Saturday 31 March 2012

रामनवमीच का?


रविवारचे भाष्य दि. ०१-०४-२०१२ करिता


उद्या रामनवमी. म्हणजे इक्ष्वाकू वंशात जन्मलेल्या श्रीरामाची जयंती. राम इक्ष्वाकू कुळातला. राजा दशरथाचा पुत्र. अज राजाचा नातू. विश्वविजयी रघूचा पणतू. जन्मदात्या पित्यापेक्षाही प्रजेला प्रिय वाटणार्या दिलीपाचा खापरपणतू. पण, ना दिलीपाची जयंती साजरी होत, ना रघूची, ना अजाची, ना दशरथाची. इक्ष्वाकू कुळातील फक्त रामाची जयंती साजरी होते. चैत्र शुक्ल ही त्याची जन्मतिथी.

संस्कृतीचा प्राण

रामाचीच का? कारण, राम आमच्या संस्कृतीच्या प्राण आहे. शास्त्र सांगते की, विशेषनामांना गुणात्मक अर्थ नसतो. Proper nouns have no connotation.  हे अगदी खरे आहे. भिकाजीपंत धनाढ्य असू शकतात, आणि कुबेर आडनावाचे साधे कारकून. आमचेच पहाना. आम्ही वैद्य’, पण नाडीपरीक्षा करता येते म्हणता काय आम्हाला? नाव नको. पण रामाचे तसे नाही. ते विशेष नाम असले तरी त्याला गुणात्मक अर्थ प्राप्त झाला आहे. एखादी वस्तू किंवा एखादे वचन पुचाट असते, तर आपण म्हणतो यात काही राम नाही. रामम्हणजे कस. राम म्हणजे सार. अचूक औषध रामबाणउपाय असतो. कारण रामाच्या बाणालाएक निश्चित सुपरिणाम करणारा अचूक अर्थ लागलेला आहे. रामो द्विर्नाभिसन्धत्तेम्हणजे राम, लक्ष्यभेद करीत असताना दुसर्यांदा बाणाचा नेम धरीत नसतो, अशी वाल्मीकीची उक्ती आहे. जसा राम एकबाणीतसाच एकवचनी’. ‘रामम्हणजे पुण्यकारक प्रारं. म्हणून कुणी भेटले, तर प्रथम राम राम’. हे सारे जगण्यातले प्रसंग. मरणातही राम आहेच. मरणातही जो मरत नाही तो राम असतो. कुणी मरण पावला, तेव्हा म्हणतो त्याने रामम्हटले. आणि सर्वात चांगले राज्य कोणते?- तर रामराज्य’. रामाच्या ठायी अशी प्रचंड गुणसंपदा आहे. राम अद्वितीय आहे. राम अलौकिक आहे.

ताटिकावध
रामाच्या जीवनातील काही प्रसंग आठवण्यासारखे आहेत. यज्ञाचा विध्वंस करणार्या ताटिकेचा विनाश करायचा असतो. विश्वामित्र त्यासाठी रामाला बरोबर नेत असतात. ताटिकेचा नाश करायचा म्हणून सांगतात. रामाच्या मनात प्रश् येतो ‘‘कुणा स्त्रीला मारायचे?’’ पण ताटिका जेव्हा समोर येते, तेव्हा रामाच्या मनातली शंका, तिला पाहिल्याबरोबरच संपते. महाकवी कालिदासाने सुंदर वर्णन केले आहे. कालिदास लिहितो-
उद्यैकभुजयष्टिमायतीं श्रोणिलम्बिपुरुषान्त्रमेखलाम्|
तां विलोक्य वनितावधे घृणां पत्रिणा सह मुमोच राघव:
एक हात उंचावून पुढे आलेली, ठार मारलेल्या पुरुषांच्या आतड्यांचा कमरपट्टा बांधलेली, विशालकाया ताटिका समोर  आली आणि तिला बघताच धनुष्यातून सुटलेल्या बाणाबरोबरच स्त्रीवधाविषयीचा संभ्रमही रामाच्या मनातून निघून गेला.

योगिराज राम

राम १६ वर्षांचा झाला. ज्येष्ठ पुत्र. वडील दशरथ वृद्ध झालेले. रामाला यौवराज्याचा अभिषेक करण्याचे योजिले गेले. ते केवळ दशरथाच्या एकाच्या निर्णयाने नाही. तत्पूर्वी नगरवासी आणि ग्रामवासी यांच्या प्रतिनिधींना राजाने बोलाविले. त्यांच्या समोर आपला प्रस्ताव ठेवला. सर्वांनी, मुक्तकंठाने रामाची प्रशंसा करीत राजाच्या सूचनेला अनुमोदन दिले. यौवराज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. रामालाही आनंद झाला असणारच. पण सावत्र माता कैकेयीला ते आवडले नाही. तिने त्याला चौदा वर्षे वनात जायला सांगितले. तेही रामाने आनंदानेच स्वीकारले. दु:खेषु अनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: दु:खाच्या प्रसंगी उद्वेगविरहित आणि सुखांच्या बाबतीत नि:स्पृह ही योग्यांची वृत्ती राम नावाच्या एका तरुणाच्या अंत:करणात ठसली होती. युवराज बनणारा राम वनवासी राम बनला.

आपली संस्कृती

कैकेयीचा पुत्र भरत मातुलगृहातून आला. त्याला अनायासे राज्य मिळाले होते. पण तो सिंहासनावर बसला नाही. राम ज्येष्ठ पुत्र आहे. सिंहासनावर त्याचाच अधिकार आहे, असे म्हणून तो रामाला, परत अयोध्येला आणण्यासाठी निघाला. चित्रकूटला त्यांची भेट झाली. भरताने खूप वाद घातला. राम म्हणाला नाही. दोघांचा झालेला वाद, उपस्थित सारे कौतुकाने बघत होते. कारण तो वाद मी राजा होतो यासाठी नव्हता. तू राजा हो यासाठी होता!आजच्या काळात आपण अशा वादाची कल्पना तरी करू शकतो काय? राम नाहीम्हणाला म्हणून भरत राज्यावर बसला काय? नाही, त्याने रामाच्या पादुका सिंहासनाधिष्ठित केल्या! असा राम, असा भरत. ही आपली संस्कृती आहे.

अखंड भारत आमचा

आणि राम वनवासात राहिला. सीता लक्ष्मण त्याच्या बरोबर होते. सीतेचे अपहरण झाले होते. राम दु:खी झाला. रडलाही. तोही एक मानवच होता. पण महामानव. स्वत: रामच वाल्मीकिरामायणात आपला परिचय देताना म्हणतो. ‘‘आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्’’ ‘‘मी दशरथाचा राम नावाचा मुलगा एक मनुष्य आहे, असेच मी समजतो.’’ पुढे सुग्रीवाची भेट होते. मैत्री होते. हनुमंताची साथ मिळते. वालीचा वध केला जातो. वाली रामाला विचारतो की, ‘‘तू मला का मारलेस? मी तुझा कोणता अपराध केला होता?’’ रामाचे उत्तर, वाल्मीकीच्या शब्दात असे आहे-
इक्ष्वाकूणामियं भूमि: सशैलवनकानना |
मृगपक्षिमनुष्याणां निग्रहानुग्रहेष्वपि
‘‘ही संपूर्ण पृथ्वी, त्यातील पर्वत, वने आणि घनदाट जंगले यांसह इक्ष्वाकूंची आहे आणि येथे राहणारे पशु असोत की पक्षी अथवा मानव, त्यांनी पाप केले तर त्यांना दंड देण्याचा आणि त्यांनी पुण्य केले तर त्यांच्यावर अनुग्रह करण्याचा आम्हाला अधिकार आहे.’’ संपूर्ण भारत एक आहे, अखंड आहे, अशी ही हजारो वर्षांपासूनची आमची धारणा आहे. इंग्रजांनी भारत एक केला, असे मानणे हा धादांत मूर्खपणा आहे.

राजा राम

राम रावण यांचे युद्ध झाले. अभूतपूर्व असे युद्ध. रावण मारला गेला. लंका हाती आली. सोन्याची लंका. कुणी सुचविलेही असेल की, करा ना इथेच राज्य. पराक्रमाने पादाक्रांत केलेले आहे. चित्रकूटचा भरत चौदा वर्षांनंतर तसाच राहिला असेल, याची खात्री काय? सत्ता भ्रष्ट करतेच की! खरेच राम लंकेचा राजा बनला असता तर राम रामराहिला नसता. रामाने बिभीषणाला लंकेच्या सिंहासनावर बसविले; आणि राम अयोध्येला परतला. हनुमंताला पाठवून भरताच्या वर्तनाचा कानोसा घेतला आणि मग सर्वांनी अयोध्येत प्रवेश केला. त्यानंतर रामाला विधिवत् राज्याभिषेक करण्यात आला. राम राजा झाला. रामराज्य सुरू झाले.

रामराज्य

रामराज्याने रामाची विलक्षण परीक्षा घेतली. रावणासारख्या स्त्रीलंपट राजाच्या कैदेत सीता राहिली होती. तिच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारी कुजबूज लोकांत सुरू झाली. ती रामाच्याही कानावर आली. आणि रामाने निर्णय घेतला आणि सीतेचा परित्याग केला. राजाकशासाठी असतो? काय त्याचे काम? का त्याला राजा म्हणायचे? किती मोठी किंमत त्याला मोजावी लागते? कालिदास सांगतो- राजा प्रकृतिरंजनात्’- तो प्रकृतीचे म्हणजे प्रजेचे रंजन करतो, म्हणजे तिला संतुष्ट ठेवतो, म्हणून तर त्याला राजाअसे म्हटले जाते. म्हणजे राजाचे आद्य कर्तव्य आहे प्रजाराधन. कवि भवभूतीने आपल्या उत्तर रामचरितम्या सुप्रसिद्ध नाटकात रामाच्या तोंडी एक श्लोक घातलेला आहे. तो असा-
स्नेहं दयां सौख्यं यदि वा जानकीमपि|
आराधनाय लोकस्य मुञ्चतो नास्ति मे व्यथा॥
लोकांना खुष ठेवण्यासाठी स्नेह, दया, सुख, एवढेच काय पण प्रत्यक्ष सीतेचाही त्याग मला करावा लागला, तरी मला त्याचे दु: नाही. भवभूतीने नाटकात जो प्रसंग कल्पिलेला आहे ज्यात राम ही प्रतिज्ञा उच्चारतो, तेव्हा सीता तेथे उपस्थित असते. त्यावर सीतेचा अभिप्राय आहे, ‘‘म्हणून तर आपण रघुकुलात श्रेष्ठ आहांत.’’

एकपत्नी

आणि नंतर खरेच रामावर सीतेचा त्याग करण्याची पाळी येते. सीता शुद्ध आहे, हे माहीत असतानाही जनतेच्या संतोषासाठी राम सीतेचा त्याग करतो. अशा अवस्थेत की जेव्हा तिला सोबतीची, साहाय्याची गरज असते. ती आसन्नप्रसव असते. हा, सीता या व्यक्तीवर अन्याय आहे की नाही? नक्कीच आहे. पण सीतेवरच अन्याय आहे काय? नाही. तो रामावरही अन्याय आहे. त्याचे सर्व कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होते. त्यावेळी बहुपत्नीत्वाची चाल होती. राम दुसरा विवाह करू शकला असता. पण रामाने तसे केले नाही. विरहाच्या वणव्यात सतत जळत राहणे त्याने पसंत केले. पुढे अश्वमेध यज्ञाचा प्रसंग आला. यज्ञाचे कंकण बांधण्यासाठी गृहिणीची गरज असते. रामाने सीतेची सोन्याची प्रतिमा बनवून तिच्या सोबतीने यज्ञकंकण बांधले. रामराज्य असे व्यक्तिनिरपेक्ष असते. स्वकीयांच्याच नव्हे तर स्वत:च्याही संबंधात कठोर असते. राजधर्माच्या पालनात कठोरता नुस्यूत असतेच.

धर्मराज्य

रामराज्ययाचा अर्थ केवळ राम या व्यक्तीचे राज्य असा नाही. त्याला गुणात्मक अर्थ आहे. तो अर्थ सांगतो की रामराज्यम्हणजे धर्मराज्य. धर्मराज्यम्हटल्या बरोबर काही आधुनिक अडाण्यांच्या भुवया उंचावतील. त्यांना धर्मराज्यहे थिओक्रॅटिक स्टेट म्हणजे सांप्रदायिक राज्य वाटेल. या अडाण्यांना धर्मआणि रिलिजनयातले अंतर कळतच नाही. आपल्या धर्माच्या अवधारणेत राज्य पंथनिरपेक्षच असते. नव्हे, ते तसेच असले पाहिजे. धर्मराज्यचा खरा अर्थ होईल, नैतिकतेचे राज्य, न्यायाचे राज्य आणि नैतिकता म्हणजे चरित्राची शुद्धता, आचरण व्यवहार यातील पवित्रता आणि व्यक्तीपेक्षा तत्त्व आणि सिद्धांत यांची श्रेष्ठता. व्यक्तीपेक्षा समाजाची श्रेष्ठता मोठी. व्यक्तीने स्वत:ला व्यापकतेशी जोडून घेणे म्हणजेच धर्म. या अर्थाने रामराज्य म्हणजे धर्मराज्य.

एकस्य मरणं मेऽस्तु

वर सीतात्यागाचा प्रसंग उल्लेखिला आहे. श्रीरामाच्या जीवनात, पुन: असाच एक प्रसंग आला आहे. वाल्मीकिरामायणाच्या उत्तरकांडातील तो प्रसंग आहे. रामाचे ऐहिक जीवन समाप्त होण्याचा समय आला आहे. कालपुरुष श्रीरामाच्या भेटीला आले असून त्यांनी एकान्तात रामाची भेट मागितली आणि बजावले की, कुणीही या एकान्ताचा भंग करणार नाही; जो करील, त्याला मृत्युदंड भोगावा लागेल. रामाने पहारेकरी म्हणून लक्ष्मणाची नेमणूक केली. कालपुरुषाशी संवाद चालू असतानाच महाकोपी दुर्वास ऋषी तेथे आले आणि आताच रामाची भेट हवी असल्याचे त्यांनी म्हटले. लक्ष्मणाने थोडा वेळ थांबा असे म्हटले. पण उपयोग झाला नाही. मी आल्याचे लगेच सांगितले नाही, तर तुम्हा सर्वांसहित या अयोध्येला भस्मसात् करीन, अशी धमकी त्यांनी दिली. लक्ष्मणाने विचार केला ‘‘एकस्य मरणं मेऽस्तु मा भूत् सर्वविनाशनम्. आज्ञा मोडली, तर मलाच मृत्युदंड मिळेल. योध्या तर वाचेल. असा विचार करून तो आत गेला. राम आणि कालपुरुष यांचा संवाद संपला होता. ते दोघेही उठून उभे झाले होते. तरी लक्ष्मण म्हणाला की, मला मृत्युदंड द्या. मी आपल्या आज्ञेचे पालन केलेले नाही. अखेरीस प्रकरण वसिष्ठांकडे गेले आणि वसिष्ठ म्हणाले की, आपण लक्ष्मणाचा परित्याग करा आणि रामाने लक्ष्मणाचा त्याग केला. रामाविना लक्ष्मण? आपण कल्पनाही करू शकत नाही. लक्ष्मण सरळ शरयूच्या किनार्यावर गेला आणि त्याने तेथे जलसमाधी घेतली.

विजयशालित्व

आणखी एक मुद्दा. धर्मराज्य हे नीतिमत्तेचे, सांस्कृतिक मूल्यांचे, न्यायाचे राज्य, हे अगदी खरे आहे. पण याचा अर्थ ते दुर्बलांचे राज्य असा नाही. जे दंडनीय आहेत त्यांना दंड देणारे ते राज्य असते. ताटिका, वाली, रावण हे दंडनीय होते. त्यांना दंडित करण्यात आले. दंडशक्ती, ही कोणत्याही राज्याची आधारशक्ती असते. धर्मराज्यातही दंडशक्तीचे महत्त्व राहणारच. याचप्रमाणे धर्मराज्य हे नित्य विजयशाली राज्य असते, असले पाहिजे. राम सदैव विजयशाली राहिले आहेत. असे हे आपल्या संस्कृतीचे सर्व वैशिष्ट्य प्रकट करणारे, रामचरित्र आहे. म्हणून रामजन्माचा उत्सव आहे. म्हणून रामनवमी पाळायची असते आणि रामचंद्राच्या स्वच्छ, निरपेक्ष, पवित्र, कर्तव्यपरायण जीवनाचे स्मरण करायचे असते. रामनवमीचे हे महत्त्व आहे. राम राम!

                          -मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ३१-०३-२०१२

4 comments:

  1. आपल्या ज्ञानाबद्दल मला शंका नाही. ह्या लेखात आपण एके ठिकाणी रावणाला "स्त्री-लंपट" म्हंटले आहे. ह्याची पुष्टी करणारे संदर्भ कधी रामायणात वाचायला मिळाले नाहीत. सीतेचे हरण हा रावणाचा प्रतिशोध होता असे वाटते. जरा स्पष्ट कराल तर एक शंका दूर होण्यास मदत होईल.

    श्रीकांत जोशी, मुंबई

    ReplyDelete
    Replies
    1. I agree with you. Ravan did not even touch her even though she was in his captive for years.

      Delete
  2. 99 Moti sodoon eak lahan khada baghayacha nasato.Far kiis kadhoo naka.

    ReplyDelete
  3. In India there are many Adiwasis who do worship Rawana. What about them? Prabhu Ram claimed that entire continent belonged to Ikshwaku but that does not mean it was rality. Otherwise there would not have been different rulers even in his own time!

    ReplyDelete