Saturday, 9 June 2012

भाजपातील धुसफूस


रविवारचे भाष्य दि. १० जून २०१२ करिता

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या वेळी दिसून आलेले रागलोभाचे नाट्य, अजूनही संपलेले नाही. गुजरातचे मुख्य मंत्री नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी हट्टापुढे, भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने शरणागती पत्करली, हे कुणालाच आवडले नव्हते. दिनांक २७ मे च्या भाष्यात’, मी पुढे असेही म्हटले होते की, पक्षाच्या प्रतिष्ठेपेक्षा व्यक्तीच्या प्रतिष्ठेला जपण्याची कृती ना नैतिक दृष्टीने समर्थनीय आहे, ना राजकीय दृष्टीने फायदेशीर. मी असेही सूचित केले होते की, संजय जोशींचा बळी घेणे योग्य नव्हते. मुंबईच्या बैठकीच्या वेळी संजय जोशींनी कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा राजीनमा दिला होता. नवी बातमी अशी आहे की, त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला तो स्वीकारण्यातही आला. हा, मोदींचा संपूर्ण विजय समजला जात आहे तरी संजय जोशींची प्रतिष्ठा यामुळे वाढली आहे, हे निश्चित.

अडवाणींची टीका

माझी अशी कल्पना की, हे प्रकरण तेव्हाच संपले. निदान, येत्या डिसेंबरात श्री गडकरी यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईपर्यंत सारे काही सुरळीत चालेल. पण ही कल्पना खोटी ठरली. आणि त्या कल्पनेला धक्का देणारी व्यक्ती लहानसहान नाही. पक्षातील सर्वश्रेष्ठ सर्वज्येष्ठ पुढारी लालकृष्ण अडवाणी यांनीच ती खोटी ठरविली. ज्या दिवशी भाजपाप्रभृती अनेक राजकीय पक्षांनी, पेट्रोलच्या किमतीतील अफाट वाढीच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले होते, त्याच दिवशी, श्री अडवाणी यांनी, नाव घेता, पक्षाध्यक्ष श्री गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली. अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर जे लिहिले त्याचे जे वृत्त प्रकाशित झाले, ते पक्षाच्या पदाधिकार्यांना निश्चितच अस्वस्थ करणारे आहे.
श्री अडवाणींनी लिहिले की, ‘‘सांप्रत पक्षातील वातावरण उत्साहवर्धक नाही. . प्र. विधानसभा निवडणुकीचा निकाल, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मायावतीच्या सरकारने ज्याची हकालपट्टी केली, त्या मंत्र्यांचे भाजपात स्वागत, झारखंड कर्नाटकातील परिस्थितीची पक्षाकडून झालेली हाताळणी- या सर्व घडामोडींनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पक्षाने जे अभियान सुरू केले आहे, त्याला कमजोर केले आहे.’’
अडवाणी जे म्हणाले, त्यात काहीही चूक नाही. बाबूसिंग कुशवाहाला भाजपात प्रवेश देणे ही चूक होती. त्यांचा प्रवेश रोखण्यात येऊन ती चूक दुरुस्त करण्यात आली. तसेच विवादास्पद उद्योगपती अंशुमान मिश्र यांना राज्यसभेत येण्यासाठी अनुमती दर्शविणे हेही चूक होते. पण तीही चूक दुरुस्त करण्यात आली. मग अडवाणींचा राग का? आणि त्यांनी तो भारत बंदच्या दिवशीच प्रकट करण्याचे प्रयोजन कोणते? वृत्तपत्रांनी, गडकरींच्या नेतृत्वावरील हा हल्ला आहे, असा त्याचा अर्थ लावला, तर त्यांना कोणत्या तोंडाने दोष देणार?

नाराजीचे नेमके कारण?

मुंबईत जे घडले, त्यामुळे अडवाणी नाराज झाले, हे उघड आहे. पण या नाराजीचे नेमके कारण काय? गडकरींना, पुन:, लगेच तीन वर्षांसाठी अध्यक्षपद लाभावे, या हेतूने, पक्षाच्या घटनेत जी दुरुस्ती करण्यात आली, त्यामुळे त्यांना राग आला की, मोदींपुढे पक्षाध्यक्षाने लोटांगण घातले म्हणून त्यांची नाराजी आहे? मोदी आणि अडवाणी यांचे संबंध बघता, मोदींना खुष करण्यासाठी संजय जोशींचा बळी देण्यात आला, याचा त्यांना राग आला असेल, असे वाटत नाही. संजय जोशींविषयी त्यांना खूप आपुलकी वाटत होती, असे पक्षाच्या संघटनेत काम करणार्या लोकांचे मत नाही. संजय जोशींचे निष्कलंकत्व सिद्ध झाल्यावरही, त्यांचे पुन: पक्षात स्वागत करावे यासाठी अडवाणींनी प्रयत्न केल्याचीही वार्ता नाही. त्यामुळे, त्यांच्या नाराजीचे कारण, गडकरींना परत तीन वर्षे अध्यक्षपद देण्यासाठी जी व्यूहरचना मुंबईत करण्यात आली, हेच असले पाहिजे, असा निष्कर्ष कुणी काढला तर त्याला दोष देता येणार नाही. वार्ता अशी आहे की, कर्नाटकातून लोकसभेवर निवडून आलेले खासदार अनंतकुमार यांना पक्षाध्यक्ष करावे, अशी अडवाणींची इच्छा होती. पक्ष-घटनेतील दुरुस्तीमुळे, गडकरींचा मार्ग प्रशस्त झाला आणि अनंतकुमारांचा मार्ग बंद झाला, यामुळे अडवाणी रागावले, असा एक तर्क आहेअडवाणींची प्रतिक्रिया बघता तोच अपरिहार्य ठरतो आणि आपल्या ब्लॉगवरील वक्तव्याने तो राग त्यांनी जाहीर रीतीने प्रकट केला, अशा निष्कर्षाप्रत यावे लागते. अडवाणींसारख्या ज्येष्ठ, प्रगल्भ नेत्याचा संयम सुटावा याचे कुणालाही आश्चर्य वाटेल.

दूरदर्शन वाहिन्यांवरील चर्चा

गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्याकडे दूरदर्शनच्या दोन-तीन वाहिन्यांचे प्रतिनिधी येऊन गेले. असे जाणवले की, त्यांना माझ्या २७ मे च्या भाष्यातील काही वचनांची माहिती असावी. त्यांचे सर्व प्रश् श्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील होते. त्या भाष्या मी जे लिहिले होते, त्याचीच मी पुनरुक्ती केली. मी त्यांना सांगितले की, ‘‘पक्षापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ नाही. जेथे व्यक्ती श्रेष्ठ आणि पक्ष कनिष्ठ असतो, असे पक्ष व्यक्तिकेंद्रित असतात. असे अनेक पक्ष आपल्या देशात आहेत. मी सपा, बसपा, द्रमुक, अद्रमुक, शिवसेना, तेलगू देशम् अशा पक्षांची नावेही घेतली. भाजपा, तसा व्यक्तिकेंद्रित पक्ष नाही. होऊही शकणार नाही. म्हणून मोदींच्या हट्टापुढे पक्षाने वाकण्याचे कारण नव्हते.’’ नंतर त्यांनी पक्षाचा, प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार कोण, मोदी हे त्या दृष्टीने कसे आहेत, असे प्रश् मला विचारले. मी्हणालो, २०१४ साली प्रधानमंत्री कोण होणार याची चर्चा आज अप्रस्तुत आहे. प्रथम पुढच्या महिन्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे. तिला अधिक महत्त्व आहे. नंतर २०१२ संपण्यापूर्वी गुजरात विधानसभेची निवडणूक आहे. श्री मोदी तेव्हा स्वत: निवडणुकीला उभे राहतात की नाही, त्या निवडणुकीचा निकाल कसा लागतो, माजी मुख्य मंत्री केशुभाई पटेल, माजी मुख्य मंत्री सुरेश मेहता, माजी गृहमंत्री झाडफिया ही मंडळी मोदी यांच्या विरोधात उभी ठाकली आहेत, त्यांच्या विरोधाचा परिणाम काय होतो, ते बघावे लागेल. तसेच २०१३ मध्ये होणार्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल बघावे लागतील. मगच हा प्रश् प्रस्तुत ठरेल. मी हे परवा म्हटले आणि कालच्या वृत्तपत्रात, मोदींनी, केशुभाई पटेल प्रभृतींचा धसका घेतला असे सूचित करणारी बातमी प्रसिद्ध झाली.

ती बातमी

दिनांक जूनला, भाजपाचा भेसान येथील एक नगर प्रतिनिधी भूपत भायानी याच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबाराच्या निषेधार्थ भेसानच्या लोकांचा जो क्षोभ प्रकट झाला, त्यात नऊ दुकाने जाळली गेली. या नऊ दुकानांमध्ये बहादूर खुमान या व्यक्तीचे पानपट्टीचे दुकान होते. ते जाळण्यात आल्याबद्दल त्याने न्यायालयात तक्रार केली. आणि त्या तक्रारीत त्याने असा आरोप केला की, केशुभाई पटेल आणि गोवर्धन झाडफिया यांनी जी प्रक्षोभक भाषणे केलीत, त्याचमुळे ही जाळपोळ झाली. म्हणून बहादूर खुमान याने या व्यक्तींच्या विरोधात भेसानच्या न्यायालयात धाव घेतली. हे खरेच आहे की, भडकविणार्या भाषणांनी लोकक्षोभ निर्माण होऊ शकतो. तसे भेसानमध्ये घडूही शकते. पण मजेची गोष्ट अशी की, ही आरोपित भडकाऊ भाषणे ११ मार्चला झाली होती. म्हणजे जवळजवळ तीन महिने वातावरण शांत होते. ते पावणेतीन महिन्यांनंतर भडकले. तीाषणे इतकी उग्र होती की, तीन महिनेपर्यंत त्यांनी निर्माण केलेला क्षोभ जनतेत धुमसत होता आणि भायानीवरील गोळीबाराच्या घटनेने तो जूनला प्रकट झालाआणि त्यात त्या बिचार्या गरीब पानवाल्याचा ठेला जाळला गेला. अर्थात्, गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्या प्रमाणे केशुभाई पटेल प्रभृतींवर भारतीय दंड संहितेच्या २०२ व्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी मजेची गोष्ट अशी की, ती आरोपित भडकाऊ भाषणे भेसानला झालीच नव्हती. त्याच्या जवळच्या मोटा कोटदा या गावी ती झाली होती. तेथे ११ मार्चला लेवा पटेलांची एक सामाजिक बैठक झाली, तीत ही भाषणे झाली. त्यामुळे लेवा पटेल भडकले त्यांनी पावणेतीन महिन्यांनंतर बहादूरभाईचे दुकान जाळून आपला क्षोभ व्यक्त केला! आहे की नाही मजा!
हा सर्व तपशील देण्याचे कारण असे की, राजकारणातील आपल्या विरोधकांवर सूड उगविण्याची एवंगुणविशिष्ट नरेंद्र मोदी यांची ही शैली आहे. त्यांच्या सरकारच्या प्रेरणेशिवाय बहादूरभाई अशी बहादुरी प्रकट करायला धजले तरी असते काय?

अकालिक चर्चा

हे जरा विषयांतरच झाले की! मूळ प्रश् २०१४ मध्ये भाजपाचा प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार कोण, हा होता आणि आडूनपाडून मला हाच प्रश् दू. .च्या तिन्ही वाहिन्यांनी विचारला. मी, ज्या प्रमाणे २०१२ च्या निवडणुकांचा संदर्भ दिला, तसेच २०१३ मध्ये होणार्या निवडणुकांचाही संदर्भ दिला. भाजपाची, ज्या राज्यांमध्ये चांगली पायाभूत शक्ती आहे, त्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकी २०१३ मध्ये होणार आहेत. यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आहेत. त्या निवडणुकांचा निकाल कसा लागतो, यावर सारे अवलंबून आहे. त्यामुळे, २०१४ मध्ये आपला प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे भाजपा, तत्पूर्वी कधीही सांगणार नाही. शिवाय, त्या पदासाठी लायक नेत्यांची उणीव भाजपात नाही. मी हेही म्हणालो की, इंग्लंडमध्ये जो विरोधी पक्षाचा नेता असतो, त्याचा पक्ष पुढच्या निवडणुकीत बहुमतात आला, तर तोच प्रधानमंत्री होतो. आपल्याकडे तशी पद्धती रूढ झाली असती, तर श्रीमती सुषमा स्वराज प्रधानमंत्री झाल्या असत्या. शिवाय, आणखीही एक बाब विचारात घ्यावी लागेल. आणि ती म्हणजे २०१४ मध्ये भाजपाला मिळणार्या जागांची संख्या. भाजपाच्या जागा २०० च्या आत असतील, तर भाजपाला, आपल्या मित्रपक्षांच्या मताचा आदर करावाच लागेल. पण भाजपा २५० जागांच्या आसपास पोचला (ही संभावना आज शक्य कोटीतील वाटत नाही. पण २०१३ चा निकाल ही परिस्थिती बदलवू शकते.) तर मित्रपक्षांना भाजपाचे म्हणणे ऐकावेच लागेल. तात्पर्य असे की भाजपाचा प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार कोण याची चर्चा २०१२ मध्ये अप्रस्तुत आहे, अकालिक (प्रिमॅच्युअर) आहे. दू. . वाहिन्यांशी चर्चा -१० मिनिटांतच आटोपली. पण मी जे त्यांच्याशी बोललो, त्याचे हे सार आहे.

एक नवीन शंका

हे भाष्यलिहीत असताना, माझ्या मनात एका शंकेची पाल चुकचुकत आहे. वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे नरेंद्र मोदी यांचा एवढा उदोउदो का करीत आहेत? या मागे कुणाची काही प्रेरणा आहे काय? मोदींची प्रेरणा असेल, असे मला वाटत नाही. याचा अर्थ मोदींच्या ठिकाणी प्रधानमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा नाही, असा नाही. ती महत्त्वाकांक्षा त्यांच्या ठिकाणी असेलच; आणि त्यात गैर काहीही नाही. राजकारणात याबद्दल कुणाला दोष देण्याचे कारणही नाही. राजकारण म्हणजे रा. स्व. संघ नव्हे, जेथे मैं नहीं तू हीहा आदर्श असतो. पण श्री मोदी स्वत: हे सर्व घडवीत असतील, असे मला वाटत नाही. ते चाणाक्ष राजकारणी आहेत. आपली पावले ते शहाणपणाने टाकत असणार. स्वत:चाच असा बटबटीत प्रचार ते करावयाचे नाहीत. म्हणून, मला शंका येते की, भाजपाच्या विरोधी दलांचीच ही व्यूहनीती असावी. भाजपाने एकदा का, मोदींना आपले प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले, किंवा जनमानसात असा ठसा निर्माण झाला की, मोदीच भाजपाचे भावी प्रधानमंत्री राहणार आहेत, तर अल्पसंख्यकांना तसेच भाजपाच्या मित्रपक्षांना भाजपापासून दूर करता येईल आणि मग तिसरी आघाडी अधिक मजबूत होईल, असा त्यांचा होरा असावा. भाजपाच्या विरोधकांनी आपल्या लाभासाठी अशा कूटनीतीचा अवलंब करावा यात अप्रूप काहीच नाही. मात्र भाजपाने, त्याला बळी पडू नये, अशी अपेक्षा आहे.

एकजुटीची आवश्यकता

दि. २७ मे च्या भाष्यातभाजपाच्या भवितव्याच्या दृष्टीने मी काही विचार मांडले होते. त्यांचा पुनरुच्चार येथे करीत नाही. आज सर्वात महत्त्वाची आवश्यकता जी आहे, ती पक्षात एकजूट असण्याची ती आहे असे दिसण्याची. सर्व महत्त्वाचे निर्णय सामूहिक विचारविनिमयातून घेतले गेले पाहिजेत. निर्णयापूर्वी विचारविनिमय होत असताना, भिन्न भिन्न मते प्रकट होणारच. ती झालीही पाहिजेत. पण एकदा का समूहाचा निर्णय झाला की मग तो आपलाच निर्णय आहे, अशी सर्वांची भूमिका असली पाहिजे. ही संघाची रीत आहे. कोणत्याही संस्थेच्या किंवा संघटनेच्या आरोग्यासाठी ही रीत उपकारक आहे. संघासारख्या विशाल संघटनेत भिन्न भिन्न मते धारण करणारे नसतील काय? पण ती सारी विचारविनिमयाच्या बैठकीत प्रकट होतात आणि बैठकीत जो निर्णय घेतला जातो, तो सामूहिकतेने सर्वांचा आणि व्यक्तिरूपाने प्रत्येकाचा निर्णय होत असतो. भाजपात, संघाच्या मुशीतून गेलेले पुष्कळ लोक आहेत, त्यांना संघाच्या या रीतीची माहिती असेलच. पण भाजपात तसे दिसत नाही. पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीला विरोध असेल, तर तो अडवाणींनी त्या सभेत व्यक्त करावयाला हवा होता; आणि बहुमताचा निर्णय मान्य करावयाला हवा होता. निर्णय झाल्यानंतर त्या संबंधीची नाराजी जाहीर रीतीने प्रकट करणे हे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा गौरव सन्मान वाढविणारे नाही. पक्ष एकजुटीने चालत आहे, असाच ठसा जनतेवर कार्यकर्त्यांच्या मनावर ठसला पाहिजे. या दृष्टीने अडवाणींची टीका असमर्थनीय आहे.

पर्याय भाजपाच

सध्या सत्तासीन असलेली संपुआ, खूपच बदनाम झालेली आहे. अनेक आर्थिक घोटाळ्यांनी ग्रस्त त्रस्त आहे. २०१४ मध्ये ती पुन: सत्ता काबीज करील, अशी यत्किंचितही शक्यता नाही. या परिस्थितीत भाजपा हाच सर्वोत्तम पर्याय आहे. पण हे जनतेला जाणवले पाहिजे. या दृष्टीने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीरपणे आत्मपरीक्षण केले पाहिजे. २०१३ च्या विधानसभांच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची निवड, घोषणापत्रांची निर्मिती, प्रचारयंत्रणा या सर्व बाबतीत पक्ष एकजुटीने उभा आहे, असे दृश्य उपस्थित झाले पाहिजे. तेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करील. या उत्साहनिर्मितीच्या प्रक्रियेत जे बाधा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतील त्यांना योग्य पद्धतीने समज देण्याची क्षमता सिद्धता पक्षनेतृत्वात असली पाहिजे. मग ती व्यक्ती कोणत्याही मोठ्या पदावर असो. असा एकजुटीने युक्त, संयमाने प्रतिक्रिया व्यक्त करणारा, शिस्तशीर, चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी पुढील दोन वर्षांमध्ये उभी झाली पाहिजे. यातच पक्षाचे राष्ट्राचेही हित निहित आहे.

-मा. गो. वैद्य
babujivaidya@gmail.com
नागपूर
दि. ०९-०६-२०१२

No comments:

Post a Comment