Saturday, 9 March 2013

अस्मितेच्या शोधात बांगला देशरविवारचे भाष्य दि. १० मार्च २०१३ करिता 


आपल्या देशाच्या शेजारच्या बांगला देशात, एक क्रांती घडत आहे. १९७१ साली बांगला देश स्वतंत्र झाला, हे सर्वविदित आहे. त्याच्या पूर्वी तो पाकिस्तानचा भाग होता. पूर्व पाकिस्तान हे त्याचे नाव होते. पण पश्‍चिम पाकिस्तान आपल्या या पूर्व भागाला, म्हणजेच तेथील जनतेला समजूच शकले नाही. दोन्ही भागांमध्ये एकच साम्य होते. ते हे की, दोन्ही भाग मुस्लिमबहुल होते; आणि त्या आधारावरच १४ ऑगस्ट १९४७ ला भारताचे विभाजन घडून येऊन पाकिस्तानची निर्मिती झाली होती.

इस्लाम आणि राष्ट्रभाव
परंतु, त्यावेळी तरी, दोन्हीकडचे मुस्लिम समाजाचे नेते ही वास्तविकता विसरले की, इस्लाम हा राष्ट्रत्वाचा आधार होऊ शकत नाही. फार मागच्या इतिहासात न जाताही, हे आता उघड झाले आहे की, इस्लाम कबूल करणारे लोक परस्परांशी बंधुभावाने सोडा, स्नेहभावानेही राहू शकत नाहीत. तसे झाले असते तर इराण व इराक यांच्यात युद्धच झाले नसते. इराकने कुवैतवर आक्रमणच केले नसते. अगदी अलीकडच्या काळात तालिबानने, त्यांच्या हातून अफगानिस्थानातील सत्ता जाताच, सत्ताधारी मुसलमानांवर आत्मघाती हल्ले करून त्यांना ठार केले नसते. अगदी अलीकडे म्हणजे गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुन्नीपंथी बलुची लोकांनी, आपल्याच देशातील शियापंथीय मुसलमानांची हत्या केली नसती. तीही अन्य निधार्मिक ठिकाणी नव्हे, तर पवित्र मशिदीच्या परिसरात. अर्थात शियांच्या मशिदीच्या परिसरात. हा हल्ला एवढा भीषण होता की, त्यात सुमारे शंभर शिया मुसलमान ठार झाले; आणि अगदी त्याच्याही अलीकडची ताजी घटना सांगायची म्हणजे पाकिस्तानमधील कराची शहरात, दिनांक ३ मार्चला, शियापंथीयांच्या वस्तीत बॉम्बस्फोट घडवून निदान पन्नास शियांना ठार करण्यात आले. या सर्व घटनांतून एकच निष्कर्ष निघतो की, इस्लाम, पराक्रमाची, जिहादची, बलिदानाची किंवा आत्यंतिक धर्मनिष्ठेची  प्रेरणा देऊ शकत असेलही, पण तो बंधुतेची प्रेरणा देऊ शकत नाही. आणि राष्ट्रभावाचा आधार परस्पर बंधुभाव असतो, धर्म-संप्रदाय असत नाहीत. ७० हजार लोकांना ज्यात मरण आले आहे, ते सीरियातील गृहयुद्ध याचीच साक्ष देत आहे.

भाषेचे महत्त्व
पूर्व पाकिस्तानची म्हणजे आजच्या बांगला देशाची एकूण लोकसंख्या पश्‍चिम पाकिस्तानातील चारही प्रांतांच्या लोकसंख्येच्या बेरजेपेक्षा अधिक होती. पण संपूर्ण पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत पूर्व पाकिस्तानचे नेते मुजीबुर रहमान यांना बहुमत मिळाले असतानाही, त्यांना प्रधानमंत्री बनू देण्यात आले नव्हते. इस्लामी देशातील राजनैतिक पद्धतीप्रमाणे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आणि त्यांचे तोंड बंद करण्यात आले. विरोधाचा आणखी एक मुद्दा होता. तो म्हणजे पूर्व पाकिस्तानच्या जनतेवर उर्दू भाषा थोपण्याचा. पूर्व पाकिस्तानच्या जनतेची भाषा बांगला आहे. त्यांना उर्दूची सक्ती पसंत पडली नाही. उर्दू मुसलमानांची धर्मभाषा नाही. कुराण शरीफ अरबी भाषेत आहे; उर्दूत नाही. सौदी अरेबिया, इराक, इराण, अफगानिस्थान या देशांची भाषा उर्दू नाही. भारतात मोगलांचे आक्रमण आणि पाठोपाठ त्यांचे शासन आल्यानंतर, उर्दूचा जन्म झाला. ही मुख्यत: सैनिकांच्या छावणीची भाषा आहे. दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशातील त्यावेळची हिंदी आणि अरबी यांच्या मिश्रणाने तयार झालेली ही भाषा आहे. ती उत्तर भारतातच नांदली आणि आताही तेथेच नांदत आहे. आपल्या भारतातील तामीळनाडू, कर्नाटक व केरळ, या राज्यांमध्ये राहणारे मुसलमान अनुक्रमे तमीळ, कानडी व मल्याळम् भाषेचा उपयोग करतात. केरळात मुस्लिम लीगचा दबदबा आहे. भारताच्या फाळणीला जबाबदार असलेल्या या पक्षाचे अस्तित्व, भारताच्या अन्य भागातून नाहीसे झाले असले, तरी केरळात तो पक्ष आजही आहे. सध्या त्या पक्षाचा एक गट, कॉंग्रेसप्रणीत सरकारात सामील आहे. या मुस्लिम लीगच्या अधिकृत वृत्तपत्राचे नाव काय आहे, ते माहीत आहे? त्याचे नाव आहे चंद्रिका’! मजहब एक असला, तरी भाषा भिन्न असू शकतात, हे साधे सहअस्तित्वाचे तत्त्व पश्‍चिम पाकिस्तानातील उर्दूभाषिक मुसलमानांना समजले नाही आणि त्यांनी लष्करी बळाचा उपयोग करून पूर्व पाकिस्तानातील, बांगला भाषी लोकांना दडपून टाकण्याची रणनीती स्वीकारली.

घृणास्पद अत्याचार
या रणनीतीच्या विरोधात पूर्व पाकिस्तानातील बांगला भाषी लोकांनी उठाव केला. मुक्तिवाहिनीची स्थापना झाली. सशस्त्र क्रांती सुरू झाली. पाकिस्तानच्या लष्कराने, याच भागातील कट्टर मुसलमानांना हाताशी धरून ती क्रांती दडपून टाकण्यासाठी, इतरत्रचे मुस्लिम आक्रमक ज्या अघोरी, माणुसकीला लाजविणार्‍या वर्तनाचा अंगीकार करतात, तोच प्रकार त्यांनी आपल्या बांगला भाषी बंधूंच्या बाबतीतही केला. त्यांनी खून केले, सामूहिक हत्या केली आणि स्त्रियांवर बलात्काराचे घृणास्पद अत्याचारही केले. आपण आपल्याच मजहबच्या स्त्रियांवर बलात्कार करीत आहोत, याचे भानही त्या नराधमांना राहिले नाही.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर
भारताच्या सक्रिय मदतीने, पूर्व पाकिस्तानने, पश्‍चिम पाकिस्तानच्या जुलमी जोखडातून, १९७१ साली आपली सुटका करून घेतली. तुरुंगात डांबून ठेवलेल्या शेख मुजीबुर रहमान यांची सुटका झाली. ते नव्या स्वतंत्र बांगला देशाचे सर्वाधिकारी बनले. त्यांनी पंथनिरपेक्ष (सेक्युलर) राज्याची घोषणा केली. कट्टरपंथी जमाते इस्लामी, मुस्लिम लीग, निझाम-ए-इस्लामी या अणि अशाच अन्य संस्थांवर बंदी घातली. ही १९७२ ची गोष्ट. पण हे कट्टरपंथी दबले नाहीत. १९७५ मध्ये मुजीबुर रहमान यांची हत्या करण्यात आली आणि लष्कराने आपल्या हाती सत्ता घेतली. यानंतर सत्तेवर आलेल्या लष्करशहांनी या संस्थांवरील बंदी उठविली. पुढे पुन: लोकशाहीचे वारे सुरू झाले. शेख मुजीबुर रहमान यांच्या पक्षाचे नाव होते, ‘अवामी लीग.सध्या बांगला देशात या अवामी लीगचीच सत्ता चालू आहे; आणि मुजीबुर रहमान यांची कन्या शेख हसीना या प्रधानमंत्री आहेत. यापूर्वीही त्या प्रधानमंत्री होत्या. पण मधल्या काळात बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीनेही सत्ता उपभोगली आहे. बांगला देश नॅशनल पार्टीच्या प्रमुख खलिदा झिया या महिलाच आहेत. त्यांचा पक्ष कट्टरवाद्यांच्या सोबत आहे.

२१ फेब्रुवारीचा दिवस
अवामी लीगच्या राजवटीत, ज्यांनी १९७१ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात, खून, महिलांवरील बलात्कार, या सारखे जघन्य अपराध केले, त्यांच्यावर खटले भरण्यासाठी बांगला देश आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालय’ (बांगला देश इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल) स्थापन करण्यात आले. या न्यायालयाने, अत्यंत अधम अपराधाचे आरोप असलेल्या, जमाते इस्लामीचा असिस्टंट सेक्रेटरी जनरल -अब्दुल कादर मुल्ला- याला फाशीची शिक्षा सुनावण्याऐवजी जन्मठेपेची म्हणजे पंधरा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. हा दिवस होता ४ फेब्रुवारी २०१३. आणि दुसर्‍या दिवशीपासून या शिक्षेच्या विरोधात बांगला देशातील विद्यार्थ्यांनी आणि अन्य तरुणांनी प्रचंड प्रमाणात विरोध प्रारंभ केला. या विरोधाचा आकार आणि तीव्रता इतकी वाढली की, दि. २१ फेब्रुवारीला, बांगला देशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील शाहबाग चौकात पन्नास लाख तरुण एकत्र आले; आणि त्यांच्या कंठातून एकच घोषणा उमटली की, ‘कादर मोल्लार फाशी चाई’ (कादर मुल्लाला फाशी द्या). २१ फेब्रुवारी या दिवसाचेही एक भावनोत्कट महत्त्व आहे. याच दिवशी, याच शाहबागेत, बरोबर साठ वर्षांपूर्वी, बांगला भाषेला, राज्यभाषेचा दर्जा द्यावा या मागणीसाठी, एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांवर त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानच्या सरकारने गोळीबार करून अनेक विद्यार्थ्यांना ठार केले होते. त्या एकुशिये फेब्रुवारीची वेदना अजूनही बांगलादेशी विद्यार्थ्यांच्या मनात घर करून आहे. २१ फेब्रुवारी २०१३ला तीच प्रकट झाली.

जमाते इस्लामीचा हिंसाचार
विद्यार्थ्यांचा हा २१ फेब्रुवारीचा शाहबाग चौकातील प्रचंड मेळावा, इजिप्तच्या राजधानीच्या कैरो शहरातील तहरीर चौकातील मेळाव्याची आठवण करून देतो. या तहरीर चौकातील मेळाव्याच्या प्रचंडतेने इजिप्तचे तत्कालीन हुकूमशहा होस्नी मुबारक यांना पदच्युत केले होते. त्यानंतर अरब जगतात नवा वसंतागम झाल्याचे चित्र रंगविण्यात आले. हा भाग वेगळा की, या वसंतागमाचा परिणाम म्हणून वसंताचे सुखद वारे तेथे वाहू लागले नाहीत. परिवर्तन झाले. पण पुन: शिशिराचे कट्टरपंथी वारेच तेथे प्रभावी ठरले. शाहबाग चौकातील क्रांतिकारी प्रचंडता मात्र आपला प्रभाव दाखवून गेलीच. ५ फेब्रुवारीला कादर मुल्ला सौम्य शिक्षेने सुटला असला, तरी दिनांक २८ फेब्रुवारीला याच जमाते इस्लामीचा उपाध्यक्ष असलेल्या दिलवर हुसेन सईदीला, त्याच न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आणि मग जमाते इस्लामीकडून या शिक्षेच्या विरोधात हिंसक आंदोलन सुरू झाले. या हिंसाचारात आतापर्यंत सुमारे शंभर लोकांना प्राण गमवावे लागले.
हा हिंसाचार आणखी भडकू शकतो. कारण, जमाते इस्लामीची ताकद नगण्य नाही. खलिदा झियाच्या राजवटीत तो पक्ष सत्तेत भागीदारही होता; आणि सध्या सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेली खलिदा झियांची बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टी’, जमाते इस्लामीच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. खलिदा झियांनी, आपली नाराजी झाकूनही ठेवली नाही. भारताचे राष्ट्रपती महामहिम प्रणव मुखर्जी, बांगला देशच्या अधिकृत भेटीसाठी गेले असताना, खलिदा झिया यांनी, त्यांच्याशी ठरलेली आपली भेट रद्द केली. परंतु, बांगला देशातील विद्यार्थीही स्वस्थ बसावयाचे नाहीत. न्यायालयाने अब्दुल कादर मुल्लाला जन्मठेपेची शिक्षा दिलेली असली, तरी त्याच गुन्ह्यासाठी, त्याच्याच बरोबर आणखी एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षाही सुनावली होती. त्याचे नाव अब्दुल कलाम आझाद उर्फ बच्चू आहे. तो पाकिस्तानात पळून गेला आहे. त्यामुळे त्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावयाची नाही. मात्र दिलवर हुसेन सईदीची शिक्षा अंमलात येऊ शकते. हा सईद मामुली व्यक्ती नाही. जमातच्या तिकिटावर निवडून आलेला तो १९९६ ते २००८ अशी बारा वर्षे बांगला देश पार्लमेंटचा सदस्य होता. त्याच्यावर ५० लोकांची हत्या, लूटमार, महिलांवरील बलात्कार असे गंभीर गुन्हे आहेत. त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याचा आनंद या नव्या पिढीच्या तरुणांना असला, तरी ज्या दिवशी फाशीची शिक्षा अंमलात येईल, त्या दिवशी बांगला देशात मोठा हलकल्लोळ माजल्याशिवाय राहणार नाही. केवळ फाशीची शिक्षा सुनावल्याबरोबर जर एवढा हिंसाचार उसळू शकतो, तर ती शिक्षा प्रत्यक्ष अंमलात आल्यावर हिंसाचार किती तीव्र राहील, याची कल्पना करणे कठीण नाही.

शुभसंकेत
म्हणून म्हणायचे की, बांगला देशाला आपली अस्मिता शोधायची आहे. आंदोलन करणारे छात्र, बांगला देशाच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर जन्मलेले आहेत. त्यांनी आपल्या आंदोलनाचे नावच मुळी मुक्ति जोद्धा प्रजन्म कमेटीम्हणजे मुक्तियोद्धा नवी पिढीअसे ठेवलेले आहे. बांगला देशाचे विद्यमान सरकार सेक्युलर राज्यव्यवस्थेला अनुकूल आहे. पण सध्याच्या राज्यघटनेने बांगला देशाचा अधिकृत धर्म इस्लाम आहे, हेही घोषित केले आहे. बांगला देशाच्या सरकारमध्ये ही हिंमत असेल काय की, ते राज्यघटनेत बदल करून आपले राज्य सेक्युलर राहील, असे घोषित करील? हा बदल लगेच तरी शक्य वाटत नाही. काही महिन्यांनीच म्हणजे या २०१३ सालीच बांगला देशाच्या संसदेची निवडणूक आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेली बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीआणि जमाते इस्लामी यांची युती आहे. या युतीला पराभूत करून, शेख हसीना यांची अवामी लीग पुन: सत्तेवर येईल काय, हा खरा प्रश्‍न आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची शक्ती पूर्णपणे अवामी लीगच्या पाठीशी उभी राहील, हे गृहीत धरले, तरी निवडणुकीचा निकाल कसा लागेल, हे आज सांगता येत नाही. म्हणून म्हणायचे की बांगला देश, आपल्या अस्मितेच्या शोधात आहे. तहरीर चौक आंदोलनानंतरही इजिप्तमध्ये झालेल्या निवडणुकीने कट्टरपंथी मुस्लिम ब्रदरहूडलाच सत्ता प्राप्त करून दिली. बांगला देशात तसे तर घडून येणार नाही ना! योग्य वेळच या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकेल. एवढे मात्र खरे की बांगला देशाला कट्टरपंथी इस्लामिस्ट राज्य होऊ देण्याऐवजी, ते पंथनिरपेक्ष म्हणा अथवा सर्वपंथसमादर ठेवणारे म्हणा, राज्य बनविण्यासाठी एक मोठी युवा शक्ती, त्या देशात उभी झाली आहे. बांगला देशाच्या आणि भारताच्याही दृष्टीने हा शुभसंकेत आहे.


-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ०८-०३-२०१३
babujivaidya@gmail.com

No comments:

Post a Comment