Saturday, 28 January 2012

इ त स्त त:

रविवारचे भाष्य दि. २९-०१-२०१२ करिता

 

गावांच्या कथा

आपला भारत देश, खरे म्हणजे, गावांचा म्हणजे खेड्यांचा देश आहे. भारत खर्‍या अर्थाने समजून घ्यावयाचा असेल तर खेडी व तेथील लोकजीवन बघितले पाहिजे. मुंबई किंवा दिल्ली बघून खर्‍या भारताची ओळख व्हावयाची नाही.
या नव्या वर्षाच्या आरंभी दिल्लीहून प्रकाशित होणार्‍या ‘संडे इंडियन’ या वृत्तपत्राने, जो वार्षिक अंक प्रकाशित केला, तो भारतातील गावांची विविधता वर्णन करण्यासाठी. अनेक गावांची त्यात माहिती आहे. ती जशी रंजक आहे, तशीच उद्बोधकही. त्यातील हे काही नमुने.
(अ) उत्तर प्रदेशाच्या गाजीपूर जिल्ह्यात ‘गमहर’ या नावाचे एक गाव आहे. नाव छान आहे. ‘गम’ म्हणजे दु:ख आणि ‘हर’ म्हणजे हरण करणारे. तर या दु:ख दूर करणार्‍या गावाची लोकसंख्या ८० हजार आहे! पण तरीही ते गावच. कारण, तेथे ग्रामपंचायत आहे. या गावाचे वैशिष्ट्य हे की, या गावातील प्रत्येक घरातील कुणी ना कुणी आपल्या सैन्यदलात सामील झालेला आहे.
(आ) पंजाबात ‘खरोडी’ नावाचे एक गाव आहे. ते बहुधा भारतातील सर्वात श्रीमंत गाव असावे. कारण, येथील अधिकांश रहिवासी, अमेरिकेत किंवा कॅनडात आहेत. ते राहतात तेथे. पण पैसे गावातील आपल्या पालकांना व पाल्यांना पाठवितात.
(इ) कर्नाटकातील ‘मत्तूर’ गावाचाही उल्लेख या ‘संडे इंडियन’मध्ये आहे. मी याच स्तंभात ‘मत्तूर’चा परिचय करून दिला होता. काही वर्षांपूर्वी, एक दिवस या गावात माझा मुक्काम होता. संपूर्ण गाव संस्कृत बोलते. शेतमजूर सुद्धा संस्कृत समजतात. कारण, त्यांचा मालक त्यांच्याशी संस्कृतातच बोलतो. ज्या घरी माझा मुक्काम होता, त्या घरातील महिला आपसात संस्कृत भाषेत बोलत होत्या. मला थोडे फार संस्कृत येत असल्यामुळे, मला त्यांच्या घरी वास्तव्य करण्यात अजीबात अडचण आली नाही. असे हे संस्कृत गाव मत्तूर.
(ई) आपल्या महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील ‘शिराळा’ या गावाचीही त्यात नोंद आहे. आपणांस माहीत असेल की, येथले लोक सापाला भीत नाहीत. ते त्यांचे मित्र आहेत. नागपंचमीच्या दिवशी येथे नागांचे प्रदर्शन व त्यांचे खेळ होतात आणि ते बघण्यासाठी प्रचंड गर्दी असते. असे कळते की, सध्या प्राणी-संरक्षण योजनेखाली या सर्पक्रीडेवर बंदी घालण्यात आली आहे.

...आणि ही एका शेतकर्‍याची कथा

या शेतकर्‍याचे नाव श्रीनिवास मूर्ती. वय ३८ वर्षे. त्याच्या गावाचे नाव आहे सिद्दमहुंडी. त्याचे वैशिष्ट्य हे आहे की, तो दोनशे प्रकारच्या धानाच्या जातींची बियाणे तयार करतो. त्याला ही प्रेरणा मिळाली, पुरीच्या जगन्नाथ मंदिराकडून. या मंदिरात, अशी परिपाटी आहे की, देवाच्या नैवेद्यासाठी शिजविण्यात येणारा भात दररोज वेगळ्या प्रकारच्या तांदळाचा असतो. म्हणजे ३६५ प्रकारचा तांदूळ, तेथील लोकांना परिचित आहे. श्रीनिवास मूर्ती म्हणतो, ‘‘या घटनेने माझे डोळे उघडले. आपल्या या देशी जातीच आपला उद्धार करू शकतील. बीटी वगैरे जाती आपल्या कामाच्या नाहीत.’’
दिनांक २६ डिसेंबर २०११ च्या, दिल्लीहून प्रकाशित होणार्‍या ‘पायोनियर’ या इंग्रजी दैनिकात या शेतकर्‍याची माहिती प्रकाशित झाली आहे. त्या माहितीचा हा सारांश-
श्रीनिवास मूर्तीने ३५० हून अधिक तांदळाच्या जाती गोळा केल्या आहेत. या सर्व देशी जाती आहेत आणि तो त्यांचे बियाणे परवडणार्‍या भावात शेतकर्‍यांना देत असतो. तो म्हणतो, ‘‘मी नैसर्गिक शेती करतो व सेंद्रिय खतांचाच उपयोग करतो. आपण, आपल्या देशी बियाणांचे रक्षण केले पाहिजे. हितसंबंधी लोकांच्या सतत प्रचारामुळे आपल्या अनेक देशी जाती नष्ट झाल्या आहेत. मी अनेक प्रांतांमध्ये हिंडून तेथील जातींचे बियाणे प्राप्त केले आहे आणि त्यांच्यावर प्रयोग करून मी काही नवीन जातीही शोधून काढल्या आहेत.’’
श्रीनिवास मूर्ती मोठा जमीनदार नाही. त्याचे बियाण्यांचे प्रयोग-क्षेत्र केवळ दीड एकराचे आहे. या छोट्याशा क्षेत्रफळात, तो दोनशे जातींचे बियाणे तयार करतो. या जातींमध्ये प्रखर उन्हाळा सहन करणार्‍या जशा जाती आहेत, तसेच अतिपावसातही पीक देणार्‍या जाती आहेत. त्याने २००७ पासून हे कार्य सुरू केले आणि आता तो या विषयाचा तज्ज्ञ झाला आहे. शेतकर्‍यांच्या सर्व प्रश्‍नांना तो नीट उत्तरे देतो आणि सांगतो की, निरंतर कृषिविकासासाठी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) देशी जाती व देशी शेती हाच एकमात्र सफल उपाय आहे. त्याला ‘सहज समृद्धी’ या गैरसरकारी सेवा संस्थेची मदतही प्राप्त आहे.

समाजपरिवर्तनाचा एक शुभ संकेत

युगानुसार प्रत्येक समाजाला बदलावेच लागते. जे बदलत नाहीत आणि कोणत्या तरी विशिष्ट कालबिंदूपाशी थांबतात ते नष्ट होत असतात. आपला हिंदू समाज आपल्या हिंदू संस्कृतीसह अजूनही टिकून आहे, याचे कारण, आपण आपल्या चरित्रात कालानुरूप बदल केलेले आहेत. आपण शाश्‍वत काय, युगानुकूल काय आणि अपवादात्मक काय याचा नित्य विवेक केला आहे. यालाच शाश्‍वत धर्म, युगधर्म आणि आपद्धर्म अशी जुनी नावे आहेत.
तर येथे हे सांगायचे आहे की, आद्य शंकराचार्यांनी जे चार मठ, भारताच्या चार दिशांना, आपल्या देशाची एकसंधता जनमनावर बिंबविण्यासाठी स्थापन केले, त्यातला आद्यमठ कर्नाटकातील शृंगेरीचा आहे. तेथे शिवानंद नावाच्या एका दलित तरुणाला ब्रह्मचारी व्रताची म्हणजे संन्यास धर्माची दीक्षा देण्यात आली आहे. ब्राह्मणत्व जन्माने येत नाही, ते गुण व कर्म यांच्या द्वारे प्राप्त होत असते, असे आपण शास्त्रात वाचीत असतो. पण ते व्यवहारात क्वचितच आणीत असतो. हे अप्रूप कार्य शृंगेरीच्या मठाने केले आहे.
शिवानंद, जन्माने ‘पराया’ जातीचा आहे. ही एक अस्पृश्य जात आहे. तो मवेलीकारा या गावचा. हे गाव आद्य शंकराचार्यांची जन्मभूमी असलेल्या, केरळातील, कालडी या गावापासून सुमारे शंभर कि. मी.वर आहे. त्याचे व्यावहारिक शिक्षण प्री-युनिव्हर्सिटीपर्यंत झाले आहे. त्यानंतर त्याने वेदाभ्यास केला. उपनिषदांचाही अभ्यास केला. आचार्य नरेंद्र भूषण यांच्याकडून त्याने हे शिक्षण प्राप्त केले. शृंगेरी मठाकडून त्याला संन्यासदीक्षा दिली गेली आहे. कुणी सांगावे, तो पुढे एखाद्या मठाचा अधिकृत शंकराचार्यही होईल.
हे हिंदू समाजातच होऊ शकते. आमच्या गावात तर पौरोहित्य करणारा कुणीही ब्राह्मण जातीचा नाही. अन्य जातीतील एक व्यक्ती, वास्तू, विवाह आदि धार्मिक कार्यक्रम पार पाडते. आता अनेक वेदविद्यालयातही सर्व वर्णांच्या लोकांना वेदसंहिता शिकविली जाते.

ते कर्नाटकात तर हे मेघालयात

मेघालय हे आपल्या देशाच्या अतिपूर्वेकडील एक राज्य. छोटेसेच राज्य. २००१ च्या जनगणनेप्रमाणे मेघालयाची लोकसंख्या फक्त २३ लक्ष १८ हजार, म्हणजे आपल्या आजच्या नागपूरपेक्षाही कमी. यातले बहुसंख्य ख्रिस्ती. बहुधा ८५ टक्क्यांच्या वर. म्हणून तर त्यांचे एक वेगळे राज्य झाले! तत्पूर्वी मेघालय म्हणजे आसाम प्रांताचा एक जिल्हा होता. मेघालयात शिलॉंग हे मोठे शहर. ते त्याची राजधानी आहे. शिलॉंग, पूर्वी म्हणजे १९७२ पूर्वी, संपूर्ण आसामची राजधानी होते. २१ जानेवारी १९७२ ला, मेघालयाचे नवे राज्य बनले, आणि शिलॉंग त्याची राजधानी झाले.
येथील ख्रिस्ती जनता ‘ऑटोमन फेस्टिवल’ हा सण साजरा करते. हा संगीत, नृत्य आणि मौजमजेचा सण असतो. या वर्षी, तो सण रविवारी आला. ख्रिस्ती उपासनातंत्रात रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करायची असते. त्या दिवशी कुणीही काम करायचे नसते. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आल्यामुळे आणि ते ख्रिस्ती असल्यामुळे ‘रविवार’ हा सुटीचा दिवस ठरविण्यात आला. ती प्रथा आजही चालू आहे. ख्रिस्ती पुराण असे सांगते की, ईश्‍वराने सहा दिवस सृष्टी निर्माण केली. मग त्याला एक दिवस विश्रांती घ्यावीशी वाटली. तो रविवार होता. म्हणून तो सर्वांसाठीच सुटीचा दिवस ठरला.
तर काय, मौजमजेचा सण रविवारी आला; आणि तेथील चर्चच्या मुखंडांनी पत्रक काढले की, या वर्षी हा सण साजरा करू नये. रविवार हा प्रार्थनेचा दिवस आहे.
पण हा फतवा मेघालयवासीयांना आवडला नाही. त्यांनी तो मानावयाचा नाही, असे ठरविले. अनेक समाजनेते समोर आले आणि त्यांनी भलत्या ठिकाणी नाक खुपसणार्‍या धर्मगुरूंच्या या पत्रकाचा प्रखर निषेध केला. ‘शिलॉंग प्रेस क्लब’ने या विषयावर एक परिसंवादही आयोजित केला होता. त्यासाठी चर्चच्या नेत्यांनाही पाचारण करण्यात आले होते. पण त्यांच्यापैकी कुणीही आले नाही. मेघालयाचे माजी गृहमंत्री रॉबर्ट लिंगडोह यांनीही चर्चच्या आदेशाची निंदा केली.
यापूर्वी हा सण कधीच रविवारी आला नव्हता, असे नाही. २००६ साली आला होता. तेव्हा चर्चने दडपण आणून सण साजरा करण्याचा दिवस बदलायला भाग पाडले होते. आपले आदरणीय शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस हा मेघालयातील एक शक्तिशाली राजकीय पक्ष आहे. आपल्या सार्वभौम लोकसभेचे माजी सभापती श्री संगमा हे राकॉंचे नेते आहेत. (सध्या ते कोणत्या पक्षात आहेत हे मला नक्की माहीत नाही.) तर या राकॉंच्या युवक शाखेने तेव्हा हा सण साजरा करण्याला प्रखर विरोध केला होता. ‘मेघालय हे ख्रिश्‍चन स्टेट आहे’, अशीही घोषणा करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तथापि, तेथेही नवपरिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. २००६ साली जे शक्य झाले नाही ते २०११ मध्ये शक्य होऊ शकले. रविवार असूनही ‘ऑटोमन फेस्टिवल’ धूमधडाक्यात साजरा झाला. परिवर्तनाच्या या पुरस्कर्त्यांचे खरेच अभिनंदन केले पाहिजे.

घानात हिंदू धर्म

‘घाना’ हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. नायजेरियाच्या पश्‍चिमेला. लोकसंख्या सुमारे अडीच कोटी. ख्रिश्‍चनांची संख्या जवळजवळ ७० टक्के. त्यांच्या खालोखाल मुस्लिमांची. ती १६ टक्के. उरलेल्यांमध्ये इतर.
तर या घानात एक अप्रूप घडले. घानावासीयांमधील एक धर्मगुरू ‘इसेल’ यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला. स्वामी कृष्णानंद सरस्वती या संन्याशाने इसेल यांना १९७६ मध्ये संन्यासदीक्षा दिली आणि मग इसेल यांनी हिंदू धर्माच्या प्रसाराचे व्रतच घेतले. ७० च्या दशकात घानातील हिंदूंची संख्या पुरती २५ ही नव्हती. ती आता ३ हजार झाली आहे. इसेल यांनी एका मठाचीही स्थापना केली असून तो मठ हिंदू धर्मप्रसाराचे कार्य करीत आहे. तीन हजार ही फार मोठी संख्या आहे, असे नाही. पण सुरवात झाली आहे, आणि ही प्रेरणा इतरत्रही पसरत आहे. घानाच्या पूर्व सीमेला लागून असलेल्या ‘टोगो’ या देशातही हिंदू धर्म पोचला आहे.

गोपालरत्नम् चा गीताप्रचार

गोपालरत्नम्. एका व्यक्तीचे नाव. त्यांनी एम. टेक्.ची पदवी घेतली आहे. सहजच मोठ्या पगाराची नोकरी त्यांना मिळू शकली असती. पण ते बनले संघाचे प्रचारक. १४ वर्षे ते संघप्रचारक होते. नंतर त्यांनी तेही काम सोडले आणि श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रचाराचे कार्य अंगीकारले. दाढी ठेवल्यामुळे ते एखाद्या साधूसारखे दिसतात. आपले उरलेले जीवन गीतेचा प्रचार करण्यासाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरविले आहे. सध्या ते तामीळनाडूतील सुप्रसिद्ध कोईमतूर शहराच्या परिसरात फिरत असतात.
त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असावी, असा तर्क करण्यास वाव आहे. ते मारुती अल्टो कारने फिरत असतात. एकेका गावात ते तीन दिवस वास्तव्य करतात आणि तेथे तीन दिवस गीतेवर प्रवचन देतात. त्यांच्या प्रवचनाच्या विषयांचा क्रमही ठरलेला असतो. पहिल्या दिवशी ‘गीता आणि व्यक्ती’; दुसर्‍या दिवशी ‘गीता आणि कुटुंब’ आणि तिसर्‍या दिवशी ‘गीता आणि समाज’ असे प्रवचनाचे विषय असतात.
त्यांच्या या उपक्रमाचे नाव आहे 'In Search of Chandragupta'म्हणजे चंद्रगुप्ताच्या शोधार्थ! आपल्या या उपक्रमात त्यांना अठरा युवक, शिष्य म्हणा, भक्त म्हणा, लाभलेले आहेत. या सर्वांनी, दारू, जुगार व हुंडा कधीही न स्वीकारण्याची शपथ घेतली आहे. हे तरुण सामाजिक समस्यांचीही जाण व भान ठेवून असतात. ते रेशनकार्ड, गॅस कनेक्शन, मतदार ओळखपत्र, वृद्धांची पेन्शन मिळवून देणे इ. कार्यात लोकांना मदत करीत असतात.
राजनीती हाही एक समाजजीवनाचा अविच्छीन्न भाग. गोपालरत्नम् यांचे हे भक्त राजकारणातही भाग घेतात. ते निवडणुकीपासूनही अलिप्त नाहीत. गेल्या डिसेंबरात झालेल्या कोईमतूर जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत त्यांच्यापैकी काही उभेही झाले होते. त्यातले चौघे निवडून आले. एकाने तर, द्रमुक, कॉंग्रेस, अद्रमुक या बलाढ्य पक्षांच्या उमेदवारांना चीत करून मेट्टूपालयम् या न. प.चे अध्यक्षपदही प्राप्त केले. गोपालरत्नम् सांगतात की, शांतीने आणि योजनाबद्ध पद्धतीने कार्य केले तर ते लोकांना आवडत असते. हे शिक्षण त्यांना संघाच्या कार्यपद्धतीतूनच मिळाले, अशी कबुलीही ते देतात.

      -मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २८-०१-२०१२

No comments:

Post a Comment