Sunday 6 July 2014

शंकराचार्य, साईबाबा आणि हिंदूधर्म


शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद महाराजांनी साईबाबांसंबंधी मतप्रदर्शन करून विनाकारण एका वादाला जन्म दिला. तथापि याचे आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण स्वरूपानंद महाराज वाणी-संयम पाळून बोलतात अशी त्यांची कीर्ती नाही. काही लोकांना साईबाबा केवळ संत न वाटता भगवंत वाटले, तर त्यात हिंदूधर्माचे काय बिघडले? जोपर्यंत साईभक्त इतरांना त्यांना (साईबाबांना) भगवान मानून त्यांची पूजा करण्यासाठी जबरदस्ती करीत नाहीत, किंवा बळाचा वापर करीत नाहीत, तोपर्यंत इतरांनी त्यांच्या भावनेचा विरोध करण्याचे कारण नाही.

हिंदू धर्माचा विकास
हिंदू धर्माच्या आजवरच्या विकासाचा वेध घेतला, तर आपणांस असे दिसून येईल की काळाच्या ओघात अनेक देवता आपल्यामध्ये आलेल्या आहेत. त्यांची मंदिरे आणि उपासनाकेंद्रेही बनली आहेत. अट एकच आहे की, दुसर्‍याचे मंदिर पाडून  तेथे आपल्या देवतेचे मंदिर उभे करता येणार नाही. पश्‍चिमेकडून आलेल्या इस्लामी आक्रमकांनी हा संयम पाळला नाही, म्हणून अजूनही अनेक इस्लामचे भक्त आपल्या भारतीय राष्ट्रीय मूल्यव्यवस्थेपासून दूर राहिले आहेत. पोर्तुगीजादि युरोपियन आक्रमकांनीही असाच अत्याचार व अनाचार केला. हिंदूंचे एक मूलभूत सत्य आहे. ‘‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति’’ या वाक्यात त्या सत्याचे मर्म सामावलेले आहे. सत्य एक आहे, म्हणजे परमात्मा एक आहे, पण लोक वेगवेगळ्या नावांनी त्याचे वर्णन करू शकतात. त्यामुळे अनेक देवतांचा अंतर्भाव आपल्या हिंदू धर्मात झाला आहे. हा अनेकेश्‍वरवाद नव्हे. हा एकेश्‍वरवादच आहे. फक्त रूप व नाव वेगळे आहे. एका सत्याची प्रत्येकाला त्याच्या  रूचीप्रमाणे अनेक रूपे करता येऊ शकतात. रुचीनां वैचित्र्याद् ऋजुकुटिलनानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव या शिवमहिम्न: स्तोत्रातील पंक्तीत हा भाव व्यक्त झालेला आहे.

इतिहासाचा वेध
आपल्या धर्माचा इतिहास बघण्यासारखा आहे. आपल्या अत्यंत प्राचीन वेदग्रंथांमध्ये इंद्र, वरुण आणि अग्नी या तीन प्रमुख देवतांना वाहिलेली सूक्ते आहेत. आहे काय आपल्या देशात इंद्राचे एखादे मंदिर? मला तरी माझ्या भारतभ्रमणात दिसले नाही. वरुणाचे आहे म्हणतात. एका सिंधी गृहस्थाने मला एक मंदिर दाखवले होते व हे वरुणाचे आहे असे आवर्जून सांगितले होते. अग्निशाळा मात्र आहेत. ज्यांची मंदिरे आज बहुसंख्येने उभी आहेत, त्या देवतांची नावे देखील वेदग्रंथांमध्ये नाहीत. शिव रुद्ररूपात आहे. विष्णू आदित्यरूपात आहे. पण चतुर्भुजधारी विष्णू नाही. राम, कृष्ण, दुर्गा, गणेश, हनुमान यांची नावे असणेच शक्य नाही. राम, कृष्ण हे ऐतिहासिक पुरुष आहेत. प्रभू रामानेच, रामायणात आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम् म्हणजे मी दशरथाचा मुलगा राम, एक मनुष्य आहे, अशी आपली ओळख करून दिली आहे. हिंदू धर्माचेच हे वैशिष्ट्य आहे की त्याने स्त्रीरूपालाही देवतेचे स्थान दिले आहे. राम म्हटले की सीता आलीच. कृष्ण म्हटले की राधा आलीच. व्याकरण सांगते की द्वन्द्व समासात दोन्ही पदे समकक्ष असतात. पण आमच्या व्याकरणाचा नियम आहे की, त्या समासातही पहिले नाव स्त्रीरूपाचे असले पाहिजे. सीताराम, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण, गौरीशंकर अशी नावे आहेत. कालौघात वेगळ्या रूपांनी आणि नावांनीही काही दैवते आली आहेत. विठोबा, खंडोबा, जगन्नाथ असे त्यांचे नवे अवतार आहेत. अलीकडच्या काळात संतोषी माताआली आहे. साईमंदिरेउभी झाली आहेत. आमच्या गावच्या मंदिरात पंचायतन मूर्तींची स्थापना तर आहेच, बाहेर हनुमंतही आहे. पण संत केजाजी महाराजांच्याही पादुका आणि आता पुतळाही आला आहे. ज्याला जे पूजनीय वाटेल, त्याला त्याची पूजा करण्याची मोकळीक आहे. कारण हिंदू धर्म हा काही पंथ नाही. तो मानव धर्म आहे.

गौतम बुद्धालाही आम्ही अवतार मानले आहे. आर्यसमाजी मूर्तिपूजेच्या विरुद्ध आहेत. राम व कृष्ण यांना ते ईश्‍वराचे अवतार मानीत नाहीत. महापुरुष मानतात. ते अग्नीचे उपासक आहेत. त्यांना तसे मानण्याचे स्वातंत्र्य आहे आणि तरी ते हिंदूच आहेत.

हिंदू धर्माची गतिशीलता
डॉ. राधाकृष्णन यांनी हिंदू धर्माच्या या वैशिष्ट्याचे आपल्या Hindu View of Life या पुस्तकात सुरेख वर्णन केले आहे.
Hinduism is a movement, not a position; a process, not a result; a growing tradition, not a fixed revelation. Its past history encourages us to believe that it will be found equal to any emergency that the future may throw up, whether in the field of thought or of history.
Leaders of Hindu thought and practice are convinced that the times require, not a surrender of the basic principles of Hinduism, but a restatement of them with special reference to the needs of a more complex and mobile social order. Such an attempt will only be the repetition of a process which has occurred a number of times in the history of Hinduism.

(भावार्थ- हिंदू धर्म गतिशील आहे, स्थिर अवस्था नाही; एक प्रक्रिया आहे, परिणाम नाही; वर्धिष्णू परंपरा आहे, अपरिवर्तनीय साक्षात्कार नाही. भविष्यात वैचारिक अथवा इतिहासाच्या संदर्भात उद्भवणार्‍या प्रसंगी तो नित्य समतोल राहील, असा त्याचा पूर्वेतिहास आम्हाला खात्री देतो.
काळानुरूप हिंदू धर्माच्या मूळ तत्त्वांना तिलांजली न देता अधिकाधिक व्यामिश्र आणि बदलत्या सामाजिक रचनेच्या संदर्भात त्या तत्त्वांचे पुन:प्रतिपादन करायचे असते, याची हिंदू विचार व आचारधर्माच्या महापुरुषांना चांगलीच जाण आहे. अशा प्रकारचा प्रयत्न म्हणजे हिंदू धर्माच्या इतिहासात अनेकवेळा घडलेली केवळ एक नवी प्रक्रिया असेल.)

मा. गो. वैद्य
6 जुलै 2014

4 comments:

  1. Very informative article about what Hinduism is.Thank you for sharing!!

    ReplyDelete
  2. लेख ज्ञानवर्धक हैं। धन्यवाद

    ReplyDelete
  3. साईं बाबा भगवान हैं की नहीं यह बताओ।

    ReplyDelete
  4. तुमचे भाष्यामृत आम्हास निरंतर लाभत राहो.......

    ReplyDelete