Saturday 23 February 2013

संघ आणि सेवा


रविवारचे भाष्य दि. २४ फेब्रुवारी २०१३ करिता 

संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तो समजून घेणे जरा कठीण असते. कारण, विद्यमान संस्थांच्या नमुन्यात तो बसत नाही. त्याच्या नावातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. सप्रयोजन आहे. तथापि पहिला राष्ट्रीयशब्द त्या सर्वांत अधिक महत्त्वाचा आहे, असे मला वाटते. निरपेक्षपणे काम करणारे अनेक कार्यकर्ते असतात. त्यांना आपण स्वयंसेवकम्हणू शकतो. अशा कार्यकर्त्यांची एखादी संस्था किंवा समूह असू शकतो. त्याला आपण संघ म्हणू शकतो. पण त्यातला प्रत्येक संघ’ ‘राष्ट्रीयम्हणजे राष्ट्रव्यापी असेलच असे नाही. शिवाय, ‘राष्ट्रया शब्दाच्या अर्थायामाविषयीही संभ्रम आहे. जगात अन्यत्र तो नसेलही, पण आपल्या देशात आहे. आपण सहज, पण स्वाभिमानाने, म्हणून जातो की, १५ ऑगस्ट १९४७ ला आपले नवे राष्ट्र जन्माला आले. म्हणजे १४ ऑगस्टला आपण काय होतो? ‘राष्ट्रनव्हतो? काही लोक राज्यालाच राष्ट्र मानतात; तर अन्य काही, देश म्हणजे राष्ट्र समजतात. राज्यआणि देश यांचा राष्ट्राशीघनिष्ठ संबंध आहे. पण राष्ट्रत्यांच्याहून वेगळे, त्यांच्याहून व्यापक, त्यांच्याहून श्रेष्ठ असते. देशाशिवाय राष्ट्रराहू शकते? राहिलेले आहे. इस्रायलहे त्याचे उदाहरण आहे. १८०० वर्षे त्यांना देश नव्हता. पण आपला देश आणि आपण एक राष्ट्र आहोत म्हणजे ज्यू कुठेही राहात असला तरी तो आपला बंधू आहे, हे ते विसरले नाहीत. म्हणजेच आपले राष्ट्र ते विसरले नाहीत. मग राष्ट्र म्हणजे काय असते? राष्ट्र म्हणजे लोक असतात. राष्ट्र म्हणजे समाज असतो. कोणत्या लोकांचे राष्ट्र बनते किंवा लोकांचे राष्ट्र बनण्याच्या काय अटी आहेत याचे विवेचन हा एक स्वतंत्र विषय आहे. आज तो प्रस्तुत नाही. मला, या ठिकाणी, हे अधोरेखित करायचे आहे की, संघासमोर सतत, अव्याहत, राष्ट्राचाच विचार असतो. म्हणजे आपल्या लोकांचा, आपल्या समाजाचा, विचार असतो.

सेवाकार्याचा प्रारंभ
या आपल्या राष्ट्रात, जो समाज राहतो, त्या संपूर्ण समाजाचा जीवनस्तर समान नाही. काही लोक खूप गरीब आहेत. अशिक्षित आहेत. नव्या आधुनिक जीवनाशी त्यांची ओळखही नाही. त्यांच्या ठिकाणी आरोग्य नाही. त्यासाठी व्यवस्था नाही. हे सारे आपल्याच समाजाचे लोक आहेत. म्हणजे ते आपल्या राष्ट्राचे घटक आहेत. त्यांना वाटले पाहिजे की नाही की, आपणही या राष्ट्राचे घटक आहोत? या मौलिक गोष्टीचे आपल्या या समाजबांधवांना ना ज्ञान होते, ना भान. संघाने हे करून द्यावयाचे ठरविले; आणि संघसंस्थापक डॉ. के. ब. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे १९८९ पासून संघाने या कामाला हात घातला. संघात सेवाभागसुरू झाला. त्यापूर्वी संघाचे स्वयंसेवक व्यक्तिश: सेवाकार्यात गुंतले नव्हते असे नाही. छत्तीसगडातील जशपूरचा वनवासी कल्याण आश्रम १९५२ मध्येच सुरू झाला होता. तो एका स्वयंसेवकानेच सुरू केला होता. बिलासपूर जिल्ह्यातील चांपा या गावचे भारतीय कुष्ठ धाम, एका स्वयंसेवकानेच सुरू केले होते. संघ स्वयंसेवकांव्यतिरिक्त अन्य थोर पुरुषांनीही सेवाकार्यांद्वारा लौकिक प्राप्त केलेला आहे. कुष्ठरोग निवारणाच्या संदर्भात अमरावतीचे शिवाजीराव पटवर्धन, वरोड्याचे बाबासाहेब आमटे, वर्ध्याच्या सर्वोदय आश्रमातील कार्यकर्ते यांची नावे सर्वत्र गाजलेली आहेत. माझे मित्र शंकर पापळकर यांचा सेवाप्रकल्प, मूक-बधिर आणि मतिमंद बालकांच्या संबंधात आहे. पापळकरांचा अमरावती जिल्ह्यातील वझ्झरचा प्रकल्प मी निदान दोनदा तरी पाहिल्याचे मला आठवते. विलक्षण कठीण काम आहे त्यांचे. नालीत, कचराकुंडीत, फलाटावर टाकून दिलेल्या अनाथ, अपंग अर्भकांचा तो पिताबनला आहे. त्या आश्रमातला एक हृदय हेलावणारा प्रसंग मला आजही आठवतो. मी जेवायला बसलो असताना त्याने एक मुलगा माझ्यासमोर आणून बसविला, आणि मला म्हणाला, याच्या तोंडात एक घास घाला. त्या मुलाचे दोन्ही हात गायब होते. मी त्याच्या तोंडात एक घास घातला. मी इतका गहिवरून गेलो की, मला अश्रू आवरणे कठीण गेले. मला तो घास, हजार लोकांना अन्नदान करण्याच्या मोलाचा वाटला.

सेवाभारतीचा विस्तार
मला हे सांगायचे आहे की, हे सारे वैयक्तिक प्रकल्प प्रशंसनीय असले, तरी त्यांच्या विस्ताराला आणि आवाक्यालाही स्वाभाविकच मर्यादा पडल्या आहेत. संघाने १९८९ साली, सेवाकार्याला अखिल भारतीय आयाम दिला. आपल्या रचनेतच सेवाविभागनावाचा एक नवा विभाग निर्माण केला. त्याच्या संचालनासाठी सेवाप्रमुखया पदाची निर्मिती करून, एका श्रेष्ठ प्रचारकावर त्याचे दायित्व सोपविले. स्वयंसेवकांकडून जी व्यक्तिस्तरावर कार्मे सुरू होती, ती सारी या विशाल छत्राखाली आली. जशपूरचा वनवासी कल्याण आश्रम, ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमबनला. आणि केवळ वनवासी क्षेत्रातीलच नव्हे, तर अन्य सर्व क्षेत्रांमधील सेवाकार्यांसाठी एक व्यवस्था निर्माण करण्यात आली. ती व्यवस्था सेवाभारतीया नावाने ओळखली जाते. या सेवाभारतीच्या कार्यकलापाचा गेल्या दोन दशकांमध्ये एवढा प्रचंड विस्तार झाला आहे की, दीड लाखांहून धिक सेवाप्रकल्प चालू आहेत.

एक अनुभव
आपल्या समाजात जे दुर्बल, उपेक्षित आणि पीडित घटक आहेत, त्यांच्यावर सेवाभारतीने आपले लक्ष केंद्रित केले. त्यातला, जंगलात, पहाडात, दर्‍याखोर्‍यात राहणारा एक भाग. तेथील मुलामुलींच्या शिक्षणासाठी एकशिक्षकी शाळा सुरू केल्या. एकल विद्यालयअसे या शाळेचे नाव. गावातलाच एक तरुण या कामासाठी निवडला जातो. त्याला थोडे प्रशिक्षण दिले जाते आणि तो तेथील मुलामुलींना शिकवितो. संपूर्ण हिंदुस्थानात अशी एकल विद्यालये किती असतील, याची मला कल्पना नाही. पण एकट्या झारखंडात आठ हजार एकल विद्यालये आहेत. सुमारे १०-१२ वर्षांपूर्वीची गोष्ट. जशपूरला जात असताना वाटेत, झारखंडमधील एक एकल विद्यालय बघण्याचा योग आला. आमच्यासाठी एक कार्यक्रम योजिला होता. १० ते १४ या वयोगटातील ५५ बालके व त्यांचे पालक उपस्थित होते. त्यात २३ मुली होत्या. त्यांनी पाढे म्हणून दाखविले, पुस्तक वाचून दाखविले, गाणी म्हणून दाखविली. गावात शाळा होती. म्हणजे इमारत होती. शिक्षकही नियुक्त होता. पण विद्यार्थीच नव्हते. मी एका गावकर्‍याला विचारले, आपली मुले त्या शाळेत का जात नाहीत? तो म्हणाला, ती शाळा दुपारी १० ते ४ असते. त्यावेळी आमची मुले गुरेढोरे चारायला घेऊन जात असतात. सरकारी यंत्रणेला हे सुचूच शकत नाही की, विद्यार्थ्यांच्या सोयीच्या वेळेत शाळा भरवावी. एकल विद्यालयाला सुचू शकते कारण त्याला समाज जोडायचा असतो. झारखंडातील हे एकल विद्यालय सायंकाळी ६॥ ते ९ भरते. गावात वीज नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात ती शाळा चालते; आणि शिक्षक आहे नववी इयत्ता नापास!

सेवासंगम
वनवासी भागातील एकल विद्यालय हा सेवाप्रकल्पाचा एक प्रकार. असे अनेक प्रकल्प-प्रकार आहेत. जसे इतरत्र आहेत, तसेच ते विदर्भातही आहेत. दि. २२ फेब्रुवारी २०१३ ला या सेवाप्रकल्पप्रकारांचा एक संगम नागपुरात संपन्न झाला. रेशीमबागेत. या संगमाचे नावच मुळी आहे सेवासंगम’. या सेवासंगमचे उद्घाटन, नागपूर सुधार प्रन्यासचे प्रमुख, श्री प्रवीण दराडे, आयएएस, त्यांच्या पत्नी, आदिवासी विकास आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि वर ज्यांचा नामोल्लेख केला आहे ते शंकर पापळकर यांनी केले. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती द्वारा आयोजित होता.
विदर्भात, मला अशी माहिती मिळाली की, सुमारे साडेपाचशे सेवाप्रकल्प चालू आहेत. अर्थात् एका संस्थेचे एकाहून अधिक प्रकल्पही असणारच. यापैकी सुमारे ८० संस्थांच्या प्रकल्पांची माहिती देणारे प्रदर्शनही तेथे होते.

सेवाकार्याचे आयाम
सध्या सेवेचे एकूण सहा आयाम निश्‍चित केलेले आहेत. १) आरोग्य २) शिक्षण ३) संस्कार, ४) स्वावलंबन, ५) ग्रामविकास आणि ६) विपत्तिनिवारण.
आरोग्यविभागात, रक्तपेढी, नेत्रपेढी, फिरते दवाखाने, नि:शुल्क स्वास्थ्य परीक्षण, परिचारिका प्रशिक्षण तसेच आरोग्य-रक्षक-प्रशिक्षण, ऍम्बुलन्स आणि रुग्णसेवेसाठी उपयुक्त वस्तूंची उपलब्धता ही कार्ये केली जातात. नागपूर जवळील खापरी येथे विवेकानंद मेडिकल मिशनतर्फे चालविण्यात येणारा दवाखाना, हे या आरोग्य प्रकल्पाचे एक ठळक व मोठे उदाहरण आहे. आता अमरावतीतही डॉ. हेडगेवार आयुर्विज्ञान व अनुसंधान संस्थानसुरू होत आहे. रक्तपेढी, नागपूरप्रमाणेच अमरावती, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणीही आहे. सर्वांचे नाव डॉ. हेडगेवार रक्तपेढीअसे आहे.
२) शिक्षण - एकल विद्यालयाचा वर उल्लेख केला आहेच. पण याशिवाय, ज्यांच्याकडे सामान्यत: कुणी ढुंकूनही पाहणार नाहीत, अशा मुलांच्या शिक्षणाची व निवासाची व्यवस्था करणारेही प्रकल्प आहेत. नागपुरात विहिंपतर्फे, फलाटावर फिरणार्‍या व झोपणार्‍यांसाठी शाळा व वसतिगृह आहे. तिचे नाव आहे प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळा’. सध्या या शाळेत ३५ मुले आहेत. श्री राम इंगोले वेश्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाहत असतात, तर वडनेरकर पतिपत्नी, यवतमाळात, पारध्यांच्या मुलांना व मुलींना शिक्षित करीत आहेत. पारध्यांची ही मुले इतर सामान्य मुलांप्रमाणे शाळेत जातात. मात्र राहतात वसतिगृहात. मुलांसाठी वसतिगृह वेगळे आहे, मुलींसाठी वेगळे. चालविणार्‍या संस्थेचे नाव आहे दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ’. अमरावतीची प्रज्ञाप्रबोधिनीही संस्थाही पारधी विकास सेवेचे कार्य करते. पारधीम्हणजे एक गुन्हेगारांची टोळी, असा समज इंग्रजांनी करून दिला होता. तो स्वातंत्र्याच्या काळातही रूढ होता. संघाच्या कार्यकर्त्यांनी तो दूर केला आहे. सोलापूरजवळील यमगरवाडीचा प्रकल्प संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. लहान प्रमाणावर का होईना यवतमाळचा प्रकल्पही अनुकरणीय आहे, हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगू इच्छितो. अमरावतीचे पारधी विकास सेवा कार्यहे, यमगरवाडीचे प्रणेते गिरीश प्रभुणे यांच्या प्रेरणेने सुरू झालेले आहे. याचप्रमाणे अन्य लोकांसाठी वाचनालयेही आहेत. झोला वाचनालयही नवीन संकल्पना कार्यान्वित आहे. थैलीत पुस्तके घेऊन ती वाचकांना घरी नेऊन दिली जातात. यवतमाळचे दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ मुलांना तंत्र शिक्षणाचेही पाठ देते. मुले खडू तयार करतात, अंबरचरख्यावर सूत काततात व ते खादी ग्रामोद्योग संस्थेला पुरवितात.
३) संस्कार - शाळेतले शिक्षण केवळ पुस्तकी असते. परीक्षा उत्तीर्ण करणे एवढेच मर्यादित लक्ष्य त्याचे असते. पण शिक्षणाने व्यक्ती सुसंस्कृत झाली पाहिजे. या शालेय शिक्षणाला जोड म्हणून गावोगावी संघशाखांच्या द्वारे उन्हाळ्याच्या सुटीत मर्यादित कालावधीसाठी, संस्कारवर्ग चालविले जातात. या वर्गांमध्ये झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचा मुख्यत: सहभाग असतो. त्यांना कथा सांगितल्या जातात. सुभाषिते शिकविली जातात. संस्कृत श्‍लोकांचे पाठांतर त्यांच्याकडून करवून घेतले जाते. गेल्या २०१२ च्या उन्हाळ्यात अशा संस्कारवर्गांची नागपुरातील संख्या १२८ होती. या पाठ केलेल्या श्‍लोकांच्या, तसेच कथाकथनाच्या स्पर्धाही होतात.
४) स्वावलंबन - महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्याच्या दृष्टीने त्यांचे बचतगट बनविले जातात. अनेक ठिकाणी शिलाई केंद्रे उघडून शिवणकाम शिकविले जाते. तसेच कायद्याचा सल्लाही दिला जातो. नागपुरात एक मातृशक्ती कल्याण केंद्रआहे. त्याच्या द्वारे सेवावस्तीमध्ये- चालू भाषेत सांगायचे म्हणजे झोपडपट्टीमध्ये, एखाद्या मंदिराची पडवी किंवा एखाद्या घराची छपरी भाड्याने घेऊन बालवाडी चालविली जाते. सध्या या केंद्रातर्फे २५ बालवाड्या चालविल्या जात आहेत. या बालवाडीतील शिक्षिका त्याच वस्तीतील ८ वी-९ वी पर्यंत शिक्षण घेतलेली युवती असते. उन्हाळ्याच्या सुटीत त्यांच्यासाठी पंधरा दिवसांचा प्रशिक्षणवर्ग घेतला जातो. या केंद्राचा एक, ‘नारी सुरक्षा प्रकोष्ठही आहे. निराधार, परित्यक्ता किंवा संकटग्रस्त महिलांना आधार देणे, त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करणे, तसेच त्यांना कायदेविषयक मदत देणे, ही कामे केली जातात. तसेच दोन गर्भसंस्कार केंद्रेही ही संस्था चालविते.
५) ग्रामविकास - विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा गंभीर प्रश्‍न आहे. नुकतेच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेत सांगितले की, एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांत विदर्भात २२८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. शेतकर्‍यांच्या हितासाठी सेवाभारतीकडूनही कार्ये केली जातात. शेतकर्‍यांना जैविक शेतीचे महत्त्व पटवून दिले जाते. जलसंधारण कसे करायचे हे शिकविले जाते. गोवंशरक्षणावर व गोपालनावर भर दिला जातो. उन्नती करणार्‍या गावांच्या तीन श्रेणीही कल्पिलेल्या आहेत.. गाईपासून मिळणार्‍या पंचगव्याच्या अनेक औषधी बनविणारे प्रकल्प, नागपूर जिल्ह्यात देवलापार व अकोला जिल्ह्यात म्हैसपूर येथे आहेत. तेथे बनविल्या जाणार्‍या औषधींना मान्यता प्राप्त आहे व त्यांची विक्रीही वाढत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ-पांढरकवडा या दोन तालुक्यांमध्ये, दीनदयाल बहुउद्देशीय मंडळाने ६० गावे निवडलेली असून प्रत्येक गावातील निवडक १५ ते २० शेतकर्‍यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच कापूस व ज्वारी यांचे जैविक बियाणेही त्यांना दिले आहे.
६) विपत्तिनिवारण - राष्ट्रीय स्वयंसेवक संघा द्वारे प्रवर्तित जनकल्याण समितीने म्हणजे तिच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे संघ स्वयंसेवकांनी, पूर, आग, भूकंप अशा दैवी आपत्तीच्या काळात, स्वत:चे प्राण धोक्यात घालून देखील, आपत्पीडितांना मदत केली आहे. संघ स्वयंसेवकांचा हा एक स्वभावच बनून गेला आहे की, संकटप्रसंगी आपल्या बांधवांच्या रक्षणासाठी धावून जावे. कुठलाही प्रांत घ्या, सर्वत्र एकच अनुभव सर्वांना येत असतो.

अन्य कार्ये
नकोशी झाल्यामुळे टाकून दिलेल्या अर्भकांना सांभाळण्याचे जसे काम शंकर पापळकरांचा प्रकल्प करीत आहे, तसेच काम यवतमाळचे ज्येष्ठ संघ कार्यकर्ते कै. बाबाजी दाते यांनी सुरू केले होते. त्यांच्या या संस्थेचे नाव आहे मायापाखर’. सध्या मायापाखरमध्ये ४ मुले व १४ मुली आहेत. अनेक ठिकाणी स्वयंसेवक वृद्धाश्रमही चालवीत आहेत.
हा जो सेवाभारतीचा उपक्रम आहे, त्याचे उद्दिष्ट कोणते? उद्दिष्ट एकच आहे की सर्वांना, आपला समाज एक आहे, असे वाटावे. त्यांच्यात समरसता उत्पन्न व्हावी. सर्वांना आपण एका राष्ट्राचे घटक आहोत, म्हणून आपण सर्व एकात्म आहोत असे जाणवावे. हे असे खर्‍या अर्थाने राष्ट्रीय कार्य आहे. संघाच्या शिबिरांतून प्रशिक्षण घेऊन स्वयंसेवक या मनोवृत्तीने आपल्या जीवनाचा विचार करतात व तशी ती घडवितात. आपल्या गृहमंत्र्यांना, माननीय शिंदेसाहेबांना, या निमित्ताने हे सांगायचे आहे की, संघशिबिरात या एकात्म, एकरस, एकसंध राष्ट्रत्वाची शिकवण दिली जाते. आतंकवाद शिकविला जात नाही. कृपा करून पुन: त्यांनी आपली जीभ घसरू देऊ नये आणि कोणत्या तरी संकुचित राजकीय स्वार्थासाठी बेलगाम वचनांनी ती विटाळूही नये.


-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २३-०२-२०१३
babujivaidya@gmail.com

No comments:

Post a Comment