Saturday 23 June 2012

‘सेक्युलर’ कोण? आणि ‘सेक्युलर’ काय?



रविवारचे भाष्य दि. २४ जून २०१२ करिता


आपल्या देशात सेक्युलरशब्दाचा नुसता बाजार झाला आहे. हा बाजार मांडणारे, ‘सेक्युलरशब्दाचा खरा अर्थ ध्यानात घेत नाहीत आणि तो शब्द राजकीय प्रणालीत कसा शिरला हेही समजून घेत नाहीत.

सेक्युलरचा अर्थ

सेक्युलरशब्दाचा अर्थ आहे इहलोकासंबंधी, ऐहिक. इंग्रजी भाषेत सांगायचे म्हणजे this-worldly. याचा, परमेश्वर, अध्यात्म, परमार्थ, पारलौकिक, ईश्वराची उपासना किंवा आराधना आणि त्या उपासनेचे कर्मकांड, यांच्याशी संबंध नाही. खरेच का कोणी व्यक्ती खर्या अर्थाने सेक्युलरराहील? राहीलही. पण मग ती व्यक्ती नास्तिक असली पाहिजे. चार्वाकासारखी किंवा कार्ल मार्क्ससारखी. चार्वाक म्हणाला होता :-
यावज्जीवं सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत: |
म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आनंदाने जगावे. वाटल्यास कर्ज काढावे पण तूप प्यावे (म्हणजे चैनीत आयुष्य घालवावे) चितेवर जळून भस्म झालेला पुन: थोडाच परत येतो! मार्क्सनेही धर्माला म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वावर असणार्या श्रद्धेला अफूची गोळी म्हणजे माणसाला बेहोश करणारी वस्तू म्हटले होते.
पण जगात ना चार्वाकाचे अनुयायी फार आहेत ना मार्क्सचे. अधिकांश संख्या परमेश्वराच्या अस्तित्वाला मानणारी आहे. मग त्याला कुणी गॉड्म्हणो, अथवा कुणी अल्लाम्हणो.

व्यक्ती सेक्युलरनसते

आपल्या सोनिया गांधींना सेक्युलरम्हणता येईल? त्या रोमन कॅथॉलिक आहेत. त्या नियमाने चर्चमध्ये जातात किंवा नाहीत, हे मला माहीत नाही. पण त्या एकदा कुंभमेळ्यात स्नानाला गेल्या होत्या; आणि एकदा गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी आल्या असताना, एका मंदिरातही जाऊन आल्या होत्या. आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य मंत्र्यांचे वर्तन बघा. अगदी शरद पवारांपासून तो आजच्या पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सर्व जणांनी आषाढी एकादशीला, भल्या पहाटे, स्नानादींनी शुचिर्भूत होऊन, पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा केली आहे. यांना सेक्युलर म्हणता येईल? आणि सेक्युलॅरिझम्चे गाळीव अर्क आपले लालूप्रसाद! ते तर छठ पूजेचा पुरस्कार करतात. हे कसले सेक्युलर’? म्हणून म्हणतो की, सामान्यत: कोणतीही व्यक्ती सेक्युलर नसते. तिचा कुठल्या ना कुठल्या देवतेवर विश्वास असतो.

हिंदू परंपरा

मग सेक्युलरकाय असते? सेक्युलर राज्यव्यवस्था असते. राज्यव्यवस्थेचा संबंध इहलोकाशी असतो. परमात्मा, अध्यात्म, पारलौकिकता, उपासनेचे कर्मकांड याच्याशी तिचा संबंध नसतो, नसलाही पाहिजे, असा आपणा भारतीयांचा आग्रह असतो आणि तसा व्यवहारही असतो. हे, इंग्रजांचे राज्य आपल्या देशात आले तेव्हापासूनचे तत्त्व नाही. ते फार प्राचीन आहे. कारण आपल्या देशाने, म्हणजे हिंदुस्थानने, आणि खरे म्हणजे ज्यांच्यावरून या देशाला हिंदुस्थानहे नाव मिळाले, त्या हिंदूंमुळे राज्यसेक्युलर राहिलेले आहे. सम्राट हर्षवर्धन स्वत: सनातन धर्म मानणारा हिंदू होता. पण तो बौद्ध आणि जैन पंथीयांच्या प्रमुखांचाही सत्कार करीत होता. हिंदूंकरिता राज्य सेक्युलरअसते, ही संकल्पना इतकी स्वाभाविक आहे की, जसे माणसाला दोन पाय असतात असे म्हणण्या इतकी. माणसाला दोन पाय असावेत, असा कोणी प्रचार करतात काय? कारण ते असतातच. अपघाताने किंवा नैसर्गिक विकृतीने माणसाचा एकच किंवा दीड पाय असू शकतो. पण हा झाला अपघात किंवा अपवाद. ही जी सेक्युलर राज्यव्यवस्थेची प्राचीन परंपरा आहे, तिचेच प्रतिबिंब आपल्या स्वातंत्र्योत्तर राज्यघटनेतही पडले आहे. घटनेचे १४ वे १५ वे कलम बघा. १४ वे कलम सांगते : ‘‘राज्य कोणत्याही व्यक्तीस राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.’’ आणि १५ वे कलम सांगते, ‘‘राज्य, केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही.’’ (घटनेच्या सरकारमान्य मराठी अनुवादातून मी हे उद्धृत केले आहे.)  ही हिंदू परंपरा आहे. म्हणून तर इराणातून निर्वासित झालेले पारशी हिंदुस्थानात शेकडो वर्षांपासून आपला धर्म, आपल्या परंपरा चालीरीती राखून आजही जिवंत आहेत. ते इराणात का परतू शकले नाहीत, याचे उत्तर मुसलमानांनी दिले पाहिजे.

मुसलमान आणि सेक्युलर राज्य

याचा अर्थ साफ आहे की, ईश्वरीय, पारमार्थिक, पारलौकिक अशा कोणत्याही क्रियाकलापांची राज्य दखल घेणार नाही. सर्वांना या बाबतीत स्वातंत्र्य राहील. सेक्युलरराज्यव्यवस्था अशी असते. सध्या आपल्या घटनेच्या आस्थापनेत सेक्युलरशब्द आहे. पण तो प्रारंभापासून नव्हता. तो १९७६ सालच्या आणिबाणीच्या काळात निष्कारणच घुसविण्यात आला. घटना १९५० पासून लागू झाली; आणि सेक्युलरशब्द १९७६ मध्ये आला. २६ वर्षे आपली घटना सेक्युलर नव्हती काय? राज्याचा व्यवहार, पंथ, संप्रदाय, लिंग, जात या आधारावर भेद करीत होता काय? नाही. कारण हे हिंदुस्थानचे म्हणजे हिंदूबहुल संख्या असलेल्यांचे राज्य आहे. पाकिस्तानात आहे काय अशी तरतूद? आणि बांगला देशात? तेही एका काळी भारताचेच भाग होते ना? का तेथे तशी व्यवस्था नाही? कारण तेथे हिंदूंची बहुसंख्या नाही. राज्य हिंदूंचे नाही. पाकिस्तानात किंवा बांगला देशात  जर राज्य सेक्युलरनाही, तर ते इराण, इराक, सौदी अरेबियात राहणे कसे शक्य आहे?

युरोपचा इतिहास

जवळजवळ दीड हजार वर्षे युरोपातील राज्ये सेक्युलर नव्हती. राज्यावर पोपचा म्हणजे चर्चच्या प्रमुखाचा अधिकार चालत असे. या अधिकार्याच्या ठिकाणी ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्ही शक्ती एकवटल्या होत्या. नंतर तेथील अनेक देशांचे राजे या व्यवस्थेला कंटाळले. त्यांनी पोपची सत्ता झुगारली. पोपविरुद्ध पहिले बंड इंग्लंडचा राजा आठवा हेन्री (१५०९ ते १५४७) याने केले. नंतर इतरांनी तोच मार्ग स्वीकारला. त्यांनी सांगितले की, राज्य हे सेक्युलरअसते, ते चर्चच्या स्वाधीन राहणार नाही. पण आठव्या हेन्रीने पोपची अधिसत्ता झुगारली, तरी स्वत: आपल्या देशाचे एक नवे चर्च चर्च ऑफ इंग्लंडस्थापन केलेच आणि स्वत: डिफेण्डर ऑफ फेथम्हणजे श्रद्धेचा संरक्षक असा किताब घेतला. म्हणजे आपल्या भारतासारखे इंग्लंड हे अजूनही सेक्युलरराज्य नाही. तेथील राजा प्रॉटेस्टंट पंथीयच असला पाहिजे, अशी परंपरा आहे. राजाने एका कॅथॉलिक पंथीय स्त्रीशी विवाह केला, तर त्याला राज्यावर बसू देण्यात आले नव्हते. ही फार जुनी गोष्ट नाही. अजून शंभर वर्षेही त्या गोष्टीला पुरी झाली नाहीत. अमेरिका स्वत:ला सेक्युलर राज्य म्हणते. ते आहेही. पण अमेरिकेच्या अडीचशे वर्षांत फक्त एकदाच कॅथॉलिक पंथीय व्यक्ती राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आली होती; आणि तीही पुरती चार वर्षे त्या पदावर राहू शकली नाही. तीन वर्षांच्या आत तिचा खून झाला. त्यापूर्वी आणि त्यानंतर कुणीही कॅथॉलिक अमेरिकेचा अध्यक्ष झाला नाही, किंवा असेही म्हणता येईल की, कुणाही कॅथॉलिकाने त्या पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहण्याची हिंमत केली नाही. तरी अमेरिकेत कॅथॉलिकांची संख्या २४ टक्के आहे. भारतात मुसलमानांची संख्या १३ टक्के आहे. पण आतापर्यंत तीन मुस्लिम गृहस्थ भारताचे राष्ट्रपतिपद भूषविते झाले. स्वभावत: आणि सिद्धांतत: ही सेक्युलर राज्यव्यवस्था मानणार्‍या हिंदूंमुळेच हे शक्य झाले. जम्मू-काश्मिरात हिंदूंची संख्या ४० टक्क्यांच्या वर आहे. पण कुणीही हिंदू तेथे आजतागायत मुख्य मंत्री बनू शकला नाही. का? कारण हेच ना की तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत!

वैचारिक व्यभिचार

अशी परिस्थिती असताना, भारतात सेक्युलर’, ‘सेक्युलरअसा गोंगाट का चालू आहे? याचे कारण राजकारण आहे. या राजकारणाने सेक्युलरशब्दाला एक विकृत अर्थ प्राप्त करून दिला आहे. सेक्युलरम्हणजे मुस्लिम खुशामतखोर असा विचित्र अर्थ त्याला आपल्या देशात प्राप्त झाला आहे नवल हे की ही विकृती अंगीकारणारे हिंदूच आहेत. या देशातील १३ टक्के मुसलमानांची एक व्होट बँक व्हावी आणि ती आपल्याला सदैव अनुकूल असावी, यासाठी ही सारी खटपट धडपड आहे. काही उदाहरणे ध्यानात घेण्यासारखी आहेत. आपल्या देशाच्या फाळणीला जबाबदार मुस्लिम लीग हा पक्ष आहे. १९४६ च्या निवडणुकीत भारतातील ८५ टक्के मुसलमानांनी फाळणीच्या बाजूने मतदान केले. ते सारे येथेच राहिले. त्यांची मते मिळविण्यासाठी, ‘सेक्युलॅरिझम्चा पुरस्कार करणार्या पं. जवाहरलाल नेहरूंनी तिला शिफारसपत्र दिले. दुसरे प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या काळात, सर्वोच्च न्यायालयाने एका वृद्ध घटस्फोटित मुस्लिम महिलेला, तिच्या नवर्याने पोटगी दिली पाहिजे, असा निर्णय दिला, तर राजीव गांधींच्या सरकारने घटनेत बदल करून तो निर्णय रद्दबातल ठरविला. का? तर कट्टरवादी मुसलमानांनी त्याला विरोध केला होता. घटना काय सांगते? घटनेचे ४४ वे कलम सांगते की, भारतातील यच्चयावत् नागरिकांसाठी समान नागरी कायदा असावा. करते काय कुणी सरकार या दृष्टीने हालचाल? नाव नको. उलट मुस्लिमांना ४॥ टक्के आरक्षण हवे, याचा ते आग्रह धरतात. हे कसले सेक्युलर? कारण एकच की, परंपरावादी मुसलमानांची बहुसंख्या आपल्या बाजूला असावी त्यांच्या मतांवर आपण सत्ता कमवावी हेच आहे. मजेची गोष्ट ही की, धर्माधर्मात, पंथापंथात भेदभाव करणार्या व्यवस्थेचे समर्थक, आपल्या देशात सेक्युलरठरतात; आणि सर्व पंथ-संप्रदायांना समान वागणूक असावी असे म्हणणारे हिंदू किंवा हिंदुत्वनिष्ठ लोक सांप्रदायिक ठरतात! वैचारिक व्यभिचाराचे एवढे बटबटीत उदाहरण जगात अन्यत्र सापडावयाचे नाही.

नीतीशकुमारांचा आगाऊपणा

आता थोडे नीतीशकुमारांविषयी. याच वेळी, भारताचा प्रधानमंत्री सेक्युलर असावा, अशी बोलण्याची उबळ त्यांना का आली? जवळ निवडणूक तर राष्ट्रपतिपदाची आहे. लोकसभेची नाही. ती २०१४ मध्ये आहे. तत्पूर्वी गुजरात विधानसभेची निवडणूक येत्या डिसेंबरात आहे. २०१३ मध्ये राजस्थान, ध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली इत्यादि या राज्यांच्या निवडणुकी आहेत. त्यानंतर लोकसभेची निवडणूक. कुणी सांगितले त्यांना की नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होणार आहेत? भाजपाने तर म्हटले नाही. हॉं, प्रसारमाध्यमांनी तसा प्रचार केला. कदाचित्, मोदींनीही त्याला हातभार लावला असेल. नीतीशकुमार निदान गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपासोबत आहेत. त्यांना भाजपाच्या चरित्राविषयी नक्कीच थोडेबहुत ज्ञान असेल. पण त्यांनी अवेळी हा मुद्दा का उपस्थित केला? एक कारण असे दिसते की, त्यांना भाजपाशी संबंध तोडायचा आहे. तोडा ना! कुणी तुम्हाला म्हणज तुमच्या जद (यू) पक्षाला रोखले आहे? राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एरवीही जद (यू)ने वेगळा पंथ स्वीकारलाच आहे. शिवसेनेनेही तोच मार्ग धरला आहे. यामुळे, रालोआ तुटेल, असे वाटत नाही. पण नीतीशकुमारांना ती तोडायची आहे, असे दिसते. त्यामुळे, त्यांचे बिहारातील मुख्यमंत्रिपद धोक्यात येऊ शकते. पण बहुधा, त्यांना कॉंगे्रस पक्षाचे समर्थन मिळणारे असावे. म्हणून ते हा धोका पत्करायला तयार झालेले दिसतात. अशा तडजोडी भारतीय राजकारणात अप्रूप नाहीत.

हिंदूंचे कर्तव्य

तेव्हा नीतीशकुमारांनी प्रधानमंत्री सेक्युलर असावा, असे म्हणण्यात विशेष काही नाही. पण ही त्याची वेळ नव्हती. ज्या अर्थी, राजकारणात आकंठ मुरलेल्या त्यांच्यासारख्यांनी, अवेळी, हा असंबद्ध मुद्दा उपस्थित केला, त्या अर्थी त्यांचा अंत:स्थ हेतू वेगळाच असावा, असा तर्क करावयाला हरकत नसावी. या पृष्ठभूमीवर सरसंघचालक मोहनजी भागवतांनी प्रधानमंत्री हिंदुत्वनिष्ठ असावा, असे म्हटले असेल, तर त्यात वावगे काय? हिंदुत्वनिष्ठ प्रधानमंत्रीच खर्या अर्थाने सेक्युलर राज्याचा प्रमुख राहण्यास पात्र आहे. कारण, हिंदुत्वामध्ये वेदप्रामाण्य मानणार्या जैन बौद्ध यांचाही समावेश होतो. मूर्तिपूजा मानणारे आर्यसमाजीही त्यांच्या दृष्टीने हिंदूच असतात. वस्तुत: मुसलमानांनीही या दृष्टीने आपल्या धार्मिक सिद्धांतांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. याच्या उलट, सेक्युलॅरिझम्ची ओरड करणारे अल्पसंख्यकांच्या खुशामतीत रमणारे आहेत; आणि जे पंथ, संप्रदाय, श्रद्धा यांच्या आधारावर आपल्या जनतेत भेदभाव पसरविण्याचे राजकारण करतात, त्यांना म्हणजे देशाच्या संपूर्ण जनतेच्या ऐक्याचे शत्रू समजले पाहिजे. गेली ६०-६५ वर्षे याच विकृत सेक्युलॅरिझम्ने ग्रस्त असलेले राज्यकर्ते आपण भोगले आहेत. त्यांनी देशाच्या एकात्मतेची किती दुर्दशा केली, हे आपण सर्व बघतच आहोत. ८०-८२ टक्के असलेल्या हिंदूंनी या मतलबी राजकारणाचा आणि राजकारण्यांचा हेतू ओळखला पाहिजे; आणि सर्वांना समान लेखणार्या खर्या देशनिष्ठ राजकारणाला उचलून धरले पाहिजे.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २३-०६-२०१२

4 comments:

  1. baburavji...kharech aaple vichar khupach margdarshak aahet.

    ReplyDelete
  2. Secular mahanje kaay: panth nirpeksha kiwan dahrma nirpeksha. he hindu/ bhartiya janta made clear krayala pahije. dharma aani religion made farch confusion aahe tyamule secular word che rajnitikaran jhaleli. he pracharit kela jaato ki je hindunishtha aahet aani rastrahit che chalawali karato te secular nahin.
    mi marathi bhashik nahi aahet. gar koni truti aahet mal maaf kara.

    ReplyDelete
  3. फक्त सेक्युलॅरिज़म विकृत नाही आपल्या देशातील माणसेच विकृत आहेत त्यामुळे सर्व प्रश्न निर्माण होतात.

    ReplyDelete
  4. केवळ सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या राजकीय चढाओढ़ी ची मात्र अशावेळी कीव येते
    ........
    महेशचंद खत्री .
    मेहकर जिल्हा .विदर्भ .

    ReplyDelete