत. ‘हिंदू कोड बिल’ या कायद्याच्या नावात हिंदू शब्द असला, तरी तो कायदा जैन, शीख व बौद्ध यांना लागू आहे. याला विरोध करणारे या धर्मसंप्रदायांमध्ये नाहीतच असे नाही. आहेत, आणि कधी कधी त्यांचा विरोध प्रकटही होतो. पण ते अत्यल्प संख्येत आहेत. अधिकांश लोकांना ‘हिंदू कोड बिल’ मान्य आहे. म्हणजे ‘हिंदू’ या व्यापक आणि समावेशक शब्दात, त्यांची गणना होण्याला त्यांचा विरोध नाही. ‘हिंदू’त त्यांची गणना केल्यामुळे, त्यांची जी वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणी आणि उपासनापद्धती आहे, तिला बाधा येत नाही. जैन आणि बौद्ध, वेदप्रामाण्य मानीत नाहीत. शीख मूर्तिपूजा मानीत नाहीत. आर्यसमाजींचाही मूर्तिपूजेला विरोध आहे. पण तरी ते सर्व हिंदू आहेत. मुसलमानही कुराण शरीफ व हजरत पैगंबरसाहेबांना मानणारे असू शकतात; ईद व मोहर्रम मोकळेपणाने पाळू शकतात; हजला जाऊ शकतात; मशिदीत नमाज पढू शकतात आणि तरी ते ‘हिंदू’ असू शकतात.
समान संस्कृती
ही चांगली गोष्ट आहे की, मुसलमानांना आपल्या प्राचीन पूर्वजांचे स्मरण आहे. आता त्यासाठी त्यांनी त्यांच्याशी प्रकटपणे जोडून घ्यावे. त्यांची नावे धारण करायलाही हरकत नाही. नारायण वामन टिळक ख्रिस्ती झाले होते. ‘रेव्हरंड’ ही धर्मपदवीही त्यांना मिळाली होती. पण त्यांनी आपले नाव बदलविले नाही. एच. सी. मुखर्जी हे प. बंगालचे राज्यपाल होते. ते ख्रिस्ती होते, पण त्यांनी आपले ‘मुखर्जी’ हे नाव बदलविले नाही. केरळात अनेक ख्रिस्ती व्यक्तींची नावे हिंदू आहेत. मुसलमानांमध्येही ही प्रथा सुरू व्हावयाला हरकत नाही. आपल्या पूर्वंजांशी त्यामुळे आपला संबंध जुळतो आणि संस्कृतीशी म्हणजेच जीवनमूल्यांशीही आपली जवळीक होते.
विविधता
आणखी एका गोष्टीची गरज आहे. ती मूलभूत गोष्ट आहे. ती म्हणजे विविधतेच्या सन्मानाची. परमेश्वर एकच आहे. तरी त्याच्याकडे जाण्याचे, त्याची भक्ती आणि उपासना करण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, त्याची नावेही वेगवेगळी असू शकतात, ही जी हिंदूंची आधारभूत मान्यता आहे, ती सर्वांनी मान्य केली पाहिजे. ती मान्य केली की ‘काफीर’ हा शब्दच विचारविश्वातून हद्दपार होईल. मग मशीद, मंदिर, गुरुद्वार, विहार सारे जवळजवळ राहू शकतील. मशीद बांधायला, हिंदुस्थानात कुणाचीच ना नसते. आग्रह एकच असतो की, मंदिर पाडून मशीद बांधायची नाही. ज्यांनी, इतिहासकाळात, अशी मतांध असहिष्णुतेची कृत्ये केली, त्यांच्यापासून भारतातील मुसलमानांना दूर व्हावे लागेल. वर ज्या लेखांचा उल्लेख केला आहे, त्यातील मिर्जा हबीब बेग यांच्या लेखात एक फार मार्मिक वाक्य आहे : ‘‘सच तो यह है, कि हिन्दोस्तान में तबाही और बर्बादी गजनी और गोरी के दौरे हुकूमत में हुई थी| हिन्दुस्तानी कुतुबखानों (ग्रंथालय) को इन बाहर के आये हुए दुष्टों ने नष्ट कर दिया|’’ दुष्ट बाहेरचे असोत की आतले त्यांच्या दुष्ट कृत्यांची निंदाच केली पाहिजे. रावण, कंस, दुर्योधन हे बाहेरचे नव्हते. आतलेच दुष्ट होते; ते आतले आहेत म्हणून त्यांचा कुणी गौरव करीत नाही.
अखंड हिंदुस्थान
भारतीय मुसलमानांमध्ये हे परिवर्तन लक्षणीय रूपात दिसून आले तर पुन: संपूर्ण हिंदुस्थान अखंड व्हावयाला वेळ लागावयाचा नाही. हिंदूंच्या वर्चस्वाचा बागुलबुवा उभा करून आणि इस्लामचा आधार घेऊन देशाची फाळणी करण्यात आली. पाकिस्तान निर्माण करण्यात आले. काय आहे सध्या पाकिस्तानची स्थिती? नावाला ‘इस्लाम’चा आधार घेण्यात आला. पण खरा आधार हिंदूंचा द्वेष होता आणि द्वेषाच्या आधारावर उभी झालेली कोणतीही व्यवस्था टिकत नसते. पाकिस्तान निर्माण होऊन पंचेवीस वर्षे होत नाहीत, तो त्याचीही फाळणी झाली. कां? तेथेही इस्लामला मानणारेच बहुसंख्य होते ना! पण भाषेच्या भिन्नतेवर ‘इस्लाम’ मात करू शकला नाही. ‘इस्लाम’च्या शिकवणुकीत पुष्कळ स्वीकारार्ह आहे. ती शिकवण पराक्रमाला, हौतात्म्याला प्रेरणा देऊ शकते; पण ती शिकवण प्रेम आणि विश्वास निर्माण करू शकत नाही, असा अनुभव आहे. पाकिस्तानातील उर्दूभाषिक मुसलमानांना बंगाली भाषा सहन झाली नाही. त्यांना ती आपली भाषा वाटली नाही म्हणून पाकिस्तान तुटले. उरलेल्या पश्चिम पाकिस्तानात तरी सौहार्द आहे काय? सिंधी, बलूची, पठाण यांच्यात असंतोष आहे. केवळ सैन्यबळावर पाकिस्तानचे अस्तित्व टिकून आहे. ते सतत टिकून राहू शकत नाही. रशिया, युगोस्लाव्हिया यांची उदाहरणे गेल्या शतकातील आहेत, तर इजिप्त आणि आता लिबिया यातील ताज्या घटना, हे दर्शवितात की, सैन्यबळाने भावनिक एकात्मता निर्माण करता येत नाही. हिंदुस्थानात किती तरी भाषा आहेत. पण ते एकमेकांशी जुळून राहतातच की! केरळ व तामीळनाडूतील मुसलमान उर्दू बोलत नाहीत. अनुक्रमे मल्याळम् व तमीळ बोलतात. केरळमधील मुस्लिम लीगच्या अधिकृत नियतकालिकाचे नाव ‘चंद्रिका’ आहे. भाषा भिन्न असल्या तरी त्या भिन्न भिन्न भाषांमधून एकच आशय व्यक्त केला जाऊ शकतो. मग उर्दू आणि बंगाली असे वैर होण्याचे कारणच काय? सिंधी विरुद्ध पंजाबी असे वातावरण बनण्याचे प्रयोजन काय? आज पाकिस्तानात मुसलमान मुसलमानांनाच ठार करीत आहेत. यासाठी मुसलमानांचे वेगळे राज्य मागण्यात आले होते काय? गंभीरपणे विचार करण्याचा हा मुद्दा आहे. मुसलमान त्याचा सखोल, सकारात्मक विचार करतील तर पुनश्च हिंदुस्थान अखंड होण्याची प्रक्रिया सुरू होईल. लोकशाहीत, ज्या प्रदेशात, ज्या भाषकांची किंवा ज्या संप्रदायाची बहुसंख्या असते, त्यांचीच सत्ता चालते. बलुचीस्थान, व्यायव्य प्रांत, सिंध, पंजाब हे परत हिंदुस्थानात सामील झाले, तरी तेथील मुख्य मंत्री मुसलमानाच राहणार, आणि मुसलमानांपैकीही तेथील बहुसंख्य भाषिकांपैकीच तो राहणार. तात्पर्य असे की, या लेखात उल्लेखिलेल्या मुसलमानांसारखी समज बहुसंख्य मुसलमानांची बनली आणि ती पुरेशी मुखर झाली, तर हिंदू-मुसलमान ही समस्या तर सुटेलच, पण हिंदुस्थानही पुन: एक होईल. वेदातील मंत्रात म्हटल्याप्रमाणे ‘समुद्रपर्यन्ताया: एक राट्’ बनेल.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. १०-०९-२०११
No comments:
Post a Comment