Sunday, 24 March 2013

इ त स्त त:रविवारचे भाष्य दि. 24 मार्च 2013 करिता


असाही एक मुख्य मंत्री
घटना दि. 18 मार्चची असावी. एक मुख्य मंत्री आपल्या राज्याच्या राजधानीतून विमानाने दिल्लीला यावयाला निघाले होते. पण अहो आश्‍चर्यम्! त्यांच्याबरोबर कुणीही चोपदार-भालदार नव्हते. सुरक्षा गार्डही नव्हते. साधा चपराशीही दिसला नाही. आपले सामान त्यांनीच सांभाळले होते. विमानात त्यांचे तिकीट साध्या इकॉनॉमी क्लासमध्ये होते. सर्वांच्या मागून आत शिरावे, तर तसेही नाही. रांगेत उभे राहून, क्रमाक्रमाने ते वर आले.
विमानतळावरही सामान्य प्रवाशाप्रमाणे ते इमारतीत शिरले. बसमध्ये बसले. आपला क्रम आल्यानंतर विमानात प्रवेश करते झाले. विमानातील कर्मचार्‍यांचीही, कुणी विशेष व्यक्ती आल्यानंतरची धावपळ नव्हती. बरे, आपल्या आसनावर बसल्यानंतर त्यांच्या शेजारचे आसन रिकामे असावे, तर तसेही दिसले नाही. त्यांच्या शेजारी एक दुसरा प्रवासी येऊन बसला.
दिल्ली विमानतळावर ते विमान उतरले, तेव्हा सर्वात आधीही ते उतरले नाहीत. रांगेत उभे राहून उतरले. स्वागतासाठी शिरोभागी लाल दिवा असलेली गाडीही आली नव्हती. सर्व प्रवासी ज्या बसमध्ये बसले, त्याच बसमध्ये बसून ते विमानतळाच्या इमारतीत आले. तेथेही आपले सामान स्वत:च हाती धरले. पोशाखही साधा. शर्ट व फुलपँट. हे गृहस्थ कोण होते? ते होते गोव्याचे मुख्य मंत्री मनोहर पर्रीकर. रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबले हेही त्याच विमानात होते. त्यांनीच हा प्रसंग सांगितला.
***        ***        ***

जिवंत शववाहिका
होय! यांना शववाहिकाच म्हटले पाहिजे. त्या सर्व महिला आहेत. अकरा जणींचा एक गट आहे. बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले आहे. शव, रेल्वे अपघातात छिन्नविच्छिन्न झालेले असो किंवा पाण्यात बुडून, सडून, वर आलेले असो, एड्ससारख्या महाभयंकर रोगाने जग सोडून गेलेल्याचे असो की, अनैतिक संबंधातून जन्माला आल्यामुळे क्रूरतेने मारल्या गेलेल्या निष्पाप बालकाचे असो, अशा सर्व बेवारस, विरूप अवस्थेतील शवांवर अंतिम संस्कार करायला जेथे भलेभलेही कचरतात, तेथे ‘पंचशील महिला बचत गटाच्या’ महिलांनी आतापर्यंत तब्बल दीड हजार पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले आहेत. हा ‘पंचशील महिला बचत गट’ आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातील आहे.
पाऊस असो की ऊन, दिवस असो की रात्र, पोलिसांचा फोन आला की, दहा मिनिटांत, या महिला, शव सापडलेल्या जागी पोहोचतात. अंत्यविधीसाठी लागणार्‍या सर्व साहित्याची, जसे नवा कपडा, फुले, अगरबत्ती, रॉकेल, लाकडे, यांची खरेदी त्याच करतात; आणि आवश्यक ते सर्व विधी आटोपून, पोलिसांच्या साक्षीने, त्या पार्थिवाला अग्नी देतात. या अंत्यसंस्कारासाठी औरंगाबादची महापालिका यांना तीन हजार रुपये देते.
औरंगाबादेतील भीमनगर भागात त्या राहतात. या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत आशाताई मस्के. त्या मराठी चौथ्या वर्गापर्यंतच शिकलेल्या आहेत. आपल्या भागातील महिलांसाठी काही तरी चांगले कार्य करावे, या उद्देशाने 2005 मध्ये त्यांनी ‘पंचशील महिला बचत गटाची’ स्थापना केली. या बचत गटामार्फत पोलिओ लसीकरण, कुटुंब- नियोजन शस्त्रक्रिया, ग्रामस्वच्छता अभियान, यासारखे उपक्रम राबवीत असताना, 2007 मध्ये, महापालिकेची बेवारस प्रेतांची विल्हेवाट लावण्यासंबंधीची नोटीस प्रसिद्ध झाली. आशाताईंना या नोटीसीने अस्वस्थ केले. आपण हे काम करावे काय? महिला आपल्याला साथ देतील काय? आपल्याला हे काम झेपेल काय?- असे अनेक प्रश्‍न त्यांच्या मनात उपस्थित झाले. तब्बल पंधरा दिवस या मानसिक घालमेलीत गेले. मग त्यांनी ठरविले की, आपण हे काम करायचेच. त्यांच्या निर्धाराला बचत गटाच्या इतर महिलांचाही पाठिंबा मिळाला. आशाताईंच्या यजमानांनीही त्यांना प्रोत्साहन दिले; आणि त्यांनी टेंडर भरले. आणखीही टेंडरे होती. पण महापालिकेने ‘पंंचशील बचत गटाची’ निवड केली.
काम मिळाल्यानंतर पाचच दिवसांनी त्यांना फोन आला. औरंगाबाद शहराजवळच्या फुलंब्री शिवारात पोलिसांना एक प्रेत आढळले. साधारण 15-20 दिवसांपूर्वीचेच ते शव असावे. ते कुजलेले होते. सडलेले होते. त्याचा भयंकर दुर्गंध येत होता. त्या मृतदेहातून पू व रक्तही बाहेर येत होते. ते बघताक्षणीच, पंचशील गटाच्या दोन महिलांना चक्कर आली व त्या खाली पडल्या. काहींना ओकारी झाली. पण आता मागे फिरून चालणार नव्हते. त्या प्रेताला कोर्‍या कपड्यात त्यांनी गुंडाळले. स्मशानभूमीत ते त्यांनी नेले व त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. आशाताई सांगतात, ‘‘पुढचे आठ दिवस आम्ही वेगळ्याच विश्‍वात होतो. आम्हाला जेवण जात नव्हते. ते सगळं चित्र सारखं डोळ्यासमोर येत राहिलं. तो जीवघेणा वास, ती छिन्नविच्छिन्न अवस्था, सगळंच कसं भयंकर! एक वेळ असं वाटलं की,  कशाला करायचं हे काम? अन्य उद्योग करूनही बचत गट पैसे मिळवू शकेल. पण मग मनाचा निश्‍चय झाला. इतरांना जे जमत नाही, ते आपण करतो, याचं समाधान वाटायला लागलं. आता काहीही झालं तरी माघार नाही.’’ आशाताईंच्या निर्धाराला त्यांच्या सहकारी महिलांनीही साथ दिली, आणि गेल्या पाच वर्षांपासून घेतलेला सामाजिक वसा जोपासण्याचं आगळंवेगळं काम हा बचतगट करीत आहे. जणू काही या बचतगटाच्या महिला शववाहिकाच बनल्या आहेत.
(‘अमेय’च्या ‘खरेखुरे लीडर्स’च्या जानेवारी 2013 च्या अंकावरून साभार)
***        ***        ***

पशूंची कृतज्ञता
कुत्र्यांच्या स्वामिनिष्ठेच्या कथा आपण ऐकल्या आहेत. पण दक्षिण आफ्रिकेतील एक रहिवासी लॉरेन्स अँथनी हत्तींच्या कृतज्ञतेची विलक्षण कथा सांगतात. श्री अँथनी हे लेखकही आहेत. त्यांच्या तीन पुस्तकांपैकी एक ‘एलिफंट व्हिस्परर’ याने तर विक्रीचा विक्रमच प्रस्थापित केला आहे. 7 मार्च 2012 ला अँथनीचे निधन झाले. त्यांच्या अभावाचे दु:ख भोगताहेत, त्यांची पत्नी, त्यांनी दोन मुले, त्यांचे दोन नातू आणि अनेक हत्ती!
होय हत्तीही! हत्तींवर त्यांचे अनंत उपकार आहेत. मानवांच्या अत्याचारांपासून त्यांनी अनेक रानटी हत्तींना वाचविले आहे. इ. स. 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला असता, अँथनीने आपला जीव धोक्यात घालून, बगदादच्या प्राणिसंग्रहातील हत्तींना वाचविले होते.
अँथनीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी 31 हत्तींचा कळप, 12 मैलांचे अंतर कापून त्यांच्या घरी आला. या हत्तींना कसे कळले की, त्यांचा उपकारकर्ता मरण पावला आहे? कुणास ठावूक? लीला बर्नर या नावाची ज्यू धर्मोपदेशिका सांगते की, हत्तींच्या दोन कळपांना, कसे कळले कुणास ठावूक, पण आपला सुहृद गेला आहे, हे त्यांनी ओळखले. थुला थुला जंगलातून हा कळप निघाला. अँथनीच्या घरी पोचला. अँथनीची पत्नी सांगते की, गेल्या तीन वर्षांमध्ये तरी आमच्या घरी हत्ती आलेला आम्ही पाहिला नाही. पण तो कळप आला. दोन दिवस आणि दोन रात्री तेथेच थांबला. या काळात त्यांनी काहीही खाल्ले नाही; आणि तिसर्‍या दिवशी सकाळी, तो कळप तसाच शांततेने निघून गेला! आपण ज्यांची पशू म्हणून हेटाळणी करतो, तेही कृतज्ञता जाणतात, हेच खरे!
***        ***        ***

डॉ. पुष्पा दीक्षित यांची पाणिनीय कार्यशाळा
पाणिनी, हा जगप्रसिद्ध संस्कृत व्याकरणकार आहे. एवढी समृद्ध संस्कृत भाषा, पण पाणिनीने आपल्या असामान्य प्रतिभेने चार हजार सूत्रांमध्ये ती बांधून टाकली आहे. पाणिनीच्या पूर्वीही अनेक व्याकरणकार होऊन गेले. पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’त त्यांचे उल्लेख आहेत. पण पाणिनीएवढा प्रभाव कुणाचाही नाही. जे पाणिनीला मान्य नाही, ते अशुद्ध, अशी पाणिनीची प्रतिष्ठा आहे. पाणिनीनंतरही अनेक व्याकरणकार होऊन गेले. पण त्या सर्वांनी पाणिनीच्या सूत्रांना केवळ पुरवणी जोडली किंवा त्या सूत्रांचा अर्थ विशद करण्यात धन्यता मानली.
जर्मनीमधील बॉन विद्यापीठात संस्कृत व हिंदी या दोन विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रतीक रूमडे यांनी 2012 च्या मे महिन्यात डॉ. पुष्पा दीक्षित यांच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतले. त्यांनी ‘धर्मभास्कर’ मासिकाच्या गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या अंकात आपल्या अनुभवांचे निवेदन केले आहे. त्याच्या आधाराने खालील माहिती दिली जात आहे.
ही कार्यशाळा छत्तीसगडमधील बिलासपूरला भरते. डॉ. पुष्पा दीक्षित या राष्ट्रपति- पुरस्कारप्राप्त विद्वन्मान्य व्याकरणतज्ज्ञ आहेत. त्या एम. ए., पीएच. डी. आहेत. छत्तीसगड शासनाच्या महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. आता सेवानिवृत्त आहेत. 5 मे ते 5 जून 2012 अशी महिनाभर ही कार्यशाळा चालली. या कार्यशाळेत सुमारे 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. ते महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उ. प्र., त्याचप्रमाणे आसाम, मणिपूर, कर्नाटक आणि आंध्र या विविध राज्यांमधून आलेले होते. नेपाळमधून आलेलेही विद्यार्थी होते. एका लघुभारतातेच तेथे दर्शन घडत होते. कार्यशाळेतील विद्यार्थ्यांची परस्पर संपर्काची भाषा अर्थात् संस्कृतच होती.
रोज सकाळी 7 वाजता अष्टाध्यायीतील सूत्रांच्या पठनाने अध्ययनाची सुरुवात होत असे. दुपारी भोजनाच्या सुट्टीपर्यंत हे अध्ययन चाले. भोजनोत्तर विश्रांती आटोपून पुन: विद्यार्थी जमत ते रात्रीच्या भोजनसमयापर्यंत. एवढा वेळ एके ठिकाणी आसन ठोकून विद्यार्थी बसत. हा एकप्रकारे ‘आसनविजय’च होता.
कार्यशाळेची सर्व व्यवस्था एखाद्या गुरुकुलाप्रमाणेच होती. परिसराची स्वच्छता, वर्गातील बैठकव्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वयंपाकात मदत, जेवणाचे वाढप, ही सारी कामे, नेमून दिल्याप्रमाणे विद्यार्थीच करीत. दिवसभर अभ्यासाचे बौद्धिक श्रम झाल्यावर विसावा म्हणून, सायंकाळी निरनिराळ्या भाषांमधील भजनांचा फड रंगत असे. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर झोपायला जाण्यापूर्वी डॉ. पुष्पाताई (त्यांना विद्यार्थी माताजी म्हणत) भागवत सांगत. त्यातूनही सामाजिक जाणीव व शास्त्राध्ययनाची तळमळ, या गोष्टींचेच स्मरण करून दिले जात असे.
माताजींचा दिनक्रम विद्यार्थ्यांच्या दिनक्रमापेक्षाही कठोर असे. पहाटे पाच वाजता उठून नित्यविधी आटोपल्यावर त्या संगणकावर नित्याचे ग्रंथलेखन करीत. या ग्रंथलेखन कार्यात कधीही खंड पडला नाही. 7 वाजता अध्यापन सुरू होई. मध्येमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारून त्या विद्यार्थ्यांना जागरूक करीत. या पन्नासेक विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी त्या स्वत: स्वयंपाकघरातही राबत. ही महिनाभराची कार्यशाळा, समाजातील संस्कृतप्रेमी सज्जनांकडून मदत घेऊन त्या चालवीत. विद्यार्थ्यांकडून त्या शुल्क घेत नसत. श्री रूमडे लिहितात, ‘‘स्फूर्तीचा जणू झराच असणार्‍या या कार्यशाळेत भाग घेऊन संस्कृतचे विद्यार्थी म्हणून आमच्यावर शास्त्राध्ययनाबरोबरच केवढी मोठी सामाजिक जबाबदारी आहे, याची खूणगाठ मनाशी बांधत, माताजींच्या सहवासात या तेज:पुंजातून तेजाचे काही कण घेता आले, यापरती आनंदाची बाब दुसरी कोणती?’’
(‘धर्मभास्कर’वरून साभार)
***        ***        ***

मोटेलमध्ये भगवद्गीता
मोटेल म्हणजे मोटरकारने प्रवास करणार्‍यांकरिता, थांबण्याची व आपली कार ठेवण्याची सोय असलेले हॉटेल. ‘इस्कॉन’ म्हणजे ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कान्शस्नेस’. आपण आपल्या भाषेत म्हणतो ‘हरे कृष्ण’ संस्था. या संस्थेने अमेरिकेतील विभिन्न मोटेलांमध्ये 16000 भगवद्गीतेच्या प्रती ठेवलेल्या आहेत. या गीतेवर हरेकृष्ण संप्रदायाचे संस्थापक श्री प्रभुपाद महाराज यांचे भाष्य आहे. साधारणत: प्रत्येक मोटेलमध्ये बायबलची एक प्रत असतेच. बायबलच्या अशा प्रतींची संख्या 1 लाख 35 हजार आहे. त्याचे अनुकरण करीत ‘इस्कॉन’ने गीतेच्या प्रती ठेवण्याचा उपक्रम 2006 मध्ये सुरू केला. 10 लाख गीतेच्या प्रती ठेवण्याचे लक्ष्य त्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे.
मोटेलमध्ये गीतेच्या या प्रती नि:शुल्क ठेवल्या जातात. अमेरिकेतील धनी भारतीय यासाठी पुरेसे धन देत असतात. प्रभुपादांचे भाष्य वाचून गीतेशी अनभिज्ञ असलेले लोकही गीतेचा अर्थ समजून घेतात.  वॉशिंग्टन डी. सी.मधील मोटेलमध्ये निवास केलेला एक प्रवासी जॉन रॉड्रिग्ज, याने मोटेल मालकाला आभाराचे पत्र पाठवून कळविले की, ‘‘मोटेलच्या मालकाचे मी आभार मानतो की, त्यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. यावरून मला, ‘मी कोण आहे?’, ‘हे जीवन म्हणजे काय?’- याचे ज्ञान झाले. त्यामुळे माझे जीवन अधिक सुखी आणि तणावरहित झाले. माझ्या या सुदैवावर माझाच विश्‍वास बसत नाही. धन्यवाद.’’
***        ***        ***

आता काही गमती
हे पुणेरी फलक वाचा-
1) आम्ही कधी अभ्यास करीत नाही. कारण अभ्यास फक्त दोनच गोष्टींमुळे शक्य होतो. (अ) आवडीने (आ) भीतीने. फालतू आवडी आम्ही ठेवल्या नाहीत. भीत तर आम्ही कोणाच्या बापालाही नाही.
2) सिगारेट बशीमध्ये विझवू नये. नाही तर चहा अ‍ॅश ट्रेमध्ये प्यावा लागेल.
3) आयुष्यातील पहिले वस्त्र म्हणजे लंगोट. त्याला खिसा नसतो. शेवटचे वस्त्र (असते) अंगावर गुंडालेली पांढरी चादर. तिला खिसा नसतो. तरीही आयुष्यभर माणसे खिसे भरून घेण्यासाठी मरत असतात.
4) आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत. त्यामुळे गेटसमोरील गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार नाही. थोड्या वेळाने गेटसमोरील गाडीही दिसणार नाही, याची खात्री बाळगा. गाडी गेटसमोर लावा आणि आकर्षक बक्षिसे मिळवा :- (बक्षिसे अशी)
* पंक्चर टायर    * फाटलेली सीट  * फुटलेले हेडलाईट *       पेट्रोलची टाकी रिकामी आणि बंपर इनाम गाडी पोलिस स्टेशनमध्ये
5) रोज सकाळी उठल्यानंतर श्रीमंत आणि महान व्यक्तींची नावे वाचा. त्यात स्वत:चे नाव नसेल, तर कामाला लागा.
6) बघणार असेल कोणी तर दाढी करण्यात अर्थ आहे. जर कोणीच बघणार नसेल, तर आंघोळ सुद्धा व्यर्थ आहे.
***        ***        ***

राजकीय क्षेत्रातील काही सुभाषिते
1) ‘‘आपण छोट्या चोरांना फासावर लटकवितो आणि मोठ्या चोरांना सरकारी पदे देतो’’ - इसाप
2) ‘‘सर्वत्र राजकारणी लोक सारखेच असतात. जेथे नदी नाही, तेथे पूल बांधण्याचे आश्‍वासन ते देत असतात’’ -निकिता क्रुश्चैव.
3) राजकारण ही अशी एक कला आहे की ती गरिबांकडून मते मिळविते आणि श्रीमंतांकडून पैसा. दोघांनाही परस्परांपासून रक्षण करण्याचे आश्‍वासन ती देत असते. -ऑस्कर अमेरिंगर
4) ‘‘माझ्या विरोधकांना मी एक समझोत्याचा प्रस्ताव दिला. मी म्हणालो, माझ्या विरोधातील असत्य गोष्टी प्रसारित करणे, तुम्ही थांबविले, तर तुमच्याविषयीच्या खर्‍या गोष्टी मी सांगणार नाही.’’ -अ‍ॅडलाय स्टीव्हन्सन.
5) राजकारणी असा माणूस आहे की तो देशासाठी तुमचे प्राणही घेईल.
6) आणि हा एक विनोद.
राजकारणी नदीत बुडून मेला तर काय होईल? अर्थात् पाणी दूषित होईल. पण सारेच राजकारणी बुडून मेले तर?- तर सर्व प्रश्‍न सुटतील.
***     ***     ***

सरदारजी
तुम्हाला माहीत आहे काय की,
1) आयकरातील 33 टक्के भाग शीख देत असतात.
2) देशातील एकूण दानधर्माच्या 67 टक्के भाग शीख करीत असतात.
3) सैन्यातील 45 टक्के संख्या शिखांची असते.
4) 59 हजार गुरुद्वारांमधील लंगरमध्ये रोज 59 लाख लोकांना मोफत भोजन दिले जाते.
5) हिंदुस्थानच्या एकूण लोकसंख्येत त्यांचे प्रमाण किती म्हणता? तर फक्त 1.4 टक्के.

आता ही एक घटना
सुटीत काही मित्र दिल्लीला आले. नगर भ्रमण करण्यासाठी त्यांनी एक टॅक्सी भाड्याने घेतली. चालक होता एक म्हातारा सरदारजी. तरुण मुलेच ती. प्रवासात सरदारजीला चिडविण्यासाठी सरदारजींवरील विनोद ते एकमेकांना सांगू लागले. सरदारजी शांतपणे ते सारे ऐकत होते.
फिरणे संपल्यानंतर त्यांनी त्याला पैसे दिले. सुटे पैसे सरदारजीने त्यांना परत केले पण प्रत्येकाला एक रुपया जास्त दिला. आणि त्यांना म्हणाला, ‘‘तुम्ही इतका वेळ सरदारजींची थट्टा करणारे किस्से सांगितले. त्यातले काही अभिरुचीहीनही होते. पण मी शांतपणे सारे ऐकून घेतले. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. हा जो जास्तीचा रुपया मी तुम्हाला दिला, तो या शहरात किंवा इतरत्रही कुणी शीख भिकारी भेटला, तर त्याला द्या.’’ निवेदक सुमंत आमशेकर सांगतात की, त्या सहलीत माझा एक मित्रही होता. तो म्हणाला, ‘‘अनेक वर्षांनंतरही तो रुपया माझ्याजवळ तसाच आहे.’’


-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. 22-03-2013
babujivaidya@gmail.com

No comments:

Post a Comment