Saturday, 21 January 2012

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक

रविवारचे भाष्य दि. २२-०१-२०१२ करिता

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक महाराष्ट्र शासनाने तयार केले आहे. ‘‘सन २००५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ८९’’ असे या विधेयकाचे नामाभिधान आहे. गेल्या २०११ च्या डिसेंबर महिन्यात नागपुरात झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल, अशी शक्यता वर्तविली गेली होती. पण, असे काही घडल्याचे दिसले नाही. २००५ सालापासून विधेयक तयार असावे व त्यावर विधिमंडळात चर्चा होऊन त्याचे गेल्या सुमारे सहा वर्षांमध्ये कायद्यात रूपांतर होऊ नये, ही नवलाची गोष्ट आहे. सरकार या बाबतीत फारसे गंभीर नाही, असा कुणी तर्क केला, तर त्याला दोष देता येणार नाही.

निमित्तकारण

नागपुरात, अधिवेशन चालू असण्याच्या काळात, दि. १९ डिसेंबरला या विधेयकाची चर्चा करण्याचा कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आयोजिला होता. या चर्चासत्रात मी येऊन आपले विचार व्यक्त करावे, अशी विनंती ‘अंनिस’चे अग्रगण्य कार्यकर्ते श्री श्याम मानव यांनी माझ्या घरी जातीने येऊन मला केली होती. मी ते आमंत्रण नक्कीच स्वीकारले असते, पण नेमक्या त्याच दिवशी, अमरावतीला, आमच्या घरचे एक लग्नकार्य असल्यामुळे आणि घरचा कुटुंबप्रमुख म्हणून मला तेथे जाणे अनिवार्य असल्यामुळे मी त्या चर्चासत्रात उपस्थित राहू शकणार नाही, असे श्री मानव यांना सांगितले. तेव्हा त्यांनी, मी त्यावर, एक लेख लिहावा, अशी सूचना केली व त्या विधेयकाच्या प्रारूपाची एक प्रतही मला दिली. या माझ्या लेखाचे हे निमित्तकारण आहे.

निरुपद्रवी

या विधेयकाचे प्रारूप मी वाचले. मला त्यात फारसे आक्षेपार्ह वाटले नाही. त्याविरुद्ध जोरदार प्रचार करण्याची किंवा आंदोलन उभे करण्याची आवश्यकता व औचित्य आहे, असे मला वाटत नाही. त्याच बरोबर हे विधेयक अत्यंत आवश्यक आहे व त्याचा कायदा बनविला गेला नाही, तर समाजाचे फार मोठे नुकसान होईल, असेही मला वाटत नाही. विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले, तर दारूबंदी, हुंडाबंदी यासारखे जे निरुपद्रवी कायदे आहेत, त्यांच्या मांदियाळीत आणखी एका कायद्याची भर पडेल.

उद्दिष्ट

याचा अर्थ, या विधेयकाच्या उद्दिष्टात जे निरूपिले आहे, त्याला काही अर्थ नाही, असा होत नाही. उद्दिष्ट चांगलेच आहे. त्याचे शब्द आहेत : ‘‘अंधविश्‍वास आणि अज्ञानावर पोसल्या जाणार्‍या अनिष्ठ (अनिष्ट) व दुष्ट प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने, तसेच समाजातील सर्वसामान्य लोकांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक शोषण करून त्यांचे नुकसान करण्याच्या व त्या द्वारे समाजाची घडी विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने वैदू व भोंदूबाबा यांची सर्वसामान्यत: जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या तथाकथित अतींद्रिय किंवा अतिमानुष शक्ती किंवा चमत्कार करून भूतपिशाच्च यांच्या नावाने जनमानसात रुजविलेल्या अंधविश्‍वासापोटी निर्माण होणार्‍या अनिष्ट व दुष्ट प्रथांचा व अघोरी रूढींचा मुकाबला करून त्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने या संबंधात समाजामध्ये जागृती व जाणीव निर्माण करण्याकरिता तसेच निकोप व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता’’ इत्यादि. या उद्दिष्टाला आक्षेप घ्यावा असे यात काहीही नाही. उद्दिष्ट पुढे जे म्हणते की, या अनिष्ट प्रथांमुळे ‘‘जनतेचे मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान होण्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत असून, त्यांचे प्रमाण भयावह आहे’’ ते मात्र खरे नाही. समाज उत्सन्न व्हावा, असे काहीही आज तरी घडत नाही. ज्या अनिष्ट प्रथांचा उल्लेख विधेयकात करण्यात आलेला आहे व ज्यांची यादी मी या लेखात देणार आहे, त्यांचे प्रमाण भयावह नाही. तसे असते, तर अशा अनिष्ट घटना वारंवार घडल्या असत्या; व त्यांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरले गेले असते.

अनिष्ट प्रथा

अनिष्ट व अघोरी कृतींची यादी या विधेयकात दिलेली आहे. ती अशी -
१) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेवून मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, छताला टांगणे, दोराने किंवा केसांनी बांधणे, त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन इजा पोचविणे, उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अघोरी कृत्य करणे, तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे.
२) एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कार करून त्यापासून आर्थिक प्राप्ती करणे, तसेच अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकविणे अथवा त्यांच्यावर दहशत बसविणे.
३) अतिमानुष शक्तीची कृपा मिळविण्यासाठी ज्यामुळे जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे; आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे.
४) मौल्यवान वस्तू, गुप्त धन, जलस्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष कृत्य करणे आणि जारणमारण अथवा देवदेवस्की (?) यांच्या नावाखाली नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देेणे, त्याकरिता प्रवृत्त करणे, अथवा प्रोत्साहन देणे.
५) आपल्या अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा अतींद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे वा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे.
६) एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, काळी विद्या करते, भूत लावते, मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत संशय निर्माण करणे, त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे. रोगराई पसरल्यास कारणीभूत ठरणारी आहे, इत्यादी सांगून वा भासवून संबंधित व्यक्तीचे जगणे मुश्कील करणे, त्रासदायक करणेे वा कठीण करणे, कुठलीही व्यक्ती सैतान असल्याचे किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचे जाहीर करणे.
७) जारणमारण, करणी किंवा चेटूक अथवा यासारखे प्रकार केले आहेत या सबबीखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्नावस्थेत धिंड काढणे किंवा तिच्या रोजच्या व्यवहारावर बंदी घालणे.
८) मंत्राच्या साह्याने भूत पिशाच्चांना आवाहन करून किंवा भूत पिशाच्चांना आवाहन करीन अशी धमकी देऊन एकूणच लोकांच्या मनात घबराट निर्माण करणे, मंत्रतंत्र अथवा तत्सम गोष्टी करून एखाद्या व्यक्तीस विषबाधेतून मुक्त करतो आहे असे भासवणे, शारीरिक इजा होण्यास भुताचा किंवा अमानवी शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणे, लोकांना वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून, त्याऐवजी त्यांना अघोरी कृत्ये वा उपाय करण्यास प्रवृत्त करणे अथवा मंत्रतंत्र (चेटूक) जादूटोणा अथवा अघोरी उपाय करण्याचा आभास निर्माण करून लोकांना मृत्यूची भीती घालणे, वेदना देणे किंवा आर्थिक वा मानसिक हानी पोचविणे.
९) कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे.
१०) बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदल करून दाखवतो असा दावा करणे.
११) (क) स्वत:त विशेष शक्ती असल्याचे अथवा कुणाचा तरी अवतार असल्याचे वा स्वत:त पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे.
(ख) मूल न होणार्‍या स्त्रीला अतींद्रिय शक्ती द्वारा मूल होण्याचे आश्‍वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे.
(१२) मंद बुद्धीच्या (mentally retarded) व्यक्तीमध्ये अतींद्रिय शक्ती आहे असे इतरांना भासवून त्या व्यक्तीचा धंदा व व्यवसाय यासाठी वापर करणे.
अशी ही संपूर्ण यादी आहे. यातील सर्वच गोष्टी अनिष्ट आहेत, असे नाही. पाण्याचा स्रोत शोधण्यासाठी, मी स्वत: एका पाणीवाल्या महाराजांना आमंत्रित केले होते. पण त्यांच्या निष्कर्षावर अवलंबून न राहता, मी नंतर एका सरकारमान्य भूगर्भशास्त्रज्ञालाही बोलविले. दोघांनी जवळजवळ तीच जागा सांगितली; व तेथे कूपनलिका खोदल्यानंतर पाणी लागले. गावकर्‍यांना आश्‍चर्य वाटले; कारण या शेतात पाणी लागणार नाही, या संबंधी शेतमालकापासून अन्य सर्व गावकर्‍यांची खात्री होती.
अतींद्रिय शक्ती असू शकते, असे मला वाटते. विवेकानंदांना, रामकृष्ण परमहंसांच्या केवळ हस्तस्पर्शाने एका विलक्षण शक्तीचा प्रत्यय आला होता. रामकृष्ण हे कुणी भोंदू जादूगार नव्हते आणि विवेकानंदही भोळसट मूर्ख नव्हते. सत्यसाई बाबा हवेतून घड्याळे किंवा अन्य काही वस्तू काढून देतात, असे मी ऐकले आहे. पण अनेकांचा या चमत्कारांवर विश्‍वास आहे. तो विश्‍वास खोटा का मानावा हे मला कळत नाही. विशिष्ट प्रकारच्या योगसाधनेने अलौकिक सिद्धी प्राप्त होऊ शकतात, यावर माझा विश्‍वास आहे. जवळजवळ जन्मांध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील माधान गावच्या गुलाबराव महाराजांना सर्व शास्त्रांचे ज्ञान का व कसे मिळाले असेल? रामानुजम्ला, शाळेत शिकत असतानाच, गणितातील गहन तत्त्वे कशी अवगत झाली असतील? ज्ञानेश्‍वरमाउली वयाच्या १७ व्या वर्षी ज्ञानेश्‍वरीसारखा अद्भुत ग्रंथ कसे निर्माण करू शकली? या सर्व अलौकिक, अतिभौतिक शक्ती आहेत. पण या शक्तींनी प्राप्त अलौकिकत्वाचा यांच्यापैकी कुणीही व्यापार केला नाही. तेव्हा पूर्वजन्मातील म्हणा किंवा या जन्मातील म्हणा अतर्क्य अशा शक्तींनी हे पुरुष युक्त होते, हे मानावेच लागते. ‘अंनिस’वाले पूर्वजन्म वगैरे मानतात वा नाही, हे मला माहीत नाही.

आघातलक्ष्य

‘अंनिस’चे म्हणा अथवा या विधेयकाचे म्हणा, आघातलक्ष्य, भोंदूगिरी व त्या द्वारे लोकांची केली जाणारी फसवणूक हे आहे. यात काही वावगे नाही. या विधेयकात नमूद केलेल्या अघोरी कृत्यांची जी सूची दिली आहे, तिच्यातील काही गोष्टी घडत असतात, या विषयी शंका नको. नरबळीचीही उदाहरणे घडतात. क्वचित घडतात पण घडतात. त्यांना दंडित करण्याची व्यवस्था असण्यात गैर काहीही नाही. तथापि, सर्वच बाबा आणि महात्मे भोंदू असतात, असे मात्र नाही. मंत्रोच्चारातही सामर्थ्य असू शकते. विंचवाचे विष उतरविणारे मांत्रिक मला माहीत आहेत. असा प्रश्‍न करता येईल की, खरेच का मंत्राने विष उतरते की ते उतरले आहे असे विंचू चावणार्‍यांचा ग्रह होतो? ते विष उतरत नाही पण तसा त्यांचा ग्रह होतो, असे आपण समजू. पण असा ग्रह होणे चूक की बरोबर? शास्त्र सांगते की शारीरिक रोगात मानसिकतेचीही भूमिका असते. मन आणि शरीर परस्परांवर परिणाम करीत असतातच. मग एखाद्या बाबाच्या सान्निध्यामुळे, बोलण्यामुळे, स्पर्शामुळे, व्यक्तीला समाधान वाटत असेल तर त्यात वाईट काय आहे? ते, काही जपजाप्य, क्रियाविधी, अनुष्ठाने इत्यादि उपासना सांगत असतील व शिष्य ते आचरत असतील व त्यांच्या मनाला त्यापासून शांती लाभत असेल, तर आक्षेप घेण्याचे कारण काय? आपल्या अशा भक्तांना, वरील सूचीत वर्णन केल्याप्रमाणे ते यातना देत असतील, तर गोष्ट वेगळी. ती कृती दंडनीयच समजावयाला हवी.

सवलत

या विधेयकाच्या १३ व्या कलमात एक व्यापक सवलत देण्यात आली आहे. ती प्रशंसनीय आहे. ते कलम सांगते, ‘‘शंका दूर करण्यासाठी या द्वारे असे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे शारीरिक वा आर्थिक बाधा पोचत नाही, असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.’’ माझ्या मते ही सवलत, या कायद्याच्या गैरवापरापासून लोकांना वाचवू शकेल.

एक प्रश्‍न

एक असा प्रश्‍न विचारता येईल की, ज्या अनिष्ट प्रथा व रूढी यांचा निर्देश वरील सूचीत केला आहे, त्या रूढी व प्रथा या कायद्याने दूर होतील काय? माझे उत्तर ‘नाही’ असे आहे. थोडा फार धाक निर्माण होऊ शकतो आणि कायदा वचक निर्माण करण्यासाठीच असतो. खून, चोरी, दरोडे यांच्या विरोधात कायदा आहे. तरी या अनिष्ट घटना घडतातच. पण म्हणून तो कायदा निरर्थक आहे, असे म्हणता यावयाचे नाही. तथापि, चोरी, खून आदिसंबंधीचा कायदा आणि अंधविश्‍वासातून उद्भवणार्‍या अनिष्टांविरुद्धचा कायदा यात एक मूलभूत फरक आहे. चोरी, खून, दरोडे घालणारे लोक दुसर्‍यांच्या घरावर आक्रमण करून गुन्हा करीत असतात. भोंदू बाबा लोकांच्या घरावर आक्रमण करीत नाहीत. लोकच त्यांच्याकडे जात असतात. ते वाईट सल्ला देऊ शकतात, देतही असतील. पण ते भक्तांना बोलवायला जात नाहीत. कोंबडा, बकरा यांचा बळी किंवा अगदी नरबळीही ते स्वत: देत नाहीत. ते फक्त सांगू शकतात. शिवाय, ते त्यांनाच सांगू शकतात, जे त्यांच्याकडे जातात. बहुतेक कोणतेच बाबा स्वत:ची जाहिरात करीत नसतात. या दृष्टीने विचार केला, तर अशा कायद्याची आवश्यकता नाही, याच निष्कर्षाला यावे लागेल.

समाजप्रबोधन

नवसयायास, कोंबड्या-बकर्‍यांचा बळी, हे प्रकार आपल्या समाजात अजीबात नाहीत, असा दावा करता येणार नाही. पण या रूढी कायद्याने दूर होतील, असे मला वाटत नाही. त्यावर मूलगामी उपाय शिक्षण हाच आहे. आमच्या गावच्या जवळील साकोर्ली येथील देवीजवळ कोंबड्यांचा बळी देण्याचा प्रकार मी माझ्या लहानपणी पाहिला होता. आता त्याचा मागमूसही नाही. कोंबड्याचे किंवा बकर्‍याचे मांस खाणे संपले किंवा कमी झाले असे मात्र नाही. त्याचे प्रमाण वाढलेलेही असेल. पण देवाची कृपा संपादन करण्याचा तो मूर्खपणा आता संपलेला आहे. आता जिभेच्या चोचल्यासाठी ते चालू आहे. ‘अंनिस’वाल्यांचा त्याला विरोध नसावा. म्हणून माझ्या मते या अनिष्टांवर कार्यक्षम उपाय समाजप्रबोधन हाच आहे. हे प्रबोधन ज्याप्रमाणे विद्यालयातील औपचारिक शिक्षणातून होऊ शकते, त्याचप्रमाणे, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात, भाषणे, कीर्तने, प्रवचने, नाटकादि मनोरंजनाची साधने यातूनही होऊ शकते; आणि ते सतत होत असते म्हणूनच सध्या या प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

हिंदूच का?

आणखी एक प्रश्‍न विचारला जातो. ‘अंनिस’वाले हिंदू समाजातील रूढींबाबतच सक्रिय का असतात? मुसलमानांमध्ये वाईट प्रथा किंवा रूढी नाहीत काय? तीनदा उच्चारल्याबरोबर तलाक, महिलांना बुरखा, दर्गे, मजारी इत्यादींची पूजा, मोहरमची सवारी अंगात येणे इत्यादि अनिष्ट रूढी त्यांच्यातही आहेत. ‘अंनिस’वाले त्या बाबतीत मौन का असतात? मला, व्यक्तिश: या बाबतीत ‘अंनिसला’ दोष द्यावा असे वाटत नाही. ते बोलत नसले, तरी मनोमन त्यांना जाणीव असते की ते हिंदू आहेत व त्यांचे हिंदू समाजावर प्रेम आहे. या प्रेमापोटीच त्यांना त्यांच्या समजुतीप्रमाणे हिंदू समाज निर्दोष व निर्लेप असावा, असे वाटते. त्यांना कदाचित् जाणवतही नसेल की, ते या आंदोलनाने एक प्रकारे आपल्या राष्ट्रजीवनाचा जो मुख्य व महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आपला हिंदू समाज आहे, त्यालाच ते बलवान करीत आहेत. असा बलवान की अन्य समाजांनाही, आपण परत या समाजाशी समरस व्हावे, असे वाटावे. त्यांच्या सुप्त मनात आपल्या देशाचे भाग्य व भवितव्य हिंदूंशी निगडित आहे, हेही ठसलेले असावे. म्हणूनच त्यांचे लक्ष्य हिंदू समाज हेच असणार. या कारणांचा विचार करता या विधेयकाविरुद्ध आंदोलन वगैरे करावे, असे मला वाटत नाही.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २१-०१-२०१२

No comments:

Post a Comment