रविवारचे भाष्य दि. १२-०२-२०१२ साठी
गेल्या जानेवारी महिन्यात श्री मोहन गुप्ता यांच्याकडून माझ्या ई-मेलवर काही लेख आले आहेत. श्री मोहन गुप्ता यांना मी ओळखीत नाही. पण त्यांच्या लिखाणावरून ते हिंदुत्वनिष्ठ विचारवंत दिसतात आणि त्यांना हिंदूंच्या भवितव्याविषयी अत्यंत काळजी वाटते, हे जाणवते.
संवाद निरर्थक?
हिंदू-ख्रिस्ती किंवा हिंदू-मुस्लिम यांच्यात कसलाही संवाद नको, हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. त्याला त्यांनी सबळ कारणेही दिली आहेत. त्यांचे म्हणणे असे की, ख्रिस्ती इस्लाम हे दोन्ही धर्म बंदिस्त आहेत, कट्टर आहेत. त्यांचे स्वत:चे विशिष्ट तत्त्वज्ञान आहे आणि त्यांच्या आंधळ्या श्रद्धाही आहेत. जिहादी मुसलमान आणि आक्रमक मिशनरी यांचे हल्ले थांबविण्यासाठी, त्यांच्याशी संवादाची गरजच नाही. गरज हिंदू धर्माला त्यांच्यापासून वाचविण्याची आहे. त्यासाठी हवेत शिवाजी आणि गुरुगोविंदसिंग. त्यासाठी हवे, हिंदू राष्ट्रावर श्रद्धा असलेली राजकीय शक्ती. ख्रिस्त्यांच्या कावेबाजापासूनही हिंदूंनी सावध राहिले पाहिजे. ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे, हिंदू धर्मीयांच्या उपासनापद्धतीची नक्कल करून भोळ्याभाबड्या हिंदूंना बहकवीत आहेत. हिंदू, विष्णुसहस्रनामाचा पाठ करतात, तर त्याची नक्कल करीत त्यांनी ‘ख्रिस्तसहस्रनामम्’ शोधून काढले आहे.
भीती कशाला?
माझे मत यापेक्षा वेगळे आहे. हिंदूंनी आंतरधर्मीय संवादाला भिण्याचे कारण नाही. जे, बौद्धिक दृष्ट्या दुबळे असतात, ते संवादाला घाबरतात. ज्यांचे ज्ञान व निष्ठा पक्क्या आहेत, त्यांनी का घाबरायचे? माझा अनुभव तर असा आहे की, ज्यांच्या तत्त्वज्ञानात त्रुटी आहेत, ज्यांचा विचार संकुचित आहे, ते घाबरतात. एक प्रसंग सांगतो. सन २००० ते २००३ या काळात, दिल्लीला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवक्ता असताना, माझी, सरकारी अल्पसंख्य आयोगाचे एक सदस्य श्री जॉन जोसेफ यांच्याशी भेट झाली. वर्ष बहुधा २००१ असावे. तेव्हा संघातर्फे संपूर्ण देशभर ‘जनजागरण अभियान’ चालविले गेले होते. या अभियानांतर्गत, दिल्लीच्या संघ कार्यकर्त्यांनी, काही बड्या सरकारी अधिकार्यांशी मी भेटावे, असा कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमानुसार, अल्पसंख्य आयोगाचे उपाध्यक्ष सरदार तरलोचनसिंग (त्रिलोचनसिंग) यांच्या घरी आम्ही गेलो. आम्ही म्हणजे मी, तत्कालीन दिल्ली प्रांताचे संघचालक श्री सत्यनारायणजी बंसल आणि राष्ट्रीय शीख संगतचे कार्यकर्ते आर. पी. सिंग. हिंदू म्हणजे शीखेतर हिंदू आणि शीख यांच्या परस्परसंबंधाविषयी, संघाची भूमिका मी स्पष्ट केली. त्यावर सरदार तरलोचनसिंग म्हणाले, ‘‘हे आपण माझ्या घरी सांगता; आमच्या अल्पसंख्य आयोगाच्या कचेरीत येऊन हे सांगाल काय?’’ मी म्हणालो, ‘‘होय. आमची हरकत नाही.’’ त्याप्रमाणे त्यांनी, आयोगासमोर आम्हाला बोलाविले. आम्ही तिघेही गेलो. सरदारजींच्या घरी जे बोललो, तेच तेथे बोललो. एवढेच नव्हे तर संघाची भूमिका स्पष्ट करणारे एक लेखी निवेदनही दिले. बैठक समाप्त होत आली असताना जॉन जोसेफ म्हणाले, ‘‘तुम्ही ख्रिस्ती लोकांशीही बोलायला तयार आहात काय?’’ मी म्हणालो, ‘‘आमची काहीच हरकत नाही.’’
टाळाटाळ
जॉन जोसेफ यांनी प्रथम कॅथॉलिक चर्चच्या मुखंडांशी संपर्क केला. ते म्हणाले की, आम्ही आरएसएसच्या प्रवक्त्याशी काही बोलणार नाही. आमचे बिशप, फक्त संघाच्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीशीच बोलतील. जॉन जोसेफ यांनी तसा निरोप दिला. मा. सुदर्शनजी तेव्हा सरसंघचालक होते. त्यांच्याशी मी संपर्क केला. तेही तयार झाले. मग त्यांच्याकडून दुसरी अट आली की, आम्ही प्रॉटेस्टंटांसोबत बसणार नाही. आम्ही म्हणालो, ‘‘ठीक आहे.’’ नंतर त्यांनी तिसरी अट टाकली की, ‘‘जे काही बोलणे होईल, ते आमच्या चर्चमध्येच होईल.’’ मी ती अट नाकारली. जोसेफ यांना सांगितले की, ‘‘कॅथॉलिकांना बोलणे टाळायचे आहे, असे दिसते. आम्ही चर्चमध्ये येणार नाही. अन्य कुठेही भेटू.’’ हा सर्व प्रकार मा. सुदर्शजींना मी कळविला. तेव्हा ते केरळ प्रांतात प्रवासात होते. सुदर्शनजी म्हणाले, ‘‘कशाला मानपानाचा विचार करायचा? जाऊ की आपण त्यांच्या चर्चमध्ये.’’ आणि आमची कॅथॉलिक चर्चमध्ये बैठक झाली. आम्हा दोघांबरोबर डॉ. श्रीपती शास्त्रीही होते. ते या बैठकीसाठी मुद्दाम पुण्याहून दिल्लीला आले. कॅथॉलिकांनी आमचा आदर केला. औपचारिक बोलणे संपल्यावर मीच एक प्रश्न केला. त्याचा आशय होता ‘‘ख्रिस्ती धर्मासारखेच अन्य धर्म आणि अन्य विश्वास व श्रद्धाही खर्या असू शकतात, हे आपणांस मान्य आहे काय?’’ संवाद इंग्रजी भाषेत चालू होता. मी विचारले होते, "Do you accept that other faiths and religions can also be valid?" त्याला चटकन त्यांच्याकडून उत्तर आले नाही. विचार करावा लागेल, असे ते म्हणाले.
परिणाम
यानंतर प्रॉटेस्टंट पंथीयांशी संवाद झाला. त्यांच्या २७ उपपंथांचे २९ पुढारी नागपूरच्या संघकार्यालयात -हेडगेवार भवनात- आले होते. त्यांच्याशी मनमोकळी चर्चा झाली. संघ कार्यालयातच सर्वांबरोबर त्यांचे भोजन झाले. त्यांनाही मी हाच प्रश्न विचारला होता. त्यावर त्यातील काहींनी तरी होकारार्थी उत्तर दिले. यानंतर, मा. सुदर्शनजी आणि/किंवा संघाच्या अन्य अधिकार्यांशी प्रॉटेस्टंट ख्रिस्ती लोकांच्या गाठीभेटी झाल्या. त्या, माझ्या माहितीप्रमाणे, कर्नाटक व केरळ प्रांतात झाल्या. मला नाही वाटत की, या संवादामुळे आमची हिंदुत्वनिष्ठा कमी झाली. काही परिणाम झाला असेलच, तर त्यांच्यावरच झाला असणार! दोघातिघांनी का होईना, इतर पंथ, श्रद्धा व विश्वासही खरे असू शकतात, हे मान्य केले. विश्वासांची विविधता (plurality of faiths) मानणे हे मी, हिंदुत्वाचे महत्त्वाचे लक्षण मानतो; आणि जे हे मानतात, ते सारे हिंदू असू शकतात, अशी माझी धारणा आहे. आपल्या हिंदूंमध्ये कमी पंथ आणि उपपंथ आहेत काय? मूर्तिपूजा मानणारे जसे बहुसंख्य आहेत, तसे न मानणारेही आर्यसमाजी आहेत. राम-कृष्णांना परमेश्वराचे अवतार मानणारे जसे आहेत, तसेच त्यांना अवतार न मानणारे, पण महापुरुष मानणारेही आहेत. आणि हे सारे हिंदू आहेत.
हिंदूंची नक्कल
ख्रिस्त सहस्रनामासारखी हिंदूंची उपासनापद्धती ज्यांनी स्वीकारली, त्यांनी एक प्रकारे हिंदूंच्या उपासनापद्धतीचीच महती प्रतिपादित केली आहे. चर्चमध्ये आता संगीत भजनेही होऊ लागली आहेत. ही चांगली गोष्ट आहे. अशी नक्कल करताना ते पर्यायाने हिंदूंच्या उपासनापद्धतीची श्रेष्ठताच अधोरेखित करीत असतात. हे खरे आहे की, या मागे त्यांचा उद्देश चांगला आणि स्तुत्य असेलच असे नाही. ते भाबड्या हिंदूंना फसविण्यासाठीही या युक्त्या योजीत असतील. पण त्यांच्यावर आक्षेप घेण्याऐवजी आपण हिंदूंना सावध केले पाहिजे. अनेक संत-महंत, सद्गुरू, यांच्या प्रवचनांना प्रचंड गर्दी असते. ते आपल्या भक्तांना आणि शिष्यांना जशी आपल्या धर्माची श्रेष्ठता समजावून सांगतात, तसेच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करावयालाही उपदेशावे. कुणी मनाई केली आहे? ख्रिस्ती मिशनरी आपला कळप वाढविताना दिसतात. आपण का आपला विस्तार करीत नाही?
इतिहासाचे वास्तव
थोडा आपलाच इतिहास बघा ना! पूर्वी आपल्या देशावर आयोनियन (यवन=ग्रीक), हूण, शक, कुशाण आदि देशाबाहेरील टोळ्यांची आक्रमणे झाली. त्यांनी विजयही संपादन केले. त्यांची राज्येही काही काळ नांदली. आता कुठे आहेत ते? ते सारे, समग्र हिंदू समाजात सामावून गेले आहेत. मला इ. स. पूर्वीच्या दुसर्या शतकातील उज्जैनीचा राजा रुद्रदामन् याचा एक शिलालेख आठवतो. तो शिलालेख गुजरातच्या सौराष्ट्र विभागात आढळला. तेथले एक जुने धरण फुटले होते. ते रुद्रदामन् राजाने दुरुस्त केले. त्यानिमित्तच्या आनंदसोहळ्याच्या संदर्भात तो शिलालेख आहे. रुद्रदामन्ची राजधानी उज्जैन; पण त्याचे राज्य सौराष्ट्रापर्यंत पसरले होते. त्या शिलालेखात रुद्रदामन्ची कुलपरंपरा सांगितली आहे. रुद्रदामन्च्या पित्याचे नाव जयदामन् होते. पण आजोबाचे नाव चेष्टन होते. ‘चेष्टन’ अर्थातच परकीय. त्याचे नावच त्याचे परकीयत्व प्रकट करते. तो ‘सेनापती’ होता. जयदामन् ‘राजा’ झाला आणि रुद्रदामन् ‘महाराजाधिराज.’ हे पराक्रमी पुरुष होते, हे ध्यानात यासाठी घेतले पाहिजे की, त्यांना कुणीही जबरदस्तीने हिंदू बनवू शकले नसणार. तशी ही मंडळी परकीय होती. तरी ती हिंदू बनली. आपल्या देशातील मुसलमान व ख्रिस्ती तर मूळचे इथलेच आहेत. २१ व्या शतकातील हिंदूंमध्ये अशी सर्वांना समाविष्ट करून आत्मसात् करण्याची वृत्ती बाणली पाहिजे. त्यासाठी, ना छळाचा, ना कपटाचा, ना लालचीचा प्रयोग करण्याची गरज आहे. गरज, व्यापक दृष्टिकोणाची, विस्तार करण्याच्या प्रवृत्तीची आणि आधुनिक जगात, सर्व मानवसमाजासाठी हिंदुत्व उपकारक असल्याच्या निष्ठेची आहे.
इस्लामसंबंधी
जे ख्रिस्त्यांच्या संबंधात, तेच मुसलमानांच्याही संबंधात. मोहन गुप्ता यांनी पाठविलेल्या लेखात कुराणातील काही हिंसाप्रवण वचनांचा उल्लेख केला आहे. तो खोटा नाही. पण कुराण चौदाशे वर्षांपूर्वीचे आहे. भारतातील जाणते मुसलमान त्या वचनांचा उच्चार करीत नाहीत. कुराणात जी चांगली वचने आहेत, ती उद्धृत करतात. गेल्या १-२ जानेवारीला नागपूरच्या वेदप्रचारिणी सभेने दोन दिवसांची विचारगोष्ठी आयोजित केली होती. विषय होता ‘‘ईश्वर : कल्पना बनाम यथार्थ’’. त्यात नागपूरचे लाकूड व्यापारी गफूरभाई यांचेही भाषण झाले. त्यांनी कुराणातील एक वेगळीच आयत सांगितली. तिचा अर्थ आहे, ‘‘मी ज्याची पूजा करतो, त्याची पूजा तुम्ही करीत नाही. आणि तुम्ही ज्याची पूजा करता त्याची मी करीत नाही. मी तुमच्या देवतेची पूजा करणार नाही आणि तुम्ही माझ्या देवतेची. तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा.’’ हिंसेला प्रोत्साहन देणार्या आयती, या कालानुक्रमे नंतरच्या असल्यामुळे, पूर्वीच्या आयतांचे महत्त्व त्यांच्यापुढे नसते, या इस्लामी परंपरेचे मला स्मरण आहे. परंतु इस्लामची महती सांगणारे आजचे विद्वान, निदान इस्लामेतरंच्या सभेत तरी, कुराण शरीफमधील अशा आयतांचा उल्लेख करतात हे मला लक्षणीय वाटते; आणि त्यांच्यातला एक मोठा वर्ग, इस्लामला वेगळ्या प्रकारे प्रस्तुत करू लागले आहेत, याचा हा पुरावा आहे. तो नाकारण्याचे कारण नाही, असे माझे मत आहे.
परिवर्तन
खूप विचारान्ती माझे असे मत झाले आहे की, इस्लामला जिवंत रहावयाचे असेल, तर त्याला स्वत:त परिवर्तन करावेच लागेल. पुराणात सुंद आणि उपसुंद या दोन सख्खे भाऊ असलेल्या राक्षसांची कथा आहे. त्या दोघांनी एकमेकांशी लढून एकमेकांना ठार केले. इस्लामी देशात सध्या हेच चालू आहे. इजिप्त, इराण, इराक, येमेन, कुर्दीस्तान, सीरिया, अफगानिस्थान आणि जवळचे पाकिस्तान यामध्ये प्रचंड सुंदोपसुंदी चालू आहे. मुसलमान परस्परांनाच ठार करीत आहेत. असे दिसून येते की, इस्लामने आपल्या अनुयायांना फक्त लढणे व शत्रूला ठार करणे एवढेच शिकविले आहे. आणि शत्रू नसला तर मग ते आपसातच लढत असतात. तेव्हा जिवंत राहण्यासाठी का होईना इस्लामधर्मीयांना स्वत:त परिवर्तन करणे आवश्यक झाले आहे. मी दि. ११ सप्टेंबर २०११ ला प्रकाशित झालेल्या या स्तंभात भारतीय मुसलमानांमधील काही शुभसंकेतांची माहिती दिली होती. ते येथे पुनरावृत्त करीत नाही. या शुभसंकेतांचा आधार घेऊन, त्यांच्यात परिवर्तन कसे येईल, आस्था आणि विश्वास यांच्या विविधतेला ते कशी मान्यता देतील, आणि आपली उपासना व धर्मग्रंथ यावर विश्वास ठेवूनही ते व्यापक अर्थाने हिंदुत्वाचे कसे पुरस्कर्ते बनतील, याचा आपण विचार केला पाहिजे.
दोष कुणाचा?
माझे निरीक्षण असे आहे की, मुस्लिम समाजातील एक वर्ग हिंदुत्वाशी नाते जोडायला उत्सुक आहे. शिक्षित मुस्लिम आणि ख्रिस्ती तरुणी हिंदू तरुणांशी विवाह करावयाला उत्सुक आहेत. हिंदूंचीच मानसिक तयारी कमी पडते. आपल्या देशात, बांगला देशातील मुसलमान मोठ्या संख्येत आलेले आहेत. अनेक राज्यांमध्ये त्यांची वसती आहे. स्थानिक मुसलमानांमध्ये ज्यांचे सामीलीकरण झालेले नाही. ते उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत. नोकरी मिळविण्यासाठी ते हिंदू नावही धारण करतात. कुणी हिंदू ठेवतात काय त्यांच्याशी संपर्क? त्यांना आपलेसे करून घ्यावे असे कुणाला वाटते काय? आपण मिशनर्यांना नावे ठेवण्यात धन्यता मानतो. पण त्यांना जसा आपल्या मताचा विस्तार करण्याची प्रेरणा आहे, तशी हिंदूंना का नाही? आपले सरकार चालविणार्या लोकांमध्ये बहुसंख्य हिंदूच आहेत ना? का नाही त्यांना वाटत की, येथील ख्रिस्ती व मुसलमानांनी राष्ट्राच्या मुख्य प्रवाहाशी समरस व्हावे? त्यांचे वेगळेपण कोण जोपासत आहेत? आपल्या संविधानची ऐसीतैसी करीत, कोण त्यांच्यासाठी वेगळ्या राजकीय आरक्षणाची भाषा बोलत आहेत? सोनिया गांधी ख्रिस्ती आहेत, हे सर्वज्ञात आहे. ख्रिस्ती मिशनर्यांना आतून त्यांचे प्रोत्साहन असते, असे सांगितले जाते. आपण ते खरे मानू. पण सोनिया गांधींना ही शक्ती प्रदान करणारे कोण आहेत? हिंदूच आहेत ना? तात्पर्य, असे आहे की हिंदूंनाच, हिंदुत्वाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता ध्यानात घेऊन, तथाकथित परधर्मीयांनाही, विचारांनी, वृत्तींनी आणि आचरणांनी आपलेसे करून घेण्यासाठी प्रेरणा देण्याची गरज आहे. सर्व संतमहात्मे, महाराज, सद्गुरू आणि समाजनेते यांनी हे कार्य अंगीकारले पाहिजे. तथाकथित परधर्मीयांशी संवाद टाळणे, हा हिंदुत्वाला बलशाली करण्याचा मार्ग नाही. उलट आपल्या दुर्बलतेचे ते प्रकटीकरण आहे. कुणाशीही संवाद साधण्याची हिंमत आणि क्षमता आपण प्रकट केली पाहिजे.
No comments:
Post a Comment