Tuesday 28 May 2013

मालेगावचे स्फोट आणि तथाकथित हिंदू आतंकवाद


सन २००६ मध्ये महाराष्ट्रातील मालेगाव या गावी बॉम्बस्फोट झाले होते. हे बॉम्बस्फोट घडवून आणणारे हिंदू होते. ते स्फोट ८ सप्टेंबर २००६ ला झाले होते आणि त्यात ३७ लोकांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटाचे आरोपी असलेल्या चौघांवर गेल्या बुधवारी म्हणजे २२ मे २०१३ रोजी आरोप ठेवण्यात आले.
आश्‍चर्याची म्हणा की मजेची म्हणा गोष्ट अशी की, त्या चार आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर किंवा स्वामी असीमानंद किंवा कर्नल पुरोहित यांचे नाव नाही. पुरोहित यांचे नाव नसणे समजले जाऊ शकते. कारण, हिंदू आतंकवादाचा शोध घेण्यासाठी व आतंकवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारतर्फेच त्यांची योजना करण्यात आली असावी, असा एक मोठा संशय आहे. हा संशय तेव्हाही होता आणि आजही कायम आहे. हे तिघेही सध्या तुरुंगात आहेत.

प्रज्ञासिंग ठाकूर आणि असीमानंद
वस्तुत: हिंदू आतंकवादासाठी, सरकार आणि सरकारचीच री ओढणार्‍या प्रसारमाध्यमांनी, सर्वाधिक बदनामी प्रज्ञासिंग ठाकूर आणि असीमानंद यांचीच केली होती. तथापि अजूनही त्यांच्यावर आरोप निश्‍चित झाले नाहीत. मग ते अजून तुरुंगात का आहेत?
हे खरेच आहे की, मालेगावला बॉम्बस्फोट झाले होते. त्यात ३७ माणसांचा मृत्यू झाला होता. मरणार्‍यांमध्ये, अर्थातच मुसलमानांचा समावेश होता. दि. २२ मे ला, त्या चौघांवर आरोपपत्र ठेवण्यात आल्यानंतर, रात्री मला आयबीएन-लोकमत या टीव्ही सारणीवरून फोन आला की, या प्रकरणात संघाच्या सात स्वयंसेवकांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. आपली प्रतिक्रिया काय? मी म्हणालो, ‘‘मी आज टीव्हीवरील बातम्या बघितल्या नाहीत. पण आपण सांगता ते खरे असेल तर कायद्याने आपले काम करावे.’’ फोन बंद झाला. रात्रीचे साडेनऊ वाजायला आले होते. मी त्यांना फोन केला की, मी आता बातम्या बघतो, आपण १५ मिनिटांनी मला फोन करा. मी सह्याद्री वाहिनीवरून ९॥ ते १० पर्यंत प्रसारित केलेल्या बातम्या ऐकल्या; पण त्या बातम्यांमध्ये या मालेगाव प्रकरणासंबंधी एकही बातमी नव्हती. आयबीएन-लोकमतकडूनही फोन आला नाही. मला दोन्ही गोष्टींचे आश्चर्य वाटले. एवढी मोठी बातमी, तीही महाराष्ट्रात घडलेली आणि सह्याद्री वाहिनीच्या अर्धा तासाच्या प्रदीर्घ प्रसारणात तिचा साधा उल्लेखही असू नये?


सूडाचे कृत्य
पण दुसर्‍या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये ती बातमी वाचायला मिळाली. इंडियन एक्सप्रेस, तरुण भारत व लोकशाही वार्ता ही तीन वृत्तपत्रे आमच्याकडे येतात. इंडियन एक्सप्रेसमध्ये पहिल्या पानावर सुमारे दीड कॉलम रुंदीचे शीर्षक देऊन ती प्रसिद्ध केली आहे. त्या बातमीत ज्या चार आरोपींचा उल्लेख आहे, त्यात साध्वी प्रज्ञासिंग किंवा असीमानंद यांचा उल्लेख नव्हता. ज्या चौघांवर ते आरोप ठेवण्यात आले होते, ते संघाचे स्वयंसेवक असल्याचाही उल्लेख नव्हता. त्यांची लोकेश शर्मा, धनसिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया अशी नावे दिली होती; आणि त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, मोक्का कायदा आणि अन्य दोन-तीन कायदे यांच्या कलमान्वये खटला भरला असल्याची माहिती दिली होती. त्या बातमीत असेही म्हटले होते की, ‘‘२००२ मध्ये जम्मूच्या रघुनाथ मंदिरावर, २००५ मध्ये श्रमजीवी एक्सप्रेसवर आणि २००६ मध्ये काशीच्या संकटमोचन मंदिरावर झालेल्या हल्ल्यांचा सूड म्हणून मालेगावात स्फोट करण्यात आले होते.’’ या तिन्ही ठिकाणी झालेले हल्ले मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेले होते, हे वेगळे सांगायला नकोच. मालेगावच्या या स्फोटांचा तपास प्रथम महाराष्ट्राची दहशतवादविरोधी यंत्रणा (एटीएस) नंतर सीबीआय, आणि शेवटी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांनी केला. आरोपपत्र एनआयएनेच तयार केले आहे.

जिहाद आणि हिंसा
मी आयबीएन-लोकमतला जे दि. २२ ला सांगितले, त्याचा आजही पुनरुच्चार करतो की, कायद्याने आपले काम करावे. पण माझा प्रश्‍न हा आहे की, या प्रकरणाला हिंदू आतंकवाद म्हणावे काय? हिंदू आतंकवाद नावाची काही वस्तू जगात कुठे अस्तित्वात आहे काय? जगभर जो गाजत आहे तो जिहादी आतंकवाद म्हणजे मुस्लिम आतंकवाद आहे. याचा अर्थ सारे मुसलमान आतंकवादी आहेत, असे नाही. पण जिहादहे निष्ठावान मुस्लिमांचे पवित्र कर्तव्य मानलेले आहे, हे कोणीही नाकबूल करणार नाही. जिहाद फि सिबिलिल्लाहअसे जिहादचे पूर्ण नाव आहे. त्याचा अर्थ अल्लाहच्या मार्गासाठीचा प्रयत्नअसा आहे. अल्लाहच्या मार्गासाठीचा प्रयत्न अर्थात् पवित्रच राहणार. त्यामुळे जिहादला एक प्रकारचे पावित्र्य चिकटलेले आहे. या ध्येयाने प्रेरित होऊनच पैगंबरसाहेबांच्या अनुयायांनी -खलिफांनी- अभूतपूर्व पराक्रम प्रकट केला होता. केवळ शंभर वर्षांच्या अवधीत संपूर्ण पश्‍चिम आशिया, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण युरोप त्यांनी पादाक्रांत करून इस्लामी बनविला होता. त्यांनी सैन्याच्या बळावरच हे यश संपादन केलेले असल्यामुळे जिहाद आणि हिंसा यांचे अतूट नाते तयार झालेले आहे.
त्या जिहादचे आकर्षण आजही कायम आहे. १९९३ चे मुंबईतील बॉम्बस्फोट असोत, संसदेवरील हल्ला असो, २००८ चा पुन: मुंबईतील ताजमहाल हॉटेलवरील हल्ला असो किंवा अलीकडच्या म्हणजे २०१३ च्या फेब्रुवारीतील हैदराबाद येथील किंवा एप्रिल २०१३ चा बंगलूरूचा हल्ला असो, हे सारे जिहादी हल्ले आहेत आणि हे प्रकार भारतापुरतेच मर्यादित नाहीत. २००१ चा अमेरिकेच्या प्रतिष्ठित संस्थांवरील हल्ले असोत की अलीकडचा बोस्टनचा हल्ला असो, हे सारे जिहादी हल्ले आहेत, याविषयी संशय नको. हल्लेखोरही ते लपवीत नाहीत.

काळ बदलला आहे
परंतु आता जमाना बदलला आहे. हे सातवे-आठवे शतक नाही. एकवीसावे शतक आहे. या हल्ल्यांनी, आता इस्लामचा गौरव वाढत नाही; उलट त्याची बदनामी होते आहे; ‘इस्लामचा अर्थ शांतीअसा आहे. त्याच्याशी जिहादी हल्ले पूर्णत: विसंगत आहेत याची जाणीव भारतातील अनेक मुसलमानांनाही झालेली आहे. ७ व्या शतकात सैन्यबळाने जसा अद्वितीय विजय प्राप्त झाला, तसा या शतकातच काय, पण पुढे केव्हाही मिळावयाचा नाही. सध्या तर अनेक मुस्लिम राष्ट्रे, अगदी शेजारच्या पाकिस्तानपासून प्रारंभ केला तर अफगानिस्थान, इराण, इराक, सीरिया, लिबिया या सर्व देशांमध्ये मुसलमानच मुसलमानांविरुद्ध जिहाद चालवीत आहेत. एकवेळ काफिरांविरुद्ध जिहाद ठीक मानले जाईल. पण वर उल्लेखिलेल्या देशांमध्ये कोण काफीरआणि कोण जिहादी’? बहुधा ते परस्परांनाच काफीरसमजत असतील!

भारतातील राजकारण
आपल्या देशातले राजकारण जरा वेगळ्याच प्रकारचे आहे. या राजकारणात आणि त्याचा प्रक्षेप म्हणून समाजकारणात आणि विशेषत: प्रसारमाध्यमांमध्ये हा जो मुस्लिमांचा जिहादी आतंकवाद आहे, त्याच्या तोडीस तोड म्हणून हिंदू आतंकवादही आहे, असे सांगितले व प्रचारिले जाते. या जिहादी आतंकवादी घटनांच्या विरोधात कुठेच काही प्रतिक्रिया उमटत नाही, असे म्हणता यावयाचे नाही. मालेगावचे स्फोट, तत्पूर्वीच्या तीन जिहादी स्फोटांची प्रतिक्रिया होती, हे वर सांगितलेच आहे. पण या सेक्युलॅरिस्टांची एक खास शैली बनलेली आहे. ती ही की, मुसलमानांकडून काही प्रक्षोभक कृत्य घडले की, लगेच तोडीस तोड म्हणून हिंदूंचेही तसेच कृत्य उभे करायचे. ओवेसी काही अत्यंत प्रक्षोभक बोलले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची पाळी सरकारवर आली की लगेच कुणातरी तोगडियांचा शोध घ्यायचा, अशी ही रीत आहे. आपल्या देशाचा मुख्य राष्ट्रीय प्रवाह हिंदूंचा आहे, याचे त्यांना अवधान नसतेच. पण हे काहीच नाही. हिंदूंकडून काही प्रतिक्रिया घडली की, ज्या क्रियेची ती प्रतिक्रिया होती, त्या क्रियेकडे दुर्लक्ष करावयाचे व प्रतिक्रियेलाच झोडपीत जावयाचे ही त्यांची रीत बनली आहे. म्हणजे गोधर्‍याला ५७ हिंदूंना मुसलमानांकडून जिवंत जाळण्यात आले हे विसरून जायचे आणि त्याची उग्र प्रतिक्रिया गुजराती लोकांसारख्या शामळू समजलेल्या गेलेल्या समूहात उमटली तर तिचाच गाजावाजा करायचा, असे हे तंत्र आहे. एकदा ही विचाराची आणि विशेषत: प्रसिद्धीची रीत ठरली की मग सर्वत्र व्यापक जिहादी आतंकवादाला बाजूला सारण्याची आणि हिंदू आतंकवादाच्या नावाने बोंब ठोकायची नीती आपोआपच स्वीकारावी लागते. मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी, ही नीती फायदेशीर ठरते, असा राजकारण्यांचा अनुभव असल्यामुळे ते याच रीतीने वागणार, हे लक्षात घ्यायचा हवे. मुळात आतंकवाद ‘हिंदूराहूच शकत नाही. हिंदूंकरिता ते धार्मिक किंवा पवित्र कर्तव्य असूच शकत नाही. प्रतिक्रिया वेगळी आणि मूळ कृत्य वेगळे, याचा विवेक आपणास करता आला पाहिजे. हिंदू आतंकवादी असते, तर इराणातून हाकलले गेलेले पारशी भारतात प्रतिष्ठेने राहू शकले असते काय? किंवा युरोपात ज्यांची होरपळ झाली, ते ज्यू भारतात शांतिपूर्वक जीवन जगू शकले असते काय? हिंदूंच्या राज्यांमध्ये, अगदी विजयनगर साम्राज्याच्या काळात किंवा शिवछत्रपतींच्या काळात देखील मशिदी उभ्या राहू शकल्या असत्या काय?- याचा विचार केला पाहिजे आणि नंतरच आतंकवादाला हिंदूहे विशेषण लावायला धजले पाहिजे. आपल्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी हिंदू आतंकवादाचा धोशा लावणे, यासारखे राष्ट्रहिताला बाधक असे अन्य खोटारडे कोणते कृत्य असेल? आणि शेवटी सांगायचे म्हणजे तीन तीन तपास यंत्रणा, गेल्या सात वर्षांपासून तपास करीत आहेत आणि असीमानंद किंवा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विरुद्ध अजूनही साधे आरोपपत्रही तयार करू शकत नाहीत, याला काय म्हणावे? त्यांना अजून डांबून ठेवण्यात सूडबुद्धीशिवाय दुसरे काहीही नाही, असे म्हणणे चूक ठरेल काय?

-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. २४-०५-२०१३
babujivaidya@gmail.com
............................................................................................................................................

सर्वांना विनंती
या ब्लॉगवर माझे जे लेख प्रकाशित होतीलते वापरण्यासाठी सर्वांना अनुमती आहेअसे समजावे. त्यासाठी मला कोणत्याही मानधनाची अपेक्षा नाही. फक्त लेख ज्या अंकात प्रसिद्ध झाला असेलतो अंक कृपया माझ्या खालील पत्त्यावर पाठवावाही विनंती.

-मा. गो. वैद्य
१९जयप्रकाशनगरपोस्ट-खामलानागपूर-४४ ०० २५



No comments:

Post a Comment