Saturday 9 February 2013

औषधे : ब्रॅण्डेड आणि जेनेरिक


रविवारचे भाष्य दि. १० फेब्रुवारी २०१३ करिता

     स्त  त:

औषधे : ब्रॅण्डेड आणि जेनेरिक
जेनेरिक औषध म्हणजे मूळ औषध किंवा औषधाचे मूळ नाव आणि ब्रॅण्डेड औषध म्हणजे याच औषधाला कंपन्यांनी दिलेले नाव.
ब्रॅण्डेडऔषधांचे दर जेनेरिक औषधांच्या अनेक पटीने असतात. याचे कारण बाजारात असलेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे कंपन्यांना करावी लागणारी जाहिरातबाजी, त्यावर असलेले सरकारी कर, व्यापारी आणि केमिस्ट यांना द्यावे लागणारे कमिशन, वाहतूक खर्च हे असून याचा सर्व आर्थिक बोजा शेवटी आजारग्रस्त रुग्णांवरच लादला जातो. कधी कधी अनुपलब्धतेमुळे जेनेरिक औषधेमहाग पडतात. पण जेनेरिक औषधांची मागणी वाढली तर पुरवठा वाढून ती स्वस्त होऊ शकतात.
आपल्या फॅमिली डॉक्टरांशी सल्लामसलत करून जेनेरिक औषधांचा आग्रह धरा.

दरातील तफावत
मधुमेहाच्या रुग्णास कोणते औषध द्याल, असे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला परीक्षेत विचारले तर कदाचित तो ग्लिमेपेराईडअसे उत्तर लिहील. मधुमेहावरील उपचारासाठी सर्वसामान्यपणे वापरल्या जाणार्‍या एका क्षाराचे हे नाव आहे. पण हाच विद्यार्थी डॉक्टर झाल्यावर त्याच्याकडे जेव्हा मधुमेहाचा रुग्ण येईल तेव्हा तो कदाचित त्याला ऍमारिलहे औषध लिहून देईल. मग हे काय चुकीचे औषध आहे? मुळीच नाही. हे त्याच क्षारापासून बनविलेल्या ब्रॅण्डेड औषधाचे नाव आहे. मग नाव सोडले तर दोन्हीमध्ये काय फरक? ‘ऍमारिलच्या १० गोळ्या सुमारे १२५ रुपयांना मिळतात व ग्लिमेपेराईडच्या १० गोळ्या फक्त दोन रुपयांना मिळतात. दोन्हींचे औषधी गुणधर्म एकच, पण ब्रॅण्डेड औषधासाठी आपण चक्क १२३ रुपये जास्त मोजतो.
सदासर्वकाळ आढळणारा सर्दी हा आजार. त्यासाठी सर्रास वापरल्या जाणार्‍या औषधी क्षाराचे नाव सेट्रिझाईन. या मूळ औषधाची किंमत, उत्पादन खर्च, वाहतूक खर्च व बर्‍यापैकी नफा धरून असते, १० गोळ्यांसाठी १ रु. २० पैसे. याच गुणधर्माचे सेटझाईन हे ब्रॅण्डेड औषध मिळते ३५ रुपयांना १० गोळ्या या दराने.
ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो ते धमन्यांमधील अवरोध दूर करण्यासाठी सर्रास वापरले जाणारे इंजेक्शन म्हणजे स्टेप्टोकिनेस किंवा युरोकिनेस. त्याची मूळ किंमत असते एक हजार रुपये. एखाद्या कंपनीच्या ब्रॅण्डचे नाव चिकटले की किंमत होते पाच हजार रुपये.
भारतात विशेषत: लहान मुलांमध्ये मलेरिया हा मोठा जीवघेणा रोग आहे. औषधांनाही न जुमानणार्‍या मलेरियावर दिले जाणारे इंजेक्शन, तीन कुप्यांच्या पाकिटास २५ रु. या दराने मिळू शकते. तेच इंजेक्शन ब्रॅण्डेड झाले की त्याची किंमत एका कुपीला ३०० ते ४०० रुपये होते.
लहान मुलांमधील आणखी एक मोठा जीवघेणा रोग म्हणजे डायरिया. त्यात खरा धोका असतो तो शरीराच्या जलशुष्कतेचा. ते रोखण्यासाठी डॉम्पेरिडोन हा औषधी क्षार वापरतात व त्याच्या १० गोळ्यांची पट्टी मिळते सव्वा रुपया एवढ्या नगण्य किमतीत. त्याचेच डोमेस्टाल हे ब्रॅण्डेड औषध विकले जाते ३३ रुपयांना. गरिबांना नव्हे, तर अगदी मध्यमवर्गीयांनाही ही औषधे कशी परवडणार? त्याच्यावर जेनेरिक मेडिसिन म्हणजे औषधी द्रव्य मूळ स्वरूपात उपलब्ध करणे हा उपाय आहे. भारतात सर्वसाधारणपणे २५ टक्के आजारांवर परवडत नाही म्हणून उपचार केले जात नाहीत. तेव्हा जेनेरिक मेडिसिनने प्रत्येक भारतीयाला किती फायदा होईल, याचा विचार करा.
आणखी एक मजेची माहिती. जेनेरिक मेडिसिन विक्रीचे दुकान काढू इच्छिणार्‍या व्यक्तीला केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते. याखेरीज दुकानासाठी जागा देण्याचा स्वेच्छाधिकार त्यांना आहे. गरीब व श्रीमंतांना उत्तम दर्जा आरोग्यसेवा एकसमान मिळण्याचे स्वप्न कदाचित साकार होण्याची चिन्हे दिसताहेत.
(साप्ताहिक विजयन्तसांगली, वरून साभार)
***     ***     ***

पर्वतही नतमस्तक
ही दशरथ मांझी या गरिबाची कथा आहे.
दशरथ मांझी यांचा जन्म १९३४ मध्ये बिहार येथील गेलहोर या गावी अतिशय गरीब कुटुंबात झाला. ते बिहारच्या आदिवासी जमातीतील अतिशय निम्नस्तरीय अशा मुसाहर जमातीतील होते. त्यांच्या पत्नीचे नाव फाल्गुनीदेवी. दशरथ मांझीसाठी पिण्याचे पाणी घेऊन जात असताना पत्नी फाल्गुनीदेवीचा अपघात झाला. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यांच्या गावापासून शहर ७० किलोमीटर अंतरावर होते. तेथे सर्व सुविधा होती. पण तिथपर्यंत त्वरित पोचणे शक्य नव्हते. दुर्दैवाने वैद्यकीय उपचारांअभावी फाल्गुनीदेवी यांचा करुण मृत्यू झाला. असा दुर्दैवी प्रसंग आपल्या आसपासच्या माणसांवर येऊ नये, या विचाराने दशरथ मांझी पछाडले. नजीकच्या शहराचे ७० कि. मी. अंतर कसे कमी करता येईल या दिशेने विचारचक्र सुरू झाले. त्यांच्या लक्षात आले की, शहरापासून गावाला वेगळे करणार्‍या डोंगराला दूर केले तर अंतर खूप कमी होईल. हा डोंगर फोडल्यावर शहर ते गाव हे सत्तर किलोमीटरचे अंतर अवघे सात किलोमीटरवर येणार होते. त्यांनी हे काम हाती घ्यायचे, हा दृढ निश्‍चय केला. मात्र हे काम काही सोपे नव्हते. कारण यासाठी त्यांना रोजी-रोटी देणारे दैनंदिन काम सोडावे लागणार होते. त्यांनी स्वत:जवळ असणार्‍या शेळ्या विकून छिन्नी, हातोडा आणि फावडे विकत घेतले. दशरथ मांझीनी आपली झोपडी कामाच्या जवळ हलविली. त्यामुळे आता त्यांना रात्रंदिवस काम करता येणार होते. या कामाचा त्रास त्यांच्या कुटुंबीयांना तर झालाच, परंतु अनेक वेळा दशरथ यांनाही उपाशीपोटी काम करावे लागले. जवळून लोकांची ये-जा चालू होती. गावातही या कामाची चर्चा होत होती. या सर्व माणसांनी दशरथ यांना वेड्यात काढून टाकले होते. गावातल्या माणसांची ही प्रखर टीका त्यांना सहन करावी लागली होती. परंतु ते आपल्या निश्‍चयापासून कधीच दूर हटले नाहीत. कामात जशी जशी प्रगती होत होती तसतसा त्यांचा निश्‍चय पक्का होत होता. सतत बावीस वर्षे अहोरात्र केलेल्या परिश्रमांमुळे १९६० मध्ये सुरू केलेले हे अशक्य वाटणारे काम १९८२ मध्ये पूर्ण झाले. त्यांच्या एकट्याच्या श्रमांतून अजिंक्य वाटणारा डोंगर तोडून ३६० फूट लांब, २५ फूट उंच आणि ३० फूट रुंद असा रस्ता तयार झाला. थोडक्यात, त्यांनी २,७०,००० घनफूट दगड फोडला होता. त्यामुळे आटरी आणि वझीरगंज या गया जिल्ह्यातील गावांचे अंतर दहा किलोमीटरच्या आत आले होते.
त्यांची प्रिय पत्नी फाल्गुनीदेवी- जिच्या प्रेरणेमुळे त्यांनी हे अशक्य वाटणारे काम पूर्ण केले, तेव्हा ती त्यांच्याजवळ नव्हती. परंतु गावातील लोकांनी मात्र शक्य होती ती मिठाई, फळे दशरथजींना आणून दिली आणि त्यांच्या यशाचा आनंद त्यांच्यासमवेत साजराही केला. तरुण मुले देखील मोठ्या कौतुकाने या पर्वत हलवणार्‍या देवदूताच्या कथा ऐकू लागले. गावकर्‍यांनी दशरथजींना साधूजीही पदवी बहाल केली.
दशरथजी म्हणतात, ‘‘माझ्या कामाची प्रथम प्रेरणा म्हणजे माझं माझ्या पत्नीवर असणारं प्रेम. त्या प्रेमानेच हा डोंगर तोडून रस्ता तयार करण्याची ज्योत माझ्या हृदयात पेटवली. परंतु आसपासचे हजारो लोक विनासायास आपल्या दैनंदिन गरजांसाठी जवळच्या शहरात जाऊ शकतील, हे माझ्या डोळ्यांसमोर येणारं दृश्यच मला दैनंदिन कार्यप्रेरणा देत होतं. यामुळेच मी काळजी आणि भीतीवर मात करू शकलो.’’
(‘विकल्पवेधअंक १ ते १५ डिसेंबरवरून साभार)
***     ***     ***

माजुली बेटावरचा मराठी मास्तर
ब्रह्मपुत्रेच्या पात्रात वाळूमिश्रित मातीचा संचय होऊन तयार झालेलं माजुली हे नितांत सुंदर बेट. या बेटावर छोटी छोटी १०-१२ गावे आहेत. नारळ-पोफळीच्या बागा, वेळूची बनं, मोठमोठ्या वृक्षांवर वाढलेली ऑर्किड, पाणथळीच्या जागेत केलेली भातशेती आणि पुरापासून संरक्षण व्हावं म्हणून खालचा भाग मोकळा ठेवून बांबूच्या आधारावर रस्त्याच्या कडेने बांधलेली वेताची घरं! आपण इथल्या कोणत्याही घरात गेलं की, आपलं आदराने स्वागत होतं. महाराष्ट्रातून आलो आहे, असं सांगताच ताबडतोब प्रश्‍न विचारला जातो, ‘‘रवि सर कैसा है?’’ नंतर प्रत्येक घरात हाच प्रश्‍न आपला पिच्छा पुरवत राहतो. मग आपल्यालाही प्रश्‍न पडतो, ‘‘कोण आहे हा रवि सर?’’ माजुलीतला प्रत्येक माणूस या रवि सरांची एवढ्या आस्थेने का चौकशी करतोय? आणि हा रवि सर महाराष्ट्रातल्या तमाम माणसांना माहीत असलाच पाहिजे, अशी यांची अपेक्षा का आहे?
हे रवि सर म्हणजे रवींद्रनाथ देवेंद्रनाथ सावदेकर. ते नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावाचे. देवेंद्रनाथ सावदेकर गुरुजींचे एकुलते एक चिरंजीव. विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन रवींद्रनाथांनी भारतपरिक्रमेत भाग घेतला. कन्याकुमारीतल्या विवेकानंद केंद्रात आचार्यप्रशिक्षण पूर्ण केलं. केंद्राने त्यांना नागालँडमधील डोयांग या ठिकाणी रुजू होण्यास सांगितलं. एकुलता एक मुलगा इतक्या दूर, हिंसाग्रस्त भागात जाणार, म्हणून आईचं हृदय गलबललं. पण महिनाभरासाठी जाऊन पाहतोअसं म्हणून २००० साली रवींद्रनाथ सावदेकरांनी घर सोडलं.
डोयांगच्या अतिदुर्गम प्रदेशात असलेल्या शाळेत महिना-दोन महिने नव्हे तर तब्बल दोन वर्षे काम केल्यानंतर माजुली बेटावर नव्याने सुरू होत असलेल्या शाळेसाठी मुख्याध्यापक म्हणून सरांची नियुक्ती झाली. जोर्‍हाटमधल्या निमाटी घाटावर सकाळी आठ वाजता सर पोहोचले. ब्रह्मपुत्रेच्या काठावर सकाळ काढून, संध्याकाळी सहा वाजता सर माजुली बेटावर पोहोचले. कमलाबारी गावाचं निसर्गसौंदर्य पाहून सर हरखून गेले. दोन मुख्य रस्ते एकत्र येऊन तयार झालेल्या चौफुल्यावर कमलाबारी हे लहानसं गाव वसलेलं आहे.
५३ विद्यार्थी आणि २ शिक्षक, भाड्याने घेतलेली छोटीशी इमारत, यासह सरांची शाळा सुरू झाली. पण नवीन प्रदेश, नवीन वातावरण, त्यामुळे सरांच्या पुढे अनेक प्रश्‍न होते. हे प्रश्‍न लोकांच्या सहकार्याशिवाय सुटणे अवघड होते. पण त्यातही समस्या होतीच. गावातल्या लोकांना हिंदी, इंग्रजी भाषा येत नव्हत्या आणि सरांना आसामी भाषा माहीत नव्हती. मग हे प्रश्‍न सोडायचे कसे?
सरांनी आसामी भाषा शिकायला सुरुवात केली. मराठी आणि आसामी भाषेत असलेल्या साम्याचा त्यांना उपयोग झाला. हळूहळू मोडक्यातोडक्या आसामी भाषेतून सरांनी गावकर्‍यांशी संवाद साधायला सुरवात केली. स्थानिक लोकांना सरांचे अप्रूप वाटायला लागले. गावातल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी सर रोज संध्याकाळी गावातून फेरी मारायला लागले. सरांच्या फिरण्याचं वेळापत्रक माजुलीच्या गावकर्‍यांना पाठ झालं. ते सरांची वाट बघायला लागले आणि मग सावदेकर सर रवि सरम्हणून गावकर्‍यांमध्ये प्रसिद्ध झाले.
रवि सरांनी शाळेसाठी कमलाबारी गावाच्या बाहेर जागा मिळवली. आता भाड्याच्या जागेऐवजी शाळेची स्वत:ची जागा झाली. पण ही जागा म्हणजे वेळूचं बन आणि झाडाझुडपांनी वेढलेली पाणथळ जागा होती. लोकांच्या मदतीने सरांनी या जागेची सफाई केली. सिमेंट कॉंक्रिटची पक्की इमारत या जागी बांधणे म्हणजे एक आव्हानच होते. कारण तिथली जमीन पाणथळ, भुसभुशीत. खोल जमिनीत कॉंक्रिट स्ट्रक्चर तयार करायचं तर भूजल पातळी कधी बदलेल याचा नेम नाही. बेटावर बांधकामासाठी दगड नाहीत, खडी नाही आणि बेटावरची वाळू बांधकामाच्या उपयोगाची नाही, अशी स्थिती. बेटावर सिमेंट कसे आणि कोठून आणायचे, हा सुद्धा प्रश्‍न होताच. पण रवि सरांनी निग्रह केला. त्यांनी माजुली हितैशी बंधूनावाची पालक संघटना तयार केली आणि संघटनेच्या मदतीने काम सुरू केले. १५ ट्रक भरतील इतके दगड बोटीतून आणले. हे दगड म्हणजे नदीतले गोल गोटे. ते फोडायला मासं मिळेनात. गोटे फोडताना त्याच्या कपच्या उडून डोक्याला, डोळ्यांना इजा होते म्हणून लोकं पळून जात. शेवटी सरांनी मोठे गॉगल मागवले. हे गॉगल लावून मजूर दगड फोडायला लागले. जोर्‍हाटवरून बोटीने सिमेंट आणले. सतत पाऊस, प्रतिकूल हवामान आणि सगळीकडे पाणीच पाणी अशा स्थितीत मोठ्या कष्टाने रवि सरांनी शाळेची इमारत बांधून काढली.
२००४ साली रवि सरांनी अहमदनगरच्या पूर्वा नावाच्या युवतीशी लग्न केलं. आसाममध्ये ब्रह्मपुत्रेच्या बेटावर राहायला पूर्वाची तयारी होती. पूर्वादीदी सुद्धा रवि सरांप्रमाणेच शाळेत शिकवू लागल्या. रवि सरांप्रमाणेच आसाममधल्या प्रतिकूल परिस्थितीशी त्यांनी स्वत:ला जुळवून घेतलं आहे.
ब्रह्मपुत्रेला पूर आल्यावर माजुली बेटाचा बराचसा भाग पाण्याखाली जातो. साहजिकच, पूरपरिस्थितीमध्ये गावकर्‍यांचा एकमेकांशी व इतर गावांशी असलेला संपर्क तुटतो. अशा वेळी रवि सर मात्र होडीतून फिरून गावकर्‍यांना मदत करत असतात. २००८ साली तर एवढा पूर आला की, होडीतून जाताना पाण्यावर दिसणार्‍या घराच्या छपरावरून आपण कोणत्या गावात पोहोचलो याचा अंदाज बांधावा लागला होता. पण तशाही परिस्थितीत रवि सर छोट्या होडीतून गावकर्‍यांना हरप्रकारे मदत करीत रात्रंदिवस फिरत होते.
माजुली बेटावर असलेल्या प्रतिकूल वातावरणात काम करण्यासाठी कोणता शिक्षक तयार होईल? पण रवि सर म्हणतात, ‘‘मी महाराष्ट्रात नोकरी केली असती तर एक उत्तम शिक्षक झालोही असतो. पण इथे या माजुली बेटावरच्या माणसांची सांस्कृतिक नाळ भारताशी घट्ट जोडलेली राहावी म्हणून जे काही आम्ही करतो आहोत, ते करता आलं नसतं.’’
आज रवि सर आसामातल्या दिब्रुगड इथल्या विवेकानंद केंद्राच्या विद्यालयाचे प्राचार्य आहेत. सरांनी माजुली बेट सोडून आता दोन वर्षे उलटली आहेत. पण आजही बेटावरचा प्रत्येक लहानथोर अत्यंत गहिवरून विचारते, ‘रवि सर कैसा है?’’
(लोकसत्ता, ९ जुलै २०१२ वरून साभार)
***     ***     ***

अमेरिकेत गीतापठन
व्हँकुअर हे अमेरिकेतील एक शहर. ते युएसएत म्हणजे संयुक्त संस्थानात आहे की कॅनडात हे मला माहीत नाही. बहुधा, या दोन्ही देशांच्या सीमेवर असावे.
पण ते महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे तेथील वीणा संस्कृत फाऊंडेशनया संस्थेने घेतलेली गीतापठनाची स्पर्धा. स्पर्धेचे नाव होते श्रीमद्भगवद्गीता श्लोकोच्चारण प्रतियोगिता.३४ मुलामुलींनी यात भाग घेतला. पाच जणांनी संपूर्ण गीता म्हणून दाखविली. व्हँकुअरचेच नवनीत कौशल आणि सुचिता रामन् यांनी परीक्षक म्हणून काम केले.
७ वर्षे वयाच्या सिद्धार्थ गणेशने गीतेचा संपूर्ण ७ वा अध्याय पाठ म्हणून दाखविला. सुब्रमण्यम् जनस्वामी, ८ वर्षे वयाची निकिता शिवराम यांनी १५ वा अध्याय, तर श्रद्धा कौशिकने १२ वा अध्याय पाठ म्हणून दाखविला. २५ वर्षे वयाच्या वरच्या लोकांनीही आपले पाठांतर प्रकट केले. पण त्यांचा समावेश स्पर्धकांमध्ये नव्हता.
या स्पर्धेतील पहिले पारितोषिक ६ वर्षे वयाच्या कुमारी श्रेयांसी वाला हिने पटकाविले. ७ वर्षे वयाचा विष्णूगुप्त दीक्षित आणि ६ वर्षे वयाची वेदांशी वाला या दोघांना दुसरा क्रमांक मिळाला. तर तिसर्‍या क्रमांकावर ५ वर्षे वयाचा उदय गणेश आला.
***     ***     ***

असेही एक गाव
या गावाचे नाव आहे कालीथिंबम्’. गाव तामीळनाडूमधल्या कोईमतूर जिल्ह्यातील. गावात अद्यापि वीज नाही. मग इतर नागरी सुविधांची बातच दूर.
गावात अरालीया नावाच्या जनजातीची वस्ती आहे. या गावातील हे लोक उपजीविकेसाठी कोईमतूर आणि इरोड या शहरी जातात आणि विशेष म्हणजे ते आपल्यासाठी पत्नीही घेऊन येतात. आपल्या जातीच्या बाहेरची वधू आणण्यात या जमातीला अभिमान वाटतो. ३०० कुटुंबांचे हे गाव आहे. यापैकी ४० कुटुंबातील सुना अन्य जमातींच्या आहेत. त्यातल्या काही दलित जातींच्याही आहेत.
हा चमत्कार कसा घडला? त्यालाही एक कारण घडले. पूर्वी, काही मुलांनी अशाच प्रकारे जमातीबाह्य मुलींवर प्रेम केले असता, घरवाल्यांनी त्यांच्या विवाहाला सक्त विरोध केला. त्यामुळे, अनेकांनी आत्महत्या केल्या. तेव्हा घरातील वडील माणसांचे डोळे उघडले; आणि त्यांनी अशा विवाहांना मान्यता दिली. एवढेच नव्हे तर आता या विवाहोत्सवात संपूर्ण गाव सामील होते. या विवाहप्रसंगी गावचे लोक शपथ घेतात की, आम्ही अशा प्रेमविवाहांना विरोध करणार नाही. मुलीच्या कुटुंबीयांचा अशा विवाहाला विरोध असला, तर मुलाकडचे लोकच त्यांची समजूत घालतात. आपल्या जमातीच्या मुलींनीही जमातीबाहेरच्या तरुणाशी विवाह केला, तर त्यालाही गावकर्‍यांची संमती असते.

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. ८-२-२०१३
babujivaidya@gmail.com


No comments:

Post a Comment