Sunday 27 January 2013

नीतीन गडकरी यांचे अभिनंदन

रविवारचे भाष्य दि. २७ जानेवारी २०१३ करिता 

दुसर्‍या खेपेलाही भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आरूढ होण्याची शक्यता असतानाही, श्री नीतीन गडकरी यांनी निवडणुकीच्या रिंगणातून स्वत:ला दूर केले, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी घेतलेल्या या शहाणपणाच्या निर्णयाने पक्षातील फूट टळली. निदान ती प्रकट झाली नाही. माझे मत असे आहे की, या पदासाठी निवडणूक झाली असती, तरी किमान ७० टक्के मते मिळवून गडकरी विजयी झाले असते. पण त्यामुळे पक्षातील फाटाफुटीचे दर्शन झाले असते. ११ नोव्हेंबरच्या, माझ्या भाष्याच्या, ज्याने बरीच खळबळ उडवून दिली होती, समारोपात मी म्हटले होते की, ‘‘भाजपा एकरस आहे, त्याच्या नेत्यांमध्ये परस्पर सद्भाव आहे, त्यांच्यात मत्सर नाही, असा ठसा उमटावा, अशी भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि सहानुभूतिदारांचीही अपेक्षा आहे. यातच पक्षाचे भले आहे; आणि त्याच्या वर्धिष्णुतेची ग्वाही आहे’’ ती अपेक्षा नीतीन गडकरींनी स्वत:च्या उदाहरणाने, काही प्रमाणात का होईना, पूर्ण केली.

एक कारस्थान
भाजपाच्या घटनेप्रमाणे एका व्यक्तीला लागोपाठ, अध्यक्षपदी राहता येत नव्हते. घटनेच्या या कलमात संशोधन करून, ती व्यक्ती पुन: एकदा त्या उच्च पदावर राहू शकते, असे परिवर्तन करण्यात आले. ही घटनादुरुस्ती गडकरी यांच्यासाठीच होती, असा स्वाभाविकच निष्कर्ष काढला गेला. पण भाजपात असाही एक वर्ग होता की, त्याला हे पसंत नव्हते. या वर्गातील लोकांनी या घटनादुरुस्तीला विरोध केला नव्हता. पण त्याच क्षणापासून गडकरीविरोधी कारस्थानाने जन्म घेतला असावा. गडकरींचा ज्या पूर्ती उद्योग समूहाशी संबंध होता, खरे म्हणजे जो उद्योग समूह त्यांच्याच पुढाकाराने निर्माण झाला व त्यांच्या नेतृत्वाने वृद्धिंगत झाला, त्याच्या आर्थिक व्यवहारासंबंधी काही बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या. सरकारनेही त्या बातम्यांची दखल घेतली आणि त्या उद्योग समूहाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाईल, असे घोषित केले. गडकरींनी या चौकशीचे स्वागतच केले. पण एवढ्याने त्या असंतुष्ट आत्म्यांचे समाधान होणारे नव्हते. त्यांच्यापैकी एक स्वनामधन्य राम जेठमलानी यांनी गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकार करणार्‍या चौकशीचा निष्कर्ष काय येईल, याची वाट पाहण्याची त्यांना गरज वाटली नाही. ही दोन-अडीच महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आणि माझ्या त्या ११ नोव्हेंबरच्या भाष्यावर ज्या प्रतिक्रिया मला प्राप्त झाल्या, त्यात एक शंकाही व्यक्त करण्यात आली की, भाजपाच्याच काही श्रेष्ठ व्यक्तींनी किंवा एखाद्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांना हा मसालापुरविला. राम जेठमलानी यांच्यानंतर त्यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी, जे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य होते, अशा कलंकितव्यक्तीच्या हाताखाली काम करणे मला शक्य नाही, असे जाहीर करून आपल्या कार्यसमितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पण तेव्हाही कलंकसिद्ध झाला नव्हता. एवढेच काय पण आरोपपत्राची गोष्ट सोडा, साधी नोटीसही गडकरींना पाठविण्यात आली नव्हती. तरी जेठमलानी पिता-पुत्रांना गडकरी कलंकितवाटले. म्हणून मला हे गडकरीविरोधातील कारस्थान आहे, असे वाटले आणि तसे मी त्या अडीच महिन्यांपूर्वीच्या आपल्या भाष्यात लिहिले. त्यानंतर यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनीही गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली. अमेरिकेत वॉशिंग्टन येथे राहणार्‍या भाजपाच्या एका समर्थकानेही मला ई-मेल पत्र पाठवून आपली हीच भावना प्रकट केली. त्यांच्या पहिल्या पत्रातील पहिलेच वाक्य आहे, "I am saddened  by your support for Gadkari."  माझी खात्रीच पटली की, हे गडकरींविरुद्धचे अंतर्गत कारस्थान आहे. पण ११ नोव्हेंबरच्या भाष्यानंतर हे कारस्थान शांत झाले. अशी सर्वांची कल्पना झाली की, सर्व काही मिटले आणि गडकरी यांचा पुन: अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला. पण मग या मंडळींनी त्यांची निवड अविरोध न होऊ देण्याचा संकल्प केला. तशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशितही झाल्या. हे होत असतानाच सरकारी आय कर खात्याने पूर्ती उद्योग समूहाच्या काही कार्यालयांवर धाडी घातल्याचे वृत्त आले. गडकरी आपले नामनिर्देशपत्र भरण्याच्या अगदी दोन दिवसपूर्वी ही बातमी प्रकाशित झाली. अनेकांच्या मनात संशय उत्पन्न झाला आणि तो आजही आहे की, सरकारला एवढ्या उशिरा का जाग आली? जवळजवळ तीन महिने सरकार कशाची प्रतीक्षा करीत होते? या कारस्थानी मंडळींचे आणि सरकारचे परस्पर काही अनुबंध तर नाहीत? अर्थात् हा केवळ संशय आहे. खरे काय आहे, हे कोण सांगणार?

विजय कुणाचा?
गडकरींनी आपले नाव मागे घेतले ही बातमी दि. २२ जानेवारीच्या रात्री दूरदर्शनच्या वाहिन्यांवर झळकली. दि. २३ ला, इंडिया टीव्ही, एनडीटीव्ही, झी आणि एबीपी माझा या वाहिन्यांचे प्रतिनिधी या सर्व प्रकरणावर माझी प्रतिक्रिया विचारण्यासाठी, मला भेटायला आले. या लेखाच्या आरंभी मी जे वाक्य लिहिले तेच त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत सांगितले की, हे योग्य पाऊल आहे, हा शहाणपणाचा निर्णय आहे. त्यांच्यापैकी कुणी तरी प्रश्‍न विचारला की, यात कुणाचा विजय झाला? मी उत्तर दिले, विजयाच्या श्रेयासाठी पहिला क्रमांक प्रसारमाध्यमांचा आहे आणि दुसरा क्रमांक गडकरीविरोधी कारस्थान रचणार्‍यांचा आहे. आता जे व्हायचे ते होऊन गेले आहे. राजनाथसिंग हे भाजपाचे अध्यक्ष झाले आहेत. विशेष हे की, ते सर्वानुमतीने त्या पदावर निर्वाचित झाले आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. पार्टी विथ अ डिफरन्सम्हणजे एक वेगळ्या प्रकारचा पक्ष अशी त्याची गौरवपूर्ण ओळख, त्या पक्षाचे कार्यकर्ते व नेते करून देत असत; या सर्व प्रकाराने पार्टी विथ डिफरन्सेसम्हणजे मतभेदांनी भरलेला पक्ष अशी त्याची प्रतिमा झाली होती. ती नीट करण्याची संधी नव्या अध्यक्षांना मिळाली आहे. राजनाथसिंग अनुभवी राजकीय नेते आहेत. उ. प्र.सारख्या विशाल राज्याचे मुख्य मंत्रिपद त्यांनी भूषविलेले आहे. केंद्रातही ते मंत्री होते आणि मुख्य म्हणजे ते यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिलेले आहेत. सर्वांच्या सहमतीने त्यांना हे पद मिळाले आहे. त्या सर्वांचे सहकार्य ते अपेक्षित असतील, तर ते स्वाभाविकच आहे. घोडामैदान फार दूर नाही. सव्वा वर्षाच्या आत लोकसभेची निवडणूक होत आहे. पक्ष एकजुटीने या मैदानात उतरेल, असा विश्‍वास वाटतो.
***           ***           ***

सुशीलकुमार शिंदे यांचा निषेध

हिंदू दहशतवाद’, ‘भगवा आतंकवाद’, ‘संघाची शिबिरे म्हणजे आतंकवादाचे प्रशिक्षण देण्याच्या शाळा’- अशी मुक्ताफळे भारताच्या गृहमंत्रिपदी अलीकडेच विराजमान झालेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या तोंडून प्रकट व्हावीत याचे मला खूप आश्‍चर्य वाटले. दु:खही झाले. मी त्यांना ओळखतो. तेही मला ओळखीत असावेत. असे उठपटांग काहीबाही बोलण्याचा त्यांचा स्वभाव नाही. सदा हसतमुख असणारे ते व्यक्तिमत्त्व आहे. पण ही अगदी खालच्या दर्जाची भाषा त्यांच्या तोंडून बाहेर पडावी, याचे मला खूपच नवल वाटले. हिंदू आतंकवादम्हटले तर स्वत: शिंदेही त्या आतंकवादाचे संवाहक ठरतात. कारण ते हिंदू आहेत. नंतर, असे स्पष्टीकरण आले की, त्यांनी हिंदू आतंकवादअसे म्हटले नव्हते, ‘भगवा आतंकवादहा त्यांचा शब्द होता. सुशीलकुमारांना भगवाया रंगाच्या सर्व अर्थच्छटा नक्कीच माहीत असतील. भगवाहा रंग, पवित्रतेचा, त्यागाचा, संन्यस्त जीवनाचा निदर्शक आहे. म्हणून तो लोकांच्या आदराचा, न्मानाचा आणि पूजनीयतेचा रंग बनला आहे. आतंकवादाला तो रंग चिकटवून सुशीलकुमारांनी सर्व हिंदूंच्या या भावनांचा घोर अपमान केला आहे.

पक्षाची फारकत
शिंदे ज्या कॉंग्रेस पक्षाचे आहेत, ज्या पक्षाचे असल्यामुळेच गृहमंत्रिपदावर त्यांची निवड झाली, त्या पक्षालाही शिंदे यांचे प्रतिपादन पटले नाही. त्या प्रतिपादनाचे गंभीर आणि दुष्प्रभावी परिणाम त्याच्या ध्यानात आले आणि कॉंग्रेसच्या अधिकृत प्रवक्त्यांनी, पक्षाला शिंदे यांच्या वक्तव्यापासून दूर केले. या प्रकरणानंतर खरे म्हणजे शिंदे यांनी संपूर्ण हिंदू जनतेची माफी मागून आपल्या पदाचा राजीनामाच द्यायला हवा होता. तसे झाले असते तर लोक समजले असते की, होतेच आहे माणसाच्या हातून चूक, कारण मनुष्य स्खलनशील आहे, हे सर्व जाणतात; घसरतेही एखाद्या बेसावध वेळी अशी जीभ आणि लोकांनी त्यांना क्षमाही नक्कीच केली असती. पण सुशीलकुमारांनी, त्यांच्या नावाला साजेसे असे काही केले नाही. सध्या ते मौन व्रतात गेलेले दिसतात.

संघ आणि आतंकवाद
श्री शिंदे यांचा तिसरा शोध हा की, संघाच्या शिबिरांत आतंकवादाचे प्रशिक्षण दिले जाते. शिंदे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. सोलापूरचे. सोलापूरला संघ आहेच. तेथेही केव्हा ना केव्हा संघाचे शिबिर झाले असेलच की नाही? किती आतंकवादी निघाले सोलापुरातून? प्रस्तुत लेखकाने संघशिक्षा वर्गातून तिन्ही वर्षांचे प्रशिक्षण घेतले  आहे. या वर्गांत अनेक वर्षे शिक्षकाचेही काम केले आहे. तेव्हा मीही आतंकवादच शिकलो असेन आणि तोच मी अन्यांना शिकविला असेल, नाही का? आमचे मित्र सुशीलकुमारांना हे मान्य आहे?

गृहखात्याला प्रश्‍न
प्रसारवाहिन्यांनी मला या बाबतही प्रश्‍न विचारले होते. मी म्हणालो, ‘‘आरोप गंभीर आहे. आपल्या देशाच्या कायद्याचा भंग करणार्‍या त्या सर्वांवर खटले भरले पाहिजेत आणि कायद्याला आपले काम करू दिले पाहिजे.’’ ते किंवा त्यांच्या खात्याचे सचिव म्हणाले की, त्यांच्याजवळ पुरावे आहेत. मग खटले भरायला विलंब का? कुणाच्या परवानगीची ते वाट बघत आहेत? त्यांच्या  हाताखाली काम करणार्‍या राष्ट्रीय अन्वेषण विभागानेदहा आतंकवादी स्वयंसेवकांची नावे प्रकाशित केली आहेत. आपण क्षणभर समजू या की, हे अन्वेषण खाते खरे सांगत आहे. या दहांमध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचे नाव आहे. गृहमंत्रालयातील सचिव अडाणी असू शकतात. पण शिंदे तर तसे नाहीत. त्यांना एवढेही माहीत नसावे काय की, संघात कुणा महिलेला प्रवेश नसतो? मग ती महिला संघाच्या प्रशिक्षण शिबिरात कशी येईल? एक नाव स्वामी असीमानंदांचे आहे. गुजरातच्या डांग जिल्ह्यात ते प्रसिद्ध आहेत. ते केव्हा संघात होते, केव्हा त्यांनी प्रशिक्षण घेतले, हे गृहखाते सांगू शकेल? दोन की तीन माजी संघ प्रचारकांची नावेही त्यांनी दिली आहेत. त्यातले एक नाव आहे सुनील जोशींचे. सरकारी अहवाल सांगतो की, ते १९९० ते २००३  संघाचे प्रचारक होते. त्यांना २००७ च्या डिसेंबरात ठार करण्यात आले. कोणी ठार केले? का ठार केले? बाहेरच्यांनी ठार केले की आरोपित आतंकवाद्यांपैकी कुणी तरी ठार केले? या पाच वर्षांमध्ये सरकारला म्हणजे त्यांच्या गुप्त अन्वेषण खात्याला एवढीही माहिती काढता येऊ नये, हे चमत्कारिक नाही काय? संदीप डांगे हे आणखी एका माजी प्रचारकाचे नाव या यादीत समाविष्ट आहे. ते म्हणे फरार आहेत. एवढ्या कालावधीत सरकारी गुप्तचर खात्याला, ते सापडू नयेत, यावरून या खात्याच्या कार्यकुशलतेचे अनुमान काढले, तर ते शिंदेसाहेबांना चालेल? कॉंग्रेसमध्ये भ्रष्टाचारी नेत्यांची, ज्यांच्यावर आरोप व खटले चालू आहेत, त्यांची संख्या कमी नसणार. जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा, कोळसा खाण घोटाळा, आदर्श वसाहत घोटाळा ही कॉंग्रेसनेत्यांच्या भ्रष्टाचाराची ताजी उदाहरणे सर्वपरिचित आहेत. त्यावरून सर्व कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचारी आहे, असा निष्कर्ष कुणी काढला तर तो सुशीलकुमारांना मान्य राहील? आणि त्यानंतरही ते पक्षात राहतील? उत्तर सुशीलकुमारांनी द्यायचे आहे.
परंतु मला येथे हे अधोरेखित करायचे आहे की, ही सरकारी अन्वेषण शाखा चक्क खोटे बोलत आहे, हे सिद्ध झाले आहे. हिंदू आतंकवादी म्हणून ज्यांना पकडण्यात आले आहे, त्यांच्यावर समझोता एक्सप्रेसवर बॉम्ब टाकल्याचा आरोप आहे. परंतु आपल्या देशातील एक अग्रगण्य बुद्धिवंत एस. गुरुमूर्ती यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि त्यांचा निष्कर्ष आहे की, हा बॉम्ब हल्ला लष्कर-ए-तोयबा या इस्लामी अतिरेकी संघटनेनेच केला होता. अरीफ कासमनी या लष्करच्या संघटकाची त्यात मुख्य भूमिका होती. या संबंधीचा संपूर्ण अहवाल त्यांनी २०-११-२०१२ ला राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जींना सादर केला, तेव्हा तेही चकित झाले होते. गुरुमूर्ती यांनी हेही निदर्शनास आणून दिले की, २० जानेवारी २००९ ला महाराष्ट्राच्या आतंकवाद विरोधी पथकाने, कर्नल पुरोहिताने समझौता एक्सप्रेसवरील हल्ल्यासाठी आरडीएक्स उपलब्ध करून दिले होते, ही कथा खोटी आहे, असे स्पष्टच नमूद केले आहे. असे असतानाही २४ जानेवारी २०१३ ला हिंदुत्व टेररया शीर्षकाखाली काही हिंदुद्वेष्ट्या महाभागांनी एक पत्र प्रसिद्ध करून तथाकथित हिंदू आतंकवाद्यांना कर्नल पुरोहिताने आरडीएक्स पुरविले होते, असा उल्लेख केलाच आहे. खोटेपणालाही काही सीमा असली पाहिजे की नाही? या संबंधीचा गुरुमूर्ती यांचा संपूर्ण लेख न्यू इंडियन एक्सप्रेसया चेन्नईवरून निघणार्‍या दैनिकाच्या २४ जानेवारीच्या अंकात प्रकाशित झाला आहे. जिज्ञासूंनी तो अवश्य वाचावा.

पाकी आतंकवाद्यांना आनंद
शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे, त्यांची प्रतिष्ठा किती वाढली, किंवा त्यांच्या पक्षाला मुसलमानांची मते आपल्याकडे वळविण्यात किती लाभ होईल, हे तेच जाणोत. पण पाकिस्तानातील आतंकवाद्यांना मात्र याचा लाभ झाला आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटाचा सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या, भारत सरकार ज्याच्या अटकेची व भारताच्या स्वाधीन करण्याची सतत मागणी करीत आहे, त्या हफीज सईद याला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. शिंदेसाहेब, हे तुम्हाला अभिप्रेत आहे? मला खात्री आहे की, तुम्ही याची कल्पनाही केली नसेल. पण ते घडले आहे. भारतच आपल्या भूमीवर आतंकवाद प्रशिक्षित करीत आहे, असा निष्कर्ष त्याने आपल्या वक्तव्यावरून काढला आहे. अनवधानाने का होईना आपल्या घसरलेल्या जिभेकडून हा महान् प्रमाद घडला आहे तरी आपणांस गृहमंत्री म्हणून मिरविण्यात स्वारस्य वाटते! काय म्हणावे आपणांस हे खरेच कळत नाही.


-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २५-०१-२०१३
babujivaidya@gmail.com

1 comment:

  1. १) Caesar's wife must be above suspicion.
    २) गडकरींना आपल्याच पक्षातील विरोधकांच्या खेळी उद्ध्वस्त करता आल्या नाहीत म्हणून त्यांच्याप्रति सहानुभूती व्यक्त करावी की असा माणूस पक्षाध्यक्ष झाला नाही म्हणून आनंद मानायचा. राजकारण म्हणजे धकाधकीचा मामला. ज्या व्यक्तीला अंतर्गत राजकारण कळले नाही तो इतर पक्षांचे राजकारण काय ओळखणार आणि त्याला काय उत्तर देणार? याबाबत नरेंद्र मोदींकडे बघावे. त्यांना काय कमी त्रास झाला? पण ते सगळ्यांना पुरून उरले.

    ReplyDelete