Saturday, 30 March 2013

राम राम!

रविवारचे भाष्य दि. ३१ मार्च २०१३ करिता


राम राम! हे माझे शेवटचे साप्ताहिक भाष्यआहे. तरुण भारताच्या मुख्य संपादकपदाची धुरा १९८३ मध्ये खाली ठेवल्यानंतर, गेली तीस वर्षे दर रविवारच्या अंकासाठी हा स्तंभ मी लिहीत आलो आहे. आता ते लेखन थांबवीत आहे. वयाची नव्वदीही, इंग्रजी पंचांगाप्रमाणे, ओलांडली आहे आणि आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणेही, येत्या तीन-चार दिवसानंतर, तीच अवस्था प्राप्त होणार आहे.

भाष्याचा आरंभ
तरुण भारताचा मुख्य संपादक म्हणून कार्यरत असताना आपल्या नावाने फारसे काही लिहिल्याचे आठवत नाही. अपवाद असलाच तर पुस्तक परीक्षणाचा असू शकतो. अग्रलेखाव्यतिरिक्त काही लिहिले असेल, तर ते नीरदया टोपण नावाने. नीरदहे नाव घेऊन लेखन केव्हा सुरू केले आणि ते केव्हा थांबविले, हे आता आठवत नाही. मात्र संपादकपदावरून निवृत्त झाल्यानंतर, सर्व लेखन आपल्या नावानेच केले.
हे भाष्यलेखन सर्वांनाच आवडले असे नाही. लोकांना आवडेल तेच लिहावे, अशी वृत्तीही नाही. आपले नावही गोडबोलेनाही. पण आवडो वा न आवडो, लोक त्या स्तंभाची उत्सुकतेने वाट पाहात असतात, हे मात्र जाणवत असे. त्या लेखनावर टीका करणारी पत्रे व लेखही येत. माझ्या मुख्य संपादकत्वाच्या कालखंडात, प्रकाशित अग्रलेखांवर किंवा अन्य लेखांवरही जे टीका करणारे लेखन येई, ते आवर्जून, अग्रक्रमाने, प्रकाशित करण्यावर माझा कटाक्ष असे. हे माझ्या सोबत काम केलेल्या सर्वांना माहीत आहे. त्या लेखनात कधी कधी शिवराळही अंश असे. मी तो कायम ठेवीत असे. अशा लेखनावरून आपले काही बिघडत नाही, लिहिणार्‍याची मात्र पातळी दिसते, असा माझा दृष्टिकोन असे. एकदा मी प्रबंध संचालक व मामासाहेब घुमरे मुख्य संपादक असताना, माझ्या लेखावर, प्रतिक्रियारूप आलेल्या लेखात असेच काही असभ्य शब्द होते. ते पत्र श्री घुमरे यांनी माझ्याकडे पाठविले. मी अवश्य छापावे, असे लिहून त्यांच्याकडे परत केले. ते त्यांनी प्रकाशित केले पण तो असभ्य अंश गाळून. मी मामासाहेबांना म्हणालो, ‘‘कशाला आपण गाळलेत ते शब्द? मी तर ते तसेच ठेवीत असे.’’ मामासाहेबांचे उत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, ‘‘तेव्हा, तुम्ही मुख्य संपादक होता; आता मी आहे!’’ आम्हा दोघांचे असे सख्यत्वाचे संबंध होते.

भाष्याचाप्रवास
एक प्रकारचे व्रत म्हणूनच मी तीन दशके हे भाष्य-लेखनकेले. धावत्या आगगाडीतही ते कधी कधी लिहावे लागले. खेड्यावर मुक्काम असताना, तेथे लेखन करून वर्धेला श्री हरिभाऊ वझूरकर यांच्याकडे पाठवीत असे; ते वर्धेवरून नागपूरला रवाना करीत. पुढे फॅक्सची सोय झाल्यावर परगावावरून पाठविणे पुष्कळच सोयीचे झाले.
मी मराठीतच लिहीत असे. अर्थात् नागपूरच्या तरुण भारतासाठी. मग पुणे, औरंगाबाद, मुंबई, सोलापूर इत्यादी स्थानांवरून प्रकाशित होणार्‍या तरुण भारतात ते येई. तरुण भारत असोसिएट्सही व्यवस्था, त्यासाठी काम करी. माझे मित्र श्री पद्माकर भाटे, ‘युगधर्ममध्ये कार्यरत असताना, ते त्याचा हिंदी अनुवाद करून, दिल्लीवरून प्रकाशित होणार्‍या पाञ्चजन्यसाप्ताहिकासाठी पाठवीत असत. युगधर्मातून निवृत्त झाल्यानंतरही ते अनुवादाचे काम करीत; पाञ्चजन्यही ते लेख नियमाने प्रसिद्ध करी. श्री भाटे यांच्या देहावसानानंतर श्री शरद महाजन हे अनुवादाचे काम करीत. पण पुढे पुढे पाञ्जजन्यकडून नियमित प्रतिसाद कमी झाल्यानंतर मीच महाजनांना ते काम थांबविण्यास सांगितले. श्री महाजनही युगधर्मबंद पडेपर्यंत त्या दैनिकात कार्यरत होते. आज श्री भाटे व श्री महाजन दोघेही हयात नाहीत.
कालांतराने पुण्यावरून तरुण भारताचे प्रकाशन बंद झाले. मुंबईवरून निघणारेही बंद पडले. पण ते पुन: सुरू झाले. पण माझे लेखन चालूच राहिले. मग एका घटनेनंतर, २०१० च्या ऑगस्ट महिन्यात मीच ते लेखन थांबविले. माझ्या एका भाष्यानेभारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेते नाराज झाले, व त्यांनी संघातील एका वरिष्ठ अधिकार्‍याकडे आपली नाराजी व्यक्त केली, हे मला कळले; तेव्हा मी त्या संघ अधिकार्‍याची भेट घेतली. ते मात्र नाराज दिसले नाहीत. ते एवढेच म्हणाले की, तुमचे भाष्यम्हणजे लोकांना संघाचे अधिकृत मत आहे असे वाटते. वस्तुत: तसे वाटण्याचे कारण नव्हते. २०१० मध्ये तरी माझ्याकडे संघातील कोणतेही अधिकारपद नव्हते. संघात अधिकारपद असतानाही, माझे भाष्य लेखन चालू होते. तथापि, मीच विचार केला की, कशाला आपण लिहायचे? अन् कशाला अशा बड्या व्यक्तींना नाराज करायचे?- आणि म्हणून लेखन बंद केले.

पुनरारंभ
दोन आठवडे, ‘भाष्यप्राप्त न झाल्यानंतर, औरंगाबादवरून प्रकाशित होणार्‍या देवगिरी तरुण भारताचे त्यावेळचे संपादक श्री दिलीप धारूरकर यांचा मला दूरध्वनी आला. ते म्हणाले, ‘‘आम्हाला भाष्यहवे आहे.’’ मी विचारले, ‘‘मालकांना विचारले काय?’’ त्यांचे उत्तर आले, ‘‘त्यांनीच सांगितले की, ‘भाष्यहवे. माझ्यावर (म्हणजे संस्थेच्या अध्यक्षावर) जरी टीका असली, तरी ते छापावे. मी त्याला उत्तर देईन.’’ त्यावर श्री धारूरकर त्यांना म्हणाले, ‘‘महाराष्ट्र भाजपातील एक मोठे नेते, १-२ भाष्यांमुळे नाराज झाले होते.’’ त्यावर मालकांचे उत्तर होते, ‘‘त्यांनाही सांगा की, ‘भाष्ययेईल. त्याला त्यांनी उत्तर द्यावे, तेही आम्ही छापू. त्यांना वेळ नसेल, तर त्यांच्याकडे आपला प्रतिनिधी पाठवून त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया मागून घ्या.’’ पत्रकारितेच्या संदर्भातील संचालकांच्या या निरामय भूमिकेबद्दल ला त्यांचा अभिमान व कौतुकही वाटले.
या दूरध्वनीवरील संवादानंतर, माझ्या स्मरणाप्रमाणे, २०१० च्या सप्टेंबरपासून भाष्यलेखन पुन: सुरू झाले. श्री धारूरकर म्हणाले, ‘‘मुंबई तरुण भारतालाही हवे आहे. आम्ही त्यांना पाठवू शकतो.’’ मी म्हणालो, माझी हरकत नाही. १-२ महिन्यांनी सोलापूर तरुण भारताच्या संपादकांचेही पत्र आले की, त्यांनाही भाष्यहवे आहे. तेव्हा ते त्यांच्याकडे पाठविणेही सुरू झाले. या मराठी भाष्याचा हिंदी अनुवाद ग्वाल्हेरवरून प्रकाशित होणार्‍या स्वदेशदैनिकात प्रकाशित होत असे. अनुवादाची व्यवस्था नागपुरातच होती. स्वदेशकडूनही पत्र आले की, त्यांनाही भाष्यहवे.

ब्लॉगवर भाष्य
याप्रमाणे भाष्यपुनश्‍च सुरू झाले. पण प्रथम मुंबई तरुण भारतात ते बंद झाले. एका भाष्यावरून त्या दैनिकाचे संपादक व व्यवस्थापक यांच्यात वाद झाला आणि संपादकाला राजीनामा द्यावा लागला. त्या भाष्याचा जोरदार प्रतिवादही करण्यात आला. त्या प्रतिवादाचे शीर्षक होते, ‘वैद्यांचे औषध रोगापेक्षाही भयंकर.मला बरे वाटले. प्रत्येक विषयाला दुसरी बाजू असू शकते आणि ती प्रकट व्हायलाच पाहिजे, असे मला नित्य वाटत आले आहे. तथापि भाष्यहे सदर नागपूरच्या त. भा.त येत नसल्यामुळे, अनेकांना बरे वाटले नाही. पण नवल म्हणजे पत्रकारितेत सक्रिय असणार्‍या लोकांनाही बरे वाटले नाही. त्यापैकी एक, कलकत्त्याहून प्रकाशित होणार्‍या टेलिग्राफया इंग्रजी दैनिकाचे या भागातील प्रतिनिधी श्री जयदीप हर्डीकर हे एकदा घरी येऊन म्हणाले की, आम्हाला ते भाष्य हवे असते. पीटीआयचे श्री जोसेफ राव यांनीही तीच भाना व्यक्त केली होती. मी आपला अडाणी उपाय सांगितला की, ‘‘तुम्ही औरंगाबादचा त. भा. वाचत जा.’’ तेव्हा, श्री हर्डीकरांनी नवा मार्ग सांगितला की, ‘‘तुम्ही ब्लॉगकाढा आणि त्यावर भाष्यटाका.’’ ‘ब्लॉगवगैरे हे आधुनिक तंत्र मला माहीत नव्हतेच. पण माझा मुलगा श्रीनिवास या नव्या पत्रकारितेत आहे. त्याला मी विचारले आणि त्याच्या पुढाकाराने ब्लॉगवर भाष्य येणे सुरू झाले. भिन्न भिन्न टीव्ही चॅनेलाही त्याचा उपयोग करू लागल्या. मा. गो. वैद्य एकदम वृत्तपत्रीय स्तंभाच्या जमिनीवरून दूरदर्शनच्या आकाशात उडू लागला. नागपूरच्या त. भा.च्या वाचकांचीही इच्छा कानावर येई. त्यांनाही कळावे की, विशिष्ट ब्लॉगवर भाष्यउपलब्ध होऊ शकेल, म्हणून त्याची एक जाहिरात, नागपूर त. भा.कडे पाठविली. ती, प्रकाशित झालेली मी बघितली नाही. पण ती बाहेरगावी जाणार्‍या आवृत्तीत प्रकाशित झाल्याचे कळले. नागपूर आवृतीत न येण्याचे कारण, प्रबंध संचालकांनी रात्री एक वाजता दूरध्वनी करून ती काढून टाकायला सांगितले, असे नंतर समजले.
मला नवल वाटले. पण नंतर स्वत: प्रबंध संचालकांनीच घरी येऊन खुलासा केला की, ‘‘मीच ती जाहिरात काढायला सांगितली. जे लेख आमचे वाचक वाचणार नाहीत, ते इतरांनी वाचावे, असे आम्ही कसे कळविणार?’’ मी उत्तरलो, ‘‘अहो, ती जाहिरात आहे. आपण कॉंग्रेस पक्षाची जाहिरात नाही का छापत? ते काय आपल्याला कॉंग्रेसची धोरणे पटतात म्हणून थोडेच असते? शिवाय, औषधांच्याही जाहिराती असतात. आपण ती औषधे वापरत असतो असे थोडेच असते!’’

कृष्ण-धवल दोन्ही
ते बोलणे तेथेच थांबले. त्यानंतर आमच्यात काही पत्रव्यवहार झाला. त्यात त्यांनी माझ्यावर काही आरोपही केले. हा संपूर्ण पत्रव्यवहार तरुण भारतातील आठवणी संबंधीचा जो लेख माझ्या मी आणि माझेया आत्मचरित्रात्मक लेखांच्या पुस्तकाच्या दुसर्‍या सुधारित आवृत्तीत टाकावा असे मला वाटले. या बाबतीत मी माझ्या दोन मित्रांचा सल्ला घेतला. त्यांचे मत असे पडले की, हा दुर्दैवी भाग पुस्तकात टाकू नये. मी त्यांचा सल्ला मानला. शिवाय प्रबंध संचालकांनी घरी येऊन माफी मागितल्यानंतर आपोआपच हे दुर्दैवी प्रकरण संपले.

लेखन बंद नाही
तात्पर्य काय की, आता साप्ताहिक भाष्यबंद. म्हणजे लेखन बंद असे मात्र नाही. कुणी विशिष्ट विषयावर लेख मागितला तर तो मी लिहीन. एक-दोन पुस्तकांचा विचारही मनात आहे. निवडक भाष्यांचा संग्रह काढण्याचाही विचार आहे. २००० ते २००४ या वर्षांतील निवडक भाष्यांचा संग्रह ठेवणीतले संचितया शीर्षकाने अगोदर प्रसिद्ध झालाच आहे. शिवाय, एखाद्या विषयासंबंधी मत प्रदर्शित करावे, असे वाटलेच तर ब्लॉगआहेच. म्हणजे लेखन चालू राहणार आहे. दर सप्ताहाला लिहिण्याचे बंधन तेवढे राहणार नाही. या भाष्यावर गेली तीस वर्षे ज्यांनी प्रेम केले त्यांचे व ज्यांनी त्यावर टीका केली, त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो, आणि या लेखणीला येथे विराम देतो.

राम राम!


-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २९-०३-२०१३
babujivaidya@gmail.com

2 comments:

 1. आदरणीय ... ,
  वैद्य बाबा -----
  सादर प्रणाम !
  पूर्वी तरुण भारत च्या अंकामधून नियमित वाचत असे .नागपुर येथून अंक यायचा नंतर अकोला येथून प्रकाशन सुरु झाले त्यातही भाष्य वाचायला मिळत असे . आता अगदी सहज पने ब्लॉग वर वाचू लागलो .
  केवळ करमणुक नव्हे तर एक आचरणीय विचारांचा खजीना होता माझे साठी . प्रत्रिक्रिया पन लिहू लागलो . आता अगदी मन सवयी झाले आहे .
  व्यसनी व्यक्तिला व्यसना पासून दूर करावे असे होणार आहे .
  मात्र आपण लिहिने बन्द करणार नाही यावर निश्चित मनाला काहिसा दिलासा झाला .
  या वयात देखिल आपण हे करणार यापेक्षा आम्हाला बरे आणखी काय हवे .
  परमात्मा त्रिदेव आपल्या पाठीशी आहेच आपणास उदंड आयुरारोग्य प्रदान करो अशी माँ जगदम्बे कड़े मागणी करुन आपले मार्गदर्शन मिळत राहो ही अपेक्षा !
  परत एकदा प्रणाम !
  आशीर्वाद असु द्यावा !
  --------------------------------
  आपला
  महेशचंद खत्री
  कळंबेश्वर
  मेहकर जिल्हा
  विदर्भ महाराष्ट्र

  ReplyDelete
 2. काका, आपण इथे अनेक थोरामोठ्यांचा उल्लेख केला जे ''भाष्य'' प्रेमी आहेत. परंतू, काही माझ्या सारखे सर्वसामान्य वाचक देखील आपले चाहते आहोत आणि राहू. माझी विनंती आहे की नियमित जरी नाही तरी जसे जमेल तसे अधुन मधुन ब्लॉगवरील लिखाण आपण सुरू ठेवावे. अर्थात हा लहान तोंडी मोठा घास आहे पण ही विनंती आपण मान्य कराल असा विश्वास वाटतो.

  ReplyDelete