Saturday 13 October 2012

कॅथॉलिक चर्च संकटात?


रविवारचे भाष्य दि. १४-१०-२०१२ करिता


रोमन कॅथॉलिक चर्च संकटात आहे, असे दिसते. कसले संकट म्हणून विचाराल? तर उत्तर आहे अस्तित्वाचे संकट. २०१२ च्या ईअर बुक प्रमाणे जगात सुमारे २२५ कोटी लोक ख्रिस्ती धर्माला मानणारे आहेत, त्यातले ७५ ते ८० टक्के रोमन कॅथॉलिक आहेत.
या चर्चच्या प्रमुखाला पोपम्हणतात. या चर्चचे स्वत:चे एक छोटेसे राज्य आहे. व्हॅटिकनहे त्या राज्याचे नाव. ते इतके छोटे आहे की कुणालाही हसायला येईल. त्याचे क्षेत्रफळ अर्धा चौरस कि. मी. ही नाही. लोकसंख्या एक हजाराच्या आत आहे. त्याची राजधानी व्हॅटिकन सिटी. ती चोहोबाजूंनी इटलीच्या राजधानीने- रोमने- घेरलेली आहे. पण त्याचे स्वत:चे रेल्वे स्टेशन आहे. टपाल सेवा आहे. स्वतंत्र मुद्रा आहे. रेडिओ स्टेशनही आहे. एवढेच काय पण त्याचे पोलिस व न्यायालयही आहे. सध्या पोप आहेत बेनेडिक्ट १६ वे. याचा अर्थ यापूर्वी बेनेडिक्ट नावाचे पोप १५ होऊन गेलेत. ते सध्या ८५ वर्षांचे आहेत. पोप बनण्यापूर्वीचे त्यांचे नाव जोसेफ राझिंगर असे होते.

एकसंध चर्च
एक काळ असा होता की, संपूर्ण ख्रिस्ती जगावर पोपची अधिसत्ता होती. राजा कोण बनेल, हे पोप सांगत असे. राजाने कुणाशी विवाह करावा, घटस्फोट घ्यावा किंवा नाही, हे देखील पोप सांगत असे. अशी जवळजवळ दीड हजार वर्षे पोपची, धार्मिक व राजकीय अशा दोन्ही क्षेत्रात अधिसत्ता चालली. पण १५ व्या शतकात जर्मनीमध्ये जन्मलेल्या मार्टिन ल्यूथर (इ. स. १४८३-१५४६) या धर्मसुधारकाने पोपच्या अधिसत्तेला आव्हान दिले. त्याने आपला एक पंथही स्थापन केला. त्याचे नाव प्रॉटेस्टंट’. ‘प्रोटेस्टया इंग्रजी धातूचा अर्थ निषेधकरणे असा आहे. पोपच्या अधिसत्तेचा ज्या मार्टिन ल्यूथरच्या अनुयायांनी निषेध केला, ते सर्व प्रॉटेस्टंटझाले. म्हणजे प्रॉटेस्टंटहाही ख्रिस्ती धर्माचा एक पंथच. पण या पंथाचे अनेक उपपंथ आहेत. २००१ मध्ये प्रॉटेस्टंट चर्चच्या प्रतिनिधींशी तत्कालीन सरसंघचालक श्री सुदर्शनजी यांची जी चर्चा, नागपूरच्या संघ कार्यालयात झाली होती, त्या चर्चेत प्रॉटेस्टंटांच्या २७ उपपंथांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. प्रॉटेस्टंटांशिवाय, ‘ऑर्थोडॉक्स चर्चहाही एक ख्रिस्ती उपपंथ असून तोही पोपची अधिसत्ता मानीत नाही. पण या सर्व पोपविरोधी म्हणा किंवा रोमन कॅथॉलिक नसलेले म्हणा, ख्रिस्त्यांची संख्या २५ टक्क्यांच्या वर नाही. रोमन कॅथॉलिक चर्चचे वैशिष्ट्य हे की तो पंथ इतक्या वर्षांनंतरही एकसंध आहे. धर्माचार्यांची (कार्डिनल) सभा पोपची निवड करते आणि जगातल्या सर्व देशांमधील कॅथॉलिक त्याची सत्ता मान्य करतात.

खाजगी पत्रांची चोरी
या १६ व्या बेनेडिक्टच्या संदर्भात अलीकडेच एक वार्ता प्रसिद्ध झाली आहे. ती त्यांच्या सैपाक्याच्या संबंधी आहे. या सैपाक्याचे नाव पावलो गॅब्रिएल असे आहे. त्याच्यावर असा आरोप आहे किंवा होता म्हणा की, त्याने पोप महाशयांची काही गोपनीय खाजगी पत्रे चोरली आणि ती जियानलुगी नुझ्झी या इटलीतील पत्रकाराला दिली. पत्रकार नुझ्झीने या पत्रांच्या आधारे 'His Holiness Pope Benedict XVI's Secret Papers' या शीर्षकाचे एक पुस्तकच लिहिले; आणि गेल्या मे महिन्यात त्याचे प्रकाशनही केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. पोपच्या पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेतला आणि पोपचा, सहा वर्षांपासूनचा विश्‍वासू सैपाकी पावलो गॅब्रिएलला पकडले. त्याच्यावर रीतसर खटला भरण्यात आला आणि त्याला १८ महिन्यांची कारावासाची शिक्षाही फर्मावण्यात आली. व्हॅटिकनमध्ये वेगळे कारागृह नाही. म्हणून गॅब्रिएलला त्याच्या घरी कोंडून ठेवण्यात आले.

चर्चच्या भानगडी
नुझ्झीच्या पुस्तकात चर्चमधील अंतर्गत भानगडींची व भांडणांचीही माहिती आहे. आर्थिक भ्रष्टाचाराची आणि समलिंगी व्यक्तींच्या घृणास्पद लैंगिक सवयींचेही त्यात वर्णन आहे. स्वाभाविकच युरोपातील वृत्तपत्रांमध्ये नुझ्झीच्या या पुस्तकाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. नुझ्झी, गॅब्रिएलच्या बचावालाही धावला होता; त्याचे म्हणणे असे की, गॅब्रिएलने चोरलेल्यापत्रांमध्ये राज्यकारभाराची किंवा लष्करी गुपिते नाहीत. गॅब्रिएलचा उद्देश चांगला होता. चर्चचा व्यवहार पारदर्शिक असावा असे त्याला वाटत होते. त्याने तेथे जे अवांछनीय कारनामे बघितले, त्यामुळे तो व्यथित झाला; व चर्चचा कारभार दुरुस्त व्हावा, धर्मसंस्थेला साजेशा निर्मळ पद्धतीने चालावा, याच उद्देशाने, त्या पत्रांची छायाचित्रे त्याने काढली. गॅब्रिएलच्या वकिलानेही आपल्या अशीलाचा बचाव करताना हे आवर्जून सांगितले की, त्याने पत्रे चोरलेली नाहीत. फक्त छायाचित्रे काढली आणि त्याचा असे करण्यात उद्देश चांगला होता. म्हणून त्याला पोपने क्षमा करावी. आता पोप १६ वे बेनेडिक्ट त्याला क्षमा करतात की त्याला उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी इटलीतील एखाद्या कारागृहात पाठवितात, इकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या जुलै महिन्यापासून गॅब्रिएल कैदेत आहे.

सायनडचे अधिवेशन
या सार्‍या प्रकारामुळे पोप बेनेडिक्ट खूपच अस्वस्थ झाले. त्यांनी याच ऑक्टोबर महिन्यात चर्चच्या, धर्माचार्यांची एक सभा बोलाविली. या सभेला सायनडअसे नाव आहे. या सायनडला २६२ धर्माचार्य उपस्थित होते. त्यात कार्डिनल (म्हणजे पोपच्या दर्जाच्या खालचे पण इतर सर्वांहून श्रेष्ठ दर्जाचे धर्माचार्य. हे धर्माचार्यच पोपची निवड करीत असतात), बिशप, आणि प्रीस्ट (म्हणजे पुजारी) यांचा समावेश होता. ते केवळ युरोपातीलच नव्हते, तर जगभरातून त्यांना बोलावण्यात आले होते. ही धर्माचार्यांची सभा तीन आठवडे चालण्याची अपेक्षा आहे.

एक कोडे
या सभेच्या आरंभी पोप बेनेडिक्ट यांनी केलेले भाषण महत्त्वाचे आहे. परंतु, आपल्या उद्घाटनाच्या भाषणाला आरंभ करण्यापूर्वी पोप महाशयांनी डॉक्टर ऑफ द चर्चया कॅथॉलिक चर्चच्या व्यवस्थेतील सर्वोच्च पदवीने, इतिहासकाळात होऊन गेलेल्या दोन श्रेष्ठ धर्मोपदेशकांचा गौरव केला. त्यातले एक होते १२ व्या शतकात झालेले- म्हणजे जवळजवळ एक हजार वर्षांपूर्वी झालेले- जर्मन गूढवादी (मिस्टिक) सेंट हिल्डेगार्ड आणि दुसरे होते १६ शतकातील स्पॅनिश धर्मोपदेशक सेंट जॉन ऑफ् ऍव्हिला. चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत केवळ ३३ व्यक्तींनाच या सर्वश्रेष्ठ पदवीने गौरवान्वित करण्यात आले आहे. पण बेनेडिक्ट महोदयांनी याच वेळी गौरव समर्पणाचा हा कार्यक्रम का करावा, हे मात्र एक कोडेच आहे.

पोपची चिंता
या धर्माचार्यांच्या सभेचा अधिकृत वृत्तांत तर एवढ्यात कळणे शक्यच नाही. हा लेख वाचकांच्या हाती पडेल तेव्हाही कदाचित् ते सायनडसंपलेले नसेल. पण आतापर्यंत जी वृत्ते बाहेर आली आहेत, त्यावरून असे दिसते की, कॅथॉलिक चर्चला मानणारे जे लोक जगभर पसरलेले आहेत, त्यांचे वर्तन पाहून पोप महाशय अत्यंत उद्विग्न झालेले आहेत. त्यांचे म्हणणे असे की, युरोपातील आणि अमेरिकेतील म्हणजे मुख्यत: कॅनडा या उत्तर अमेरिकेच्या देशातील आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, चिली, पेरू, अर्जेंटिना इत्यादी बहुसंख्य कॅथॉलिक असलेल्या देशांतील, कॅथॉलिक लोक नावापुरते कॅथॉलिक राहिलेले आहेत. ते रविवारी नियमाने चर्चमध्येही जात नाहीत. अनेक चर्चच्या इमारती ओसाड पडल्या आहेत. त्या विकल्या जात आहेत; आणि त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची व चिंतेची गोष्ट म्हणजे ही ओसाड पडलेली चर्चगृहे मुसलमान खरेदी करीत आहेत व तेथे आपल्या मशिदी उभारीत आहेत. म्हणून त्यांचे आवाहन आहे की, सर्व कॅथॉलिकांनी त्यांचे जे नियमित उपासनेचे कर्मकांड आहे, त्याचे काटेकोरपणे पालन करावे.
गेल्या ११ ऑक्टोबरला, हे वर्ष ईअर ऑफ द फेथम्हणजे श्रद्धेचे वर्ष सर्वांनी समजावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याच ११ ऑक्टोबरला पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १९६२ ते १९६५ दुसर्‍या कॅथॉलिक कौन्सिलने जे निर्णय घेतले होते, त्यामुळे कॅथॉलिक पंथाचा चेहरामोहराच बदलून गेला होता आणि तेव्हापासून या पंथाचे धर्मोपदेशक अधिक सक्रिय झाले होते.

सेक्युलॅरिझम्
रोमन कॅथालिक चर्चला दोन बाबींपासून खूप धोका वाटतो. त्यातली एक आहे सेक्युलॅरिझम्संबंधी ख्रिस्ती राष्ट्रांमधील राज्यकर्त्यांची वाढती आवड आणि दुसरी आहे इस्लामचा प्रसार. बहुतेक ख्रिस्ती देशांच्या संविधानांमध्ये सेक्युलरया शब्दाचा उल्लेख नाही. आपल्या भारताच्याही संविधानात सुरवातीला सेक्युलरशब्द नव्हता. तो संविधान लागू झाल्यानंतर २६ वर्षांनी अंतर्भूत करण्यात आला. तरी सुरवातीपासूनच आपले राज्य सेक्युलरच होते. म्हणजे राज्याचा स्वत:चा असा कोणताही संप्रदाय किंवा रिलिजन नव्हता. सर्व प्रकारचे पंथ, संप्रदाय, श्रद्धा, विश्‍वास बाळगणार्‍यांना समान अधिकार होते. अमेरिकेच्या संविधानातही सेक्युलरशब्द नाही. पण अमेरिकेचे राजकीय धोरण सेक्युलरम्हणजे सर्व पंथसंप्रदायांना समान लेखण्याचे आहे. तेथे १६ टक्के कॅथॉलिक आहेत. त्यांच्यापैकी कुणीही, अगदी राष्ट्रपतिपदासाठी सुद्धा, उभा राहू शकतो. आजवर फक्त एकच कॅथॉलिक त्या पदावर निवडून येऊ शकला व तोही पुरती चार वर्षे टिकू शकला नाही, हा भाग वेगळा. पण कॅथॉलिकांवर तशी बंदी नाही. अनेक मूळचे भारतीय पण अमेरिकेत जन्मलेले व तेथील नागरिकत्व प्राप्त केलेले लोक शासकीय पदांवर निवडून आलेले आहेत. विद्यमान अमेरिकन राष्ट्रपतींचे मूळ कूळ तर आफ्रिकेतील आहे. इंग्लंडमध्येही, जरी इंग्लंडचे अधिकृत चर्च असले व राजाला डिफेंडर ऑफ् द फेथम्हणजे त्या पंथाचा संरक्षक असा किताब असला, तरी तेथेही ख्रिस्ती नसलेल्यांना, नागरिकत्व मिळते व ते निवडणूकही लढवू शकतात.
अशा या सेक्युलर व्यवस्थेमुळे पोप महाशयांनी चिंतित होण्याचे कारण काय? कॅथॉलिक चर्चचे म्हणजे, त्या संप्रदायाचे, उपासनेचे, कर्मकांडाचे क्षेत्र वेगळे आहे. सरकारने, त्यात अडथळे आणले नाहीत म्हणजे झाले. पण एवढ्याने पोप महोदय संतुष्ट नसावेत. कारण, इतिहासकाळात ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला राज्यकर्त्यांचे फार मोठे योगदान लाभलेले आहे. रोमन सम्राटांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नसता व त्याच्या प्रसारासाठी आपली राज्यशक्ती वापरली नसती, तर ख्रिस्ती धर्माचा एवढा प्रसार झालाच नसता. तेव्हा सेक्युलॅरिझम्ने पोप महाशयांनी चिंतित व्हावे हे स्वाभाविकच आहे. परंतु या पुढील काळात ख्रिस्ती धर्माला मानणारे राज्यकर्ते- मग ते कोणत्याही पंथाचे असोत, आपल्या राज्याची शक्ती धर्मप्रसारासाठी वापरतील, अशी शक्यता नाही. एक काळ असा होता की, ख्रिस्ती साम्राज्यवादी देश, ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी वेगवेगळ्या चर्चेस्ना भरपूर धन देत असत. उद्देश हा की, त्या त्या देशात, त्यांच्या साम्राज्याशी एकनिष्ठ राहणार्‍या स्थानिक लोकांच्या संख्येत वाढ व्हावी. आजही, ते मिशनरी संस्थांना धनाची मदत करत असतील. पण गाजावाजा करून नाही. म्हणून पोप महाशय, आणि त्यांचे सर्व सहकारी, यांनी ख्रिस्ती सरकारे त्यांना मदत करतील या भरवशावर न राहणे हेच श्रेयस्कर. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी, सेक्युलॅरिझम्चा खरा अर्थ आपल्या लोकांना समजावून सांगणे व राज्य शासनांनी धर्माच्या क्षेत्रात लुडबूड करू नये असे त्यांना बजावणे, याची खरोखरी आवश्यकता आहे. धर्म-संप्रदायांचा प्रचार-प्रसार धर्मसंस्थांनी स्वबळावरच केला पाहिजे आणि तोही आपल्या धर्माची तत्त्वे जनतेत नीट समजावून देऊन आणि काळानुसार त्यांचे औचित्य पटवून देऊन.

इस्लामचा धोका
दुसरा खरा धोका आहे तो इस्लामचा. तो केवळ ख्रिस्ती चर्चला नाही, तो ख्रिस्ती राज्यांनाही संभवू शकतो. कारण इस्लामचे अनुयायी आक्रमक असतात. सध्या ते आपापसातील भांडणातच जरी गुंतलेले असले, तरी मूलतत्त्ववादी (फंडामेंटालिस्ट) मुसलमान तेथेही वरचढ होत आहेत. मुसलमान आपली लोकसंख्या वाढविण्यातही पारंगत आहेत. प्रो. सॅम्युएल हंटिंग्डन यांनीही आपल्या क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्सया प्रसिद्ध पुस्तकात ख्रिस्ती राष्ट्रे व मुस्लिम राष्ट्रे यांच्यातील संघर्षाची संभाव्यता वर्तविली आहे. हा संघर्ष दोन धर्मांची जी आधारभूत तत्त्वे आहेत, त्यामुळे अटळ वाटतो, असेही त्यांचे म्हणणे आहे. (पहा-पृष्ठ २०९ ते २१८) मला अशी माहिती मिळाली आहे की, या सायनडमध्ये ख्रिस्ती धर्माला इस्लामच्या आक्रमक अनुयायांकडून संभवणार्‍या धोक्याचीही बरीच चर्चा झाली आहे.
म्हणून रोमन कॅथॉलक चर्चने इस्लामचा प्रसार कसा थांबवावा, यासाठी आपली शक्ती खर्च केली पाहिजे. विद्यमान पोप महाशयांचे पूर्वाधिकारी या शतकाच्या प्रारंभी भारतातही आले होते आणि त्यांनी हे सहस्रक, आशिया खंडाला ख्रिस्ती करण्यासाठी योजावे, अशी घोषणा केली होती. आशिया खंडातील कुणाला ते ख्रिस्ती करू शकतील? तर फक्त हिंदू व बौद्ध यांनाच! मुसलमानांना हात लावणे तर सोडाच, त्यांच्या वस्तीतही पाद्री जाऊ शकणार नाही. पोप महाशयांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात चर्चच्या बायबलवरील श्रद्धा वाढविण्याच्या कार्याला पुन: उत्साहसंपन्न करण्याची (Reinvigorate the Church's Evengelisation Mission)  जी निकड प्रतिपादली आहे, त्या संबंधी कोणी वाद घालण्याचे कारण नाही. मात्र या उत्साहाची दिशा (१) स्वत:ला ख्रिस्ती समजणार्‍या व ख्रिस्ताला मानणार्‍या जनतेत बायबल, येशू ख्रिस्त व चर्च यांच्या संबंधी आस्था व श्रद्धा निर्माण करण्याकडे असली पाहिजे. त्यांना खर्‍या ख्रिस्ती धर्माचा परिचय करून देऊन कालानुरूप आवश्यकता पटवून देण्याकडे असली पाहिजे, आणि (२) इस्लामचा इतिहाससिद्ध आक्रमक आणि विस्तारवादी जो स्वभाव आहे, त्यापासून ख्रिस्ती जनतेला कसे वाचवावे याकडे असली पाहिजे.

चर्चच्या नवोत्साहाची दिशा
असे कळते की, आता खण्डश: ख्रिस्ती धर्माचार्यांच्या सभा होणार आहेत. आशिया खंडातील धर्माचार्यांची सभा येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहात आयोजित आहे. त्या सभेची दिशा या दोनच बाबींकडे असली पाहिजे. निरुपद्रवी, आत्मतुष्ट हिंदूबौद्धांकडे त्या उत्साहाचे टोक असण्यात प्रयोजन नाही. ख्रिस्ती राष्ट्रांना त्यांच्यापासून अजीबात धोका नाही. धोका कट्टर मुस्लिम राष्ट्रांपासूनच संभवतो, आणि तिसरे महायुद्ध झालेच तर ते या दोन धर्माच्या म्हणा सभ्यतांच्या म्हणा अनुयायांमध्येच होईल, हे सर्वांनी पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. प्रो. हंटिंग्डन यांनीही आपल्या पुस्तकात हेच भाकीत केलेले आहे. रोमन कॅथॉलिक चर्चने आपली सर्व शक्ती या दिशेने वळविली पाहिजे.


-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. १३-१०-२०१२
babujivaidya@gmail.com
......

No comments:

Post a Comment