Saturday, 2 March 2013

जिहाद आणि आतंकवाद


रविवारचे भाष्य दि. ३ मार्च २०१३ करिता

जिहादी आतंकवाद्यांनी, हैदराबादला स्फोट केलेच. दि. २१ फेब्रुवारीला दिलसुखनगर या गजबजलेल्या वस्तीत हे स्फोट करण्यात आले. त्यात अनेक निरपराध व्यक्ती ठार करण्यात आल्या. असे क्रौर्य जिहादी भावनेने पेटलेल्यांकडूनच संभवते.

राज्याचेप्रयोजन
असे सांगितले जात आहे की, २००१ च्या डिसेंबर महिन्यात आपल्या सार्वभौम संसदेवर हल्ला करून तेथील सुरक्षा कर्मचार्‍यांना ठार करण्याचे जे कारस्थान घडले, त्या कारस्थानाचा सूत्रधार अफजल गुरू याला फाशी देण्यात आल्यामुळे, त्या फाशीचा सूड घेण्यासाठी हैदराबादचे स्फोट करण्यात आले. हे कारण खरे असू शकते. पण जो स्वत: आतंकवादी आहे, ज्याला इतरांच्या प्राणांची पर्वा नाही, त्याला फाशी देण्यात शासनाचे काही चुकले, असे कुणीच म्हणू शकणार नाही. कोणत्याही पद्धतीची शासनव्यवस्था असो, ती लोकशाहीवादी असो, हुकूमशाही असो की लष्करशाही असो, तिला दंडव्यवस्था मान्य करावीच लागते. दंडव्यवस्था नसेल तर शासनव्यवस्थाच राहणार नाही. राज्यनावाची राजकीय व्यवस्था दंडशक्तीच्या आधारावरच उभी राहू शकते. नव्हे, ‘राज्याचेतसेच अधिष्ठान असते व प्रयोजनही असते. जे दंडनीय आहेत, त्यांना राज्यव्यवस्थेकडून दंड दिला गेलाच पाहिजे.

न्यायव्यवस्थेचा लाभ
आपल्या देशात, अन्य सुसंस्कृत देशाप्रमाणे कायद्याच्या आधारे चालणारी दंडव्यवस्था आहे. हे हुकूमशाही किंवा लष्करशाही राज्य नाही की, राज्यकर्त्यांच्या मनात आले आणि कुणालाही ठार करण्यात आले. इथे न्यायव्यवस्था आहे. त्या व्यवस्थेचा संपूर्ण लाभ अफजल गुरूला मिळाला आहे. त्याला खालच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. लगेच ती अंमलात आणली गेली नाही. त्या शिक्षेविरुद्ध वरच्या न्यायालयात जाण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे अफजल उच्च न्यायालयात गेला. तेथेही तीच शिक्षा कायम करण्यात आली. त्यावरही एक सर्वोच्च न्यायालय आहे; तेथेही तो धाव घेऊ शकला. पण तेथेही त्याच शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आपल्या न्यायव्यवस्थेत, या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करण्याची सोय आहे. या सोयीचाही अफजलने लाभ घेतला. त्यानंतरही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची सुविधा आहे. तीही अफजल गुरूने प्राप्त केली; आणि शेवटी राष्ट्रपतींनी त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याला फासावर चढविण्यात आले. महमद घोरीने पृथ्वीराज चव्हाणाला, औरंगजेबाने संभाजी राजांना, मुजीबुर रहमानला लष्कराने किंवा झिया-उल-हकने झुल्फिकारअली भुत्तोला, जसे तडकाफडकी ठार केले, तसे अफजलला मारण्यात आले नाही. त्यामुळे त्याच्या फाशीचा  सूड घेण्याचे प्रयोजनच नव्हते.

हे देशद्रोहीच
पण जिहादी वृत्तीच्या लोकांना हे मान्य नव्हते . ही चांगली गोष्ट आहे की, भारतातील प्रचंड संख्येतील मुसलमानांना हा जिहादी आतंकवाद मान्य नाही. त्यांनी अफजलच्या फाशीचा निषेध केला नाही. पण आपल्याच एका राज्यात म्हणजे जम्मू-काश्मीर राज्यात, खरे म्हणजे त्या राज्याच्या एका भागात, जिहादी आतंकवादाचे पुरस्कर्ते व पोशिंदे आहेत. अफजलच्या नावावर त्यांनी तेथील जनतेला वेठीस धरले. बंद पाळला. उग्र निदर्शने केली. ही सर्व मंडळी, खरे म्हणजे भारतीयच नाहीत. भारताशी, जन्मापासून शत्रुत्वाने वागणार्‍या, खरे म्हणजे भारताच्या शत्रुत्वातच ज्याच्या जन्माचे निमित्त आणि ज्याचे अस्तित्व आहे, त्या पाकिस्तानकडून ही मंडळी प्रेरित आहे आणि पाकिस्तानच्या इशार्‍यावर नाचणारी आहे. मग ते गिलानी असोत, उमर फारूक असोत, यासिन मलिक असोत किंवा आणखी अन्य कोणी असोत. ही मंडळी पाकिस्तान सरकारच्या, वस्तुत: पाकिस्तानात ज्याची खर्‍या अर्थाने सत्ता चालते, त्या पाकिस्तानी लष्कराची गुलाम आहे. लोकांनी, स्वयंशासनासाठी, निवडून दिलेल्या मंडळीचे अस्तित्व यांना सहन होत नाही. काश्मीरच्या खोर्‍यात, लोकनिर्वाचित पंच-सरपंचांचे खून पडत आहेत. हे पंच-सरपंचही मुसलमानच आहेत. गिलानी-फारूक-मलिक यांनी कधी या खुनाचा धिक्कार केल्याचे आपण वाचले आहे काय? ही सर्व मंडळी देशद्रोही आहेत, न्यायव्यवस्थेचे द्रोही आहेत, लोकतंत्राचे द्रोही आहेत, शांततेचे व कायद्याने जीवन जगू चाहणार्‍या आपल्याच मुसलमान बांधवांचेही द्रोही आहेत.

मतलबी राजकारण
अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून मोहोर लागल्यानंतर, आपल्या सरकारने ती शिक्षा लगेच अंमलात आणायला हवी होती. राष्ट्रपतींकडे त्याचा दयेचा अर्ज पाच-सहा वर्षे पडून राहण्याचे कारण काय? ती शिक्षा लगेच अंमलात आली असती, तर ९ फेब्रुवारीनंतर म्हणजे अफजलला फाशी दिल्यानंतर, काश्मीरच्या खोर्‍यात जी उग्र प्रतिक्रिया प्रकट झाली, ती प्रकट झाली नसती. परंतु, सरकार चालविणार्‍या पक्षाचे, स्पष्टच बोलायचे म्हणजे कॉंग्रेस पक्षाचे, राजकारण आडवे आले. त्याला न्यायप्रक्रियेपेक्षाही आपली मतपेढी कशी मजबूत राहील, याची जास्त चिंता वाटली. आणि त्याने एवढा विलंब केला व निष्कारण स्वत:वर हेत्वारोप ओढवून घेतले. पाच-सहा वर्षे वाट पाहण्याचे कारण, कॉंग्रेस पक्ष कधीच सांगू शकणार नाही. सर्व भारतीय जनतेचे हे मत आहे की, कॉंग्रेसने आपल्या स्वार्थी, संकुचित राजकारणापायी, अफजलच्या फाशीला विलंब केला. आणि विलंबाने ती फाशी जेव्हा दिली गेली, तेव्हा स्वाभाविकच जनतेने कॉंग्रेस पक्षावर आरोप केला की, राजकारणाच्या फायद्यासाठीच सरकारने आता फाशीची शिक्षा अंमलात आणली. या आरोपाबद्दल जनतेला दोष देण्यात मतलब नाही. कॉंग्रेस सरकारने स्वत:च्या कृतीनेच तो आरोप स्वत:वर ओढवून घेतला आहे.

बनवाबनवी
आपल्या देशात ढोंगी सेक्युलरवादी जी मंडळी आहे, तिचे गळे काढणे अजूनही चालूच आहे. सरकारने म्हणे, अफजलच्या बायकोला त्याच्या फाशीची वार्ता वेळेच्या आत दिली नाही. तशी वार्ता द्यावयाला आमचीही हरकत नाही. पण ती वार्ता वेळेच्या आत दिली नसेल तर, तो मोठा मानवाधिकाराचा भंग केल्याचा अपराध झाला असे आम्हाला वाटत नाही. संसद भवनावर हल्ला करून, तेथील सुरक्षा कर्मचार्‍यांना ठार करणार्‍या अफजलच्या साथीदारांनी त्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना, कळविले होते काय? त्यांना का ठार करण्यात आले? त्यांचा कोणता अपराध होता? मानवाधिकार मानवांसाठी असतात. अफजलसारख्या दानवांच्या बाबतीत त्या अधिकारांची चर्चा करणे अप्रस्तुत आहे. अफजल गुरूचे एक मनोगत, त्याच्या मृत्यूनंतर काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यात तो म्हणतो की, भारतीय सैनिकांनी काश्मीरच्या जनतेवर जो अन्याय केला, ‘निरपराध्यांना’ जे ठार मारले, त्याचा सूड घेण्यासाठी आम्ही संसद भवनावर हल्ला केला. आपण क्षणभर हे खरे मानू. मग अफजलने, त्याच संसदेने पारित केलेल्या कायद्यांच्या आधारे, आपला खटला का लढविला? कशाला तीन-तीन याचिका केल्या? राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज तरी का केला? पहिल्याच न्यायालयात, आपली ही सूडाची भूमिका का स्पष्ट केली नाही? आम्हाला, तरी वाटते की, अफजलचे हे निवेदनच बनावट असावे. काश्मीरच्या खोर्‍यातील कुणा पाकिस्तानवाद्याने ते तयार करून, प्रकाशित केले असावे. २००१ पासून खटला चालू आहे; आणि अफजलचे मनोगत २०१३ मध्ये प्रकट होते, याला बनवाबनवीशिवाय अन्य कोणते अभिधान लावणार?

जिहादचा पराक्रम
हे खरे असू शकते की, अफजल गुरूच्या फाशीचा सूड घेण्यासाठी हैदराबादचे स्फोट करण्यात आले असावेत. सूडाला तारतम्य नसतेच. सूडाचे स्फोट दिल्लीत, मुंबईत, बंगलोरमध्येही होऊ शकले असते. सूड घेणार्‍यांना हैदराबाद जास्त सोयीचे वाटले असणार आणि हे अस्वाभाविक नाही. जेथे अकबरुद्दीन ओवेसीसारखे नेते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ शकतात, ते स्थान या स्फोटांसाठी उपयुक्त वाटणे स्वाभाविकच समजले पाहिजे. मी या आतंकवादाला जिहादीआतंकवाद असे म्हणतो. कारण इस्लाममध्ये जिहादहे एक निष्ठावान मुसलमानाचे कर्तव्य मानलेले आहे. या जिहादचे संपूर्ण नाव जिहाद फि सबिलिल्लाहअसे आहे. या अरबी शब्दावलीचा अर्थ ‘‘अल्लाच्या मार्गासाठी प्रयत्न’’ असा होतो, असे जाणकार सांगतात. अल्लाच्या मार्गासाठीचा प्रयत्न अर्थात्च पवित्र असणार. त्यामुळे जिहादला एक प्रकारचे पावित्र्यही चिकटलेले आहे. अल्लाचा मार्ग’ म्हणजे अर्थात् अल्लाचे राज्य पसरविण्याचा मार्ग. या ध्येयाने प्रेरित होऊन पैगंबर साहेबांचे अरबस्थानातील अनुयायी, आपल्या सेना घेऊन जग पादाक्रांत करावयाला निघाले. त्यांच्या पराक्रमाला खरेच वंदन केले पाहिजे की, केवळ एका शतकाच्या आत, सगळा पश्‍चिम आशिया, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण युरोप- स्पेनपासून तो अल्बानिया-चेचेन्यापर्यंत- त्यांनी काबीज केला. ही सामान्य बाब नाही. आणि या सर्व जिहादी मोहिमा होत्या. म्हणजे जे अल्लाला मानणारे नव्हते, म्हणजे काफीर होते, त्यांच्या विरोधातील मोहिमा होत्या. आणि काफीर कोण? - तर अर्थात् जे इस्लामला मानीत नाहीत ते.

जिहादी क्रौर्य
इतिहासकाळातील असंख्य घटना आपणास सांगतील की, पराभूत होऊन पकडलेल्या शत्रूने इस्लामचा स्वीकार केला, तर त्याला क्षमा असे. त्याने इस्लाम कबूल केला नाही, तर त्याची कत्तल होत असे. या कत्तलीतून सुटलाच तर त्याला जिझियाद्यावा लागे. या प्रकारात मुस्लिम इतिहासकारांना किंवा राज्यकर्त्यांना कसलेही अप्रूप वाटले नाही. निंद्य वाटणे तर शक्यच नव्हते. आजही वाटत नाही. सैनिकांना पराक्रमास्तव चेतविण्यासाठी आजही जिहादचा प्रयोग केला जातो. आता काफीरचा अर्थही बदललेला दिसतो. पाकिस्तानकडे किंवा पश्‍चिम आशियाकडे थोडी नजर टाका. जे मुसलमानच आहेत, जे पवित्र कुराणाला मानतात, पैगंबारसाहेबांना मानतात, पण विशिष्ट पंथ मानीत नाहीत, त्यांनाही काफीरसमजले जाते. पाकिस्तानात, कादियानी मुसलमान काफीरठरविले जातात. अलीकडे बलुचिस्थानात तेथील सुन्नी मुसलमानांनी, आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून एका दिवशी जवळपास दोनशे शियापंथीय मुसलमानांना ठार केले, तेव्हा सुन्नींनी शियांना काफीरठरविले होते काय, हे तेच सांगू शकतील. किंवा पाकिस्तानातील व अफगानिस्थानातील तालिबान जेव्हा आपल्याच धर्मबांधवांवर छुपे हल्ले करून त्यांना ठार करीत असतात, तेव्हा ज्यांना ते ठार करतात, त्यांच्यासाठी ते कोणते विशेषण वापरीत असतात? किंवा सीरियामध्ये सध्या जी यादवी चालू आहे, आणि ज्या यादवीत, जाणकारांचा अंदाज आहे की, ७० हजारांहून अधिक लोक मारले गेले, ते सर्व मुसलमानच. सत्तारूढ हुकूमशहा बशर आसाद इस्लाममधील एका पंथाचा पाईक आहे, तर बंडखोर सारे सुन्नी. ते एकमेकांना काफीरम्हणत असतील काय? कुणास ठावे? मात्र दोघेही जिहादची घोषणा नक्कीच करीत असतील.

इस्लामचीच निंदा
हे सांगण्याचे प्रयोजन हे की, ‘जिहादची नवीन व्याख्या करण्यात आली पाहिजे. ते खरेच धार्मिक कृत्य असेल, तर सूड, खून, कत्तल यापासून त्याला दूर केले पाहिजे. कोणतेही पवित्र कर्तव्य क्रौर्याशी संलग्न असू शकत नाही. जिहादचा आणखीही एक अर्थ आहे, असे म्हणतात. त्याचे नाव आहे अल्-जिहादुल्-अकबर’. सुफीपंथीय मुसलमान याचा प्रसार करतात, असे म्हणतात. त्याचा अर्थ आहे आपल्या विकारवासनांशी युद्ध. आणि वर ज्या जिहादचे वर्णन केले आहे, त्याचे नाव आहे अल्-जिहादुल्-अषघर’. हा आक्रमक जिहाद आहे. मुल्लामौलवी आणि अन्य मुस्लिम विचारवंतांनी एकत्र बसून जिहादचा कालानुरूप अर्थ स्पष्ट केला पाहिजे. शब्द जुनाच  कायम ठेवणे पण अर्थ नवा व कालसुसंगत करणे, ही धर्मसुधारणेची एक पद्धती आहेच.  इराकमध्ये शियांनी सुन्नींविरुद्ध जिहादपुकारणे किंवा बलुचिस्थानात सुन्नींनी शियांविरुद्ध जिहादपुकारणे यात इस्लामचीच निंदा आहे.

आतंकवादाविरुद्ध लढाई
एक मुद्दा आतंकवादाच्या विरोधातील लढ्याचाही आहे. सरकारने पंथसंप्रदायांचा विचार न करता, आतंकवाद समाप्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. उग्र प्रकृतीचे लोक सर्व समाजात असतात. हिंदू समाजातही असतील. काहींच्यावर मालेगाव स्फोट, समझौता एक्सप्रेसमधील स्फोट इत्यादी आरोप आहेत. ते सारे हिंदू आहेत. त्यांचे मामले अजून न्यायालयात पोचलेले नाहीत. सरकारने ते त्वरित पोचवावेत; आणि संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने जी शिक्षा ठोठावली असेल ती अंमलात आणावी. असे काही घडले नसतानाच हिंदू आतंकवाद’, ‘भगवा आतंकवादअशा आरोळ्या ठोकणे हा तद्दन मूर्खपणा आहे. बेजबाबदारपणे अशा आरोळ्या मारणार्‍या व्यक्ती स्वत:हून स्वत:लाच अपमानित करीत असतात. एवढे भान ते ठेवतील, तर त्यात त्यांचे तर कल्याण आहेच. पण ज्या राज्यशासनाचे ते अंग बनलेले आहेत, त्या शासनाचीही इज्जत राखणारे ते आहे.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ०१-०३-२०१३
babujivaidya@gmail.com

No comments:

Post a Comment