Sunday, 1 January 2012

श्रीमद्भगवद्गीतेची सार्वकालिक यथार्थता

रविवारचे भाष्य दि. ०१-०१-२०१२ करिता

श्रीमद्भगवद्गीता हा हिंसेला व आतंकवादाला प्रेरणा देणारा ग्रंथ आहे, म्हणून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली, हे फार चांगले झाले. कुठे रशिया! आणि केवढा त्याचा प्रचंड विस्तार! जवळजवळ १० हजार कि. मी., त्याची पूर्वपश्‍चिम लांबी! थेट बाल्टिक सागरापासून पॅसिफिक महासागरापर्यंत! आणि उत्तर-दक्षिण अंतर ४८०० कि. मी.चे! हा प्रचंड रशिया आशिया आणि युरोप या दोन खंडांमध्ये विस्तारलेला! बहुधा, जगाच्या पाठीवर असा एकमात्र देश असावा! त्याच्या पूर्वेकडे, आशिया खंडात सैबेरिया हा एक प्रांत आहे. तोही खूप विस्तीर्ण. अर्थात् फक्त क्षेत्रफळात. तेथे मनुष्यांपेक्षा बर्फ जास्त आहे. या सैबेरियाच्या बर्फाळ वाळवंटात तोम्स्क नावाचे एक नगर. तेथील कनिष्ठ न्यायालयात हा खटला चालला. आणि त्याने आपल्या देशात खळबळ उडवून दिली.

चर्चचा पुढाकार

माझी पहिली प्रतिक्रिया या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याची होती. १०-१२ दिवसांपूर्वी ‘स्टार माझा’ या दूरदर्शन वाहिनीची एक चमू, काही मुद्यांवर माझे मत जाणून घेण्यासाठी घरी आली होती. त्या चमूच्या प्रमुखाने, मला, अनेक प्रश्‍नांबरोबर हा भगवद्गीतेवरील बंदीच्या मागणीचा प्रश्‍नही विचारला होता. मी म्हणालो, या मागणीमागे केवळ अज्ञान आहे; आणि त्याची उपेक्षा करणेच योग्य. परंतु गेल्या रविवारी, ब्लॉगवर, माझे भाष्य वाचल्यानंतर रा. स्व. संघातील एका ज्येष्ठ प्रचारकाचा अभिप्राय आला होता की, ‘गीताप्रकरणावर’ माझे भाष्य येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मग मलाही वाटले की, खरेच, आपण या विषयावर लिहिले पाहिजे. मनाचा असा निश्‍चय होत असतानाच खटल्याच्या निकालाची आनंददायक बातमी आली. आणि या विषयावर लिहिले पाहिजे, असे वाटले. शिवाय हेही कळले की, तोम्स्क प्रकरणामागे रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चचा पुढाकार आहे.

ऑर्थोडॉक्स चर्च

ख्रिस्ती धर्माचे अनेक संप्रदाय व पंथ आहेत. रोमन कॅथॉलिक हा सर्वात मोठा पंथ. प्रॉटेस्टंट त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्येचा. शिवाय, त्याचे उपपंथही अनेक. ऑर्थोडॉक्स चर्च हाही एक पंथच. ‘ऑर्थोडॉक्स’ म्हणजे जुना, मूलगामी, परिवर्तनविरोधी. या चर्चचा प्रभाव ग्रीस आणि अन्य काही देशांमध्ये आहे. रशियात या पंथाला मानणार्‍यांची संख्या सुमारे २० टक्के आहे. १९१७ मध्ये झालेल्या कम्युनिस्ट क्रांतीनंतर, या चर्चवर, सरकारने बंदी घातली होती. कारण, कम्युनिस्टांना धर्मसंप्रदायांचे वावडे होते. सत्तराहून अधिक वर्षे ही बंदी होती. ती आता उठविण्यात आली असे दिसते. लोक उजळ माथ्याने चर्चमध्ये जाऊ लागले आहेत. अशा या जुनाट विचारसरणीच्या पंथाच्या काही लोकांना भगवद्गीता नावडती झाली असली, तर यात नवल नाही. कदाचित् रशियामध्ये भगवद्गीतेला जो वाढता भक्तसंघ प्राप्त होत आहे, त्यामुळेही या चर्चमधील काही अतिवाद्यांचे माथे ठणकले असेल.

रशियात प्रभाव

आपण म्हणाल की रशियात! आणि भगवद्गीतेचा प्रभाव! हो, हे आश्‍चर्यकारक असले, तरी सत्य आहे. हे परिवर्तन ‘हरे कृष्ण’ या नावाने आपण ओळखत असलेल्या पंथाच्या अनुयायांनी घडवून आणले आहे. हा पंथ ‘इस्कॉन’ या नावाने सर्वत्र ओळखला जातो. ‘इस्कॉन’ म्हणजे ‘इंटरनॅशनल सोसायटी फार कृष्ण कॉन्शस्नेस्’ -अर्थ स्पष्ट आहे- ‘भगवान् कृष्णाच्या जाणिवेसाठी बनलेली आंतरराष्ट्रीय समिती.’ या समितीने भगवान् कृष्ण व त्याचे तत्त्वज्ञान यांची रशियनांना ओळख करून देण्याचे योजिले आहे. तशी सुरवात तर १९७१ मध्येच झाली होती. तेव्हा कम्युनिस्ट राजवट होती. लेओनिद ब्रेझनेव हे हुकूमशहा राज्य करीत होते. १९७१ मध्ये या इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांचा रशियाच्या राजधानीत -मॉस्कोत- पाच दिवस मुक्काम होता. प्रोफेसर कोटोवस्की या हिंदुधर्माचा अभ्यास करणार्‍या विद्वानाला भेटायला ते इतक्या दूर आले होते. तेथे त्यांचा काही तरुणांशीही संवाद झाला. त्याचा परिणाम म्हणजे आज रशियाच्या राष्ट्रमंडळातील देशांमध्ये ५५ हजार वैष्णव आहेत. मॉस्कोमध्ये इस्कॉनचे मंदिर आहे. तेथे रोज एक हजार भक्त येत असतात. प्रसंगविशेषी तर हा आकडा १० हजारांची मर्यादाही पार करतो. गोर्बाचेव रशियाचे राष्ट्रपती बनल्यानंतर, १९८८ मध्ये, या ‘इस्कॉन’ला अधिकृत मान्यता मिळाली. आता मॉस्कोमध्ये एक भव्य कृष्ण मंदिर उभारले जात आहे. ‘मॉस्को वेदिक सेंटर’ असे त्याचे नाव असेल. भक्तिविज्ञान गोस्वामी हे या केंद्राचे प्रमुख आहेत. नावावरून गडबडून जाण्याचे कारण नाही. ते रशियन आहेत; आणि सध्या भारतात आले आहेत. मॉस्कोत एक जुने कृष्ण मंदिर होते. ते मॉस्को नगर परिषदेच्या आज्ञेने पाडण्यात आले. त्याच्या मोबदल्यात इस्कॉनला पाच एकराची जमीन मिळाली असून, तेथे ते भव्य ‘वेदिक सेंटर’ उभे होत आहे. २०१२ च्या शेवटीशेवटी ते पूर्ण होईल. सध्या एका छोट्या जागेत अस्थायी मंदिर उभे आहे.

सेक्युलॅरिस्टही सामील

रशियाच्या एका न्यायालयात खटला चालू असल्याची वार्ता येताच, भारतात त्याची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. भारत सरकारनेही यात लक्ष घातले आणि संपूर्ण भारताची भावना, रशियन राजदूताला बोलावून, त्याच्या कानावर घातली. संघ, विहिंप वगैरे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी खटला भरण्याच्या कृतीचा निषेध करणे स्वाभाविकच होते. पण संसदेतही याचे पडसाद उमटले; आणि नवल म्हणजे लालूप्रसाद यादव व मुलायमसिंग यादव या छद्म सेक्युलॅरिझम्च्या अर्कांनीही त्या कृतीचा निषेध केला. आपण असेच समजले पाहिजे की, भगवद्गीतेचा कर्ता यादवकुलोत्पन्न होता म्हणून त्यांचे गीताप्रेम उफाळून आले असे नसून, त्यांना भगवद्गीतेची महती पटली आहे, म्हणूनच त्यांनी रशियातील घटनेचा जोरदार निषेध केला.
या ठिकाणी या तथाकथित सेक्युलॅरिस्टांचे वर्तन कसे असते, याचा एक नमुना सांगणे उचित ठरेल. मध्यप्रदेशाच्या भाजपाच्या सरकारने, विद्यालयातील पाठ्यक्रमात भगवद्गीतेच्या काही श्‍लोकांचा अंतर्भाव केला आहे. या संबंधीची घोषणा होताच ‘भगवाकरण’, ‘सांप्रदायिकता’, ‘आरएसएस एजेंडा’ आदि घोषणाबाजी होऊन सेक्युलॅरिस्टांनी आपली छाती पिटून घेतली. या मंडळींनी हेही ध्यानात घेतले नाही की, म. गांधी, आचार्य विनोबा भावे ही त्यांना पूज्य असलेली थोर मंडळी गीतेच्या शिकवणुकीने अनुप्राणित झाली होती. विनोबांची ‘गीताई’ आणि ‘गीताई चिंतनिका’ सर्वांनीच एकदा तरी वाचली पाहिजे. गांधी-विनोबा हे काय सांप्रदायिक होते? अशा वृत्तीच्या लोकांनीही भगवद्गीतेवरील संभाव्य बंदीचा निषेध केला, हे म्हणूनच विशेष होय.

सार्वकालिक, सार्वदेशिक

वस्तुत:, गीता हा सांप्रदायिक ग्रंथच नाही. तो भारतात निर्माण झाला असला आणि हिंदू ज्याला पूर्णावतार मानतात त्या भगवान् श्रीकृष्णांच्या मुखातून तो निघाला असला, तरी तो संपूर्ण मानवजातीसाठी आहे. देशाच्या आणि काळाच्या मर्यादा त्याला आकसू शकत नाहीत. गीतेचा उपदेश सार्वकालिक आणि सार्वदेशिक आहे. गीतेइतके स्वातंत्र्य अन्य धर्मीयांच्या कोणत्याही धर्मग्रंथाने दिलेले नाही. गीता, आपले आणि परके असा भेदच करीत नाही. गीतेच्या ९ व्या अध्यायातील २३ वा श्‍लोक सांगतो ‘‘जे अन्य देवतांचे भक्त, श्रद्धापूर्वक, त्या त्या देवतेचे पूजन करतात, तेही अज्ञानवश का होईना, मलाच पूजीत असतात.’’ मूळ शब्द आहेत ‘‘येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:| तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्॥ ‘अविधि’ या शब्दाचा अर्थ आद्य शंकराचार्यांनी ‘अज्ञान’ असा दिला आहे. हाच विचार ७ व्या अध्यायाच्या २१ व्या श्‍लोकातही व्यक्त झालेला आहे. तो श्‍लोक असा ‘‘यो यो यां यां तनुं भक्त: श्रद्धयार्चितुमिच्छति| तस्म तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्॥ म्हणजे भक्त, श्रद्धापूर्वक, ज्या ज्या देवतास्वरूपाचे पूजन करू चाहतो, त्याची त्याची श्रद्धा मी अचल करतो. येथे मोमीन-काफीर, किंवा ख्रिश्‍चन-हीदन असा भेद नाही. ‘सर्व माझे’- अशी संपूर्ण विश्‍वाला आपल्यात समाविष्ट करणारी अलौकिक उदारता आहे.

राष्ट्रीय ग्रंथ

भगवद्गीता कार्यप्रवण करणारी आहे. मोहवश हताश झालेल्या एका वीर पुरुषाला कर्तव्यप्रेरित करण्यासाठीच तर तिचा अवतार आहे. स्वत:चे उदाहरण देऊन भगवान् कृष्ण सांगतात की, ‘मला मिळाले नाही असे काहीही नाही. जे मिळवायचे आहे, असेही काही नाही. तरी मी कार्यरत आहेच की. ज्ञानी माणसानेही त्याच्या वाट्याला आलेले कर्म केलेच पाहिजे. कारण लोकस्थितीचे संधारण झाले पाहिजे.’ ज्ञानदेवांचे शब्द आहेत ‘‘हे सकळ लोकसंस्था | रक्षणीय गा सर्वथा॥'' तात्पर्य असे की, आजही आणि पुढेही भगवद्गीता यथार्थ राहणारी आहे. सर्व जननेत्यांना, मग ते कोणत्याही कार्यक्षेत्रात काम करणारे असोत, तिचे चिरंतन मार्गदर्शन आहे. असा हा अद्वितीय ग्रंथ वस्तुत: आपला म्हणजे समग्र भारतीयांचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून अधिकृतपणे मान्यता पावला पाहिजे. उ. प्र.च्या उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनीही तशी सूचना केली आहे. पण सेक्युलॅरिझम्च्या विकृत भ्रमजालामध्ये फसलेले आजचे राज्यकर्ते हे करण्याचे धाडस करतील, अशी आशा करण्यात अर्थ नाही आणि सरकारी मान्यतेवर श्रीमद्भगवद्गीतेचे सामर्थ्यही अवलंबित नाही.

इ  त  स्त  त:

भिन्न भिन्न संस्कृतीचे संमेलन

आपण असे समजतो की, ख्रिस्ती धर्मप्रसाराने संपूर्ण युरोप खंड आणि संपूर्ण अमेरिका म्हणजे दक्षिण व उत्तर अमेरिका या ख्रिस्ती झालेल्या आहेत. पण वस्तुस्थिती तशी नाही. अनेक जमातींनी आपल्या जुन्या श्रद्धा आणि विश्‍वास अजूनही जपून ठेवलेले आहेत. त्यांची नावे ख्रिस्ती नावांसारखी दिसतील, पण त्यांचे अंतरंग वेगळे आहे.
आपली भिन्न संस्कृती व श्रद्धा जपणार्‍या जमातींच्या प्रतिनिधींचे एक संमेलन सुमारे तीन महिन्यांपूर्वी मेक्सिकोतील ताओस या शहरी संपन्न झाले. या संमेलनात ४२ प्रतिनिधी होते. चेरोकी, लाकोटा, होपी, किपात्सी या परंपरांच्या लोकांबरोबरच काही हिंदूही तेथे उपस्थित होते. हे संमेलन, उ. अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्’ या संस्थेने आयोजित केले होते. आपल्या नागपूरचे प्रा. यशवंत पाठक हे या संस्थेच्या संयोजकांमध्ये प्रमुख आहेत.
पहिले सत्र प्रार्थनेने सुरू झाले. यंगवुल्फ या गृहस्थाने प्रार्थना म्हटली. नंतर सँटो डोमिनियनचे प्रतिनिधी जोस यांनी परिषदेला आशीर्वाद देणारे भाषण केले. नंतर पेरू देशात ख्रिस्ती साम्राज्यवाद कसा पसरला हे, अलबुकर्क येथे निवास करणार्‍या किपात्सी पंथीयांनी स्पष्ट केले. हिंदू स्वयंसेवक संघाचे लक्ष्मीनारायण यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात (युएसए) बालगोकुलम ची  कशी वाढ होत आहे, हे विशद केले.
डोग कोनेल यांनी पर्यावरण-संरक्षणाचे महत्त्व सांगितले. डॉ. योवेट्टो रोसर या विदुषीचे समारोपीय भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात स्थानिक संस्कृतींना विनाशाचा कसा धोका संभवतो, हे इतिहासातील अनेक दाखले देऊन स्पष्ट केले. आक्रमक संप्रदायांपासून वाचविण्यासाठी फक्त भारतच आपल्याला मदत करू शकतो, हेही त्यांनी आवर्जून सांगितले; आणि सर्वांनी आपापसात ऐक्यभावनेने राहिले पाहिजे, असा उपदेश केला.

थायलंडमधील गणेशोत्सव

या वर्षी थायलंडमध्ये गणेशोत्सव धूमधडाक्यात लोकांनी साजरा केला. दोन ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. एक, राजधानी बँकॉकमधील रामिनतरा येथील शिवमंदिरात आणि दुसरी बँकॉकपासून सुमारे २०० कि. मी. दूर असलेल्या नखोन नायक येथील गणेश मंदिरात.
जवळजवळ ३८ फूट उंचीच्या गणेशाच्या भव्य मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची पूजा, बँकॉकच्या बौद्ध विद्यापीठाचे कुलपती श्री फराराज कोसोन यांनी केली. रामिनतरा मंदिराचे प्रमुख श्री माए खु व्हॉन सॉंग यांनीही पूजन केले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी एक भव्य मिरवणूक निघाली. भगवी वस्त्रे तसेच स्थानिक पद्धतीचा पेहराव केलेल्या लोकांनी हातात झेंडे फडकवीत आणि भजन व कीर्तनाचे गायन करीत, या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाग घेतला. थाई पद्धतीच्या घोषचमूनींही (बँड्स) मिरवणुकीत चैतन्य ओतले.
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ हिंदूच नव्हेत, तर स्थानिक थाई लोकही या उत्सवात उत्साहाने भाग घेत असतात. एक मजेची गोष्ट म्हणजे या वर्षी २८ थाई गणेशभक्त आपली गणेशमूर्ती घेऊन मुंबईला आले होते. आणि चौपाटीवर त्यांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. या २८ जणांच्या चमूचे नेतृत्व शिल्पकॉन विद्यापीठाचे डीन डॉ. खून खोन कृत आणि पं. ब्रह्मानंद दुबे यांनी केले होते.
संस्कृत भारतीचे कार्य

‘संस्कृत भारती’ ही संस्था लोकांना संस्कृत भाषेत बोलणेचालणे करायला शिकविते. तिची शिकविण्याची पद्धती अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की, लोकांना आता संस्कृत कठिण व क्लिष्ट भाषा आहे, असे वाटेनासेच झाले आहे.
‘संस्कृत भारती’ गेल्या ३० वर्षांपासून हे कार्य करीत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे ९० लाख लोक संस्कृत बोलू शकतात. नव्हे बोलतातही. १९ देशांमध्ये ‘संस्कृत भारती’चे कार्य चालू झाले आहे.
आपल्या देशातील बहुतेक प्रांतांमध्ये १० दिवसांचे संस्कृत संभाषणाचे वर्ग चालू असतात. साधारणत: दर महिन्याला एक वर्ग होत असतो. सुरवातीला एका वर्गात मोठ्या मुश्किलीने १०-१५ लोक येत असत. आता प्रत्येक वर्गात ५०-६० जणांची उपस्थिती असतेच. आणि मुख्यत:, ती तरुणांची असते. म्हैसूरच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस या संस्थेतील प्रोफेसर आर. सुब्बाकृष्ण सांगतात की, अत्याधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान शिकविणार्‍या आयआयटींमध्ये संस्कृत भाषेवर संशोधन चालू आहे. मुंबईतील आयआयटीत तर संस्कृत भाषेतील विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या अभ्यासाकरिता एक वेगळे केंद्रच (सेल) कार्यरत आहे.
भय्याजी काणे यांचा स्मृतिदिन

कुठे महाराष्ट्र? कुठे मणिपूर? पण या मणिपूर राज्याच्या उखरूल जिल्ह्यातील खरासोम या गावी ‘ओजा शंकर विद्यालय’ नावाची शाळा आहे. ‘शंकर’ हे भय्याजींचे नाव. शंकर दिनकर काणे हे पूर्ण नाव.
भय्याजी काणे संघाचे कार्यकर्ते पण प्रचारक नव्हे. साधेच कार्यकर्ते. त्यांनी आपल्या कर्तृत्वासाठी मणिपूर राज्य निवडले. १२ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. पण, त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्यांच्या स्मृतीत ते जिवंतच आहेत. २६ ऑक्टोबर २०११ ला ओजा शंकर विद्यालयात त्यांचा स्मृतिदिन साजरा झाला. भय्याजींचे माजी विद्यार्थी रिंगफानी, त्या प्रसंगी म्हणाले, ‘‘अतिशय साधे असलेल्या भय्याजींनी स्वत:ला समाजासाठी वाहून घेतले होते.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘१९७१ साली, भय्याजी महाराष्ट्रातून अतिशय दुर्गम अशा मणिपूरमधील न्यू त्सोम या गावी आले. तेथे शिक्षक म्हणून त्यांनी एक वर्ष सेवा केली. त्या अल्पावधीत स्थानिक तांखुल नागांपैकी ते एक झाले. नंतर ते आम्हाला शिक्षणासाठी कर्नाटकात घेऊन गेले. आईवडिलांप्रमाणे त्यांनी आमची काळजी घेतली. निरनिराळ्या प्रांतांमध्ये नेऊन त्यांनी जवळपास ३०० विद्यार्थ्यांना शिक्षित केले. ही मुले विविध जनजातींची व विविध धर्मांची होती. पण त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. ‘शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता’ हे त्यांचे ध्येय होते. त्यांचे ते स्वप्न पूर्ण करणे ही आता आपली सर्वांची जबाबदारी आहे.’’

    
 -मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ३१-१२-२०११

No comments:

Post a Comment