Sunday, 27 November 2011

इ त स्त तः

रविवारचे भाष्य दि. २७ नोव्हेंबर २०११ करिता

    
      परदेशात संस्कृत

दि. ३० ऑक्टोबरला प्रकाशित झालेल्या 'आर्गनायझर' या सुप्रसिद्ध इंग्रजी साप्ताहिकाच्या दिवाळी अंकात, 'संस्कृत भारती'चे अ. भा. संघटनमंत्री श्री श्रीश देवपुजारी यांचा, विदेशांमध्ये संस्कृत कसे लोकप्रिय होत आहे, हे निवेदन करणारा एक सुंदर लेख प्रकाशित झाला आहे. येथे मी देत असलेली माहिती, त्या लेखावरून घेतलेली आहे.
कॉमनवेल्थ गेम्स (राष्ट्रमंडलीय क्रीडा स्पर्धा) या कार्यक्रमाची सांगता झाली असली, तरी त्याची चर्चा काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांच्या भ्रष्टाचाराच्या पराक्रमगाथांनी बरेच दिवस चालली होती. सध्या कलमाडीसाहेब तिहार तुरुंगाची हवा खात आहेत. पण या क्रीडा कार्यक्रमाची काही खास वैशिष्ट्येही आहेत. त्यातले एक हे की, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्या प्रतिनिधीने, भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या प्रतिनिधीला क्रीडा आयोजनाचा अधिकारदंड (Baton) देत असताना चक्क 'संगच्छध्वम्‌, संवदध्वम्‌, सं वो मनांसि जानताम्‌' हा वैदिक मंत्र म्हणण्यात आला; आणि हा मंत्र तंतोतंत अगदी त्याच्या उदात्त-अनुदात्त-स्वरित स्वरांच्या आरोहावरोहासह म्हणण्यात आला. मंत्र म्हणणारे छात्र भारतीय नव्हते. गोरे इंग्रज होते. देवपुजारी यांना, 'यू ट्यूब'वर काही कात्रणे बघत असताना, ही आश्चर्यकारक गोष्ट आढळली.
दुसर्‍या एका कात्रणात, एक काळ्या रंगाचा अमेरिकन ख्रिस्ती पाद्री प्रवचन देत होता. तो काय सांगत होता म्हणता श्रोत्यांना? 'नमस्ते'चे महत्त्व! एकमेकांना भेटत असताना तो सर्वांनी 'नमस्ते' म्हणावे असा आग्रह धरीत होता. तो सांगत होता की, 'नमस्ते' हा  परमेश्वराला वंदन करण्याचा विधी आहे, आणि तो परमात्मा अन्य सर्व लोकांच्या अंतःकरणातही वास करतो. म्हणून कुणी भेटले तर 'नमस्ते' म्हणा.
तिसर्‍या कात्रणात एक प्रौढ व्यक्ती, इतरांना 'प्रणाम' कसा करावा, हे शिकवीत होती. आपणा सर्वांना हे माहीत आहे की, 'प्रणाम' हात जोडून करावयाचा असतो, आणि तो 'नमस्ते'चा बोधक असतो.
एका अन्य कात्रणात एक ऑर्केस्ट्रा संस्कृत गाणी म्हणत होता. त्या ऑर्केस्ट्राचे नाव आहे 'शान्तिःशान्तिः'!
हा कशाचा प्रभाव असेल? हा प्रभाव आहे 'संस्कृत भारती'च्या द्वारे अमेरिकेत संस्कृत संभाषणाचे जे वर्ग घेतले जात असतात त्याचा. दरवर्षी अमेरिकेत कमीत कमी ४० ठिकाणी हे संस्कृत संभाषणवर्ग नियमाने घेतले जातात. त्याचा परिणाम म्हणून निदान शंभर अमेरिकन कुटुंबे, आपसात संस्कृतमध्ये बोलू लागली आहेत. काही संभाषणवर्ग निवासी पद्धतीचे असतात. तो एक प्रकारचा कौटुंबिक मेळाच असतो. या मेळ्याचे नाव आहे 'जान्हवी.' कुटुंबातील सर्व लहान थोर एकत्र येत असतात आणि बालक आणि तरुण खेळ वगैरेची मजा घेत असतात, तर वयस्क लोक चर्चा करतात. पण हे खेळ असोत की चर्चा, संस्कृत भाषेतूनच चालते.
युरोपातील फ्रान्स देशातही संस्कृतचे आकर्षण वाढत आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील गोपबन्धू मिश्र नावाचे प्राध्यापक गेल्या दोन वर्षांपासून फ्रान्समध्ये राहात आहेत. ते तेथील एका विद्यापीठात संस्कृत शिकवीत असतात. त्या विद्यापीठात त्यांनी एक संस्कृत संभाषण शिबिरही आयोजित केले होते.
      'संस्कृत भारती'ने आयर्लंडमधील चार शिक्षकांना संस्कृत शिकविले. आता ते आपल्या विद्यालयात विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवीत आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्यापूर्वी, त्यांनी त्यांच्या पालकांची सभा घेतली. त्यांना संस्कृतचे महत्त्व पटवून दिले. पालकांनी या उपक्रमाला मान्यता दिली. या चार शिक्षकांच्या प्रमुखाचे नाव रटगुर (Rutgure) आहे. पण तो आपले नाव आता 'मृत्युंजय' असे सांगतो!
खरेच, पाश्चात्त्यांना आता आपल्या जीवनाची पुनर्रचना करावीशी वाटते. त्यांना योग आणि आयुर्वेद शिकण्यात रस वाटू लागला आहे. त्यामुळे आपल्या जीवनात समतोल येईल व शांती नांदेल, असे त्यांना वाटते. त्यासाठी हिंदूंचे विचार आणि तत्त्वज्ञान जाणून घेण्याची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली आहे. आणि, इकडे भारतात? 'गुड मॉर्निंग'पासून 'हॅपी बर्थ डे' सर्रास चालू आहे. रामनवमी म्हणजे यांच्याकरिता 'बर्थ डे ऑफ राम' असतो!
      *** ***

      ख्रिस्ती विद्यापीठात योग

वर योगासंबंधीच्या आकर्षणाचा उल्लेख केला आहे. आपल्याकडे 'सेक्युलॅरिझम्‌'चा रंगीत चष्मा लावल्यामुळे, सेक्युलॅरिस्टांना भलतेच रंग दिसतात. काही वर्षांपूर्वी म. प्र.तील भाजपाच्या सरकारने सरकारी विद्यालयांमध्ये सूर्यनमस्कार व योग यांच्या शिक्षणाची तरतूद केली होती. तेव्हा ख्रिस्ती व काही मुस्लिम संस्थांबरोबरच बेगडी सेक्युलरवाद्यांनीही त्या उपक्रमाचा विरोध केला होता. त्यांचे म्हणणे होते की आपली घटना 'सेक्युलर' आहे आणि योग व सूर्यनमस्कार हे हिंदू धर्माचे अंग असल्यामुळे सरकारी विद्यालयात त्यांचे शिक्षण देणे घटनाबाह्य आहे. परंतु, सर्वच ख्रिस्ती आणि मुस्लिम या विचाराचे नाहीत. बंगलोरवरून प्रकाशित होणार्‍या 'बंगलोर मिरर' या वृत्तपत्राच्या १७ ऑगस्ट २०११ च्या अंकात तर ही माहिती आहे की, कट्टरतेसाठी ख्यातनाम असलेल्या देवबंदच्या दारुल उलूमने 'योग' इस्लामीविरोधी नाही, असा फतवा काढला होता. अनेक ख्रिस्ती संस्थाही आता असेच मत प्रकट करू लागल्या आहेत.
अमेरिकेत तर योग शिकविण्याची जणू काही ओढ लागली आहे, असे जाणवते. कॅलिफोर्नियातील पेपरडाईन विद्यापीठ, ख्रिस्ती विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. ते विद्यापीठ 'प्राणविन्यास फ्लो योग' या नावाखाली, सूर्यनमस्कारावर आधारित प्राणायामाचे शिक्षण देते. टेक्सास राज्यात बॅप्टिस्ट चर्चचे 'बेलर' (Baylor) विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठात अधिकृतपणे, दरवर्षी, वसंत ऋतूत, अष्टांगयोगाचे प्रशिक्षण दिले जाते. टेनेसी राज्यातील बेलमॉण्ट विद्यापीठात 'फ्लो योग', रेस्टोरेटिव्ह योग', 'योग ऍट्‌ द वॉल' या नावांनी प्राणायामाचे शिक्षण दिले जाते. इलीनाईस, मॅसॅच्युसेट्‌ल, वॉशिंग्टन, मिसीसीपी या राज्यांतही विभिन्न नावाने योगाचे शिक्षण दिले जाते. कुठे त्याला 'हठयोग' म्हटले जाते, तर कुठे 'पॉवर योग.' वॉशिंग्टनमधील व्हिटवर्थ विद्यापीठात 'देवान्‌ पूजय', 'येशुम्‌ अनुसर', 'मानवं सेवस्व' या संस्कृत मंत्रांसह योगशिक्षण देण्यात येते. यातली बहुतेक विद्यापीठे, स्वतःची ख्रिश्चन विद्यापीठे अशी ओळख करून देत असतात. अमेरिकेतील 'युनिव्हर्सल सोसायटी ऑफ्‌ हिन्दुइझम्‌' या संस्थेचे अध्यक्ष राजन्‌ आनंद सांगतात की, ''योग जरी हिंदू धर्माशी निगडित असला, तरी तो संपूर्ण जगाची संपदा आहे. आपापल्या धर्माचे पालन करूनही योगानुष्ठान करता येते.'' 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ' ही अमेरिकेतील एक प्रमुख संस्था आहे. त्या संस्थेने जाहीर रीत्या सांगितले आहे की, योगामुळे मनाची उद्विग्नता दूर होते, त्याला शांती लागते आणि श्वासोच्छ्‌वास निरामय होतो.

*** ***

      'सुयश' यशोगाथा

पुण्यात 'सुयश' नावाची एक सेवाभावी संस्था आहे. तिचे वनवासी बांधवांची सेवा करण्याचे व्रत आहे. 'सुयश'च्या या सेवाकार्याचे मुख्य सूत्र आहे वनवासी बंधू आत्मनिर्भर व्हावेत हे. १९८२ साली 'सुयश चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना करण्यात आली. तिच्या कार्याचा विस्तार आता महाराष्ट्राबाहेर राजस्थान, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यांतही झाला आहे.
२००९ साली 'सुयश'ने ठरविले की, वनवासी बंधूंनी कुणाच्याही आर्थिक मदतीविना स्वयंपूर्ण व्हावे. त्यानुसार ११३ गावांतील २४१० कुटुंबांनी स्वतःच्या पैशातून ३६ लाख ५० हजार रुपयांचे बियाणे विकत घेतले, पेरले आणि ८ कोटी ६८ लाखांचे उत्पन्न काढले.
२०१० साली २९३ गावांतील १२ हजार ५५ परिवार या प्रयोगात सहभागी झाले. त्यासाठी ३०० स्थानिक तरुण शेतकरी कार्यकर्त्यांची फौज उभी झाली. १ कोटी ७१ लाख रुपये किमतीच्या बियाण्यांची खरेदी झाली आणि त्यातून ५७ कोटी ६४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या उपक्रमाची प्रगतीच होत राहिली. २०११ साली, अधिक आत्मविश्वासाने ७२८ गावांतील २७८५० कुटुंबांनी या योजनेत भाग घेतला. त्यांनी ३ कोटी रुपयांचे बियाणे खरेदी केले. त्यांचे उद्दिष्ट १४० कोटींचे उत्पन्न घेण्याचे आहे.
'सुयश'ने सर्व कार्यकर्त्यांना कृषिविकासाचा एक मंत्रच दिला. यासाठी एक चार सूत्री कार्यक्रम राबविला. ही चार सूत्रे अशी-
      १) बीज व बीजप्रक्रिया -प्रथम वनवासी बंधू कुठलीही बीजप्रक्रिया न करता बियाणे वापरीत. त्यामुळे, पिके रोगांना बळी पडत. 'सुयश'ने बीजप्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन केले. बीजप्रक्रियेसाठी, शेण, मिठाचे पाणी, जिवाणुसंवर्धक (रायझोबियम, ऍझेटोबॅक्टर) या सारख्या सेंद्रिय प्रक्रियांचा वापर करण्यास शिकविले. उगवणशक्ती कशी तपासावी हेही शिकविले. यामुळे उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ झाली.
      २) सेंद्रिय खते- 'सुयश'ने रासायनिक खतांच्या दुष्परिणामांची लोकांना जाणीव करून दिली. खड्डा पद्धतीने कम्पोष्ट खत तयार करणे शिकविले. याशिवाय, गांडूळ खत, हिरवळीची खते, जिवाणू खते कशी तयार करावीत, या बाबतीतही मार्गदर्शन केले. हे सर्व करीत असतानाच माती/खतपरीक्षणासाठी, परीक्षण संच उपलब्ध करून दिले व त्यांचा उपयोगही शिकविला.
      ३) जैविक कीडनियंत्रक- रासायनिक कीटकनाशकांचा मानव, अन्य प्राणी, पर्यावरण आणि मित्रकीडीवर दुष्परिणाम होतो व उत्पादन खर्चही वाढतो. यावर उपाय म्हणून 'सुयश'ने जैविक पद्धतीने कीडनियंत्रण कसे करावे आणि रोग येण्यापूर्वीच पीकसंरक्षण कसे साधावे या बाबत मार्गदर्शन केले. गोमूत्र अर्क, वनस्पतिजन्य कीटकनाशके (दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क), सापळा पिके यांचा वापर कसा व केव्हा करावा याविषयी प्रशिक्षण दिले. रोगाची लागणच लागू नये, म्हणून काय खबरदारी घ्यावी हेही सांगितले.
४) जलव्यवस्थापन - अवेळी पाऊस, अपुरे पाणी, केवळ खरीप पिकावर कुटुंबाचा खर्च भागण्याची अशक्यता हे सर्व ध्यानात घेऊन बांधबंदिस्ती, दगडी बांध, वनराई बांध, शेततळे, विहिरी, फेरोक्रिट बंधारे इ. प्रकारे पावसाळ्यातील पाणी अडवून, त्याचे नियोजन कसे करावे, याविषयी 'सुयश'च्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. साठलेल्या पाण्याचे मोजमाप करणे आणि त्यावर किती क्षेत्र भिजू शकेल याचे गणिती सूत्र हेही समजावून सांगितले. रब्बी लागवड-क्षेत्र वाढवून वनवासींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी 'सुयश'ने ४-५ वनवासी परिवारांमागे एका जलनियोजन प्रकल्पाची व्यवस्था करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे, गावातील लोक बाहेरगावी कामधंदा बघण्यासाठी जायचे थांबले. 'सुयश'चे आणखी काही प्रशंसनीय उपक्रम आहेत. सविस्तार माहितीसाठी, सांगलीहून प्रकाशित होणार्‍या 'विजयन्त' साप्ताहिकाचा २५ ऑक्टोबर २०११ चा अंक बघावा. 'विजयन्त'चा पत्ता आहे- 'विजयन्त', २५५, खणभाग, सांगली. दू. ध्व. क्रमांक २३७६४११.

      *** ***
वंगारी माथाई

वंगारी माथाई हे एका महिलेचे नाव आहे. ती आफ्रिकेतील केनिया देशाची रहिवासी. आफ्रिकेतून नोबल पारितोषिक मिळविणारी ती एकमेव महिला आहे. २००४ मध्ये तिला शांतीचे नोबल पारितोषिक मिळाले होते. दि. ८ ऑक्टोबरला तिचा मृत्यू झाला. ती ख्रिस्ती असली, तरी माझा दाहसंस्कारच व्हावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली. महागड्या कॉफीनमध्ये आपला देह ठेवला जावा, हे तिला मान्य नव्हते. तिच्या इच्छेचा सर्वांनी मान राखला, आणि नैरोबीतील कारिओकर स्मशानभूमीतील दाहवाहिनीत तिचे शव अग्नीच्या स्वाधीन करण्यात आले.
ती पर्यावरणवादी होती. वृक्षतोड तिला पूर्णपणे अमान्य होती. कॉफीन बनवून व त्यात देह घालून त्याचे दफन करण्याच्या विरोधामागेही तिचे वृक्षप्रेमच कारणीभूत असावे. तिला 'आफ्रिकेची वृक्ष माता' (Tree Mother of Africa) हा लोकांनी बहाल केलेला किताब होता.
अनेक प्रथम क्रमांक तिने प्राप्त केले होते. पूर्व आफ्रिकेतील ती पहिली महिला पीएच. डी. होती. एका पार्कमध्ये ६० मजली इमारत उभी केली जाणार होती. तिने त्याविरुद्ध प्रखर आंदोलन केले आणि सरकारला आपला प्रकल्प मागे घेण्याला बाध्य केले. १९९० च्या दशकात, मोई या हुकूमशहाची राजवट असताना, राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी तिने त्या कैद्यांच्या मातांचा विवस्त्र मोर्चा काढला होता. त्या मोर्चाची जगभर चर्चा झाली. अखेरीस ते तानाशाही सरकार झुकले आणि त्याने सर्व राजकीय बंद्यांची सुटका केली.
महागड्या सागाच्या लाकडाची कॉफीन बनवू नये. तिरडीही स्वस्त पॅपीरस लाकडाची बनवावी, अशी आपली इच्छा तिने मृत्यूपूर्वीच कळविली होती. तिचे नातलग आणि मित्र यांनी तिच्या इच्छेचा मान राखला आणि तिचा दाहसंस्कार केला.

      *** ***

रूढिग्रस्त चर्च

पश्चिमेच्या प्रगतिशीलतेची आपण खूप प्रशंसा करतो. पण तेथील चर्च मात्र अजूनही रूढिग्रस्तच आहे. रोमन कॅथॉलिक पंथीयांना सर्वाधिक रूढिप्रिय मानले जाते. तुलनेने प्रॉटेस्टंट चर्च सुधारणावादी आहेत, असा समज आहे. पण हा समज खोटा ठरविला आहे, प्रॉटेस्टंट पंथाच्या प्रेस्बिटेरियन या उपपंथाने. आपल्या मिझोराममध्ये हेही एक चर्च आहे. या चर्चने असे ठरविले की, कुणीही महिला पॅस्टर म्हणजे पाद्री किंवा चर्चची अधिकारी बनणार नाही. १९७० च्या दशकात एक महिलेची निवडणूक पॅस्टर म्हणून झाली होती. पण तिला ते पद मिळू देण्यात आले नव्हते. ख्रिस्ती लोकांमध्ये याविरुद्ध असंतोष होता. लोकांनी यावेळी जोरदार मागणी केली की, चर्चच्या सेवेच्या कार्यात लिंगभेद करू नये. पण ही मागणीही चर्चच्या कार्यकारी मंडळाने (सायनॉड) फेटाळून लावली. मिझोरामच्या बॅप्टिस्ट चर्चचाही महिला-पुरोहितांना विरोध आहे.
जगामध्ये हिंदूंना रूढिवादी म्हणून हिणविले जाते. पण हिंदूंमध्ये अगदी शांततापूर्ण रीतींनी इष्ट परिवर्तन घडून आले आहे. त्याचा इतिहासही त्याला साक्षी आहे आणि वर्तमानही त्याचे उदाहरण प्रस्तुत करते. आता महिला पुरोहित ही वास्तविकता झाली आहे. त्या केवळ पुराणोक्तच मंत्र म्हणतात, असे नाही, तर वेदोक्त मंत्रांनीही धार्मिक कार्ये करतात. या वर्षी मुंबईत झालेल्या गणेशोत्सवात पूजा करण्यासाठी जवळपास तीनशे शालेय मुलींना प्रशिक्षित करण्यात आले होते. तुलनेत शालेय मुलांची संख्या फक्त ७० होती. हे विद्यार्थी, शिवाजी विद्यालय, अहल्या विद्यालय आणि किंग जॉर्ज स्कूल येथे शिकणारे होते. मुंबईत, म्हणतात, की २ लाखांहून अधिक संख्येत गणेश मूर्तींची स्थापना होते; आणि शहरात फक्त ३००० पुरोहित आहेत. अनेकांना गुरुजींची बराच काळ वाट पहावी लागते. यावर उपाय म्हणून नरेश दहीबावकर या उत्साही गृहस्थाने, विद्यार्थ्यांना किमान पौरोहित्य शिकविण्याचे ठरविले आणि आपला तो निश्चय पूर्णही करून दाखविला. श्री दहीबावकर बृहन्मुंबई गणेश उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. कुणीही या तरुण महिला पुरोहितांना विरोध केला नाही. कालमानाप्रमाणे जे चालतात तेच टिकत असतात. जे विशिष्ट कालबिंदूशी थांबतात, ते संपत असतात, हा त्रिकालाबाधित नियम आहे.
      -मा. गो. वैद्य
      नागपूर
      दि. २६-११-२०११

No comments:

Post a Comment