Friday 14 June 2013

संघ आणि राजकारण


‘संघ आणि राजकारण’ या शीर्षकाचा हा लेख लिहावयाला मला प्रवृत्त केले, दि. 13 जूनच्या ‘इंडियन एक्सप्रेस’ या सुविख्यात इंग्रजी दैनिकातील संपादकीय लेखाने. ‘इंडियन एक्सप्रेस’मधील लेखाचे शीर्षक आहे "Coming Out".  आपल्या मराठी भाषेत त्याचा अनुवाद होईल ‘प्रकटीकरण’. आणखी एक कारण घडले. ते हे की दि. 13 जूनलाच Times Now या वृत्तवाहिनीचे मुंबईचे प्रतिनिधी मला भेटायला आले आणि त्यांनीही ‘संघ आणि राजकारण’ या विषयासंबंधीच माझी मुलाखत घेतली. येत्या रविवारी म्हणजे दि. 16 ला, ‘टाईम्स नाऊ’, एक तासभर ‘पॉलिटिक्स’ या मथळ्याखाली चर्चा प्रकट करणार आहे. त्या चर्चेच्या निमित्ताने ही मुलाखत होती.

या लेखाचे कारण

‘इंडियन एक्सप्रेस’च्या संपादकीयाचा मथितार्थ असा आहे की संघाने सरळसरळ राजकारणात यावे. संघाने आपण अराजकीय असल्याची काल्पनिक कथा (fiction) सोडून द्यावी. भाजपाकरिता नागपूर (अर्थात् रा. स्व. संघ) म्हणजे काँग्रेसकरिता जसे 10 जनपथ (अर्थात् श्रीमती सोनिया गांधी यांचे निवासस्थान) आहे, तसे आहे. संघाला उपदेश करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यामुळे ‘इंडियन एक्सप्रेस’ने असे लिहिण्यात गैर काही नाही. मात्र, या उपदेशातून, संघासंबंधी त्यांचे अज्ञान आणि संभ्रम तेवढे प्रकट होतात, हे त्यांनीही विचारपूर्वक ध्यानात घ्यावे, म्हणून हा लेखनप्रपंच.

‘राष्ट्र’चा अर्थ

हे खरेच आहे की, संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यथार्थतेने समजून घेणे थोडे कठीण आहे. कारण सार्वजनिक जीवनात कार्यरत असणार्‍या ज्या अनेक संस्था आहेत, त्यांच्या नमुन्यात संघ बसत नाही. लोकांच्या हे लक्षात येत नाही की, संघ हे संपूर्ण समाजाचे संघटन आहे, समाजांतर्गत एक संघटित टोळी नाही. समाज व्यामिश्र (complex) असतो. म्हणजे त्याच्या जीवनाची विविध क्षेत्रे असतात. राजकारण किंवा राजकीय क्षेत्र हे त्यातले एक क्षेत्र आहे. एकमेव क्षेत्र नव्हे. धर्म, शिक्षण, अर्थ, श्रम, उद्योग, कृषी, आरोग्य, विज्ञान, साहित्य अशी अनेक क्षेत्रे आहेत. तसेच वनवासी, मजूर, विद्यार्थी, शिक्षक, अधिवक्ता, डॉक्टर- वैद्य, असे आपल्या समाजाचे नानाविध घटक आहेत. संपूर्ण  समाजाचे संघटन याचा अर्थ या सर्व समाजक्षेत्रांचे व समाजघटकांचे संघटन. याचेच नाव राष्ट्रीय संघटन. कारण राष्ट्र म्हणजे केवळ राज्यव्यवस्था नसते. राष्ट्र म्हणजे लोक असतात. People are the Nation हे सर्वांना ज्ञात आहेच.

सांस्कृतिक राष्ट्रवाद

कोणत्या लोकसमूहाचे राष्ट्र होते, यासंबंधी संघाच्या काही निश्‍चित धारणा आहेत. मुख्य तीन धारणा आहेत. (1) ज्या देशात आपण राहतो, त्या भूमीविषयीची आपली भावना, (2) आपल्या पूर्वजांसंबंधीचे ज्ञान आणि त्यांच्याशी आपला संबंध आणि त्या लोकसमूहाचा जो इतिहास असतो, तो त्या समूहाला आपला इतिहास वाटणे. इतिहासात सर्वच विजयाचे आणि अभिमानाचे प्रसंग असतात, असे नाही. पराभवाचे व लज्जेचेही प्रसंग असतात. पण ते सर्वांना आपल्या यशापयशाचे आणि अभिमान-लज्जेचे प्रसंग वाटले पाहिजे आणि (3) जी सर्वात महत्त्वाची बाब आहे, ती ही की बरे-वाईट ठरविण्याचे समाजाचे मापदंड; म्हणजेच त्याची मूल्यधारणा (Value system). ही मूल्यधारणा म्हणजेच संस्कृती असते; आणि आपल्या राष्ट्रीयत्वाचा हा आधार संघ मानीत असल्यामुळे आम्ही म्हणतो की, आमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. वर सांगितलेल्या तीन धारणा धारण करणार्‍या लोकांचे सर्वपरिचित नाव ‘हिंदू’ असल्यामुळे हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदू हा एक रिलिजन किंवा मजहब नाही. अनेक रिलिजन्सला आपल्या पोटात घेणारा तो एक महासागर आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् किंवा अन्य कुणीतरी म्हटले आहे की, Hinduism is not a religion, it is a commonwealth of many religions. आपण ‘धर्म’ शब्दाचा ‘रिलिजन’ असा अनुवाद करीत असल्यामुळे खूप वैचारिक संभ्रम निर्माण होतो. आपल्या नित्याच्या व्यवहारातील काही शब्द घ्या, जसे धर्मशाळा, धर्मार्थ दवाखाना, धर्मकांटा, राजधर्म, पितृधर्म इत्यादी आणि या सर्व शब्दांमधील ‘धर्म’ शब्दासाठी ‘रिलिजन’ किंवा ‘रिलिजस’ हा पर्याय वापरून बघा आणि काय गंमत होते त्याची मजा घ्या.

अर्नेस्ट रेनाँचे प्रतिपादन

या ठिकाणी मला अर्नेस्ट रेनाँ या फ्रेंच लेखकाचे वचन उद्धृत करण्याचा मोह होतो. ते वचन असे.
"The soil provides the substratum, the field for struggle and labour, man provides the soul. Man is everything in the formation of this sacred thing that we call a people. Nothing that is material suffices here. A nation is a spiritual principle, the result of the intricate workings of history, a spiritual family and not a group determined by the configuration of the earth."
 रेनाँ पुढे म्हणतो-
"Two things which are really one go to make this soul or spiritual principle. One of these things lies in the past, the other in the present. The one is the possession in common of a rich heritage of memories and the other is actual agreement, the desire to live together and the will to make the most of the joint inheritance. Man cannot be improvised. The nation like the individual is the fruit of a long past spent in toil, sacrifice and devotion."
 तात्पर्य असे की संघाचा संबंध संपूर्ण राष्ट्रकारणाशी आहे; आणि राजनीती हाही राष्ट्रकारणाचाच एक अंश असल्यामुळे राजनीतीशीही त्याचा संबंध आहे. तो आजचा नाही. फार जुना आहे. संघ ज्यांनी स्थापन केला त्या डॉ. हेडगेवारांनी संघस्थापनेनंतर 1930 साली जंगल सत्याग्रहात भाग घेऊन कारावास भोगला होता; आणि आणिबाणी संपविण्यासाठी जो विशाल सत्याग्रह झाला होता, त्या सत्याग्रहात संघाने म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांनी हिरीरीने भाग घेतला होता. ही दोन्ही राजकीय आंदोलने होती. पण त्यांचा संबंध राष्ट्रजीवनाशी होता.

विशिष्ट कार्यपद्धती

पण संघाची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. ज्या क्षेत्राचे संघटन व्हावे, असे त्याला वाटते, त्या क्षेत्राला तो कार्यकर्ते देतो. काही क्षेत्रांच्या बाबतीत पुढाकार अन्यांचा राहिलेला आहे व संघाने त्यांना काही कार्यकर्ते दिले. भारतीय जनसंघ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केला. त्यासाठी संघाने पं. दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख, सुंदरसिंग भंडारी, कुशाभाऊ ठाकरे, डॉ. महावीर इत्यादी श्रेष्ठ दर्जाचे कार्यकर्ते दिले. यापैकी डॉ. महावीर सोडून बाकी सर्व संघाचे पूर्णकालीन प्रचारक होते. डॉ. मुखर्जींच्या अकाली निधनामुळे, पक्ष चालविण्याची व वाढविण्याची जबाबदारी या मंडळीवर आली व ती त्यांनी उत्तमपणे पार पाडली. 1977 मध्ये जनसंघाचे जनता पार्टीत विलयन झाल्यानंतर, जनसंघ एक प्रकारे संपला. पण जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संघाचे स्वयंसेवक राहता येणार नाही, अशी टूम त्या पार्टीत निघाल्यामुळे, संघाशी संबंध कायम राहावा, असे वाटणारे स्वयंसेवक त्यातून बाहेर पडले आणि 1980 साली त्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. जनता पार्टीतून बाहेर पडून भाजपाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे संघाचे स्वयंसेवक होते. संघाच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य हे आहे की, त्या त्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी ते ते क्षेत्र चालवावे आणि वृद्धिंगत करावे. या दृष्टीने ती ती क्षेत्रे स्वतंत्र व स्वायत्त आहेत. म्हणजे त्यांचे स्वतंत्र संविधान असते. संस्थेसाठी लागणारे धन गोळा करण्याची त्यांची स्वत:ची पद्धती असते. कोणतेही क्षेत्र धनासाठी संघावर अवलंबून नसते.
मला जाणीव आहे की अन्य क्षेत्रांची चर्चा येथे अप्रस्तुत ठरेल. तथापि, हे सांगितले पाहिजे की, वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना श्री बाळासाहेब देशपांडे या सरकारी अधिकार्‍याने केली होती. त्यांना संघाने सुरवातीला दोन कार्यकर्ते दिले होते. भारतीय मजदूर संघाची स्थापना दत्तोपंत ठेंगडी या संघाच्या कार्यकर्त्याने केली; तर विश्‍व हिंदू परिषदेच्या स्थापनेत तत्कालीन सरसंघचालक श्री मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांचा स्वत:चा पुढाकार होता. पण ते विहिंपचे अध्यक्ष बनले नाहीत. पदाच्या आकर्षणाने कार्य प्रारंभ करणार्‍यांना श्रीगुरुजींचे हे वर्तन अप्रूप आणि अनाकलनीय वाटले, तर त्यात नवल नाही.

स्वतंत्र आणि स्वायत्त

संघ काय करतो? तो सुरवातीला कार्यकर्ता किंवा कार्यकर्तेही देतो. ते कार्यकर्ते, त्या त्या क्षेत्रात स्वायत्ततेने कार्य करीत असतात. अधूनमधून संघाशी परामर्श होतोच. संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेत या सर्व क्षेत्रांची प्रातिनिधिक उपस्थिती असते. पण याचा अर्थ, संघ त्यांच्या पदाधिकार्‍यांची निवड करतो, असा करणे गैर आहे. राजकीय पक्ष ठरवितो आपले पदाधिकारी कोण ते? या पदाधिकार्‍यांमध्ये संघाने अधिकृतपणे दिलेला कार्यकर्ताही असू शकतो. पण निर्णय त्या त्या संघटनेचा असतो. कोणत्या मतदारसंघातून लोकसभेचा कोण उमेदवार असावा, हे संघ सांगत नाही. कोणत्या प्रांतात भाजपाचा कोण अध्यक्ष असावा हेही संघ ठरवीत नाही. 10 जनपथ असेच करीत असते काय, हे ‘इंडियन एक्सप्रेस’च्या विद्वान संपादकांनी सांगावे व मग तुलना करावी.
एखाद्या विशिष्ट बाबतीत, त्या त्या क्षेत्राचे लोक संघाच्या अधिकार्‍यांशी सल्लामसलत करीत असतात. पण निर्णय त्यांचा असतो. संघाची एवढी अपेक्षा मात्र नक्कीच असते की, त्या त्या संघटनेने आपल्या संघटनेपेक्षा राष्ट्राला मोठे मानले पाहिजे. म्हणजेच समाजाला आणि समाजाच्या मूल्यव्यवस्थेला श्रेष्ठ मानले पाहिजे. चूक म्हणा की बरोबर पण संघ हे सांगतो की, व्यक्ती श्रेष्ठ नाही, संघटन श्रेष्ठ आहे, आणि संघटनेपेक्षाही राष्ट्र श्रेष्ठ आहे. संघात अशीच पद्धती रूढ आहे. म्हणून संघात ‘डॉ. हेडगेवार की जय’ किंवा ‘श्रीगुरुजी की जय’ अशी घोषवाक्ये नाहीत. संघाचे एकच घोषवाक्य आहे आणि ते आहे ‘भारत माता की जय’. याचे तात्पर्य समजणे अवघड वाटू नये, असे मला वाटते.

अडवाणी प्रकरण

आता ताजे प्रकरण, श्री लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनाम्याचे. त्या राजीनाम्याचे खरे कारण तेच सांगू शकतील. त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात पक्षाकडून काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. त्या अपेक्षा ठीकच आहेत. त्यांचा राजीनामा अचानक आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. सरसंघचालकांनाही बसला असेल. माझी माहिती अशी आहे की, भाजपातल्याच कुणा तरी वरिष्ठ नेत्याने सरसंघचालकांच्या कानावर ही गोष्ट टाकली आणि सरसंघचालकांनी अडवाणींशी बोलावे, हे सूचित केले. प्रथम दूरध्वनी कोणी केला? अडवाणींनी की भागवतांनी?- असे प्रश्‍न उपस्थित करण्यात मतलब नाही. भाजपात संकट उपस्थित झाले आहे, ते दूर व्हावे, असेच सर्व भाजपाच्या हितचिंतकांना वाटले असणार. अन्यथा, भाजपाच्या संसदीय मंडळाने अडवाणींचा राजीनामा ताबडतोब मंजूर केला असता व प्रश्‍न तेथेच कायमचा मिटविला असता. पण त्यांनी राजीनामा नामंजूर केला. कारण त्यांना नक्कीच वाटले असणार की, अडवाणीसारख्या वयोवृद्ध, अनुभवसमृद्ध, ज्येष्ठ नेत्याने पक्षात राहिले पाहिजे आणि याच दृष्टीने कुणी तरी सरसंघचालकांना विनंती केली असेल. यात वावगे काय आहे? आपल्या कार्यकर्त्यांनी चालविलेली कार्ये नीट चालावीत, त्यात मतभेद असले, तरी मनभेद असू नयेत, असे वाटणे स्वाभाविकच नाही काय?

संघाचा निर्धार

‘इंडियन एक्सप्रेस’च्या संपादकांनी उपदेश केला आहे की, संघाने सरळ राजकारणात यावे. पण संघ तो उपदेश मानणार नाही. कारण त्याला राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्त्वाचे वाटते; आणि राजकारणानेही राष्ट्रकारणाचेच श्रेष्ठत्व मान्य केले पाहिजे, अशी संघाची अपेक्षा आहे. निवडणुकीच्या राजकारणात उतरण्यासाठी संघाला कुणीही अडवू शकत नाही. पण राजकारणासारख्या समाजजीवनाच्या एका क्षेत्राशी एकरूप व्हावयाचे नाही, अशी संघाची भूमिका आहे आणि निर्धारही आहे. आपल्या शास्त्रात आत्मतत्त्वाचा किंवा प्राणतत्त्वाचा संपूर्ण ऐहिक जीवनाशी जो आणि जसा संबंध असतो, तसा संघाचा या सर्व क्षेत्रांशी आहे. त्यामुळे, तो त्या सर्व क्षेत्रांशी संबद्धही आहे आणि संबद्धही नाही. ईशोपनिषद् आत्मतत्त्वाच्या या वरपांगी परस्परविरुद्ध वर्तनाचे असे वर्णन करते-
तदेजति तनैजति। तद् दूरे तद्वन्तिके।
तदन्तरस्य सर्वस्य। तदु सर्वस्यास्य बाह्यत:।
या मंत्राचा सरल अर्थ असा आहे- ‘‘ते हालचाल करते, आणि ते हालचाल करीत नाही. ते दूर आहे आणि ते जवळ आहे. ते सर्वांच्या आत आहे आणि ते सर्वांच्या बाहेर आहे.’’
संघ, आपल्या नावातील ‘राष्ट्रीय’ या आद्यपदाशी सुसंगत अशा, राष्ट्रजीवनाच्या आत्मतत्त्वाप्रमाणे म्हणा अथवा प्राणतत्त्वाप्रमाणे आहे.


-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. 14-06-2013

babujivaidya@gmail.com

1 comment:

  1. वैद्य साहेब माझ्या पिढीचे पोषण हेच मुळात आपले त.भा मधील भाष्य वाचत झाले.तुम्हीच आम्हाला राष्ट्र,राज्य आणि देश या संकल्पना समजून सांगितल्या.....असो आपले ब्लॉग वाचून बरीच माहिती मिळते.....आपणास उदंड आयुष्य लाभो..प्रशांत आर्वे..चंद्रपूर

    ReplyDelete