Saturday 3 March 2012

इ त स्त त:

रविवारचे भाष्य - ०४.०३.२०१२ करिता

एक वेडा दुकानदार

मुंबईत सात रस्त्याजवळ ऑर्थर रोडला लागून, एक छोटेसे दुकान आहे. प्रीती आर्टसहे त्या दुकानाचे नाव. मूर्ती, चित्रे, शोपीस, पोलादी फर्निचर येथे मिळते. हे दुकान कधी चालू असते, तर कधी बंद असते. ग्राहक बाहेर दुकान उघडण्याची वाट बघत असतात. पण मालक आपल्या मर्जीने येतो अन् जातो. याचे कारण या दुकानाच्या मालकाचे एक वेड.
मुंबईसारख्या फास्ट लाईफने झपाटलेल्या जीवनात जिथे जिवंत माणसांसाठी वेळ काढता येत नाही. तिथे किशोरचंद्र भट आपला कामधंदा बाजूला ठेवून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील वेगवेगळी स्मशाने पालथी घालत असतात. हेच लोक त्यांना बेवारसी शवांची माहिती देऊन बोलावून घेतात. सन १९६८ पासून त्यांनी हे कार्य सुरू केले आहे.
त्याच वर्षी सुरतमध्ये पूर आला होता. खाद्यवाटप करणार्या एका संस्थेसोबत १७ वर्षीय किशोर भटही गेले होते. माणसं आणि जनावरांना एकत्र मरून पडलेले पाहून ते खूप अस्वस्थ झाले. शेवटी थाटात आणि तोर्यात जगणार्यांचीही मातीच होते, हे त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले तेव्हाच सुरू झाली त्यांची मृत्यूशी मैत्री. विविध इस्पितळांमध्ये जाऊन त्यांनी सांगितले की, बेवारस मृतदेह मिळाले तर मला कळवा. हे ऐकून अनेकांना संशय वाटायचा. सुरुवातीला तर हा मृतदेहांवरील वस्तू चोरत असावा अशी शंकाही व्यक्त करण्यात आली. पण सत्य चांगल्या हेतूला पुरावे लागत नाहीत. किशोर यांनी आपल्या नि:स्वार्थ कार्याने हे सिद्ध केले आहे. आजपर्यंत त्यांनी जवळजवळ २६०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. सन १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा त्यांनी अनेकांची मदत केली. देहाच्या चिंध्या बॅगेत भरून त्यांनी अग्नी दिल्याचे त्यांना आठवते. ते म्हणतात, मृत्यू हा कधीही आणि कुठेही येऊ शकतो.
त्यांच्यासाठी हा आयुष्याचाच एक भाग आहे. त्यांच्या दुकानात कापडाचे तागे, अगरबत्ती, गंगाजळ, मडके सर्व काही एका कोपर्यात ठेवले आहे. कापडाचे चार मीटरचे तुकडेदेखील वेगळे काढले आहेत. म्हणजे तातडीने जावे लागले तर आयत्या वेळी त्रास नको. याच कापड्याच्या तुकड्यांनी सर्व बांधले जातात. बोलावणे आले की, भट हे तुकडे घेऊन पोहोचतात. म्हणूनच त्यांना चार मीटर कपडावालाअसे ओळखले जाते.
हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन कोणत्याही जातीची व्यक्ती असली तरी भट त्यांना शेवटचा विधी संपन्न करून देण्यास मागेपुढे पाहात नाहीत. हिंदूंना संपूर्ण विधीप्रमाणे जाळले जाते. मुसलमानांना त्यांच्या शास्त्रांचे पालन करून पुरले जाते. सद्गती नावाचा त्यांनी एक ट्रस्ट बनवला. माझ्यानंतर हे कार्य सुरू राहावे लोकांनी यात सहभाग घ्यावा हाच या स्थापनेचा हेतू आहे, असे ते सांगतात. दुकानाबाहेर दोन व्हॅन सतत उभ्या असतात. फुकट शव नेण्याची सुविधा ट्रस्ट सामान्य माणसांसाठी देतो मयताचे सारे सामानही फुकट देतो. सर्व इस्पितळे आता किशोर भट यांना ओळखतात. काही गरीबांकडे उपचारांवर खर्च झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे उरत नाहीत अशा वेळी किशोरजींचा नंबर दिला जातो.
अशीच एक घटना त्यांनी सांगितली... एका बाईची छोटी पोर नायर हॉस्पिटलमध्ये आजाराने मेली. मेलेल्या मुलीला ती सोडून चालली होती. कारण स्मशानाचा अंत्यसंस्काराचा खर्च तिला परवडणारा नव्हता. देव नाही, असे म्हणत रडत रडत बाहेर पडत होती. तेवढ्यात किशोरजी तिथे पोहोचले. तिला म्हणाले, मी सर्व करीन. मला देवाने पाठवले आहे.
सर्व इस्पितळांचे पोलिसांचे लाडके किशोर भट आनंद व्यक्ती आहेत. अंत्यसंस्कार केलेल्या सर्वांचे आत्मे माझी काळजी घेतात, हे त्यांचे म्हणणे आहे.
(सांगलीवरून प्रकाशित होणार्या साप्ताहिक विजयंतच्या १४ फेब्रुवारीच्या अंकातून साभार)

आंधळ्यांचे डोळस काम

ऑर्बिट  हा एक इंग्रजी शब्द आहे. त्याचा एक अर्थ ग्रहाची कक्षा असा आहे. दुसरा अर्थ  डोळ्याची खाच’. आपण कोणता अर्थ स्वीकारायचा की दोन्ही यथार्थ म्हणायचे, हे आपण खाली दिलेली माहिती वाचून ठरवा.
ऑर्बिटहे तामीळनाडूतील तिरुचेरापल्ली या शहरातील एका संस्थेचे नाव आहे. विजेची मोठमोठी यंत्रे तयार करणार्या भेल’ (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.) या संस्थेचे नाव आपण ऐकले असेलच. या भेलने पारदीप रिफायनरी प्रोजेक्टया तेल शुद्धीकरण संस्थेसाठी बॉयलर्सतयार करण्यासाठी काही बाहेरच्या कंपन्यांकडे काम सोपविले होते. त्यातली ऑर्बिटही एक कंपनी. या पारदीप तेल शुद्धीकरण संस्थेचे काही अधिकारी, कामाची प्रगती बघण्यासाठी तिरुचेरापल्लीत आले. ऑर्बिटच्या कारखान्यात पोचले. कारखान्याचे अध्यक्ष जी. आर. पांडी यांनी त्यांचे स्वागत केले. अध्यक्ष पांडी आंधळे आहेत. पण हे त्यांना तेवढे आश्चर्यकारक वाटले नाही. त्यांना आश्चर्याचा खरा धक्का तेव्हा बसला, जेव्हा, त्यांनी बघितले की, या कारखान्यातील सारेच कामगार आंधळे आहेत! पारदीपच्या अधिकार्यांना, अंध आणि अपंग मुलांना शिक्षण देण्यार्‍या संस्था असतात याची माहिती होती. पण सगळा कारखानाच अंधांकडून चालविला जात असल्याचे त्यांनी ना कधी ऐकले होते, ना कधी पाहिले होते.
हे आंधळे कच्च्या मालाची बरोबर छाटणी करीत होते. ते कच्चा माल कापणीसाठी योग्य ठिकाणी नेऊन देत होते. आंधळेच करवतीने ते नीट कापीत होते. तेच छिद्रे पाडीत होते. तयार झालेला माल गोळा करीत होते. पिशव्यांमध्ये भरीत होते. निर्मितीची ही संपूर्ण प्रक्रिया अगदी काटेकोरपणे पार पाडली जात होती. तयार मालाची प्रतही गुणवत्तेच्या कसोटीवर उतरणारी होती. त्यांची भाषा डोळ्यांची नव्हती. ती असणेही शक्यच नव्हते. ती भाषा हृदयाची होती. परस्परांचे सहकार्य आणि सामूहिक प्रयत्न या गुणांच्या जोरावर, त्यांचा कारखाना चालू होता. आपल्याला हव्या असलेल्या यंत्रसामग्रीसाठी आंधळ्यांकडून असे शास्त्रशुद्ध कार्य केले जात असलेले बघून, पारदीपच्या अधिकार्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
या मंडळींना आणखी एक नवलाचा धक्का बसला, जेव्हा त्यांनी एक अपंग तरुण वेल्डिंग मशीनवर काम करताना बघितला. त्याचा मददगार एक आंधळाच होता. हा आंधळा जवळजवळ धावतच, वस्तुभांडारात जात असे आणि तातडीने तेथून इलेक्ट्रॉड्सघेऊन, त्या वेल्डरला देत असे. हा आंधळा, बरोबर योग्य ठिकाणी जाऊन, लगेच हवे ते सामान कसे आणतो, हे त्यांनी विचारल्यावर त्यांना सांगण्यात आले की, येथे काम करणार्या प्रत्येक कामगाराला, कारखान्यात कुठे काय आहे याची माहिती असते. दोन विभागातील अंतराची ही त्यांना माहिती असते. किती वेळ लागेल याचीही कल्पना असते. म्हणजे स्थळकाळाची कल्पना असते. किती पावले गेले म्हणजे कोणते स्थान प्राप्त होते, हे त्यांनी जाणून घेतले आहे.
या भेटीच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री. पांडी यांनी पारदीपच्या अधिकार्यांना विनंती केली की, ‘‘तुम्हाला कुणी अंध व्यक्ती आढळली, तर कृपाकरून तिला माझ्याकडे पाठवा. आम्ही आमच्या कर्मचार्यांमध्ये तिचे स्वागत करू.’’ या पारदीपचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर अरविंदकुमार सांगतात, ‘‘हे ऐकून मी तर गहिवरून गेलो. मी काही बोलूच शकलो नाही. पण पारदीपचा आमचा प्रोजेक्ट लवकरच सुरू होईल, असा विश्वास मनात घेऊन, आम्ही त्यांचा निरोप घेतला.’’

कृष्णचंद्र गांधी

मी कृष्णचंद्र गांधी यांना बघितले आहे. ते उत्तर प्रदेशात संघाचे प्रचारक होते. संघ स्वयंसेवकांनी शिक्षण क्षेत्रातही उत्तम कार्य उभे केले आहे. सरस्वती शिशु मंदिरांची स्थापना हे त्यातले एक कार्य. ही शिक्षण मंदिरे आता केवळ शिशूंसाठी राहिलेली नाहीत. त्यांचे रूपांतर आता विद्यालयांमध्ये झालेले आहे. कृष्णचंद्र गांधी यांचे या क्षेत्रात फार मोठे योगदान आहे.
या कृष्णचंद्र गांधींच्या नावे ईशान्य भारतात एक पुरस्कार दिला जातो. एका प्रचारकाच्या नावाने एखादा पुस्कार प्रस्थापित व्हावा, याचे मला आश्चर्य वाटले. प्रचारक म्हणजे इमारतीच्या पायातील दगड. पायातील दगडाची काय कुणी पूजा करीत असते? पूजा तर इमारतीच्या कळसाची होत असते, आणि आपल्या आधारावर उभ्या असलेल्या कळसाचा गौरव बघून पायातील या दगडांना आनंद अभिमान वाटत असतो. पण माझ्या आश्चर्याला तेव्हा सीमा राहिली नाही, जेव्हा मी कृष्णचंद्र ्रगांधींच्या नावाचा पुरस्कार आसामची राजधानी गुवाहाटी येथे देण्यात आला आणि कुणाला तो देण्यात आला म्हणता?- तर मेघालयातील गारो टेकड्यांच्या भागात कार्य करणार्या अर्णव होजांग यांना. अरुणाचल प्रदेशात राजीव गांधींच्या नावाने एक विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठातील विद्वान प्राध्यापक प्रो. तामो मिबांग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गुवाहाटीच्या विवेकानंद केंद्राच्या परिसरात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पूर्वोत्तर जनजाती शिक्षा समिती आणि विद्याभारती या दोन संस्थांच्या वतीने हा पुरस्कार दिला जात असतो. कृष्णचंद्र गांधी आज हयात नाहीत. पण त्यांनी या पूर्वोत्तर भारतात, फार मोठे शैक्षणिक कार्य केले आहे. आपला देहही त्यांनी याच कार्यासाठी संपविला आहे.
. प्र. तील मीरत येथे १९२१ साली कृष्णचंद्र गांधींचा जन्म झाला. त्यांनी प्रथम गोरखपूरला शिशु मंदिराची स्थापना केली; आणि काही वर्षांनी त्यांना ईशान्य भारतात पाठविण्यात आले. अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय आणि आसाम या राज्यांमधील अतिदूरच्या भागात अनेक शिशुमंदिरांची त्यांनी स्थापना केली. २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी याच भागात कार्य केले. त्यांनी स्थापन केलेले दक्षिण आसाममधील हॉफलॉंग येथील निवासी विद्यालय एक आदर्श विद्यालय आहे. मी ते बघितले आहे. माझी तेथेच कृष्णचंद्रांशी भेट झाली होती.
वर उल्लेखिलेल्या पूर्वोत्तर शिक्षा समितीचेही निर्माते तेच आहेत. या शिक्षा समितीनेच आपल्या निर्मात्याच्या स्मरणार्थ कृष्णचंद्र गांधी पुरस्काराची योजना आखली आहे. २००७ पासून ही योजना कार्यान्वित झाली आहे. या पूर्वोत्तर भागात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत, अरुणाचलातील सामाजिक कार्यकर्ते श्री. न्यांग पायेंग (२००७), कारबी-आँगलॉग जिल्ह्यातील श्री. लुफ्से तिमुंग (२००८), आसामच्या कोक्राझार जिल्ह्यातील तुलेश्वर नरझारी (२००९) आणि मेघालयातील श्रीमती ड्रीमसिबॉन खारकोंगॉंर (२०१०)  यांना हे पुरस्कार देण्यात आले. २०११ चा पुरस्कार अर्णव होजांग यांना देण्यात आला.
होजांग हे एका जनजातीचे नाव आहे. या जनजातीच्या सर्वांगीण उत्थानासाठी श्री. अर्णव होजांग हे कार्यरत आहेत. होजांग संस्कृति विकास मंचही संस्था त्यांनी त्यासाठी स्थापन केली आहे. होजांग भाषा विकास परिषदेचेही ते अध्यक्ष आहेत. मेघालयाच्या गारो टेकड्यांच्या प्रदेशात एकल विद्यालये स्थापन करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते पदवीधर आहेत, पण व्यवसायाने व्यापारी आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा अनुवाद होजांग भाषेत केला आहे.

राष्ट्रीय मुस्लिम मंच

राष्ट्रीय मुस्लिम मंचही मुसलमानांमध्ये कार्य करणारी आगळीवेगळी संस्था आहे. सर्वत्र मुसलमानांना राष्ट्रीय जीवनप्रवाहापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न आणि व्यूहरचना होत आहेत; तर हा मंच त्यांना राष्ट्रीय मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम करीत आहे. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे हे धाडस तर नक्कीच आहे. पण ते धाडसी कार्य त्यांनी सुरू केले असून, त्यात सफलताही प्राप्त केलेली आहे.
दि. १८ सप्टेंबर २०११ ला, दिल्लीतील जंतरमंतर मैदानात, या मंचाचा एक सार्वजनिक कार्यक्रम झाला. सर्व लोकांनी हातात तिरंगा झेंडा घेतला होता. तो आकाशात उंचावून ते घोषणा देत होते. ‘‘धारा ३७० खत्म करो’’, ‘‘पाक और चीनसे अपनी धरती वापस लो’’, ‘‘काश्मीर युवकों को रोजगार दो’’ इत्यादी.
श्रीनगरवरून आलेल्या मोहम्मद फारूक यांनी ३७० वे कलम हटविण्याची मागणी केली. काश्मीरला भारतापासून अलग ठेवणार्या या कलमाच्या घटनेतील अंतर्भावासाठी त्यांनी पं. नेहरू शेख अब्दुल्ला यांना दोषी ठरविले. भारत माता की जयच्या उद्घोषणा करीत बशीर अहमद यांनी आपले भाषण सुरू केले आणि निर्वासित म्हणून आलेल्या लोकांना मताधिकार मिळाला पाहिजे, अशी मागणी केली.
बकरवाल समाजातून आलेले गुलाम अली यांनी ही काश्मीरच्या मागासलेपणासाठी शेख अब्दुल्लांनाच जबाबदार धरले. ३७० व्या कलमाचा लाभ मूठभर राजकीय नेत्यांनीच लाटला, असा आरोप त्यांनी केला. काश्मीरच्या खोर्यातून आलेल्या श्रीमती हलिका यांनी, आपले तीन बंधू आतंकवादी कार्यामुळेच मारले गले, याचे दु: व्यक्त केले. मुफ्ती मौलाना अब्दुसामी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रफी अहमद किडवाई यांची प्रशंसा केली, तर काश्मीरच्या दुर्दशेबद्दल नेहरू अब्दुल्ला यांना दोषी ठरविले.
बंगलोरवरून आलेले अब्बास अली  वोरा म्हणाले की, दक्षिण भारतातील मुस्लिम समाज सदैव देशभक्तांबरोबरच राहील.
संघाचे प्रचारक इंद्रेशकुमार यांचेही या मेळाव्यात भाषण झाले. दिल्लीचे माजी खासदार डॉ. जे. के. जैन, हज कमिटीचे डॉ. सलीम राज, दिल्ली महानगरपालिकेचे सभासद मौ. इमरान इस्माईल यांचीही प्रसंगोचित भाषणे झाली.
या सफल मेळाव्याचे आयोजक, मंचाचे संयोजक मौ. अफजल त्यांची चमू यांनी केले होते. या मेळाव्यामुळे मंचाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

आता काही विदेशातील बातम्या

) ऑस्ट्रेलियातील रुद्रजप- ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात विश् हिंदू परिषदेच्या वतीने एकदश रुद्रजपाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १३ नोव्हेंबर २०११ ला हा कार्यक्रम मिण्टो येथील शिवमंदिरात झाला. जागतिक शांती सामंजस्य निर्माणासाठी या जपयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. चाळीसहून अधिक ऋत्विज यात सहभागी होते. त्यांनी रूद्रध्याय चमक अनुवाकाचे पठण केले. त्यानंतर होम झाला. भगवान शंकराला अभिषेकही करण्यात आला. सुमारे अडीचशे भक्त यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये संस्कृत भारतीचे संस्थापक चमू कृष्णशास्त्री यांचाही समावेश होता. सिडनीत वेद पाठशाळाही आहे. त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनीही रुद्रपाठ म्हटला.
) व्हिएतनाममध्ये नव वर्षांरंभ दिवस- व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरात २२ जानेवारी २०१२ ला, व्हिएतानमचा नववर्षदिन साजरा करण्यात आला. नवलाची गोष्ट म्हणजे तो मरिअम्माच्या मंदिरात साजरा करण्यात आला. पन्नास हजारांहून अधिक लोक त्याप्रसंगी एकत्र आले होते. अर्थात्, त्यात अधिकांश बौद्ध होते. हा उत्सव सात दिवस चालला.
व्हिएतनामी लोकांची अशी श्रद्धा आहे की, या मंदिरात प्रार्थना केल्याने आपले भविष्य उज्ज्वल होते म्हणून ते या मंदिरात हा उत्सव साजरा करीत असतात. या मंदिरात मुरुगेश (कार्तिकेय)  आणि गणेश यांच्याही मूर्ती आहेत. त्यांनाही नैवेद्य दाखविण्यात आला.
हो ची मिन्ह शहरात तीन मंदिरे आहेत. ती निदान दीडशे वर्षांपूर्वी बांधलेली आहेत.
) शिकागोत विवेकानंद अध्यासन- शिकागो आणि स्वामी विवेकानंद यांचा संबंध सर्वज्ञात आहे. येथील सर्वधर्म परिषदेतील भाषणामुळेच स्वामी विवेकानंद जगभर प्रसिद्ध झाले. या शिकागो शहरात भारत सरकारतर्फे हे अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारने १५ लाख डॉलरचे अनुदान दिले आहे. भारताचे वित्तमंत्री प्रणव मुखर्जी या अध्यासनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘विवेकानंद हे भारताचे प्रथम सांस्कृतिक राजदूत होते.’’
शिकागो विद्यापीठाचे अध्यक्ष रॉबर्ट झिमर याप्रसंगी म्हणाले, ‘‘भारतीय विषयांच्या अध्ययनाला, यामुळे विशेष चालना मिळेल त्याचा विस्तारही होईल.’’
) ऍमस्टरडॅम येथे शिवाचा पुतळा- ऍमस्टरडॅम हे शहर हॉलंडची राजधानी आहे. तेथील वस्तु संग्रहालयात (म्यूझियम) एक शंकराचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा आहे. ब्रॉन्झ म्हणजे तांबे जस्त यांच्या संयोगाने बनलेली मजबूत धातू.
या पुतळ्याचे वजन ३०० किलोग्रॅम असून त्याचा आकार १५३ सें.मी.÷११४. सें.मी. असा आहे. चोलवंशीय राजांच्या काळातील हा पुतळा आहे. नुकतीच या पुतळ्याची  क्ष-किरण तपासणी करण्यात आली आणि असे आढळून आले की सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच्या या पुतळ्यात अत्यंत टणक अशा ब्रॉन्झचा उपयोग करण्यात आला आहे. त्या प्राचीन काळातील भारतीयांच्या धातुविज्ञानाने लोक चकित झाले आहेत- ही नटराज शिवाची मूर्ती आहे.
                                                                                          -मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ०३.०३.१२

No comments:

Post a Comment